शैलेंद्रची गाणी, लताचा आवाज
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • लता मंगेशकर, मुकेश, पं. रविशंकर आणि शैलेंद्र
  • Sat , 06 May 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi लता मंगेशकर Lata Mangeshkar सलिल चौधरी Salil Chowdhury शैलेंद्र Shailendra

शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी यांच्यापुरतेच फक्त शैलेंद्रचे शब्द आणि लताचे सूर यांची मोहिनी मर्यादित नव्हती. इतरही काही संगीतकारांना या जोडीचा वापर करण्याचा मोह पडला.

संगीतकार रोशनने ‘हिरा मोती’ (१९५९) मध्ये शुभा खोटेच्या तोंडी एक गाणं दिलं आह- ‘ओ बेदर्दी आ मिल जल्दी, मिलने के दिन आये, के तुज बीन रहा न जाये’. मराठी रसिकांना ‘लटपट लटपट तुझं चालणं’ हे गाणं चांगलं आठवत असेल. त्याच्या चालीसारखी सुरावट या गाण्याच्या सुरुवातीला वापरली आहे. 

महान सतारवादक भारतरत्न रविशंकर यांनाही या जोडीचा मोह पडला होता. ‘अनुराधा’ (१९६०) चित्रपटात लीला नायडूवर एक गोड गाणं चित्रित आहे, ‘जाने कैसे सपनों मे खो गयी आखिया, मैं तो रही जागी मोरी सो गयी आखिया’. या गाण्याला अकारणच जास्तीची गती दिली गेली आहे, असं ऐकताना वाटत राहतं.

सपन-जगमोहन ही संगीतकार जोडी सलिल चौधरींच्या बॉम्बे युथ समूहात गायक म्हणून सहाय्यक म्हणून वावरत  होती. त्यांनी फार थोड्या चित्रपटांना संगीत दिलं. त्यातीलच एक चित्रपट ‘बेगाना’ (१९६३). धर्मेंद्रच्या या चित्रपटात एक गाणं आहे- ‘बुलाती है बहार, कोयल बोले कुहू कुहू, पपीहा बोले पिहू पिहू’. या गाण्यात एका कडव्यात शैलेंद्र लिहून गेला आहे-

रातों के सपने दिन मे कमल बन जल पे ये फुले

कैसी सुहानी ये राहे की राही मंझिल को भुले

हिंदी कवी चंद्रकांत देवताले यांची एक सुरेख कविता आहे -

जो रास्ता भूलेगा

मैं उसे भटकाव वाले रास्ते ले जाऊंगा

जो रास्ता भुलते नहीं

उनमे मेरी कोई दिलचस्पी नही. (पत्थर की बेंच, पृ. 9)

खरंच शैलेंद्र असाच आपल्याला हरवून टाकणाऱ्या वाटेनं नेऊ पाहतो. आपणही ओढ लागल्यागत त्याच्या मागे जात राहतो. ज्यांना रस्त्यात हरवायचं नाही त्यांनी शैलेंद्रच्या ‘वाटे’ला जाऊच नये. 

शैलेंद्रची वरील तिनही गाणी तशी विशेष नाहीत. शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी शिवाय त्याची नाळ खऱ्या अर्थानं कुणाशी जुळली असेल तर ती सचिन देव बर्मन यांच्याशी. या त्रिकुटाने काही सुंदर गाणी दिली आहेत. 

देव आनंद-नलिनी जयवंतच्या ‘मुनिमजी’ (१९५५) मध्ये हे गोड गाणं आहे - नैन खोये खोये तेरे दिल में भी कुछ होये, प्यार ये नही तो और क्या है. या गाण्यात सचिनदा तालवाद्यांचा मोठा सुंदर वापर करतात. सलिल चौधरीसारखीच लोकसंगीताची विलक्षण डुब सचिनदांच्या गाण्यांना असते. सोन्याचा बारीक गोफ करताना सोन्याची अतिशय बारीक तार केली जाते. अशा खूप तारा एकमेकांत गुंफून त्यांचा गोफ बनतो. लताच्या आवाजातील अशा बारीक बारीक ताना आलाप विलक्षण पद्धतीनं गुंफून त्यांना जलतरंग, बासरी, मृदंग अशा वाद्यांची साथ देत सचिनदा गाणं तयार करतात, तेव्हा त्याचा परिणाम वेगळाच साधला जातो. 

शैलेंद्रने डोळ्यांसाठी एक वेगळीच प्रतिमा या गाण्यात वापरली आहे- नींबू की फाकी सी पाकी ये आखियां, तिखी तिखी ये जुल्मी पलखीया. आता याचा नेमका अर्थ काय काढायचा? हिंदी साहित्याचा अभ्यास असणाऱ्यांनी काही माहिती असेल तर जरूर सांगावं.

किशोर कुमार- बीना राय यांच्या ‘मदभरे नैन’ (१९५५) या चित्रपटात लता-शैलेंद्रचं गोड गाणं आहे-

मनपंछी अलबेला तारों की नगरी में गाये

मत पुछो किसकी लाये खबरीया

नयी नयी पेहचान है उसका नाम न जाना मैने

मैं कैसे कहू मेरा कौन सावरीया

या गाण्याचे शब्दच असे आहेत की, साधं वाचायला सुरुवात केली तरी त्याचं गाणं बनू शकतं. अशीच स्वाभाविक चाल लताच्या आवाजात इथं आहे. 

पांव मेरी धरती पे मेरी नजर चांद को चुमे

मेरा आंचल उडे हवाओं मे मेरा तन झुमे मन झुमे

कैसी उलझी नजरीया

तिसरं गाणं ‘बंदिनी’ (१९६३) मधलं आहे. हा बिमल रॉयचा चित्रपट असल्याने त्यांचा कॅमेरा हा अजून एक जास्तीचा पैलू या गाण्याला जुळतो. गाण्याचं चित्रीकरण हा एक वेगळाच विषय आहे. 

जोगी जबसे तू आया मेरे द्वारे

हो मेरे रंग गये सांझ सकारे

मिठी मिठी अगन ये सह ना सकूंगी

मै तो छुई-मुई अबला रे सह ना सकूंगी

मेरे और निकट मत आ रे

आता या मोजक्या शब्दांत आख्ख्या चित्रपटाचं सार शैलेंद्र सांगून जातो. ही त्याची ताकद आहे. खरं तर आशा-गीता असे आवाज सचिनदांना वापरता आलं असतं. त्यांनी हे आवाज ताकदीने वापरलेही. मुकेशचा अतिशय कमी वापर सचिनदांनी केला, पण या चित्रपटांत ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’साठी मुकेश परिणामकारकीरीत्या त्यांनी वापरून दाखवला. 

एका विशिष्ट भावनेसाठी शंकर-जयकिशन, सलिल चौधरी, सचिनदेव बर्मन या तिघांनाही शैलेंद्रच्या शब्दांची ताकद जाणवते आणि त्यासाठी लताचाच आवाज ते वापरतात हे सगळं अनोखं आहे. 

सचिनदांनी अतिशय कमी गाणी या जोडीची दिली, पण अतिशय ताकदीचं गाणं असं दिलं की, त्याची ताकद शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी इतकी किंबहुना थोडी जास्तच जाणवते. तो चित्रपट आहे- ‘गाईड’ (१९६५). आणि गाणं आहे- ‘आज फिर जिने की तमन्ना है’.

चित्रपट रंगीत झाला आणि रंगांचा भडक वापर सुरू झाला. त्यातील कलात्मकता, कॅमेऱ्याचा संयमानं वापर सुरुवातीच्या काळात नव्हता. चित्रपट रंगीत आहे यांचंच कौतुक असायचं. पण ‘गाईड’सारखे फार थोडे चित्रपट त्या काळातील असे आहेत की, त्यांनी हा वापर अतिशय ताकदीनं करून दाखवला. 

हे गाणं रंगीत आहे पण त्यातील तरलता कुठेही हरवू दिलेली नाही. शिवाय भारतीय परंपरांची एक जाण ठेवत त्यांचा कलात्मक वापरही केलेला आढळतो. रोझी आपलं जुनं आयुष्य टाकून राजू गाईडच्या साहाय्यानं नवीन काही तरी जगू पाहते. ट्रकमध्ये बसून जाताना गाण्याच्या पहिल्याच ओळीत ती हातातील मडकं खाली रस्त्यावर टाकते. ते मडकं फुटतं आणि ‘आज फिर जिने की तमन्ना है’ म्हणत जणू काही आता परत नवा जन्म झाला आहे असं सूचित करत गाणं पुढे सरकतं. आता ही कमाल दिग्दर्शक विजय आनंदची आहे. 

शैलेंद्रचे शब्द तर काही विचारायची सोयच नाही. ‘कलके अंधेरों से निकल के, देखा है आंखे मलके मलके’ असे सुंदर अनुप्रास भरत व्यास सोडले तर कुणाच्याच गीतांत आढळत नाहीत. किंवा ‘प्यार का हिंडोला जहा झुल गये नैना, सपने जो देखे मुझे भूल गये नैना’ किंवा ‘सनन सनन हाय पावन झाकोरा'. जगण्याचा प्रचंड उत्साह, तो व्यक्त करण्यासाठी निसर्गाची केलेली निवड, त्याला शोभेसा लताचा मोकळा आवाज आणि याला पोषक संगीत, हे सगळं जूळून आलेलं रसायन आहे.

याच ‘गाईड’मध्ये अजून एक गाणं लताच्या आवाजात आहे- ‘पिया तोसे नैना लागे रे’. पण हे गाणं मोकळ्या निसर्गात नाही. विविध मंचांवर कार्यक्रमांमधून सादर केलं गेलेलं असं त्याचं चित्रण करण्यात आलं आहे. शिवाय वहिदाचं शास्त्रशुद्ध नृत्यही या गाण्यात आहे. पण केवळ ऐकताना मात्र त्यातील प्रेमाची आनंदाची खुमारी जाणवते.

शंकर-जयकिशन सोबतची २५ गाणी, सलिल चौधरीची ९, सचिन देव बर्मनची ५ आणि इतरांची ३ अशी तब्बल ४२ गाणी शैलेंद्र-लता या जोडीनं वेगळी अशी दिली. हा सगळा कालखंड १२ वर्षांचा आहे, याची वेगळी नोंद घेतली पाहिजे. 

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Jayant Raleraskar

Wed , 14 June 2017

एका वेगळ्या दृष्टीतून शैलेन्द्र कडे बघण्याचा प्रयत्न खूपच छान. एरव्ही शैलेन्द्र आणि शंकर-जयकिशन आणि राजकपूर हेच समीकरण दिसते. ते अनिवार्य असले तरी ही मांडणी वेगळी वाटते, हे नक्की... ----जयंत राळेरासकर, सोलापूर.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......