अजूनकाही
उघडे बोडके माळ दिसताहेत. कष्टकरी शेतकरी कामावर निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर मन्ना डेचा आवाज शैलेंद्रचे शब्द घेऊन उमटत जातो,
गंगा और यमुना की गहरी है धार
आगे या पिछे सबको जाना है पार
धरती कहे पुकार के
बीज बिछा ले प्यार के
मौसम बीता जाय
मौसम बीता जाय
गेली किमान दहा हजार वर्षे मौसमी पावसाकडे डोळे लावून बसलेला माणूस मृग नक्षत्रात पेरणी करत आला आहे. शेतीचे पुरावेच आपल्याकडचे दहा हजार वर्षांपासूनचे आहेत. पहिला पाऊस पडून वाफसा आला की, शेतकरी पेरणी करून मोठ्या पावसाची प्रतिक्षा करतो. पावसाचे थेंब कोसळायला लागतात आणि ‘धरती कहे पुकार के’ लिहिणारा शैलेंद्र त्याच्या पुढची भावना शब्दांत लिहून जातो-
हरियाला सावन ढोल बजाता आया
धिक तक तक मन के मोर नचाता आया
लता आणि मन्नादाच्या आवाजाचा असा अप्रतिम गोफ सलिल चौधरी यांनी गुंफला आहे की, त्याला तोड नाही. हे गाणे बिमल रॉय यांच्या गाजलेल्या ‘दो बिघा जमिन’ (१९५३) मधील आहे.
एरव्ही हिंदी चित्रपटांतील पावसाची गाणी म्हणजे पावसाची प्रतिमा वापरून लिहिलेली प्रेमाची गाणी असंच स्वरूप राहिलेलं आहे. जवळपास सगळी गाणी अशीच आहेत. पण ‘हरियाला सावन’सारखी काही मोजकी गाणी मात्र याला अपवाद आहेत. यात केवळ पावसाचेच वर्णन आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील प्रेमाचा उत्कट आविष्कार म्हणजे शेती. शिकार करून खाणारा म्हणजेच मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला आणि माणसाच्या संस्कृतीला सुरुवात झाली.
मातीबद्दलचे प्रेम, मातीला असलेली आभाळाची ओढ हे सगळे काव्यात्म पातळीवर ‘हरियाला सावन’मध्ये आले आहे. निसर्ग म्हटलं की एरव्हीच शैलेंद्रच्या शब्दांना वेगळीच कळा प्राप्त होते. इथे निसर्ग आहे शिवाय सृजनाचे प्रतीक असलेला पाऊस आहे. शैलेंद्र लिहितो-
ऐसे बीज बिछा रे,
सुख चैन उगे दुख दर्द मिटे,
नैनों में नाचे रे सपनों का धान हरा
हे खरंच आहे की, शेतकरी ते हिरवं स्वप्न पाहतो म्हणूनच तर या आख्ख्या जगाला खायला भेटते आहे.
गाण्याला लताचा आवाज आहे. अविरत झुळझुळ वाहणार्या झर्यासारखा हा आवाज निसर्गाबाबत भावभावना व्यक्त करायला अतिशय पोषक आहे. त्याला जोड आहे ती मन्नाडेच्या आवाजाची. सलिल चौधरी यांनाही निसर्गाची अतिशय बारीक जाण आहे. त्यांचे संगीत निसर्गाचे वर्णन करताना विशेष फुलते. त्यांच्या इतरही गाण्यांत निसर्ग अतिशय परिणामकारकरीत्या उमटला आहे.
अतिशय कमी चित्रपटांना संगीत दिलेल्या गायक संगीतकार जगमोहन याने ‘सरदार’ (१९५५) चित्रपटात गीता दत्तच्या आवाजात पावसाचे एक मस्तीखोर गाणं दिलं आहे-
बरखा की रूत में हे हो हा
रस बरसे नील गगन से
कोई कहे बादल से मोती गिरे
कोई कहे रात हाय रोती फिरे
अशी आगळी वेगळी शब्दकळा असलेलं उद्धवकुमारनी लिहिलेलं गीत. गीता दत्तच्या आवाजने पावसाची मस्ती या गाण्यात उतरलेली जाणवते. अशोक कुमार-बीना रॉय यांचा हा चित्रपट.
‘मदर इंडिया’ (१९५७) मध्ये ‘मेघ मल्हार’ रागावर आधारित एक सुंदर गाणे नौशाद यांनी संगीतबद्ध केले आहे. नौशाद यांना शास्त्रीय संगीताची फार चांगली जाण होती. ‘दुख भरे दिन बीते रे भैय्या अब सुख आयो रे’ या गाण्यात प्रत्यक्ष पाऊस नाही. पण पावसामुळे पिकलेली शेती, त्यामुळे आलेली समृद्धी याचे सुंदर वर्णन शकिल बदायुनीने केले आहे. शमशाद-रफी-मन्नादा-आशा असले चार आवाज नौशाद यांनी या गाण्यात वापरले आहेत. नर्गिस राजकुमार अशी आधीची पिढी आणि राजेंद्रकुमार-सुनील दत्त-कुमकुम अशी पुढची पिढी. आशाच्या आवाजात ‘मधुर मधुर मनवा गाये’ कुमकुम झोक्यावर बसून म्हणते, तेव्हा ते सूरही तसेच झोका घेत असल्याचा भास होतो.
निखळ पावसाचे एक गाणे ‘बरखा’ (१९५९) चित्रपटात आहे. चित्रगुप्तचे संगीत आणि लताचाच आवाज आहे. हे गीत लिहिलं आहे राजेंद्रकृष्ण यांनी.
बरखा बहार आयी बुंदो के हार लायी
रिमझिम ने छेडे तराने
अशी साधी शब्दकळा आहे. पण लिहिता लिहिता राजेंद्रकृष्ण यांनी असं लिहिलं आहे,
अंग निखरे रंग निखरे,
जागे सपने भी सोये हुये,
बन सवर के निकले भवरे,
मुखडे कलिया भीगोये हुये
पावसानंतर भुंगे बाहेर पडले आहेत. निसर्गातील सगळे घटक कसे पावसाळ्यात सगळ्याच अर्थाने भिजून गेले आहेत. त्यांचे रूप पालटत चालले आहे. इतकी निखळ भावना फार थोड्या गाण्यात उमटली आहे. एरवी लगेच प्रेमाच्या उपमा सुरू होतात. राजेंद्रकृष्ण यांचे वैशिष्ट्य म्हणजे संगीतकाराला सहज चाल रचता यावी आणि गायकाला सहज गाता यावेत असे शब्द त्यांच्यात गाण्यात असतात. आता पावसाचे थेंब म्हणजे सतारीचे सूरच वाटतात असे वर्णन प्रकाश नारायण संत यांनी लंपनच्या कथेमध्ये (‘शारदा संगीत’) केलं आहे. अशी एक ओळ या गाण्यात आहे,
पडता फुहार है
बजती सितार है
दिन है सुहाने सुहाने
बरखा बहार आयी बुंदो के हार लायी
रिमझिम ने छेडे तराने
हेमंतकुमार यांनी ‘चांद’ (१९५९) चित्रपटात लताच्याच आवाजात एक अप्रतिम गाणं दिलं आहे. शैलेंद, राजेंद्रकृष्ण यांच्या नंतर ज्या गीतकाराने पावसाला निखळ स्वरूपात शब्दबद्ध केलं तो गीतकार म्हणजे भरत व्यास. हे गीत त्यांचंच आहे-
ए बादलों रिमझिम के रंग लिये कहां चले
झुमती उमंग लिये, प्यार की पतंग लिये,
जिया मोरे संग लिये कहां चले
यात पावसामुळे हृदयात उठणार्या प्रेमाच्या तरंगांबद्दल लिहिलंय. पण हे प्रेम व्यापक आहे. ते कुण्या एका व्यक्तीमध्ये अडकत नाही. आपण या संपूर्ण सृष्टीचाच एक अविभाज्य घटक आहोत आणि त्या भावनेतून निर्माण होणारी प्रेमाची व्यापक जाणीव पावसामुळे उफाळून वर येते, अशी अप्रतिम रचना भरत व्यास यांनी केली आहे. अनुप्रास वापरण्याबाबत भरत व्यास यांचा हात कुणीच गीतकार धरू शकत नाही.
लचक लचक फुलों की ये डालियां,
जाने क्यूं बजा रही है तालियां,
दिल मे कोई आके कहे प्यार करो,
देखो ना इनकार करो अजी कहां चले
अशी ती शब्दकळा आहे. मीनाकुमारीवर हे गाणं चित्रित आहे. एरव्ही दु:खी प्रतिमा पडद्यावर रंगवणारी मीनाकुमारी अशा गाण्यांनाही पडद्यावर न्याय देऊ शकते हेच हे गाणे सिद्ध करते. गाणे पावसाळी हवेबद्दल आहे, पण प्रत्यक्ष पावसाबद्दल मात्र नाही.
निखळ पावसाचे म्हणता येणार नाही पण एक वेगळा प्रयोग असे भरत व्यास यांचेच गाणे म्हणजे ‘नवरंग’ (१९५९) मधील ‘कारी कारी अंधियारी थी रात’. शब्द आणि सूर अशी एक जुगलबंदी या गाण्यात आहे. यासाठी जी शब्दकळा वापरली आहे ती सगळी पावसाळी आहे. आशा भोसले आणि स्वत: सी. रामचंद्र यांच्याच आवाजात हे गाणं आहे. नुसत्या शब्दांतही संगीत-लय कशी भिनली आहे याचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं. असे लयदार शब्द कुठे फारसे सापडत नाहीत.
कारी कारी अंधियारी थी रात
जब सघन गगन से गरज उठी
गरज उठी सावन की घटा
घुंघट में छुपाकर चपल चपल बिजली की छटा
एक नार कर के शृंगार,
एक नार तिखी तलवार या थी वो कटार
करके शृंगार चली उस पार
जहा थे उसके किसन मुरार
छमक छम छम छमक छम छम
हे सगळे शब्दच भरत व्यास यांनी असे रचले आहेत की, शब्दांच्याच पायात घुंगरू बांधले आहेत आणि ते नाचत आहेत, त्याचाच जो ध्वनी कानावर पडतेा आहे तो म्हणजे हे गाणे.
निखळ पावसाचे सगळ्यात अप्रतिम अद्वितीय गाणं आहे ‘दो आंखे बारा हाथ’ (१९५७)मधील ‘हो उमड घुमड कर आयी रे घटा’. शब्द-सुर-वाद्यमेळ अशी अनोखी जुगलबंदी अजून दुसरी निर्माण झाली नाही. लता/मन्नादाचा आवाज-वसंत देसाई यांचे संगीत. भरत व्यास यांचे या गाण्यातील शब्द केवळ आणि केवळ अप्रतिम आहेत. असा अनुप्रास, अशी कल्पनाशक्ती फार दुर्मिळ.
हो उमड घुमड कर आयी रे घटा
काले काले बादलों की छायी छायी रे घटा
जब सनन पवन का लगा रे तीर
बादल को चीर निकला रे नीर
झिर-झिर झिर-झिर अब धार झरे
ओ धरती जल से मांग भरे
काय शब्दकळा आहे! वार्याचा बाण लागून ढगातून पाण्याची धार धरतीवर येते आहे. धरतीचे सौभाग्य म्हणजेच पाऊस. त्याने तिच्या भांगात जणू कुंकू भरले असेच वातावरण आहे. हे संपूर्ण गाणे कविता म्हणून वेगळेच प्रकरण आहे. केवळ ते शब्द आपण वाचले तरी आपल्या मनात एक अनोखे गाणे घुमायला लागते. लताचा आवाज आणि पाऊस याचे काहीतरी वेगळेच नाते आहे. निखळ पावसाचे गाणे असो की, प्रेमाचे प्रतीक म्हणून वापरलेले गाणे असो बहुतांश गाण्यात लता आहेच.
या गाण्यात राजस्थानमधील कोका हे लोकवाद्य वसंत देसाई यांनी वापरले आहे. याच वाद्याचा अप्रतिम उपयोग याच चित्रपटातील ‘सैंय्या झुठों का बडा सरताज निकला’मध्ये केलेला आहे.
जिथे प्रेमाची आसक्ती आहे, तिथेच पाऊस बरसतो अशी एक ओळ भरत व्यास लिहून जातो. ‘सावन का संदेशा लेकर निकली अपने घरसे, जो कोई इसके प्यार को तरसे वही नवेली बरसे’. भरत व्यास यांनी एक सनातन सत्य या निमित्ताने लिहून ठेवले आहे. विफल प्रेमाचे प्रतीक म्हणजे पाऊस नाही. पाऊस हा सफल प्रेमाचे प्रतिक आहे. ज्याला त्याची आस आहे तिथेच तो बरसतो आहे. आणि त्यातूनच नवीन निर्माण होते, सृजन होते. तिथेच हिरवे कोवळे कोंब फुलणार आहेत. तिथूनच या सृष्टीचे गाडे सुरू झाले आणि जोवर पाऊस आहे, तोवर ते चालू राहणार आहे. धरती आणि आभाळाच्या प्रेमाचे सनातन रूप साकारणारा असा हा पाऊस.
हिंदी चित्रपटातील निखळ पावसाच्या गाण्यांचा विचार केला तर ‘उमड घुमडकर आयी रे घटा’ हे गाणे सर्वोत्कृष्ट आहे. अजून तसे गाणे झाले नाही.
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment