बाहुबली २ : अति भव्यतेतील कलात्मकता
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
मंदार करंजाळकर
  • ‘बाहुबली - द कन्क्लूजन’चं एक पोस्टर
  • Tue , 02 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा बाहुबली - द कन्क्लूजन Bahubali - The Conclusion S. S. Rajamouli बाहुबली - द बिगिनिंग Bahubali - The Beginning

बहुचर्चित ‘बाहुबली -  द कन्क्लुजन’ हा सिनेमा नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला आणि जगभरातील तमाम सिनेमावेड्या रसिक प्रेक्षकांनी एकदाचा सुटकेचा नि:श्वास टाकला. बाहुबलीच्या पहिल्या भागात (‘द बिगिनिंग’) 'कटप्पाने बाहुबली को क्यु मारा?' या प्रचंड उत्सुकता ताणून धरणाऱ्या प्रश्नाचे उत्तर एकदाचे सर्वांना मिळाले आणि तेव्हा कुठे त्यांचा जीव शांत झाला. एखाद्या चित्रपटाविषयी गेली दोन वर्षे सर्वत्र सातत्याने चर्चा होत राहणे आणि त्यातून त्या चित्रपटाविषयी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्कंठा निर्माण होणे याचे ‘बाहुबली २’ म्हणजे अलिकडल्या काळातील एक आगळेवेगळेच उदाहरण. रजनीकांतच्या सर्वच चित्रपटांना ज्याप्रमाणे प्रदर्शनापूर्वीच वारेमाप प्रसिद्धी मिळते, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात ‘बाहुबली २’च्या प्रदर्शनाचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक महिने स्वार होते.

रामायण-महाभारतासारख्या पौराणिक कथेचा जबरदस्त पगडा असणारी आणि अस्सल भारतीय नवरसांचे मिश्रण असणारी ही एक तशी क्लासिकल सूडकथा आहे ज्याचा उल्लेख बाहुबलीच्या पहिल्या भागातही केला गेला होता. चांगल्या विरुद्ध वाईट प्रवृत्तीचा संघर्ष आणि शेवटी चांगल्याचाच विजय असे जरी वरकरणी मुख्य कथासूत्र असले तरीही खिळवून ठेवणाऱ्या क्लासिकल कथेचे सशक्त पटकथेच्या आधारे पडद्यावर केले गेलेले तेवढेच भव्यदिव्य सादरीकरण हे या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. याबद्दल दिग्दर्शक कलाकार आणि तंत्रज्ञांचे कौतुक करणे गरजेचे आहे. व्हिज्युअल इफ्फेक्टसच्या साहाय्याने तयार केलेले महाकाय सेट्स, अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखा, त्यांचे नेत्रदीपक कपडे, नितांत सुंदर फोटोग्राफी आणि युद्धशास्त्राचा लॉजिकच्या पलीकडे जाऊन केला गेलेला तांत्रिक कल्पनाविष्कार अशा अनेक गोष्टींमुळे ‘बाहुबली-२’ प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवतो.

राजमाता शिवगामी आपला मोठापुत्र भल्लालदेव (राणा डुगुबत्ती)ला बाजूला ठेवून अमरेंद्र बाहुबली (प्रभास) ला माहिष्मती साम्राज्याचा उत्तराधिकारी नेमण्याचे ठरवते. पण तत्पूर्वी प्रजेच्या आशा-अपेक्षांचा कानोसा घेण्यासाठी राजमाता शिवगामी त्याला राज्याची सफर करून येण्याची आज्ञा देते आणि सोबत आपला विश्वासू सेवक कटप्पाला (सत्यराज)ही पाठवते. या प्रवासादरम्यान अमरेंद्र बाहुबलीची भेट कुंतल देशाची राजकुमारी देवसेना (अनुष्का शेट्टी) शी होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. दरम्यानच्या काळात अशा काही नाट्यमय घडामोडी घडतात, ज्यातून सुरू होतो वृत्ती-प्रवृत्तीचा एक अटळ संघर्ष. 

या चित्रपटातील व्यक्तिरेखा पडद्यावर मांडताना लेखक-दिग्दर्शकांनी भारतीय संस्कृतीमधील विचारपद्धती आणि पौराणिक कथांमधील संदर्भांचा उत्तम वापर करून घेतला आहे. त्यामुळे सर्वांना ती आपल्या जवळची कथा वाटत राहते. अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबलीच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भिडतात, कारण त्याच्यात एक आदर्श मुलगा, आदर्श पती आणि एक आदर्श राजाचे प्रतिबिंब आपल्याला दिसते. आपल्या आईच्या शब्दाबाहेर नसणारा परंतु वेळ पडल्यावर तिला तिच्याच शिकवणीची आठवण करून देणारा मुलगा, एक स्त्री म्हणून आपल्या पत्नीचा आत्मसन्मान आणि तिचे विचारस्वातंत्र्य जपणारा एक आदर्श नवरा तसेच आपल्या तत्त्वासाठी प्रसंगी आपल्या पदाचाही त्याग करणारा एक आदर्श व्यक्ती म्हणून अमरेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखा चित्रपटात एक मोठी उंची गाठते.

तर राजमाता शिवगामीच्या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. एका बाजूला आपल्या स्वतःच्या मुलाला (भल्लालदेव) उत्तराधिकारी नेमता न आल्याचे शल्य तर दुसऱ्या बाजूला आपणच दिलेल्या वचनामुळे अडचणीत आलेली प्रेमळ आई अशा द्विधा मन:स्थितीत अडकलेल्या राजमातेची आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री रम्या कृष्णनने उत्तमरीत्या साकारली आहे. भल्लालदेव आणि बिज्जलदेव (नासिर) यांच्या नकारात्मक व्यक्तिरेखा महाभारतातील पात्रांची आठवण करून देतात. असे असले तरीही या चित्रपटातील सर्वांत महत्त्वाची आणि प्रबळ व्यक्तिरेखा देवसेना हीच ठरते. आपल्या नवऱ्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी तिचा असणारा अट्टहास, परपुरुषाच्या वीरतेची प्रचिती आल्यानंतर मग मात्र त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी प्रेमिका आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी कुठलीही तडजोड स्वीकार करण्यास तयार नसलेली देवसेना ही खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीच्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते.

पहिल्या बाहुबलीमध्ये दाखवल्या गेलेल्या गोष्टीचाच हा फ्लॅशबॅकमधील एक भाग आहे, तरीही तो पाहताना मात्र आपल्यालाही एक परिपूर्ण कथा वाटते. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा चित्रपट असल्यामुळे पहिल्या भागासारखाच आपल्याला एक दाक्षिणात्य चित्रपट पाहत असल्याचा प्रचंड भास होतो. कारण एखादी छोटीशी गोष्टही अधोरेखित करण्यासाठी त्यांनी दाखवलेली अचाट कल्पनाशक्ती आणि त्यासाठी केलेला व्हिजुअल इफेक्टसचा वापर. उदा : पहिल्याच दृश्यात हत्तीवर चढून धनुष्यातून बाण सोडण्याचे दृश्य असो अथवा अमरेंद्र आणि देवसेनामधील उत्कट प्रणय दाखवताना प्रवासी जहाजाचा केलेला प्रतीकात्मक वापर असो… एक प्रेक्षक म्हणून तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतून जाता. कुठल्याही लॉजिकचा विचार न करता युद्धात राजमहालाची तटबंदी ओलांडण्यासाठी नारळाच्या झाडांचा केला गेलेला वापर असो किंवा मग बैलांच्या साहाय्याने धरणाची भिंत फोडण्याचे दृश्य असो आपण दिग्दर्शक राजामौलीच्या कल्पनाशक्तीला फक्त हात जोडू शकतो.

शेती फस्त करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठीच्या लढाईच्या दृश्यात आणि इतर बऱ्याच ठिकाणी व्हिजुअल इफेक्ट्समधील त्रुटी लक्षात येतात, पण त्यामुळे दृश्याचा एकत्रित परिणाम कमी होत नाही. दाखवलेल्या प्रसंगांमधील नाट्य एवढे रोमांचक असते की, अशा त्रुटींकडे आपण दुर्लक्ष्य करू शकतो. महेंद्र बाहुबली आणि भल्लालदेव यांच्यातील शेवटच्या दृश्याव्यतिरिक्त दुसऱ्या भागात एवढे युद्धाचे प्रसंग नाहीत, मात्र शेवटपर्यंत हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. पहिल्या भागासारखेच या दुसऱ्या भागातही कटप्पाची भूमिका खूप चांगली रंगली आहे, पण पहिल्या भागातील महेंद्र बाहुबली या दुसऱ्या भागात फक्त शेवटच्या टप्प्यात अवतरत असल्यामुळे यात अवंतिका (तमन्ना)ला फार काही स्कोप नाही. 

‘बाहुबली २’ हा पहिल्या भागाएवढाच अतिभव्यतेचा एक निखळ मनोरंजक आणि कलात्मक अविष्कार प्रेक्षकांना आपल्या डोळ्याने पाहिल्याचा मनोमन आनंद मिळवून देतो. मानवी नातेसंबंध, त्यांच्या भावभावना, वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्ती, आसुरी महत्त्वाकांक्षांमुळे घडणारे नाट्य आणि आपल्याला पडलेल्या प्रश्नांचे त्यातून उलगडत जाणारे उत्तर याचा हा चित्रपटीय अविष्कार सर्वांनीच दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीसाठी एकदा अनुभवायला हवा.

हॉलिवुड ब्लॉकब्लस्टर्सचा विळखा जगभर वाढत चाललेला असताना एव्हाना ‘बाहुबली 2’ बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंतचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सज्ज झालाय, ही चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट आहे. पण आपल्या कलेवर आपले प्रेम असेल, स्वतःवर प्रचंड विश्वास असेल आणि त्याला मेहनतीची जोड असेल तर कलाक्षेत्रात काम करून मिळणारा आनंदही कल्पनातीत आहे, हे एस. एस. राजामौली या अवलियाने दाखवून दिले आहे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे.

……………………………………………………………………………………………

लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.

mkaranjalkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख