दाक्षिणात्य सिनेमा समजून घेताना : तेलुगू सिनेमा (टॉलिवुड) आणि कन्नड सिनेमा (सँडलवुड)
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुदर्शन चव्हाण
  • तेलुगू सिनेमा (टॉलिवुड) आणि कन्नड सिनेमा (सँडलवुड)
  • Fri , 26 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र टॉलिवुड Tollywood तेलुगू सिनेमा Telugu Cinema कन्नड सिनेमा Kannada Cinema सँडलवुड Sandalwood तमिळ सिनेमा Tamil Cinema

संपूर्ण दक्षिण भारतात ५ राज्ये आहेत आणि त्यात प्रामुख्याने ४ भाषा बोलल्या जातात. तेलुगु (तेलंगण, सिमान्ध्र), तमिळ (तामिळनाडू), कन्नड (कर्नाटक), मल्याळम (केरळ). या चारही भाषांमध्ये सिनेमे बनवले जातात. त्यांची तोंडओळख करून देणारी ही लेखमालिका. काल तमिळ सिनेमावर लेख होता, आज तेलुगू व कन्नड सिनेमांवर. उद्या मल्याळम सिनेमावरील शेवटचा लेख प्रसिद्ध होईल.

……………………………………………………………………………………………

तेलुगू सिनेमा (टॉलिवुड)

तेलुगू सिनेमा हा प्रेक्षक संख्येनं दक्षिण भारतात सर्वांत मोठा सिनेमा आहे. भारतातील २५ टक्के स्क्रीन्स ज्या केवळ दोन राज्यांत आहेत, ती तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही दोन्ही राज्यं तेलुगू भाषिक आहेत. दक्षिण भारतात आर्थिकदृष्ट्या तमिळ सिनेमापुढे तितक्याच ताकदीनं उभा राहू शकला, तो केवळ तेलुगू सिनेमाच.

तमिळ सिनेमानं जरी त्याचे पंख संपूर्ण दक्षिण भारतावर पसरले असले तरी त्याचा सर्वांत मोठा प्रेक्षकवर्ग हा तेलुगू आहे. खूप कमी तेलुगू कलाकार तमिळ सिनेमात काम करतात, पण रजनीकांतपासून सिद्धार्थपर्यंत बरेच तमिळ, मोहनलालसारखे मल्याळी, सुदीपसारखे कन्नड असे सगळ्या भाषेतले कलाकार तेलुगू सिनेमात सतत काम करत असतात. केवळ याच एका राज्यात तमिळ सिनेमा डब करू दिला जातो आणि प्रचंड संख्येने पाहिलाही जातो. कधीकधी तर डब न होताही तमिळ न कळणारा प्रेक्षक सिनेमा पाहायला जातो. हे अचंबित करणारं आहे आणि तेलुगू प्रेक्षक किती सिनेमावेडा आहे याचं द्योतकही आहे. म्हणूनच सुरुवातीपासूनच कमाईचे उच्चांक स्थापित करणं, ते मोडणं हे तेलुगू सिनेमाला कायमच करायला जमलं आहे.

रघुपती वेन्कैय्या नायडू हे तेलुगू सिनेमाचे जनक समजले जातात. त्यांनी तेलुगू सिनेमाची सुरुवात तमिळप्रमाणेच भारतीय सिनेमाच्या जन्मानंतर लगेच केली. ‘आलम आरा’ या पहिल्या भारतीय बोलपटाच्या आणि ‘भक्त प्रल्हाद’ या पहिल्या तेलुगू बोलपटातच्या प्रदर्शनामध्ये केवळ सात महिन्याचं अंतर होतं. यावरून तेलुगू सिनेमाच्या झपाट्याचा विचार केला जाऊ शकतो.

पण हे सर्व २० आणि ३० च्या दशकातील मद्रास प्रेसिडेन्सीत घडत असल्याकारणाने सिनेमा निर्मितीचं केंद्र चेन्नई आणि थोड्याबहुत प्रमाणात विशाखापट्टणम असं राहिलं. आणि विषयाचा ओघही पौराणिक सिनेमापर्यंतच मर्यादित होता. यात लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, आजही तेलुगू हा दक्षिण भारतातील सर्वांत कमी साक्षरता असलेला आणि सर्वांत कमी शहरीकरण झालेला समाज आहे. हे एक महत्त्वाचं कारण होतं की, सर्वाधिक पौराणिक पात्र रंगवणाऱ्या ‘एन. टी. रामा राव’ यांना त्या समाजाने देवत्व बहाल केलं. तरीही या माणसानं पौराणिक पात्रांमधून बाहेर येत बरीच गरीब पात्रं रंगवली. एकंदरच तेलुगू सिनेमा वाढण्यात बऱ्याच अंगाने त्यांनी मदत केली. तो टिकण्या आणि वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य वेळी स्टुडिओ प्रणालीचं आगमन होणं.

एन. टी. रामा राव

सिनेनिर्मिती करणारे ‘विजय वाहिनी’ (१९४८), ‘प्रसाद’ (१९५६) हे स्टुडिओ चेन्नईत उभे राहिले. जिथून त्यांनी ‘मायाबाजार’ (१९५७) सारख्या मोठ्या निर्मिती केल्या. हा तेव्हाचा भारतातील सर्वाधिक महागडा सिनेमा होता. व्यावसायिकता आणि कलात्मकता यांची सुरेख सांगड घालणारा सिनेमा म्हणून ‘मायाबाजार’चं नाव आजही घेतलं जातं. एस. एस. राजामौलीनेही त्याच्या आवडत्या बऱ्याच वेळा आवडणाऱ्या सिनेमांमध्ये या नावाचा उल्लेख केला आहे.

पुढे ७० च्या दशकापासून ‘अन्नपूर्णा स्टुडिओ’ (१९७५) आणि एन. टी. रामा राव यांच्या काळात ‘रामोजी राव’ (१९९६) असे तेलुगू निर्मिती करणारे सगळे स्टुडिओ चेन्नईहून हैदराबादला आले आणि संपूर्ण तेलुगू सिनेमा हा तिथून बनवला जाऊ लागला. तमिळ सिनेमापासून वेळीच स्वतंत्र होऊन उचललेलं हे पाऊल तेलुगू सिनेमाच्या पथ्यावरच पडलं आणि त्यानंतरची त्याची आर्थिक वाढ प्रचंड झपाट्याने झाली.

नव्वदच्या दशकातले दोन सर्वांत महत्त्वाचे तेलुगू सिनेमे म्हणजे राम गोपाल वर्माचा ‘शिवा’ (१९८९) आणि दुसरा म्हणजे ‘घराणा मोगुडू’ (१९९२). शिवा हा महाविद्यालयीन राजकारण आणि गुन्हेगारी या अंगानी जाणारा विषय आणि मांडणी दोन्हीत नावीन्य असणारा सिनेमा होता. (जो पुढे हिंदीत बनला आणि वर्मा हा हिंदीतला ९० च्या दशकातला एक खूप मोठा दिग्दर्शक म्हणून पुढे आला.) तर ‘घराणा मोगुडू’ हा कानडी सिनेमाचा रिमेक आणि अत्यंत व्यावसायिक सिनेमा. पण तो आधी कन्नड आणि नंतर तमिळमध्ये बनलेला असूनही तोपर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दाक्षिणात्य सिनेमा ठरला (१० कोटी रुपये). या सिनेमाने चिरंजीवीचं स्टार म्हणून स्थान पक्क केलं. एन. टी. रामा राव आणि ब्रम्हानंदम नंतर चिरंजीवीलाही त्याच लोकप्रियतेचा स्टार म्हणून मान्यता मिळाली. ‘एस. पी. बालसुब्रमण्यम’ नाव भारतभर पोहोचण्यात मदत झाली. सोबतच त्याचा ‘लाडला’च्या रूपाने हिंदी रिमेकही बनला.   

चिरंजीवी

हाच प्रवास पुढे ‘बोम्मारेलू’ (२००६, २५ कोटी), ‘मगधीरा’ (२००९, ८० कोटी). पुढे इगा, महेश बाबूचा डूकुडू, श्रीमंतुडू, पवन कल्याणचा गब्बर सिंग, चिरंजीवीचा खिलाडी १५०, मोहनलालचा जनता गॅरेज, अलु अर्जुनचे सरायनोडू, रेस गुर्रम असे अनेक सिनेमे १०० कोटींच्या घरात कमाई करून गेले. (आपण हिंदी सिनेमा चॅनेल्सवर अत्यंत वाईट पद्धतीने डब केलेले जे सिनेमे पाहतो, त्यातले बहुतांश तेलुगूच असतात)  

पण जसे तमिळ सिनेमामध्ये विशेष नाव घ्यावे असे दिग्दर्शक दिसून येतात, ते प्रमाण तेलुगूमध्ये बरंच कमी आहे. तरीही काही महत्त्वाची नावं घ्यायची झाल्यास एस. एस. राजामौली (छत्रपती, यमडोंगा) हे अर्थातच पहिलं नाव येईल. त्यानंतर शेखर कामुला (हॅपी डेज्, डॉलर ड्रीम्स), क्रिश (कांचे, वेदम, गौतमीपुत्र सातकर्णी) हे तसे बरे दिग्दर्शक म्हणावे, तर सुकुमार (आर्या, नान्नाको प्रेमातो), गुणशेखरा (रुद्रमादेवी), पुरी जगन्नाथ (पोकीरी, बिझनेसमन), कोरटाला सिवा, त्रीविक्रम श्रीनिवास हे हमखास पैसे मिळवून देणारे दिग्दर्शक.

इतका मोठा प्रेक्षकवर्ग, १०० कोटींच्या घरात कमाई करणारे सिनेमे, भारताबाहेरील व्यवसायात (विशेषतः अमेरिकेत) सतत होणारी वाढ आणि ‘बाहुबली’सारखे दणकट प्रयोग करण्याची क्षमता, हे झाले सकारात्मक मुद्दे. पण प्रयोगांना असणारं नगण्य स्थान, कथांची प्रचंड प्रतिगामी भूमिका, डब सिनेमे पाहून खालावलेली गुणवत्तेची मागणी असे बरेचसे मुद्दे आहेत, जे तेलुगू सिनेमानं आणि प्रेक्षकानं विचारात घेण्याची गरज आहे.

तेलुगू सिनेदिग्दर्शक

प्रयोग करण्याबाबत हा सिनेमा किती मागे आहे याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर सूर्याच्या तमिळ ‘गजिनी’चा तेलुगू रिमेक रद्द झाल्यानंतरची पवन कल्याणची विधानं फार बोलकी आहेत- “सूर्या, विक्रम हे तमिळ अभिनेते आहेत आणि ही तमिळ प्रेक्षकाची जाण म्हणा किंवा त्यांची तयारी म्हणा, की एका बोल्ड, वेगळ्या लूकमधल्या पात्राला ते स्वीकारतील. एक तेलुगू स्टार म्हणून माझ्यात हे करण्याचा आत्मविश्वास नक्कीच नाहीये. तेलुगू प्रेक्षक असा स्टार मान्य करतील का हा प्रश्न आहे.”

हा सिनेमा प्रतिगामी राहण्याचं आणखी एक (असमाधानकारक का होईना) कारण शोधता येईल ते त्याच्या वितरणामध्ये. दोन्ही तेलुगू भाषिक राज्यातील स्क्रीन्सचा विचार केल्यास लक्षात येईल की, त्यातल्या ८५ टक्के या सिंगल स्क्रीन्स आहेत. (हिंदी सिनेमात हे प्रमाण ४० टक्के ही उरलं नाहीये) ज्यातल्या काही माफियाच्या हातात असण्याबद्दलही बोललं जातं. लक्षात घ्या हिंदी सिनेमात गेल्या दशकात जो बदल झाला (भले तो शहरी बाजूंनी झुकणारा असला तरी), त्यात त्याचं अर्थकारण माफियाच्या हातून बाहेर येणं आणि मल्टीप्लेक्सची सुरुवात हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जे तेलुगू सिनेमाबाबत अजून घडताना दिसत नाही.

म्हणजेच ८०-९० च्या दशकात हिंदी सिनेमा ज्या वाईट संक्रमण काळातून गेला, तसंच काहीसं सध्याचा तेलुगू सिनेमा जातोय असं म्हणायला वाव आहे. फरक फक्त इतकाच हिंदी सिनेमाने त्या काळात जो प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग गमावला तो कायमचाच. तेलुगू सिनेमाच्या बाबतीत तसं घडेल असं वाटत नाही. कारण पहिल्या ‘बाहुबली’मध्ये स्त्री पात्राला दाखवण्यात केलेल्या चुका सुधारून, दीडच वर्षात अत्यंत सुंदर स्त्री पात्र दुसऱ्या भागात दाखवण्याची जाण या तेलुगू सिनेमाला झाली. हे उदाहरण बोलकं आहे हे दर्शवायला की, हा सिनेमा बदलू शकतो किंवा तो बदलणं चालूही झालंय. त्यामुळे त्याबद्दल आशावादी राहायला काहीच हरकत नाही.

कन्नड सिनेमा (सँडलवुड)

एकीकडे सबंध तेलुगू प्रेक्षक डब सिनेमा पाहूनच वाढलाय तर त्याच्या अगदी उलट परिस्थिती कर्नाटकमधील प्रेक्षकाची आहे. सिनेमाच काय टीव्हीवरील कार्यक्रमही डब करण्यास इथे जवळ जवळ बंदी आहे. त्यामुळे लोक आपला सिनेमा पाहतील आणि कन्नड सिनेमा उद्योगाला त्याचा फायदा मिळेल हा इथला खूप जुना समज. पण एवढं करूनही दाक्षिणात्य सिनेमांत कन्नड सिनेमा आर्थिकदृष्ट्या सर्वांत मागे आहे. हे असं का घडलं याची बरीच कारणं आहेत.    

जसा तेलुगू आणि तमिळ सिनेमा भारतात खूप आधी सुरू झाला, तसाच कन्नड सिनेमाही झाला. पण हा कन्नड सिनेमा बनत होता कोल्हापूर, मुंबई, चेन्नई आणि कोइम्बतुरच्या स्टुडिओजमध्ये. त्यामुळे बराच काळ स्वतःचं वेगळं ठिकाण वा स्टुडिओ नसताना हा सिनेमा बनत होता. त्याही काळात ‘सती सुलोचना’पासून सुरुवात करून पुढे होणाप्पा भगवंतर या पहिल्या कन्नड स्टारने ‘गोरा कुंभार’, ‘महाकवी कालिदास’ असे काही पौराणिक सिनेमे बनवले. जे पुढे कर्नाटकच्या इतिहासातले सर्वांत मोठे स्टार ‘राजकुमार’च्या काळातही चालू राहिले.

बी. व्ही. कारंथ, पट्टाभी रामा रेड्डी आणि गिरीश कार्नाड

यानंतरचा कन्नड सिनेमात महत्त्वाचा काळ येतो तो साहित्याच्या रूपांतरांचा. कन्नड साहित्य हे प्रचंड श्रीमंत आणि प्रगल्भ आहे. (सर्वाधिक ज्ञानपीठ जिंकण्याचा बहुमानही कन्नडकडेच आहे) त्याच साहित्याचा उपयोग करून घेत बी. व्ही. कारंथ यांनी ‘चोमन दोड्डी’, गिरीश कार्नाडांनी ‘वंशवृक्ष’, पट्टाभी रामा रेड्डी यांनी ‘संस्कारा’ अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घ्यायला लावणाऱ्या निर्मिती केल्या.

पण हे दिग्दर्शक सिनेमामध्ये फार काळ रमले नाहीत. रंगभूमीला त्यांनी कायम झुकतं माप दिलं. पण कन्नड सिनेमात नाटक, साहित्य यांचा वापर करून दर्जेदार आणि सोबत व्यावसायिकरित्या यशस्वी निर्मिती केली ती पुत्तना कानागल यांनी. ‘गेज्जे पूजे’, ‘मानस सरोवरा’, ‘रंगनायकी’, ‘नागरहावू’ असे अनेक यशस्वी सिनेमे त्यांनी दिले. ‘राजकुमार’सारख्या स्टारला घेऊन एकीकडे यशस्वी निर्मिती तर दुसरीकडे ‘रंगनायाकी’सारखे अनेक स्त्रीप्रधान चित्रपट त्यांनी बनवले.

स्थानिक निर्मितीत कानागल यांचं नाव होत होतं, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कन्नड सिनेमाला घेऊन जाणारा एक दिग्दर्शक आला, ज्याचं नाव गिरीश कासारवल्ली. अनंतमूर्तीच्या ‘घटश्राद्ध’वरती सिनेमा बनवून सुरू केलेला त्यांचा प्रवास पुढेही त्याच थाटात ‘ताबाराना कथे’, ‘ताई साहेब’, ‘द्वीपा’, ‘गुलाबी टॉकीज’, ‘कुर्मावतारा’ असा एकामागोमाग करत आजही चालू आहे. चार वेळा सुवर्णकमळ मिळवण्याची कामगिरी करणारे ते देशातले सत्यजित रे यांच्यानंतरचे केवळ दुसरे दिग्दर्शक असतील. 

गिरीश कासारवल्ली

दिग्दर्शकीयदृष्ट्या विचार करण्यासोबतच कन्नड सिनेमाचा विचार हा त्यांच्या स्टार्सच्या अंगानेही करायला हवा. कारण कन्नड सिनेमात दिग्दर्शन, गायन, अभिनय हे सर्व एकत्रच करण्याची खूप मोठी परंपरा आहे. बहुतेक स्टार्स हे नाटकातून आलेले असण्याचा हा परिणाम असावा. ज्याची सुरुवात परत एकदा पुत्ताना कानागल यांच्यापासूनच होते. दिग्दर्शनासोबत स्टार म्हणूनही त्यांचं नाव झालं. राजकुमार (बंगारड्डा मनुष्य) जो कन्नड इतिहासातला सर्वांत मोठा स्टार ठरला, त्यात त्याचं गाणं हाही एक घटक होता. आजही व्ही. रवीचंद्रन, उपेंद्र, राजकुमार, सुदीप (सध्याचा सर्वांत मोठा कन्नड स्टार, ज्याची आपल्याला असणारी ओळख म्हणजे ‘ईगा’मधला व्हिलन किंवा कट्टपाला तलवार विकणारा मनुष्य) हे सर्व स्टार्स स्वतः दिग्दर्शक आहेत.

या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत समीक्षक आणि प्रेक्षक या दोन्हींची एकत्र वाहवा मिळवणारं कानागल यांच्या इतकंच महत्त्वाचं नाव म्हणजे शंकर नाग. ८० च्या दशकात ‘ओंडू मुट्टीना कथे’, ‘अॅक्सिडेंट’सारखे गाजलेले सिनेमे त्यांनी केले. ‘मालगुडी डेज’ दिग्दर्शित करून सबंध देशभर त्यांचं नाव झालं. सोबत मराठी, कोकणी, कानडी अशा तिन्ही भाषात नाटकं चालूच होती. पण दुर्दैवाने वयाच्या ३५व्याच वर्षी अॅक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर एकंदर ९०च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच कन्नड सिनेमाला उतरती कळा लागली.

शंकर नाग

उत्तम स्टार्स, कथांसाठी लागणारं साहित्य, नागर व लोककला या दोन्ही अंगानी उच्च दर्जाची निर्मिती करणारी रंगभूमी हे सर्व काही असूनही व्यवसाय म्हणून काही कानडी सिनेमाला प्रस्थापित होता आलं नाही. त्याबाबतीत मराठी आणि कानडी सिनेमाच्या आर्थिक अवस्थेत भरपूर साम्यस्थळं शोधता येतील. दोन्ही सिनेमांत त्या भाषिकांनी पैसा कमीच लावला. मराठी सिनेमा कायम हिंदीच्या भीतीनं घाबरून राहिला, तर कन्नड सिनेमाचीही तीच कथा राहिली. आज दोन्हीकडे प्रचंड अनुदानं घेऊन सिनेमे बनवण्याची सवय निर्मात्यांना लागली आहे, तर दोन्हीकडील राज्यं सरकारांवर नियम बनवून आपले सिनेमे टिकवण्याची वेळ आली आहे.

हे असं का घडलं याची काही कारणं शोधताना हे जाणवतं की, कन्नड भाषिकांमध्ये वेळीच उत्तम, स्थिर निर्माते, स्टुडिओ तयार होऊ शकले नाहीत. डबिंगवर बंदी असली तरी मूळ तमिळ, तेलुगू भाषेतला सिनेमा कन्नडीगांना थोडाबहुत कळतो. त्यामुळे तो पाहण्याकडे कल राहिला. डबिंगवर बंदी असल्यामुळे रिमेकचं पेव फुटलं. ज्याला प्रतिसाद मर्यादित राहिला आणि त्यामुळे कन्नड सिनेमाने स्वतःची बलस्थानं हरवली. सोप्या भाषेत मराठी सिनेमाने हिंदीसोबत राहताना ज्या ज्या चुका केल्या, त्या त्या सर्व कानडी सिनेमाही करत गेला.

मराठी सिनेमाशी त्याचं एक दिसून येणारं साम्य म्हणजे २००० च्या दशकात एका सिनेमाने परिस्थितीत लक्षणीय बदल घडवून आणणं. मराठीत जे ‘श्वास’ने केलं तेच कन्नडमध्ये २००६ मध्ये आलेल्या ‘मुंगारु मेल’ने केलं. भारतभरात मल्टीप्लेक्समध्ये सर्वाधिक काळ  (जवळपास अडीच वर्षं) टिकलेला हा सिनेमा आहे. त्याचे कमाईचे रेकॉर्ड १० वर्षानंतरही कुठलाच कानडी सिनेमा ओलांडू शकलेला नाही. या सिनेमानंतर कन्नड सिनेमा आता कुठे स्वतःचं वेगळं स्थान शोधत उभा राहतो आहे. थ्रिलर जॉनरमध्ये उत्तमोत्तम प्रयोग इथे होतायत. जसे की पवन कुमारच्या ‘ल्युसीआ’ आणि ‘U – टर्न’चं भरपूर कौतुक झालं. त्याचे बरेच रिमेकही येऊ घातलेत. रिषभ शेट्टीचा ‘किरिक पार्टी’, अनुप भंडारीचा ‘रंगीतरंगा’, स्वर्णलताचा ‘६ – ५ =२’ या सिनेमांनी चांगलं नाव कमावलंय. योगेश भट, सुरी, संतोष आनंदरामसारखे दिग्दर्शक, सुदीप, पुनीत, उपेंद्र, यश, गणेश सारखे स्टार्स ही विश्वसनीय नावे झाल्यामुळे पैसे वसूल होण्याची हमी वाढलीय आणि सोबत प्रयोग करण्याची इच्छाही.

म्हणूनच आज राम रेड्डीचा ‘तिथी’ जगभर भारताचं प्रतिनिधित्व करतोय. ट्रान्सजेंडरसारखा विषय ‘नान अवनाल्ला आवळू’मध्ये मूळप्रवाहात आणून चर्चिला जातोय. ‘सिंपल आगी ओध लव्ह स्टोरी’, ‘उळीदावारू कंदान्टे’सारखे कथेत प्रयोग होत आहेत. अनंत नागसारखा अभिनेता परत एकदा रस घेऊन काम करू लागलाय.

अभिनेते, दिग्दर्शकांच्या नवीन आलेल्या फळीमुळे एक नवा उत्साह कन्नड सिनेमात संचारलाय. आता तो टिकतो का? अजस्र तमिळ सिनेमासमोर त्याचा निभाव लागतो का? कर्नाटक राज्यातच एक तृतीयांश जनता ही कन्नड भाषिक नसताना, त्यांना स्वतःकडे आकृष्ट करण्यात तो कितपत यशस्वी होतो? हे येणारा काळच सांगेल. सध्याला तरी याचं उत्तर बरंच सकारात्मक दिसतंय.

 

लेखक पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

chavan.sudarshan@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......