'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' - एका विक्रमवीराची जीवनगाथा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स'चं पोस्टर
  • Sat , 27 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा सचिन : ए बिलियन ड्रीम्स Sachin - A Billion Dreams

सचिन तेंडुलकर केवळ भारतातलाच नव्हे तर एक महान जागतिक फलंदाज. सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करणारा एक विक्रमादित्य. ज्याची शेन वॊर्न सारख्या महान जागतिक गोलंदाजानेदेखील प्रशंसा केली आहे. अशा एका विक्रमवीराची जीवनगाथा 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर साकार करण्यात आली आहे. ही जीवनगाथा सचिनच्याच निवेदनरूपी शब्दांत सांगण्यात आली आहे. त्यामुळे तिला काहीसे डॉक्युमेंट्रीचे स्वरूप आले आहे खरे, मात्र सचिनच्या जीवनावर एक पूर्ण चित्रपट पाहिल्याचा आनंद देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

या चित्रपटात सचिनच्या लहानपणापासून त्याने क्रिकेट विश्वात केलेल्या गौरवपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आहे. अर्थात 'सचिन- एक हिरो' म्हणूनच या चित्रपटाची पटकथा लिहिण्यात आली असल्यामुळे प्रामुख्याने त्याच्या कौटुंबिक जीवनाबरोबरच क्रिकेटविश्वातील त्याच्या महत्त्वाच्या कामगिरीवरच प्रकाशझोत टाकण्यात आल्याचे पडद्यावर पाहावयास मिळते. सचिनच्या महत्त्वाच्या सामन्यातील अपयशाला केवळ स्पर्श करण्यात आला आहे, तसेच क्रिकेटविश्वातील 'फिक्सिंग'सारख्या काळ्या बाजूनेही निव्वळ दर्शन घडवण्यात आले आहे.

सचिनचे बालपण, क्रिकेट खेळासाठी त्याला त्याच्या भावांकडून (अजित आणि नितीन) मिळालेले मार्गदर्शन. प्राध्यापक असलेल्या वडिलांकडून (रमेश तेंडुलकर) मिळालेले चांगले संस्कार, क्रिकेटसाठी आचरेकर सरांसारखे लाभलेले गुरू आणि सहधर्मचारिणी बनल्यानंतर अंजलीने सचिनला दिलेली उत्तम साथ, यामुळे चित्रपटाचा सुरुवातीचा भाग आकर्षक बनला आहे. मात्र नंतर सचिनची क्रिकेटविश्वातील कारकीर्द ही स्टेडियमवर 'लाईव्ह' स्वरूपातच पाहायला मिळते. त्यामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद येतो. एका दृष्टीने ती सचिनप्रेमींसाठी पर्वणीच वाटते.  सचिनची एकामागोमाग एक अशी होत गेलेली शतके आणि त्याने आपल्या विदेशी दौऱ्यात पाडलेला धावांचा पाऊस या साऱ्याबरोबरच प्रारंभीच्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सचिन असूनही मिळालेले अपयश आणि शेवटी २०११ सालच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला अजिंक्यपद मिळाल्यामुळे सचिनचे साकार झालेले स्वप्न हे सारे काही पडद्यावर प्रेक्षकांच्या साक्षीने पाहावयास मिळते. सचिनने निवृत्ती पत्करल्यानंतर त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केलेले भाषण आणि त्यावेळी त्याला हजारो चाहत्यांनी भावुक मनाने दिलेला निरोप मात्र मनाला चटका लावून जातो.

भारतीय क्रिकेटपटूंपैकी यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन आणि महेंद्रसिंह धोनी यांचे 'बायोपिक' चित्रपट येऊन गेले, मात्र त्यामध्ये इमरान हाश्मी आणि सुशांत सिंग राजपूत यांनी अनुक्रमे अझरुद्दीन आणि धोनी यांच्या भूमिका केल्या होत्या. मात्र या चित्रपटात स्वतः सचिननेच सचिनची भूमिका केली आहे. त्यामुळे पडद्यावर रिअल सचिनकडूनच त्याची जीवनगाथा ऐकायला मिळते. त्याचबरोबर सचिनबरोबर क्रिकेट खेळलेले काही प्रमुख भारतीय क्रिकेटपटू तसेच अमिताभ बच्चन यांच्यासारख्या नामवंत व्यक्तींनी सचिनबाबत व्यक्त केलेली मतेही ऐकायला मिळतात. त्यामुळे हा 'डॉक्युड्रामा' चांगला रंगला आहे.

थोडक्यात हा चित्रपट सचिनभक्तांसाठी एक खास पर्वणी आहे.
……………………………………………………………………………………………
'सचिन : ए बिलियन ड्रीम्स'  
दिग्दर्शक - जेम्स एरस्किन
संगीत - ए. आर.रहमान
कलाकार - सचिन आणि इतर

……………………………………………………………………………………………

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख