दाक्षिणात्य सिनेमा समजून घेताना : मल्याळम सिनेमा (मॉलिवुड)
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुदर्शन चव्हाण
  • २०१६मधील काही मल्याळम सिनेमे
  • Mon , 29 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र मॉलिवुड Molywood अदुल गोपालकृष्णन Adoor Gopalakrishnan तमिळ सिनेमा Collywood टॉलिवुड Tollywood सँडलवुड Sandalwood

संपूर्ण दक्षिण भारतात ५ राज्ये आहेत आणि त्यात प्रामुख्याने ४ भाषा बोलल्या जातात. तेलुगु (तेलंगण, सिमान्ध्र), तमिळ (तामिळनाडू), कन्नड (कर्नाटक), मल्याळम (केरळ). या चारही भाषांमध्ये सिनेमे बनवले जातात. त्यांची तोंडओळख करून देणाऱ्या लेखमालिकेचा हा शेवटचा भाग. ‘दाक्षिणात्य सिनेमा समजून घेताना : तमिळ सिनेमा (कॉलिवुड)’ हा पहिला लेख २५ मे रोजी प्रकाशित झाला, ‘दाक्षिणात्य सिनेमा समजून घेताना : तेलुगू सिनेमा (टॉलिवुड) आणि कन्नड सिनेमा (सँडलवुड)’ हा दुसरा लेख २६ मे रोजी प्रकाशित झाला. तर आजचा हा शेवटचा लेख.

……………………………………………………………………………………………

आपण आतापर्यंतचे जे तीन लेख पाहिले ते साधारणतः तीनही भाषांतल्या सिनेमाचे गुण, दोष, आव्हानं अशा अंगाने विचार करणारे होते. पण मल्याळम सिनेमाचा विचार करताना त्यातले फक्त गुण आपण पाहू शकतो. कारण त्या सिनेमाने इतकं काही साध्य केलंय की, त्याचे दोष कुठे काढावे आणि आव्हानांचा विचार मराठी (आणि बहुतांशी हिंदी) सिनेमे पाहून वाढलेला प्रेक्षक करू शकेल का हा प्रश्न आहे.

ज्याचं एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर, ‘जयदेव’ या दिग्दर्शकाने १९९९ साली नवरसांवरती नऊ फिल्म बनवण्याचा मानस केला. आणि आज १८ वर्षानंतर त्यातल्या ५ त्याने बनवल्या आहेत. या सगळ्या फिल्म माझ्या पाहण्यात आल्या नसल्या तरी कलात्मक विचारांची ही झेपच थक्क करणारी आहे. आयुष्यभरासाठी असा निर्णय घ्यायचा, तो नेटाने पुढे न्यायचा आणि तुमचा सिनेमा उद्योग त्यात तुम्हाला साथ देतो. म्हणून या उद्योगाचं एवढं कौतुक करावंसं वाटतं. आणि या कारणासाठीच मी म्हटलं की, या सिनेमाच्या आव्हानांबद्दल आपण नाही बोलू शकत. (सप्टेंबरमध्ये यातला पाचवा ‘वीरम’ हा कुणाल कपूर अभिनीत सिनेमा हिंदीत प्रदर्शित होतोय. त्याचे ट्रेलर youtube वरती नक्की पाहा.)

१९८४ मध्ये भारतातली पहिली 3D फिल्म (माय डिअर कुट्टीचतन- छोटा चेतन) याच भाषेत बनली होती. जी आपल्याकडे उर्मिलाला नाचवून विकावी लागली. पहिली लाइव्ह अॅक्शन अॅनिमेशन फिल्म (ओ’फॅबी, १९९३), पहिली फीचर फिल्म, जी डिजिटल platform वर विकली जाणे, क्राउड सोर्सिंग करून फिल्म बनवणे, हे सर्व प्रयोग मल्याळम सिनेमाने करून झाले आहेत. यावरून तो इतर भारतीय सिनेमाच्या किती योजनं पुढं आहे याचा अंदाज यावा. 

कलात्मक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांत मल्याळम सिनेमाची झेप ही अत्यंत समाधानकारक आहे. कलात्मक रीतीने विचार केला तर जिथं कानसारख्या महोत्सवात १९४६ नंतर इतर भाषांतला भारतीय सिनेमा एकही मोठा पुरस्कार जिंकू शकला नाही (बंगाली सिनेमा वगळता), तिथं मल्याळम सिनेमाने ‘कॅमेरा डी’ओर’सारखा मोठा सन्मान दोन वेळा मिळवला आहे (‘पिरावी’ आणि ‘मरण सिंहासनम’). केरळमध्ये असणारी सामाजिक स्थिती ही त्यांच्या कलात्मकच नव्हे तर व्यावसायिक सिनेमातही जागोजागी दिसते. तिथे कम्युनिस्ट पार्टीची असणारी कार्यप्रणाली, त्यासाठी आयुष्य वाहून घेणारे कार्यकर्ते, केरळमध्ये असणारा विस्थापितांचा प्रश्न, तिथं बनवले जाणारे बी–ग्रेड सिनेमे यांसारख्या कैक प्रश्नांवर एकाहून एक सुंदर सिनेमे इथं बनले आहेत.

तांत्रिकतेच्या बाबतीतसुद्धा मल्याळम सिनेमात बराच विचार होताना दिसतो. कारण छायाचित्रण आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सिनेमातले आवाज (संगीत नव्हे) या दोनही तांत्रिक गोष्टींवरची त्यांची पकड वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या शेजारील राज्यांतच सरसकट डब सिनेमे पाहण्याची सवय प्रेक्षकांना आहे, त्याउलट कैक मल्याळम सिनेमांत तुम्हाला या गोष्टींवर बारकाईने काम केल्याचं पाहायला मिळेल. 

या एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी सांगता येऊ शकणाऱ्या मल्याळम सिनेमाचं एक यश त्याच्या डेमोग्राफिक्समध्ये आहे असं म्हटलं जातं. अर्थात ते पूर्ण सत्य नसलं तरी या यशाचा नक्कीच एक महत्त्वाचा भाग आहे. ९०टक्क्यांहून अधिक साक्षर जनता आणि ५० टक्क्यांच्या जवळपास शहरीकरण. यावरून लक्षात येऊ शकतं की, मुळात इथला प्रेक्षक इतर भारतीयांपासून किती वेगळा असू शकतो. त्यात एकूण लोकसंख्येच्या सहा टक्क्यांहूनही अधिक जनता ही मध्य पूर्वेत अबुधाबी-दुबई इथं विस्थापित झाली आहे. ज्यामुळे तिकडेही या सिनेमाचं मार्केट बनत चाललंय. 

पण हे असे मुद्दे झाले ज्यासाठी उद्योगाला स्वतःला असे काही प्रयत्न करावे लागले नाहीत. मग त्यांनी जाणीवपूर्वक केलेले बदल कुठले? त्यांच्या इतिहासावर एक छोटीशी नजर फिरवूनच पाहूया. 

सुरुवातीला मल्याळम स्टुडिओ हे तेलुगू आणि कन्नड सिनेमाप्रमाणे चेन्नईतच होते. त्यात कन्नड आणि तेलुगूपेक्षा मल्याळम बोलणारी लोकसंख्याही बरीच कमी. त्यामुळे ५० च्या दशकापर्यंत मल्याळम सिनेमा बनण्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं. पण आधी जे. सी. डॅनियल यांचा ‘त्रावणकोर’ आणि नंतर कुचाको यांचा ‘उदय’ या सारखे स्टुडिओ केरळातील विविध शहरांत उभे राहत गेले आणि मल्याळम सिनेमाला आपल्या राज्यातच स्थैर्य येत गेलं.

एक गोष्ट जी मल्याळम सिनेमा आणि इथल्या कलाकारांबद्दल नमूद करावी वाटते, जी इतर भाषातील सिनेमा उद्योगात घडली नाही ती म्हणजे इथले साहित्यिक, कवी, कर्नाटकी संगीतातले शास्त्रीय संगीतकार यांनी कधीही सिनेमा या माध्यमाला कमी लेखलं नाही. एम. टी. वासुदेवन नायरसारखे ज्ञानपीठविजेते साहित्यिक, भास्करन, कुरूप यांच्यासारखे कवी आणि अनेक संगीतकार, गायक (येसुदास, चित्रा) असे सगळेजण एकत्र आणि म्हणून मल्याळम सिनेमा बहरला. काही कवी, साहित्यिक तर इथं निर्मातेही झाले. जे लेखकांच्या स्टिरिओटाइपशी अगदीच जुळणारं वाटणार नाही. सिनेमा ही अशी कला आहे जी साहित्य, संगीत, चित्र, नाटक या सर्व कलांना एकत्रित घेऊन चालते. पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी तिला इतर माध्यमातील कलाकारांनी कायम दुय्यम कला म्हणून पाहिलंय. पण त्याउलट त्यांनी जर सिनेमाची भाषा समजून रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मल्याळम सिनेमा. आपल्याकडील प्युरीटन (कर्मठ) साहित्यिक किंवा संगीत क्षेत्रातील मंडळींनी ही बाब नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे.

पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिकलेले कलाकार आणि तंत्रज्ञ. भारतात बऱ्याचदा कौटुंबिक व्यवसाय म्हणून किंवा आवड होती म्हणून किंवा गरिबीतून फिल्म या व्यवसायात येण्याचा एक प्रघात आहे. चित्रपट शिक्षण ही तर सहज खिल्ली उडवण्याची गोष्ट आहे किंवा कित्येक दिग्दर्शकही ‘मी कसलंही व्यावसायिक शिक्षण घेतलं नाही’ हे अभिमानाने सांगतात. त्याच वेळी मल्याळम सिनेमातले सर्वाधिक दिग्दर्शक, तंत्रज्ञ हे व्यावसायिक शिक्षण घेतलेले आहेत. साठच्या दशकानंतर इथं येणाऱ्या सर्व पिढ्या या भारतात किंवा परदेशात शिक्षण घेऊन आलेल्या आहेत. त्यामुळेही सिनेमाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा अधिक शास्त्रोक्त आहे.

केवळ सिनेमाचे विद्यार्थीच नव्हे तर सामान्य प्रेक्षकालाही जागतिक सिनेमाची ओळख व्हावी, त्यातून नवे कलाकार घडावे यासाठी ६०-७०च्या दशकात इथं फिल्म सोसायटी चळवळ चालू झाली. ज्यातून अनेक फिल्म सोसायटी केरळमध्ये उभ्या राहिल्या. (आज केरळ फिल्म फेस्टिव्हल हा भारतातला एक मानाचा चित्रपट महोत्सव समजला जातो.) ज्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांच्या नजरा तयार होण्याला मदत झाली. त्यामुळे चांगल्या सिनेमाची अपेक्षाही केली जाऊ लागली आणि तो पुरवलाही गेला.

असा हा सर्वार्थाने संपन्न असा सिनेमा. ‘हे बहुधा सगळे कलात्मक सिनेमाच बनवतात’ असं वाटणाऱ्यासाठी मल्याळम सिनेमाचं इतक्या कमी लोकसंख्येतही भारतातील चौथा सगळ्यात मोठा सिनेमा व्यवसाय असणं हे बरंच काही सांगून जाणारं असावं. त्यांच्या इतिहास आणि विश्लेषणातून आपल्याला थोडीशी जरी त्यांची सिनेमाकडे पाहण्याची नजर घेता आली तर केवळ या मल्याळम सिनेमाच्या लेखाचाच नव्हे तर सबंध लेखमालेचा उद्देश सफल झाला असं मी समजेन. 

……………………………………………………………………………………………

काही महत्त्वाचे आणि पाहण्यासारखे मल्याळम दिग्दर्शक -

रामू करीयत,एम. टी. वासुदेवन नायर, अदूर गोपालकृष्णन, जी अरविंदन, जॉन अब्राहम, के. जी. जॉर्ज, शाजी एन. करून, (हायली रेकमंडेड), फजील, श्रीनिवासन, जयराज.

आणखी अशी बरीच नावं घेता येतील, पण सुरुवात करण्यासाठी हे बरेच आहेत. आणि अगदीच आजचा हलकाफुलका पण आजचा चांगला अर्बन सिनेमा पाहायचा असेल तर ‘अंजली मेनन’चा सिनेमा नक्की पाहावा. 

……………………………………………………………………………………………

लेखक पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

chavan.sudarshan@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......