ना सचिनदांचं संगीत, ना किशोर-रफीचा गळा; देव आनंद जरा वेगळा
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • देव आनंदच्या काही प्रतिमा
  • Sat , 13 May 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi देव आनंद Dev Anand सचिन देव बर्मन Sachin Dev Burman किशोरकुमार Kishore Kumar मोहम्मद रफी Mohammed Rafi

देव आनंद-किशोर कुमार हे अद्वैत आपल्या इतक्या डोक्यात बसलं आहे की, किशोरची अशी बरीच गाणी आहेत, ज्यात देव आनंद नाही, पण आपल्याला डोक्यात तोच येत राहतो. शिवाय सचिन देव बर्मन यांचं संगीत. किशोर इतकीच देव आनंदसाठी गायलेली रफीची गाणीही गाजली. त्यामुळे रफीचा आवाजही बर्‍याचदा देव आनंदच्या आठवणी जाग्या करतो. पण सचिनदा-किशोर-रफी यांच्या शिवायचा जो देव आनंद आहे, तोही खूप अवीट गोडीचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

देव आनंदच्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच गुलाम मोहम्मदने मुकेशचा आवाज त्याच्यासाठी वापरला. पुढे मुकेश कधीच देव आनंदसाठी गायला नाही. ‘शेर’ (१९१४९) हा देव आनंद-सुरैय्या-कामिनी कौशल यांचा सिनेमा. लता-मुकेशच्या आवाजात एक आर्त दु:खी गाणं गुलाम मोहम्मदनं दिलं आहे-

‘ये दुनिया है

यहा दिल का लगाना किसको आता है,

हजारो प्यार करते है,

निभाना किसको आता है.’

प्रेमभंगाची दु:खी गाणी गाजायचा तो काळ होता. परिणामी देव आनंदसाठीचा मुकेशचा हा दु:खी सूर तेव्हा खपून गेला. याच चित्रपटात दुसरंही एक गोड खेळकर गाणं आहे. लता आणि जी.एम.दुर्रानीच्या आवाजातलं...

दो बिछडे हुये दिल, 

आपस में गये मिल, 

आरमान की नगरी में हुआ आज सवेरा, 

लो तुमसे मिले हम, 

सब दिलके मिटे गम, 

खुश होके मुहोब्बत ने किया दिल में बसेरा

शकिल बदायुनीचे शब्द परत देव आनंदच्या कुठल्याच चित्रपटाला लाभले नाहीत. नौशाद, रवी, हेमंतकुमार, गुलाम मोहम्मद यांच्यासाठी जास्त करून शकिलने लिहिलं, पण नेमके हे संगीतकार म्हणून देव आनंदच्या चित्रपटांना फारसे लाभले नाहीत. 

सरोदवादक अली अकबर खां यांनी ‘आंधियां’ (१९५२) मध्ये हेमंतकुमारचा आवाज ‘वो चांद नही है, दिल है किसी दिवाने का’ या गाण्यात देव आनंदसाठी वापरला आहे, पण हे गाणं फार विशेष नाही. 

‘पतिता’ (१९५३) हा शंकर जयकिशनचा राज कपूर प्रॉडक्शन बाहेरचा एक गाजलेला चित्रपट. देव आनंद-उषा किरण यांच्या भूमिका यात होत्या. शंकर जयकिशनने हक्काचे मुकेश-मन्ना डे- रफी असे कोणालाच न वापरता हेमंत कुमार आणि तलत मेहमूद यांचा वापर या चित्रपटात केला आणि गाणी गाजवून दाखवली. 

याद किया दिल ने कहां हो तुम

झुमती बहार हो कहां हो तुम

प्यार से पुकार लो जहां हो तुम

या लता-हेमंतच्या गाण्यानं नुकत्याच सुरू झालेल्या बिनाका गीतमालात धुम केली होती. पण तलतच्या आवाजातील ‘है सबसे मधुर वो गीत जिसे, हम दर्द के सूर में गाते है’, आजही रसिकांच्या मनात उदबत्ती शांतपणे जळत रहावी तसं जळत राहतं. तलतच्या आवाजात जी थरथर आहे, तिचीही कमाल आहे. या गाण्यासाठी खरी दाद देव आनंदलाच द्यायला हवी. त्यानंही तलतच्या आवाजाला दाद देत संयत अभिनय केला आहे. खरं तर त्याच्या स्वभावाला इतका शांतपणा शोभत नाही. याच चित्रपटात तलतची अजून दोन सुंदर गाणी आहेत, पण ती देव आनंदवर चित्रित नाहीत.

देव आनंद-दिलीपकुमार या जोडीचा ‘इन्सानियत’ (१९५५) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. देव आनंद-दिलीप कुमार-बीना रॉय अशी तगडी स्टार कास्ट, सी.रामचंद्रचं संगीत (त्यांच्या पाठीशी ‘अलबेला’ आणि ‘अनारकली’चं लखलखीत यश होतं) लता-रफी-तलत असे गोड आवाज, राजेंद्र कृष्णची गीतं असा सगळा जमून आलेला मसाला. मग पदार्थ चवदार होणारच. लता-तलतचं एक मधुर गाणं यात आहे-

आयी झुमती बहार, लायी दिल का करार

देखो प्यार हो गया, देखो प्यार हो गया

सैय्या पेहली पेहली बार बाजे मन की सितार

देखो प्यार हो गया, देखो प्यार हो गया

तलवारकट मिशातला कशिदाकाम केलेला गुरू शर्ट घातलेला देव आनंद आणि परकर ओढणीतली माथ्यावर बिंदी घातलेली बीना रॉय हे पाहायला मोठी गंमत वाटते.

दत्ता नाईक या मराठी माणसाने एन.दत्ता नावाने हिंदी चित्रपटात मोजकीच, पण फार चांगली गाणी दिली आहेत. देव आनंद-गीता बाली यांच्या ‘मिलाप’ (१९५५) मध्ये एन.दत्तानं ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां, खो ना जाये आ भी जा, ये बहारों का समा’ हे गाणं हेमंत कुमारच्या आवाजात दिलं आहे. हेच गाणं लताच्या आवाजात जरा अवखळ आहे. पण हेमंतकुमारच्या खास खर्जातल्या आवाजात तसाच आशय स्पष्ट करतं. कामप्रेरणा उत्कट झाल्यावर पुरुषाचा आवाज घोगरा होतो, अशी एक पुसटशी छाया हेमंतदांच्या आवाजात वापरून एन.दत्ता यांनी कमाल केली आहे. साहिरचे शब्द तर अभिजात आहेतच. साहिरची संगीतकार रवीसारखीच एन.दत्ताशी फार चांगली नाळ जुळली होती.

मदनमोहन च्या ‘पॉकेटमार’ (१९५६) मध्ये छोट्या नावेवर डोलकाठीला धरून फेरी मारणार्‍या देव आनंद-गीताबाली यांच्यावर एक सुंदर द्वंद्व गीत आहे. 

ये नयी नयी प्रीत है

तुही ही तो मेरा मीत है

ना जाने कोई साजना

ये तेरी मेरी दास्तां

राजेंद्र कृष्ण-मदनमोहन -(मदनमोहनच्या एकूण १०० चित्रपटांपैकी राजेंद्र कृष्णची गीतं असलेले चित्रपट ३६) जोडीनं सगळ्यात जास्त चित्रपट दिले. पण नाव झालं ते मदनमोहन-राजा मेहंदी अली खां (राजा मेहंदी अली खां चे चित्रपट १२) जोडीचे. तलत-लताचं हे गोड गाणं राजेंद्र कृष्णच्याच लेखणीतून उतरलं आहे. प्रेमिकांचं एक सुंदर स्वप्न असतं. या स्वप्नाला राजेंद्र कृष्णने या गाण्यात गोड शब्द रूप दिलं आहे. ‘चलो चल दे वहां, जमी और आसमां, गले मिलते जहां, बना दे वहि आसमां’.  

१९५७मध्ये देव आनंदच्या दोन चित्रपटांनी धूम केली होती. एक होता देव आनंदचा घरचा चित्रपट, ‘नौ दो ग्यारह’. ज्यात त्याची पत्नी असलेली कल्पना कार्तिक, संगीतकार सचिन देव बर्मन, गायक रफी-आशा-गीता, दिग्दर्शक विजय आनंद असा सगळा हक्काचा गाजलेला मसाला होता. पण दुसरा चित्रपट असा होता- ज्याच्या गाण्यानंही धूम केली. तो काही देव आनंद होम प्रॉडक्शन नव्हता - ‘बारिश’. यात देव आनंद सोबत होती नुतन. मागच्याच वर्षी या जोडीचा पेईंग गेस्ट (१९५६) हिट झाला होता. ‘बारिश’ला संगीत होतं सी.रामचंद्र यांचं. देव आनंदसाठी तलत-हेमंतकुमार-मुकेश यांचे आवाज रफी-किशोरशिवाय वापरून झाले होते. पण या चित्रपटात देव आनंदसाठी स्वत: सी.रामचंद्र यांनीच आवाज दिला (देव आनंदसाठी चितळकरांचा आवाज चिकचॉकलेट या संगीतकाराने ‘नादान’ (१९५१) चित्रपटात वापरला होता). ही दोन्ही गाणी गोड आहेत, आजही ऐकाविशी वाटतात.

नुतन-देव आनंद यांचा एक अप्रतिम संवाद गाण्याआधी आहे. प्रेम कसं व्यक्त करायचं दोघांनाही कळत नाही. तेव्हा नुतन म्हणते- ‘कोई बात बीना कहे सुने भी समझ में आती है’. यानंतर गाणं सुरू होतं-

कहते है प्यार जिसको, पंछी जरा बता दे

उडना खुली हवा में, ओ बेजूबा सिखा दे

मुश्किल है इस जहां में आजादियों से रेहना

जो बात दिल में आये उसको जूबां से केहना

आझाद तू है जैसा वैसा हमे बना दे

उडना खुली हवा में ओ बेजूबा सिखा दे

असं म्हणत नुतन हातातील कबुतर हवेत सोडते. राजेंद्र कृष्ण यांचं गीत आणि लताचा आवाज म्हटलं की, सी.रामचंद्र यांचे संगीत बदलूनच जाते. पण या गाण्यात त्यांनी त्यांच्या आवाजापेक्षा तलत किंवा रफीचा आवाज घेतला असता तर जास्त रंगत भरली असती. कारण त्यांच्या स्वत:च्या आवाजाला मर्यादा होत्या. पण ते लताच्या इतके प्रेमात बुडाले होते की, तिच्यासोबतच गायचा अट्टाहास त्यांचा असायचा, अशी दंतकथा त्या काळात होती. 

दुसरं गाणंही चितळकर (सी.रामचंद्र गायक म्हणून चितळकर असं नाव वापरायचे) लता यांच्याच आवाजात आहे-

फिर वोही चांद वोही तनहाई है

आज फिर दिल ने मुहोब्बत की कसम खायी है

हे गाणं म्हणजे आधीच्या गाण्याचीच पुढची पायरी आहे. यात एक ओळ राजेंद्र कृष्णने अशी लिहिली आहे, ‘दिल में जो बात है, आंखो में चली आयी है’. प्रेमाची तीच सुंदर परिभाषा, पडद्यावर देव आनंद-नुतन मग काय पहायलाच नको.

देव आनंद-माला सिन्हाचा ‘माया’ (१९६१) हा गाजलेला सिनेमा. हेमंतकुमारशी मिळताजुळता स्वर असणार्‍या द्विजन मुखर्जीला सलिल चौधरी यांनी यात दोन गाणी दिली आहेत. देव आनंदसाठी हेमंतकुमारचा आवाज लोकांना भावून गेला होता म्हणून कदाचित हा प्रयोग सलिल चौधरी यांनी केला असावा. पहिलं गाणं आहे-

‘ए दिल कहा तेरी मंझिल

ना कोई दिपक है ना कोई तारा है

गुम है जमी है दूर आसमां’

गाण्याच्या सुरुवातीला ‘क्रॉस’ची प्रतिमा वापरून गाण्याचा दु:खी भाव दिग्दर्शकाने गडद केला आहे. दुसरं गाणं मात्र आनंदी वृत्तीचं आहे. लतासोबत द्विजन मुखर्जीचा आवाज हेमंतकुमारसारखाच मिसळून जातो

‘फिर एक बार कहो, उसी अदा से कहो

सुनो जी साजना, मुझे तो तुमसे प्यार है’

असं म्हणत असताना गाण्यात लता ‘नही नही’ म्हणत परत ‘जी हां! जी हां!’ म्हणते हे सलिल चौधरी यांनी फार नजाकतीनं घेतलं आहे. खरं तर रूढ अर्थानं धृवपद आणि कडवं अशी सरधोपट रचना सलिल चौधरी करत नाहीत. म्हणूनच त्यांची गाणी गायला फार मुश्किल असल्याचं लता मंगेशकर यांनी नोंदवलं आहे. 

शंकर जयकिशनच्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ (१९६२) मध्ये तलते अतिशय सुंदर गाणं आहे. मिश्किल देव आनंद, लावण्यवती वहिदा रेहमानला उद्देशून म्हणतो आहे-

‘तुम तो दिल के तार छेड हो गये बेखबर

चांद के तले जलेंगे हम ए सनम रातभर’

शैलेंद्रचे शब्द, देव आनंदचे हासरे डोळे, सुंदर वहिदा रेहमान, उसळत्या कारंज्यासारखं शंकर जयकिशनचे संगीत आणि त्यावर तलतचा थरथरचा स्वर. हेच गाणं परत लताच्या आवाजात आहे, पण तलतची सर त्याला नाही. दु:खाची आर्तता प्रकट करणारा तलतचा स्वर प्रेमाची अस्फुटतता प्रकट करतानाही कमालीचा प्रभावी वाटतो.

जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘किनारे किनारे’ (१९६४) मध्ये मन्ना डे यांच्या स्वरात एक गाणं आहे. देव आनंदसाठी मन्ना डे तसा फारच कमी गायला आहे. ‘चले जा रहे है मोहब्बत के मारे, किनारे किनारे किनारे किनारे’ हे गाणं तसं सरधोपट आहे. देव आनंद-मीनाकुमारीवर हे गाणं चित्रित आहे. गाणं फारसं पकड घेत नाही. 

देव आनंदची पडद्यावरच्या प्रतिमेची सांगीतिक बाजू साकारण्यात सचिन देव बर्मन यांचं संगीत आणि किशोर कुमार-रफी यांचा आवाज यांचं फार मोठं योगदान आहे. पण या शिवाय इतरही संगीतकार आणि गायकांनी ही प्रतिमा सजवली. त्यातून काही गाणी लोकप्रिय-अवीट गोडीची ठरली. ही त्यातीलच काही ठळक गाणी. 

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

shirish shitole

Sat , 13 May 2017

It's treat. ..thank you


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......