‘बाहुबली - द कन्क्लूजन’ नावाची सुंदर परीकथा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
हर्षद सहस्रबुद्धे
  • ‘बाहुबली - द कन्क्लूजन’चं एक पोस्टर
  • Mon , 01 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा बाहुबली - द कन्क्लूजन Bahubali - The Conclusion S. S. Rajamouli बाहुबली - द बिगिनिंग Bahubali - The Beginning

एस.एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली - द बिगिनिंग’ या भव्य-दिव्य सिनेमानं अनेक विक्रम मोडीत काढले होते. हा सिनेमा तिकीटबारीवर प्रचंड यशस्वी ठरला. बहुतांश जणांना आवडला. एवढंच नव्हे, तर त्याने राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळवला. जुन्या काळातील काल्पनिक कथा, असंख्य घटना, साहस व थरारदृश्यं, सशक्त व वेगवान पटकथा, दमदार अभिनय आणि उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स ग्राफिक्स या सर्व घटकांच्या सुयोग्य अशा मिश्रणानं ‘बाहुबली - द बिगिनिंग’ हे राजमौलीचं स्वप्न २०१५ मध्ये साकार झालं.

आता तब्बल पावणेदोन वर्षांनंतर त्याचा दुसरा भाग, ‘बाहुबली - द कन्क्लूजन’ २८ एप्रिलला प्रदर्शित झालाय. पहिल्या भागामध्ये माहेष्मती राज्य, राणी शिवगामी, बाहुबली, सुरक्षा प्रधान सेवक कटप्पा, बाहुबलीचा मुलगा शिवा, त्याची प्रेयसी अवंतिका, भल्लालदेव आणि बिज्जलदेव यांची सुरस, भव्य आणि चमत्कारिक अशी कहाणी कथन करून दिग्दर्शक राजामौलीने प्रेक्षकांचे डोळे दिपवले होते. कथेचा विस्तृत असा पट, वेगवान घटनांची आकर्षक मांडणी आणि याआधी न-पाहिलेलं असं बरंच काही बाहुबलीच्या पहिल्या भागात होतं. हा भाग एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबतो आणि तिथंच दुसऱ्या भागाची घोषणा करतो.

‘बाहुबली - द कन्क्लूजन’ या दुसऱ्या भागाची पहिल्या भागापेक्षाही अधिक नेत्रदीपक आणि रंजक अशी सफर, बरोबर याच दृश्यापासून सुरू होते. प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा हा दुसरा भाग पूर्ण करतो. या भागातही पुष्कळ घटना आहेत. फक्त त्यांचा वेग जाणूनबुजून कमी ठेवण्यात आला आहे. यामुळे चित्रपटाचा पूर्वार्ध किंचित रेंगाळला आहे. पण याचा फायदा हा की, प्रेक्षकाला कथेसंदर्भात विचार करायची संधी मिळते. कथेचं व्यवस्थित आकलन होतं. २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा आजवरचा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट! मूळ तेलुगु, तमिळमध्ये बनला आणि नंतर हिंदीमध्ये डब करण्यात आला.

हा पहिला तेलुगु चित्रपट आहे, जो 4K या अल्ट्रा-एचडी या फॉरमॅटमध्ये रिलीज केला गेला. याकरता देशभरात जवळपास दोनशे ठिकाणी 4K प्रोजेक्टर्स बसवण्यात आले. बाहुबली 2D बरोबरच, IMAX-DMR फॉरमॅटमध्येही रिलीज झालाय. उत्तमोत्तम सेट्स, थरारक साहसदृश्यं, व्हीएफएक्सचा ग्राफिक्सचा उत्तम दर्जा - त्याचा कलात्मक, विचारपूर्वक आणि सुयोग्य जागी केलेला वापर, उत्कृष्ट वेशभूषा, प्रयत्नपूर्वक तयार केलेली पटकथा, त्याला उत्तम साथ देणारे मनोज मुन्तशीर यांचे संवाद आणि एम. एम. किरवाणी (क्रीम) यांचं पार्श्वसंगीत, ‘बाहुबली - द कन्क्लूजन’ला एक वेगळी उंची गाठण्यास मदत करतात.

आगळंवेगळं काही पहिल्यांदाच बघितलं की, त्या एकंदर परिणामांमुळे दिपायला होतं. हा परिणाम, त्याच कल्पनेच्या पुढच्या भागांमध्ये टिकवून धरणं, प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणं, हे खरं आव्हान असतं. वेगवान घटना, व्हीएफएक्स ग्राफिक्सच्या साहाय्यानं निर्मिलेली अचंबित करणारी साहसदृश्यं, विचार करायला उसंत न-देणारी पटकथा, संकलनाच्या साहाय्यानं केलेली, चक्रावून टाकणारी प्रसंगांची मांडणी ही पहिल्या भागाची वैशिष्ट्यं होती. तर महत्त्वाच्या पात्रांच्या मनोभूमिकेचा विस्तृत आलेख, किंचित कमी वेग असणारा पूर्वार्ध, माहिष्मती राज्याचं अंतर्गत राजकारण, राजकीय शह-काटशह, कुटिल नीती, अंतर्गत बंडाळी – ही दुसऱ्या भागाची वैशिष्ट्यं आहेत! 

या भागात मुख्यत्वेकरून बाहुबली आणि देवसेना यांची कथा पुढे नेण्यात आली आहे. या दोन प्रमुख व्यक्तिरेखा उत्तम पद्धतीनं रेखाटल्या आहेत. राणी शिवगामीच्या व्यक्तीरेखेलाही अनेक पदर दाखवण्यात आले आहेत. बाहुबलीच्या लोकप्रियतेमागचं कारण, त्याचं राज्यातील प्रजेवर असणारं प्रेम, राजकुमारी देवसेना आणि बाहुबलीचं नातं, भल्लालदेव आणि बिज्जलदेव यांची कुटिल कारस्थानं, शिवगामीची बदलत राहणारी भूमिका – हे सर्व, दिग्दर्शकानं मोठ्या खुबीनं दाखवलंय. ‘कन्क्लूजन’चा इमोशनल कोशंट पहिल्या भागापेक्षा जास्त आहे. राजकुमारी देवसेना आणि तिचं कुंतलदेश नावाचं, छोटंसं; पण सुंदरसं राज्य, हा या चित्रपटाचा नावीन्यपूर्ण भाग. कुंतलदेशामधले प्रसंग उत्तम रंगले आहेत. या भागाला प्रेमकथेची गुलाबी झालर आहे. पडद्यावर हा भाग पाहण्यास विशेष सुखावह वाटतो.

किंग सोलोमन, ली-व्हिटेकर, केचा आणि पीटर हाईन अशा चार नामवंत साहसदृश्यं-दिग्दर्शकांनी यातली साहस व थरारदृश्यं कमालीची उठावदार बनवली आहेत. उत्तरार्धाच्या शेवटाकडे असलेली साहसदृश्यं तर चांगली झालीच आहेत. पण कुंतल देशातली, रात्रीच्या कमी उजेडातली, पिंडारी लोकांविरुद्धची बाहुबलीची लढाई विशेष प्रेक्षणीय झाली आहे. या दुसऱ्या भागात पहिल्या भागापेक्षा काहीशी कमी प्रमाणात साहसदृश्यं आहेत. रक्तपाताचं प्रमाण कमी आहे. अशा दृश्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या क्लुप्त्या, नवनवीन योजना, नावीन्यपूर्ण मांडणी – हे घटक, पहिल्या भागात तुलनेनं अधिक विचारपूर्वक पद्धतीने आले होते. 

दिग्दर्शक एस.एस. राजमौली

चित्रपटाला एम. एम. किरवाणीनं दिलेलं जोरकस पार्श्वसंगीत लाभलं आहे. पडद्यावर दिसणारा दृश्यपरिणाम ते अधिक गहिरा करतं. यामुळे एकंदर परिणामकारकता वाढते. या भागाची गाणी मात्र विशेष जमलेली नाहीत. ती मधेमधे खंड पाडणारी वाटतात. शेवटचा संहार किंचित लांबला आहे. प्रभास, राणा, रमय्या, सत्यराज, अनुष्का शेट्टी या सर्वांनी आपली कामं चोख वठवली आहेत. प्रभास या भागात अधिक प्रभाव पाडतो. त्याने अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली अशा दोन्ही भूमिका आपल्या रूंद खांद्यांवर समर्थपणे तोलल्या आहेत. अनुष्का शेट्टी अतिशय सुरेख दिसते. कुठल्याही प्रकारचं अंगप्रदर्शन न करता, तिनं साकारलेली देखणी आणि साहसी राजकुमारी देवसेना मनात घर करते.

राजामौलीच्या दिव्य स्वप्नाचा हा दुसरा भागही आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेतो. या भागाला, त्याच्या नावाप्रमाणेच निश्चित असा शेवट आहे. पहिल्या भागासारखं अपूर्णत्व यामध्ये नाही. लोकप्रिय राजा अमरेंद्र बाहुबली, राजकुमारी देवसेना यांची कहाणी आणि महेंद्र बाहुबलीचा भल्लालदेवशी होणारा संघर्ष यांची ही सुंदर परीकथा एकदा नक्कीच अनुभवण्यासारखी आहे.

लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.

sahasrabudheharshad@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......