‘समाजस्वास्थ्य’ : आजच्या रोगी समाजासाठी!
कला-संस्कृती - नाटकबिटक
चिन्मय पाटणकर
  • ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचं एक पोस्टर
  • Sat , 06 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नाटकबिटक र.धों. कर्वे Ra. Dho. karve समाजस्वास्थ्य Samajswasthya अतुल पेठे Atul Pethe गिरीश कुलकर्णी Girish Kulkarni

हिंदूंनी दहा मुलं जन्माला घातली पाहिजेत, असं विधान खुद्द शंकराचाऱ्यांनी करण्याच्या काळात, कर्मठ आणि परंपरावादी विचारसरणी सत्तेत असण्याच्या काळात र. धों. कर्वे यांच्यासारख्या द्रष्ट्या समाजसुधारकाच्या निर्भिडतेचा, व्यक्तित्वाचा आणि कार्यकर्तृत्त्वाचा वेध घेणारं ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक रंगभूमीवर यावं, ही घटना विलक्षणच मानायला हवी. प्रत्येक विवेकवाद्याचं मनोबल उंचावणारं हे नाटक प्रत्येकानं आवर्जून पाहायलाच हवं. मुळात, ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचायला हवं. हे नाटक रंगभूमीवर आणून आजच्या २१व्या शतकातही परंपरा, अंधश्रद्धा आणि विवेकशून्य विचार करणाऱ्या रोगी समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा सर्जनशील प्रयत्न करणाऱ्या नाटककार अजित दळवी आणि दिग्दर्शक अतुल पेठे यांचं अभिनंदन करायलाच हवं. 

काही वर्षांपूर्वी र. धों. कर्वे यांच्यावर ‘ध्यासपर्व’ हा चित्रपट अमोल पालेकर यांनी केला होता. त्यातून कर्वे यांचं योगदान समोर आलं होतं. मात्र, ‘समाजस्वास्थ’ या नाटकातून थोड्या वेगळ्या पद्धतीनं कर्वे यांच्या द्रष्ट्या विचारांचा वेध घेण्यात आला आहे. ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक चालवताना येणाऱ्या अडचणी हा नाटकाचा केंद्रबिंदू आहे. स्त्री-पुरुषांतील मोकळे संबंध, लैंगिकता, संततीनियमन या विषयांवर सुमारे शंभर वर्षांपूर्वी रधों आणि मालतीबाई कर्वे समाज प्रबोधन करत होते. विधवांच्या शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या धोंडो केशव कर्वे यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा रधों पुढे चालवत होते. मात्र, अश्लीलतेच्या नावाखाली कर्मठांनी काही ना काही कारण काढून रधोंवर खटले भरले.

रधों आणि मालतीबाई हे दांपत्य परिस्थितीपुढे हतबल न होता तिला सामोरं गेलं आणि त्यांनी समाजाच्या भल्याचा विचार केला. समाजानं त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दांपत्य निडरपणे लढत राहिलं आणि निकोप समाजस्वास्थ्याचा विचार करत राहिलं. अश्लीलतेच्या आरोपाखाली झालेल्या तीन खटल्यांना कर्वे कसे सामोरे गेले, याचं चित्रण या नाटकात करण्यात आलं आहे. तर, कर्वे यांच्या मृत्यूनंतर चौथा खटलाही दाखल झाला होता. एपिसोडिक पद्धतीच्या या मांडणीतून एक दीर्घ कालखंड, त्यातली सामाजिक परिस्थिती, वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं आणि संघर्ष उभा राहतो. सोबतच धर्म, सनातन विचार, विवेकवादी विचार आणि अन्वयार्थही समोर येतात.

भावना दुखावतात म्हणून ओरड करणारा तथाकथित समाज आजच्याच काळात आहे असं नाही. १९४०च्या आधी, रधों महत्प्रयासानं ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक चालवत असतानाही हा समाज होताच. आताच्या काळाचा विचार केला, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकरांनाही अशाच अडचणींना सामोरं जावं लागतं होतं. समाजाचं बालिशपण कायम असणं ही फार गांभीर्यानं विचार करण्याची गोष्ट आहे. आज आपण आधुनिक झाल्याच्या गप्पा मारतो. समाज तांत्रिकदृष्ट्या आधुनिक होत असताना विचारांनी अधिक मागास होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. १९४०ची परिस्थिती नाटकातून दाखवताना ती आजही कालसुसंगत आहे, याला काय म्हणावं?

उदाहरणार्थ, रधों डॉ. आंबेडकरांना म्हणतात, “जुनाट रूढी, चालीरिती, परंपरांचं दुकान भावनेच्या जोरावर चालतं. तिथं बुद्धीचा वापर करणाऱ्यांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर 'ज्याची सत्ता त्याचा न्याय' हा नियम असतो.” रधोंनी तेव्हा व्यक्त केलेले विचार आणि आजची परिस्थिती ताडून पाहिल्यास वस्तुस्थिती सहजच आपल्या लक्षात येईल. तर, “लोकांच्या भावना दुखावण्याच्या अतिरेकानं मिथकांचा, पुराणकथांचा अभ्यासच करणं अशक्य होईल. मग एक दिवस या पुराणातील पुरुषांना हे लोक ऐतिहासिक पुरुष मानू लागतील. पुराणातील कल्पित गोष्टींना आपला इतिहास समजू लागतील. हे राजकारणच आहे,” असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर रधोंना सांगतात.

रधों आणि आंबेडकरांची विधानं समकालीन परिस्थितीला अगदी चपखलपणे लागू पडतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रधों आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील चर्चेचा प्रसंग, आंबेडकरांनी रधोंची केस लढवणं हा नाटकाचा परमोच्चबिंदू आहे. त्या काळात रधोंच्या विरोधात उभे राहिलेल्या अहिताग्नी राजवाडे यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीच्या रूपात आजच्या कर्मठ समाजाचं रूप दिसतं. आजच्या काळात अनेक माध्यमं उपलब्ध आहेत आणि बाहेरच्या कर्मठांचा, सनातन्यांचा, जातीयवाद्यांचा आणि सेन्सॉरशिपचा विरोध सर्जनशील लेखक, निर्मात्यांना सहन करावा लागतोय. 

नाटककार अजित दळवी यांनी  नाटकाची रचना कोर्टातले प्रसंग आणि घरातले प्रसंग अशी सोप्या पद्धतीनं केली आहे. टाळीबाज संवादांपेक्षा अन्वयार्थ लावण्यावर त्यांनी भर दिला आहे. रधोंसारख्या महत्त्वाच्या विचारवंताच्या जगण्यातलं नाट्य त्यांनी अतिशय नेमकेपणानं मांडलं आहे. दळवी यांनी नाटकाला कोर्टरूमच्या माध्यमातून सादर केलं आहे. कोर्टरूमची ट्रिटमेंट वापरूनही ती तांत्रिक केलेली नाही किंवा खटकेबाज पद्धतीनं केलेली नाही. विषयातलं नाट्य जपत व्यवस्था आणि विचार यांच्यातला तीव्र संघर्ष अधोरेखित केला आहे. व्यवस्था, व्यक्ती, परंपरा, धर्मचिकित्सा, स्त्री-पुरुष संबंध आणि विवेकवाद यांची धुसळण या नाटकातून झाली आहे. कर्वे यांच्या रूपाने एकीकडे विवेकवादी व्यक्तीचं चित्रण करताना, लेखक आणि बाहेरची सेन्सॉरशिप या बद्दलचं भाष्यही दळवींनी या नाटकातून केलं आहे.

अतुल पेठे त्यांच्या सर्वच नाटकातून समाज आणि व्यवस्थेवर भाष्य करत आले आहेत. नाटक अत्यंत ठाय लयीत चालतं. आताच्या गजबजाटी वातावरणात ही ठाय लय प्रेक्षक म्हणून स्वीकारणं जरा कठीण जातं. मात्र, कर्वे हे रॅशनलिस्ट होते, विचारवंत होते. त्यामुळे त्यांच्यावरचं नाटक करताना ते तितक्यात शांत पद्धतीनं मांडणं, विचारद्वंद्व प्रेक्षकांना पचायला वेळ देण्याचा विचार दिग्दर्शक अतुल पेठे यांनी केला आहे. त्यांनी नाटकाची हाताळणी करताना सूचकपद्धतीनं आताच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केलं आहे. उदाहरण द्यायचं झालं, तर प्रिन्सिपॉलचा प्रसंग. ‘समाजस्वास्थ्य’ मासिक चालवण्याबद्दल विल्सन कॉलेजचे मॅनेजमेंट कर्वे यांच्यावर नाराज होते आणि त्यांना नोकरी सोडा, असा सूचक संदेश द्यायचा होता. आधीच्या प्रसंगात न्यायालयातल्या पिंजऱ्यात उभे असलेल्या कर्वे यांना प्रिन्सिपॉलच्या प्रसंगासाठी पेठे यांनी पिंजऱ्यातच उभं केलं. समाजाच्या भल्यासाठी कार्यरत प्राध्यापकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याची सूचकता पेठे यांनी दाखवली आहे. त्याशिवाय शेवटच्या प्रसंगात रिकामा पिंजऱ्यावर स्पॉटलाईट ठेवला आहे.  

कर्वे यांच्या भूमिकेतील गिरीश कुलकर्णी अभिनंदनीय आहेत. ‘एक दिवस मठाकडे’ या नाटकानंतर साधारण तीन-चार वर्षांच्या गॅपनंतर ते पुन्हा रंगमंचावर परतले आहेत. अत्यंत संयमानं त्यांनी कर्वे उभे केले आहेत. त्यांची देहबोली, वाचिक अभिनय विलक्षण आहे. त्यांनी घेतलेल्या पॉजमधून कर्व्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नाट्यमयता उभी राहिली. प्रत्येक खटल्यागणिक येणारं दडपण त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केलं. त्यांना राजश्री सावंत वाड यांनी मालतीबाईंच्या भूमिकेत उत्तम सोबत केली. त्याशिवाय मामा वरेरकरांच्या भूमिकेतील अभय जबडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेतील अजित साबळे, अहिताग्नी राजवाडे झालेले रणजीत मोहिते, शेटे वकिलाच्या भूमिकेतले कृतार्थ शेवगांवकर तितकेच उत्तम आहेत. प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्यातून तो काळ उभा केला आहे. प्रदीप वैद्य यांनी प्रकाशयोजनेतून सर्वच प्रसंग उठावदार केलेत. नरेंद्र भिडे यांच्या संगीतानं ठाय लयीतल्या या नाटकाला अधिक गडद केलं.  

निकोप समाजस्वास्थ्यासाठी रधोंनी धडपड केली. त्यांचे विचार तेव्हाच्या समाजानं स्वीकारले नाहीत. ते आजच्या समाजालाही पटतील असं नाही. तर्कशुद्ध, विवेकवादी आणि परंपरेला प्रश्न करणारे कायमच समाजाच्या टीकेचे धनी होतात हे अनेकदा दिसून आलं आहे. काळ बदलतोय तशी समाजाची मानसिकताही बदलायला हवी. हे नाटक प्रत्येक विचारी माणसाचा आधार आहे. आधुनिकतेचे गोडवे गाताना विचारांनी मागास राहणाऱ्या आजच्या रोगी समाजासाठी 'समाजस्वास्थ्य' नक्कीच महत्त्वाचं आहे.

chinmay.reporter@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......