अजूनकाही
बहुतांश पावसाची गाणी लताच्याच आवाजात आहेत, पण पावसाचा एक शृंगारिक मादक पैलू आहे तो या गाण्यांत उमटत नाही. त्यासाठी सगळ्यात पोषक आवाज आहे गीता दत्तचा. उच्छृंखल न होता शृंगाराचं सौंदर्य प्रकट करण्याची अफलातून ताकद तिच्या आवाजात आहे. हे पहिल्यांदा ओळखलं सचिन देव बर्मन यांनी. ‘बाजी’ (१९५१) हा गीताच्या आवाजाला खऱ्या अर्थानं ‘ब्रेक’ देणारा सिनेमा. गीताबालीसारखा गीताच्या आवाजाला पडद्यावर न्याय देणारा खट्याळ चेहरा. एस.डी.बर्मनचं अतिशय वेगळं असं संगीत. चित्रपटातली आठपैकी सहा गाणी गीताच्या आवाजात आहेत. किशोर कुमार आणि शमशादला फक्त एक एक गाणं आहे. ‘बाजी’चं गाजलेलं गाणं म्हणजे ‘तदबीर से बिगडी हुयी तकदीर बना ले’ (या ‘तदबीर’ आणि ‘तकदीर’ दोन वेगवेगळ्या अर्थाच्या शब्दांमध्ये बहुतांश वेळा घोळ केला जातो.). पण याच चित्रपटात गीताचं पावसावरचं एक अफलातून गाणं आहे -
ऊईऽऽ देखके अकेली मुझे बरखा सताये
गालों को चुमे, कभी छिटें उडाये रे... टिप टिप टिप.. टिप टिप..
असली खेळकर शब्दरचना साहिरने केली असेल हे त्याची पुढची बहुतांश गाणी ऐकून पटत नाही. ‘गालों का चुमे, कभी छिटें उडाये’ या ओळीवर पाण्याचे थेंब गालांवर पडल्याचा अप्रतिम अभिनय डोळ्यांतून गीताबाली साकार करते. (‘बारादरी’ (१९५५) मध्ये नाशाद (नौशाद नाही)ने लताच्या आवाजात पावसाचं एक गाणं दिलं आहे. गीताबालीचंच गाणं आहे- ‘अब के बरस बडा जुलूम हुआ, मोरा बचपन गया हो राम’. पण लताच्या आवाजात ही तक्रार पूर्णत: खुलत नाही. नाशादच्या संगीतातही ती ‘किक’ बसत नाही. हेच गाणं गीताच्या आवाजात आणि सचिन देव बर्मन किंवा ओ.पी.नय्यरने अतिशय वेगळं करून दाखवलं असतं.)
गीताबालीशिवाय गीता दत्तच्या आवाजाला न्याय देऊ शकणारी नायिका म्हणजे मधुबाला. गुरुदत्तचाच दुसरा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ (१९५५) मध्ये असं सुंदर गाणं आहे. ओ.पी.नय्यरनी मजरूहकडून लिहून घेतलेले बोल आहेत-
थंडी हवा काली घटा आ ही गयी झुम के
प्यार लिये डोले हसी नाचे जिया घुम के
आता या गाण्यात मधुबाला ओठांच्या ज्या हालचाली ‘घुम के’ उच्चारताना करते त्याला तोड नाही. गीताच्या आवाजाने अतिशय नेमका परिणाम साधला जातो. जसं की शैलेंद्र-लता-सलिल चौधरी असंच मजरूह-गीता-ओ.पी.नय्यर आणि त्याला जोडला गेलेला चौथा कोन म्हणजे मधुबाला. आख्ख्या गाण्यात एक टवटवीतपणा आहे.
खरं तर गीताच्या आवाजाला सचिन देव बर्मन आणि ओ.पी.नय्यर यांनी ज्या पद्धतीनं खुलवलं आहे, तसं इतरांच्या संगीतात फारसं नाही. (त्यामुळे गीताच्या पावसाळी गाण्यांसाठी केवळ या दोघांच्याच संगीताचा विचार केला आहे.)
ओ.पी.नय्यरचा ‘छूमंतर’ (१९५५) हा जॉनी वॉकर-श्यामा-अनिता गुहा यांच्यावरचा चित्रपट. यातील गीताचं ठसकेबाज गाणं आहे-
जब बादल लहराया, जिया झुम झुम के गाया
आ जा सनम, तेरी कसम मचलती रात है
हे गाणं पडद्यावर सादर करणारी श्यामा आहे. गीताच्या आवाजात तिचं सगळ्यात गाजलेलं गाणं ‘ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है’. गीताबाली मधुबालाची मजा श्यामाच्या अदाकारीत नाही.
गीताच्या स्वरात एक नाचरेपण आहे. मोकळा सुटलेला हा स्वर नाचाला अतिशय पोषक. ‘लाजवंती’ (१९५८) मध्ये ‘आजा छाये कारे बदरा रे, छम छम बरसे नैन कजरा रे’ हे गाणं केवळ नाचासाठीचं गाणं आहे. लतापेक्षा अतिशय वेगळ्या अशा ठसक्यात गीताचा सूर लागतो. ‘मन के मेरे मोर प्यारे, पुकारू तुझे मोरनी बनके मैं’ अशा ओळी गाताना लताचा आवाज व्याकूळ लागू शकतो, पण गीताच्या आवाजात मादीने नराला दिलेलं आव्हान आहे. मजरूहनी पुढची ओळ गीता गाणार आहे हे समजून ‘मन के मेरे मोर प्यारे, जरा देखो कैसे चलू तन के मै’ अशी लिहिली. अन्यथा लताचा आवाज असता तर ही ओळ शोभली नसती. संगीतातही सचिन देव बर्मन यांनी आक्रमक तालवाद्यांचा वापर जास्त केला आहे. लता असती तर तंतूवाद्यांचा वापर वाढला असता.
केवळ आक्रमक सूर लावल्यानेच मादकता सिद्ध होत नाही. सचिन देव बर्मन यांनी परत मजरूहलाच हाताशी धरून ‘सुजाता’ (१९५८) मध्ये गीताचं एक सुंदर पावसाळी गीत दिलं आहे.
काली घटा छाये मोरा जिया तरसाय
ऐसे में कही कोई मिल जाय...हाय...
सगळी आक्रमकता बाजूला ठेवून, आव्हानात्मक मादकता विसरून स्त्री-पुरुषाबद्दलची सनातन ओढ व्यक्त करताना शालिनतेत आपल्या वासनेचं आव्हान समोर ठेवते. गीतानं हा भाव अप्रतिम टिपला आहे. या गाण्यासाठी गीताबाली किंवा मधुबाला यांच्यापेक्षा पडद्यावर नुतन आहे हे किती संयुक्तीक. तिच्या चेहऱ्यालाच एक शालिन चौकट आहे. गीताच्या आवाजाचं हे वैशिष्ट्यच आहे की, मादकतेसोबतच शालिनता, वेदना (‘वक्त ने किया क्या हसी सितम’), भक्ती (‘ना मै धन चहू ना रतन चाहू’) त्याच ताकदीनं तिच्या स्वरांतून प्रभावीपणे व्यक्त होते.
गीताचा आवाज आणि वहिदा रेहमानचा चेहरा यांचंही काहीतरी नातं असावं. कारण गुरुदत्तनं जेव्हा जेव्हा हा योग आपल्या चित्रपटात जूळवून आणला, तेव्हा तेव्हा ती सगळी गाणी गाजली. गुरुदत्तच नाही तर देव आनंदच्या ‘कालाबाजार’ (१९६०) मध्येही हा योग जुळून आला आहे. या गाण्यात एकटी गीता नाही, तर सोबत रफीचा मधाळ आवाजही आहे. ते अवीट गाणं आहे-
रिमझिम के तराने लेके आयी बरसात
यादी आयी किसीसे वो पहली मुलाकात
शैलेंद्र हा श्रेष्ठ गीतकार. शब्दांची ओढाताण तो कधीच होऊ देत नाही. पहिल्या भेटीत कधीच फारसे शब्द उमटत नाहीत हे त्याने इतक्या सहजतेनं लिहिलं आहे- ‘मैं ना बोलू आंखे करे आखियों से बात, रिमझिम के तराने लेके आयी बरसात’. या गाण्यावर वहिदा जी अदा पडद्यावर दाखवते ती लाजवाब! वहिदाचा चेहरा अतिशय ‘फोटोजनिक’ आहे, हे हेरणाऱ्या गुरुदत्तला सलाम. रफी-गीता ही जोडी द्वंदगीतातील जुळून आलेली जोडी आहे. जसं की लता-तलत, आशा-किशोर.
गीताचं एक अफलातून पावसाळी मदमस्त गाणं ‘मंझिल’ (१९६०) मध्ये सचिन देव बर्मन यांनी दिलं आहे. सोबत रफीचा नशिला सूर आहे. देव-नूतन हे पडद्यावर सगळ्यात जास्त जुळून आलेलं रसायन. याच जोडीवर हे गाणं आहे.
चुपके से मिले प्यासे प्यासे कुछ तुम कुछ हम
क्या हो जो घटा खुलके बरसे रूम झुम रूम झुम
पाऊस कुठेच नाही, पण यांच्या प्रेमाचा जो पाऊस कोसळतोय त्याला तोड नाही. ‘रूम झुम’ हा शब्द रफी आणि गीता अशा काही पद्धतीनं उच्चारतात की, कुणाही ऐकणाऱ्याला हा पाऊस वेगळाच असल्याची अनुभूती सहज येते. सहसा गाण्याची एक ओळ एकानं गायची आणि दुसरी दुसऱ्यानं अशी पद्धत असते. पण सचिनदांनी इथं सगळंच बदलून टाकलं आहे. सुरुवातीला गीता केवळ शब्द उच्चारते. मग हळूच गाणं सुरू होतं. मग अर्धी ओळ रफीची, अर्धी ओळ गीताची. मग परत त्यांची आलापी. कळतच नाही काय चालू आहे. सगळ्याची मिळून अशी काही नशा तयार होते की, ज्याचं नाव ते. मजरूह-रफी-गीता-सचिनदा आणि पडद्यावर देव-नूतन यांनी माधुर्याचा अक्षरश: हल्लकल्लोळ करून टाकला आहे. गीताच्या आवाजाला सगळ्यात जास्त जुळणारा आवाज रफीचाच का आहे, ते या गाण्यात लक्षात येतं.
एस.डी. आणि ओ.पी. सारखंच रोशनच्या संगीतातही ‘दो रोटी’ (१९५७) मध्ये ‘घिर के बरसे ये घटाये’ हे मदमस्त गाणं गीतानं गायलं आहे. हेमंतकुमारच्या ‘मिस मेरी’ (१९५७) मधलं ‘आयी रे घिर घिर’ फारसं विशेष वाटत नाही. गीताचं वैशिष्ट्य हे की, पावसाचं मदभरं रूप आपल्या आवाजात साकारतानाच ‘आनंदमठ’ (१९५२) मध्ये तिनं पावसात लहानपणीची आठवण जागवताना (‘नैनों मे सावन’) आर्त सूर लावला आहे. असाच सूर कन्नू रॉयच्या संगीतात ‘उसकी कहानी’ (१९६६) मध्ये कैफी आझमींच्या ‘आज की काली घटा’ गाण्यातही लागला आहे.
लताच्या आवाजात पाण्याचा नितळपणा अनुभवायला येतो. गीतानं आपल्या आवाजात पावसाची मादकता-शृंगार आणला आहे.
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment