अजूनकाही
२७ जून हा पंचमचा (आर. डी. बर्मन) जन्मदिवस. त्याची आठवण काढताना नेहमी ‘तिसरी मंझिल’पासून सुरुवात केली जाते. पण त्याच्याबरोबर/आधी पंचमचे जे पाच कृष्णधवल चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातील गाण्यांचा फारसा उल्लेख होत नाही. आशा-किशोर-गुलज़ार आणि पंचम या चौघांनी कित्येक गाण्यांनी कानसेनांना तृप्त केलं. पण पंचमच्या सुरुवातीच्या गाण्यांत गायकांमध्ये लता-रफी आणि गीतकारांमध्ये शैलेंद्र, मजरूह, हसरत होते, हे ध्यानात घेतलं जात नाही.
पंचमचा संगीतकार म्हणून पहिलाच चित्रपट होता ‘छोटे नवाब’ (१९६१). मेहमूदच्या या चित्रपटातील लताचं अप्रतिम गाणं, ‘घर आजा घिर आयी बरखा सावरीया’चा उल्लेख याच सदरात आधीच्या लेखात (३ जून) येऊन गेलेला आहे. दुसरं एक मस्त खट्याळ गाणं लता-रफीच्या आवाजात यात आहे-
ओ मतवाली आँखोवाले
दिल तेरा होके रहेगा
गर तू इसे अपनाले
रफीच्या आवाजाचा वापर कसा करायचा हे पंचम सचिनदाकडे सहाय्यक म्हणून काम करत होता, तेव्हापासून चांगलं शिकलेला होता. तसंच लताच्या आवाजातील खट्याळपणाही (‘चोरी चोरी मेरे गली आना है बुरा’) ओळखून होता. परिणामी त्यानं स्वत:च्या या पहिल्याच चित्रपटात हे मस्तीभरं गाणं दिलं. मेहमूद आणि हेलनवर हे गाणं चित्रित आहे. हेलनसाठी आशा किंवा गीताचा आवाज वापरला जात असताना लताचा आवाज यशस्वीरीत्या वापरायचा हे एक आवाहनच होतं. आणि ते पंचमने आपल्या पहिल्याच चितत्रपटात पेलून दाखवलं. या गाण्यानं ‘बीनाका गीतमाला’त त्या वर्षी पाचवा क्रमांक पटकावला होता.
खरं तर यशस्वी चित्रपट संगीत म्हणून जे जे करायला पाहिजे, ते ते सर्व पंचमने या पहिल्या चित्रपटात केलं आहे. अभिजात असं ‘घर आजा घिर आयी’ हे गाणं दिलं आहे. रफी-शमशादच्या आवाजात ‘कोई आने को है’ ही ठसकेबाज कव्वालीही दिली आहे. ‘चुरा के दिल बन रहे हो’ हा लताच्या आवाजातील मुजरा आहे. रफी-लताच्या युगलगीतात नेहमीप्रमाणे बागेत एकमेकांच्या मागे धावत फिरणाऱ्या नायक-नायिकेसाठी प्रसन्न टवटवीत असं ‘आज हुआ मेरा दिल मतवाला’ हे गाणंही दिलं आहे.
या चित्रपटानंतर जवळपास चार वर्षं पंचमला दुसरं कामच मिळालं नाही. दुसरा चित्रपट मिळाला तोही परत मेहमूदचाच ‘भूतबंगला’ (१९६५). या चित्रपटात पंचमने स्वत: काम केलं (‘मैं भूखा हू तुझे खा जाउंगा’ या गाण्यात मेहमूद सोबत पंचम आहे). मेहमूदने दिग्दर्शित केलेलाही हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळालं आणि सगळा घोळ झाला. ज्या लहान मुलांसाठी चित्रपट होता, ती मुलं येऊ शकत नव्हती आणि मोठ्या माणसांना हा चित्रपट पोरकट वाटल्याने त्यांनी मनावर घेतलाच नाही. परिणामी यातील सुंदर गाणीही बाजूलाच राहिली.
तरी मन्ना डेच्या आवाजातील ‘आओ ट्विस्ट करे’ या गाण्यानं धूम केली. ‘बीनाका गीतमाला’त हे गाणं त्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आलं होतं. या गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष चित्रपटात या गाण्याचं निवेदन ‘बिनाका…’मुळे सर्वत्र लोकप्रिय झालेले अमिन सयानी यांनीच केलं होतं. पहिल्या चित्रपटात गाणी शैलेंद्रची होती, तर या दुसऱ्या चित्रपटाला हसरत जयपुरीची गाणी लाभली होतील.
हे गाणं लोकप्रिय झालं, पण त्याहीपेक्षा या चित्रपटात जे गाणं किशोरकुमारच्या तोंडी पंचमने दिलं ते गाणं अफलातून होतं. ‘आवो ट्विस्ट करे’ आज लोक विसरून गेले, पण काळाच्या कसोटीवर टिकलं ते - ‘जागो सोने वालो, सुनो मेरी कहानी, क्या अमिरी क्या गरिबी भूलो बात पुरानी’.
हे गाणं ऐतिहासिक यासाठी की, हे पंचम-किशोर या लोकप्रिय जोडीचं पहिलं गाणं आहे.
याही चित्रपटात लताचं एक नितांत गोड गाणं आहे-
ओ मेरे प्यार आ जा बन के बहार आ जा
दिल में हैं तीर तेरा पाऊ ना चैन हाये
ध्रुवपदात पहिल्या दोन ओळी झाल्यावर परत पहिली ओळ म्हणताना लताने ‘ओ मेरे’ या तिन्ही अक्षरांनंतर छोटा ठेहराव दिला आहे पंचमने. तसेच ‘प्यार’ या शब्दांवर गोड आलाप आहे. केवळ इतक्या साध्या बदलाने गाण्याला वेगळाच रंग चढतो. लताच्या आवाजात मस्ती, खोडकरपणा आणण्याचा हा प्रयत्न अफलातून आहे.
यातच किशोरकुमारच्या तोंडी लहान मुलांसाठीचं ‘एक सवाल मैं करू’ हे छानसं गाणं आहे. ‘छोटे नवाब’मध्येही मेहमूदने ‘हार हो के जीत हो’ हे छोट्या मुलांसाठीचं मस्त गाणं रफीच्या तोंडी घातलं आहे.
पंचमचे ‘तिसरा कौन’ (१९६५) आणि ‘पती-पत्नी’ (१९६६) हे दोन कृष्णधवल चित्रपट या पाठोपाठच आले. पण यातील गाणी फारच सुमार आहेत. शिवाय त्यांची गीतं आनंद बक्षीसारख्या सुमार दर्जाच्या गीतकारानं लिहिली आहेत.
ज्यातील गाणी आजही ऐकाविशी वाटतात असा पंचमचा तिसरा आणि शेवटचा कृष्णधवल चित्रपट होता, कोवळ्या राजेश खन्ना-आशा पारेखचा ‘बहारों के सपने’ (१९६७).
पहिल्या दोन्ही चित्रपटांत क्लब डान्सची मस्तीवाली गाणी ‘बिनाका गीतमाला’त हिट ठरली होती. पण हा पंचमचा पहिला असा चित्रपट आहे की, लताचं अभिजात ठरावं असं गाणं, ‘तिसरी मंझिल’च्या गाण्याच्या तोडीस तोड ‘बिनाका गीतमाला’च्या स्पर्धेत टिकलं. खरं तर ‘तिसरी मंझिल’ आणि ‘बहारों के सपने’ हे जवळपास एकाच वेळी आलेले चित्रपट. दोन्हीत आपली प्रतिभा दाखवणारं संगीत देऊन एकाच वेळी पंचमने दोन गोष्टी सिद्ध केल्या होत्या. आपण संपूर्णपणे नवीन काही घडवू शकतो, नवे पायंडे पाडू शकतो, नवी लाट संगीतात आणू शकतो आणि त्याच सोबत परंपरा पूर्णपणे पचवून त्या पद्धतीची अप्रतिम अभिजात गाणी देऊ शकतो.
या चित्रपटाला गीतकार लाभले होते मजरूह सुलतानपुरी. जेव्हा जेव्हा पंचमला प्रतिभावंत गीतकार लाभले (पुढच्या कारकिर्दीत गुलजार), तेव्हा तेव्हा त्याच्या गाण्यांना वेगळीच उंची प्राप्त झाली.
‘तिसरी मंझिल’च्या ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना’ आणि ‘ओ हसिना जुल्फोवाली’च्या सोबत ‘बिनाका गीतमाला’त टिकलेलं ‘बहारों के सपने’मधलं गोड गाणं होतं-
आजा पिया तोसे प्यार दू
गोरी बैंय्या तोपे वार दू
किस लिऐ तु इतना उदास
सुखे सुखे होठ अखियों में प्यास
किस लिऐ ओ ऽऽऽ
आपण लताच्या आवाजातील सगळ्या शक्यता कशा वापरू शकतो, हे परत एकदा पंचमने दाखवून दिले.
यातील दुसरं गाणं आहे मन्नादा आणि लताच्या आवाजात. सलिल चौधरींनी ‘मधुमती’मध्ये ‘चढ गयो पापी बिच्छुआ’मध्ये जसा लोकसंगीताचा अफलातून वापर केला होता, तसाच पंचमने या गाण्यात केला आहे. मन्नादाच्याच आवाजात शंकर-जयकिशनने 'तिसरी कसम'मध्ये 'चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजरेवाली मुनिया' दिलं आहे.
चुनरी संभाल गोरी उडी चली जाये रे
मार ना दे डंख कहीं नजर कोई हाय
या गाण्यात मजरूह आहे म्हणून पुढच्या सुंदर ओळी आल्या आणि लतानेही त्याचं सोनं केलं.
फिसले नहीं चल के कभी दुखकी डगर पे
ठोकर लगी हस दे हम बसने वाले दिल के नगर के
मजरूह-हसरत-शैलेंद्र-राजेंद्र कृष्ण-शकिल-साहिर यांशिवाय इतर कुणी लिहिलं असतं तर त्याला हे जमलं नसतं. ओ.पी.नय्यर आणि पंचम या दोन संगीतकारांनी चांगल्या गीतकारांसाठी आग्रह का धरला नाही हे उमगत नाही. त्यांची कितीतरी उच्चकोटीची गाणी केवळ शब्दांमुळे मार खातात.
या चित्रपटातलं अजून एक सुंदर गाणं आहे -‘क्या जानू सजन, होती है क्या गम की शाम’. पण हे गाणं रंगीत आहे. लताच्या आवाजातील दु:खाची आर्ततेची छटा ओळखून पंचमने तशी रचना केली आहे.
नंतर पुढचा आलेला चित्रपट होता ‘पडोसन’ (१९६८). त्यानं जो इतिहास घडवला, तो तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर मात्र पंचमचा एकही चित्रपट कृष्णधवल नाही. मेलडीला मागे टाकून तालाला ठेक्याला पुढे नेणारा पाश्चात्य सुरावटीच्या वाद्यमेळ्याला (ऑर्केस्ट्रा) महत्त्व दिलं, असा आरोप झेलणारा पंचम शेवटच्या चित्रपटात ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’मध्ये अप्रतिम मेलडीवालं संगीत देऊन सगळ्यांच्या मनात कायमस्वरूपी घर करून निघून गेला.
इतकी वर्षं उलटून गेली. त्याच्या विविध गाण्यांची चर्चा होत राहते, पण या सुरुवातीच्या गाण्यांवर फारसं बोललं जात नाही. म्हणून ही एक ‘भुली हुई यादें’ अशी आठवण...
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Dhananjay Kulkarni
Mon , 03 July 2017
आनंद बक्षी सुमार गीतकार कसा?