अजूनकाही
'शेतकऱ्यांच्या आत्महत्या' ही हल्ली खूप मोठी सामाजिक समस्या बनून राहिली आहे. निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी लहरी निसर्गामुळे कर्जबाजारी होतो. आणि तो एकदा का 'सावकारी पाशात' अडकला की, त्यातून कायमची सुटका होण्यासाठी त्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. अशा 'शेतकऱ्यांच्या आत्महत्यां'बाबत वेगवेगळं भाष्य करणारे अनेक मराठी चित्रपट यापूर्वी येऊन गेले आहेत. ‘रिंगण' या नवीन मराठी चित्रपटातही कर्जबाजारी शेतकऱ्याचाच विषय आहे. मात्र त्यामध्ये बाप-लेकाची हृदयाला भिडणारी कहाणी पाहावयास मिळते. शिवाय इतर सामाजिक विषयांवरही त्यामध्ये संयमितपणे परखड भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो.
एक साधीच कथा, मात्र तिचं उत्कृष्ट सादरीकरण याबाबत लेखक-दिग्दर्शक मकरंद माने यांनी पदार्पणातच एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं का गौरवण्यात आलं असावं, याचंही उत्तरं मिळतं.
'रिंगण'मध्ये पाहायला मिळते ती एका सर्वसामान्य बाप-लेकाची कहाणी. अर्जुन मगर हा एक सामान्य शेतकरी. कर्जाच्या विळख्यामुळे सावकारी पाशात अडकलेला. त्याचा एकुलता एक मुलगा अभिमन्यू हा आईविना वाढत असलेला शाळकरी मुलगा. लहानपणीच आई गेल्यामुळे त्याला आई देवाघरी गेल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे देवाच्या गावी गेल्यावर आपली आई नक्की भेटेल अशी त्याच्या बालसुलभ मनाची खात्री झालेली असते.
कर्जामुळे अर्जुनची जमीन सावकाराकडे अडकून पडते. एक लाख रुपये देऊन ती एका वर्षात नाही सोडवली तर ती सावकाराच्या घशात जाणार म्हणून अर्जुनचा जीव कासावीस होतो. नातेवाईकांकडून मदतीची नकारघंटा मिळताच अर्जुन अभिमन्यूला घेऊन पंढरपूरला जाण्याचं निश्चित करतो. पंढरपूरला म्हणजे देवाच्या गावी गेल्यावर आपली आई नक्की भेटणार म्हणून अभिमन्यूलाही आनंद होतो. पंढरपूरला गेल्यावर अर्जुनाला कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि अभिमन्यूला त्याची आई कोणत्या रूपात भेटते, हे पाहण्यासाठी या 'रिंगणा'तून गेल्यास एक सुखद अनुभव मिळू शकतो.
चित्रपटाची कथा अगदी साधी असून तिचं सादरीकरणही दिग्दर्शकानं साध्या पद्धतीनं केलं आहे. कथेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय असला तरी त्यावर कुठंही भडकपणे भाष्य करण्याचा प्रयत्न केला नाही. छोट्या छोट्या प्रसंगातून अर्जुनला जे अनुभव येतात, ते सामाजिक परिस्थितीचं चांगलं दर्शन घडवतात. पंढरपूरला गेल्यावर अभिमन्यूला भेटलेला निलेश हा केवळ त्याचा मित्र बनून राहत नाही, तर त्याचा मार्गदर्शकही बनतो. तसंच अर्जुनला देवळात भेटलेला वारकरी बाबा जीवनाचं सूत्र अगदी साध्यासोप्या शब्दांत समजावून सांगतो.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरही या चित्रपटात साध्या संवादातून मार्मिक भाष्य करण्यात आलं आहे. आपल्याला संकटातून विठोबाचं वाचवेल या आशेनं पंढरपूरला आलेल्या अर्जुनला चोरीचा पहिलाच फटका बसतो, त्यानंतर त्यानं रस्त्यावर सापडलेल्या छोट्या विठ्ठलाच्या मूर्तीशी केलेला संवाद छान रंगला आहे. 'पंढरपूरला राहत असूनही गेल्या कित्येक वर्षांत श्री विठ्ठलाच्या मंदिराची पायरीही चढलो नाही' असं सांगणारा वारकरीबाबा, ‘देव कोणताही चमत्कार करत नाही जे काही करायचं असतं, ते आपल्याला’ हे जीवनातील सत्य सांगताना अर्जुनला प्रयत्नवादाचं महत्त्वही पटवून देतो. त्यामुळे संकटाच्या दुष्टचक्राचं हे 'रिंगण' तोडून त्यातून बाहेर पाडण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे, हा संदेशही चित्रपट देऊन जातो.
चित्रपटात पंढरपूरचं 'दर्शन' छान घडवण्यात आलं आहे खरं, मात्र कथेत मोठ्या एकादशीचा (आषाढी किंवा कार्तिकी) उल्लेख असूनही त्या दिवशीची पंढरपुरातील प्रचंड गर्दी कुठंही पाहायला मिळत नाही, ही थोडीसी त्रुटी वाटते.
अर्जुनाच्या भूमिकेतील शशांक शेंडे आणि अभिमन्यूच्या भूमिकेतील साहिल जोशी यांनी सहजसुंदर अभिनय केला आहे. त्यांची 'बाप-लेकाची' केमिस्ट्री छान जुळली आहे. निलेश झालेला अभय महाजन आणि वारांगनेच्या भूमिकेतील कल्याणी मुळे यांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. रोहित नागभिडे यांनी कथेला अनुरूप अशी गाणी संगीतबद्ध केल्यामुळे कथा अधिक परिणामकारक होण्यास मदत झाली आहे.
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment