सलिल-लता-शैलेंद्र : सांगितीक समभुज त्रिकोण
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • लता मंगेशकर, सलिल चौधरी आणि गीतकार शैलेंद्र
  • Sat , 29 April 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi लता मंगेशकर Lata Mangeshkar सलिल चौधरी Salil Chowdhury शैलेंद्र Shailendra

शंकर-जयकिशन सोबतच अजून एका संगीतकाराला शैलेंद्रच्या निसर्ग व प्रेम या भावनांना शब्दबद्ध करून लताच्या आवाजात सादर करण्याचा मोह पडला. ती गाणीही अविस्मरणीय ठरली. त्या संगीतकाराचं नाव सलिल चौधरी. 

सलिल चौधरी आणि शैलेंद्र यांचा पहिला चित्रपट होता - ‘दो बिघा जमिन’ (१९५३). यात निसर्गाचं अतिशय सुंदर गाणं आहे- ‘धरती कहे पुकार के’. पण हे केवळ लताचं गाणं नाही. मन्नादाच्या आवाजाची अप्रतिम साथ लताला लाभली आहे. किंबहुना हे गाणं मुख्यत: मन्नादाचंच आहे. लताचे सूर त्याला साथ देतात. याच चित्रपटातील दुसरं सुंदर गाणं ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ मन्नादा आणि लता या दोघांचं आहे. खरं तर ही दोन गाणी म्हणजे पावसाआधीची धरतीची आस आणि पाऊस आल्यावरचा तिला झालेला आनंद यांचं वर्णन करणारी आहेत. धरती आभाळाच्या मीलनातून सृष्टीचं पुढे पुढे चाललेलं चक्र. स्त्री-पुरुष प्रेमाचं हे एक प्रतीकच सलिल चौधरी दाखवू इच्छितात. पण हे गाणं आपल्या विषयाच्या चौकटीत बसत नाही.  

या त्रिकुटाचं प्रेमाचं पहिलं आनंदी गाणं अतिशय गाजलेल्या ‘मधुमती’ (१९५८) मधलं आहे. ‘जुल्मी संग आख लडी रे’. शंकर-जयकिशनच्याही एक पाऊल पुढे सलिल चौधरी निघून जातात. कारण त्यांनी गीतातल्या भावनेला न्याय देण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक वाद्यांचा वापर केला आहे. शंकर-जयकिशन चाल सुंदर बांधतात, पण भरपूर वाद्यं वापरण्याचा मोह त्यांना टाळता येत नाही. 

निसर्गात प्रेमभावना व्यक्त करताना बासरीसारख्या वाद्याचा वापर आणि त्या अनुषंगानं राधा-कृष्णाच्या प्रेमाचं सुचन करत शैलेंद्र गीताला वेगळाच गोडवा प्राप्त करून देतो.

वो छुप छुप के बंसुरी बजाये रे

सुनाये मुझे मस्ती मे भरा हुआ राग रे

मोहे तारों की छाव मे बुलाये

चुराये मेरी निंदिया मै रह जाऊ जाग रे

लगे दिन छोटा रात बडी

जुल्मी संग आंख लडी रे

आता असे शब्द असल्यावर लताच्या सुरात जास्तीचा गोडवा येणार नाही तर काय! या गाण्यात अजून दोघांचं मोठं योगदान आहे. एक म्हणजे दिग्दर्शक बिमल रॉय आणि दुसरं म्हणजे नायिका वैजयंतीमाला. ज्या पद्धतीनं वैजयंतीमालानं या गाण्यावर नृत्य केलंय ते वहिदा रहेमान सोडल्यास इतर कुणाला जमेल की नाही याची शंकाच येते. 

याच चित्रपटातील दुसरं गाणं आहे- ‘घडी घडी मोरा दिल धडके’. इथं नायिका निसर्गात मुक्तपणे फिरत आहे.

आज पपिहे तू चूप रहना, मैं भी हू चुपचाप, 

दिल की बात समझ लेंगे, सावरीया अपने आप

आपल्यासोबत पक्ष्यालाही गृहीत धरण्याची ही कल्पना सुंदर आहे. 

‘परख’ (१९६०) हा बिमल रॉय यांचा महत्त्वाचा सिनेमा. ‘मधुमती’प्रमाणे सलिल-लता-शैलेंद्र हे त्रिकुटही इथं आहे. खरं तर ‘दो बिघा जमीन’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘उसने कहा था’ या चार चित्रपटांना बिमल रॉय-सलिल-लता-शैलेंद्र असा सांगितीक समभूज चौकोनच म्हटलं पाहिजे. या गाण्यांचं चित्रीकरण वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

‘परख’मध्ये साधनाच्या तोंडी ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे नितांत सुंदर गाणं आहे. या गाण्याचं चित्रण, गाण्याच्या सुरुवातीपासून लताच्या स्वरांशी जुगलबंदी करत आलेली सतार, साधना कट नसलेली साधी गोड साधना या सगळ्याचं एक वेगळंच रसायन पडद्यावर जमून आलं आहे. हे गाणं नुसतं ऐकायला तर गोड आहेच, पण पाहायलाही देखणं आहे. शैलेंद्रने फार कमी शब्दांत भावना मांडली आहे-

तुमको पुकारे मेरे मन का पपिहा

मिठे मिठे अगनी जले मोरा मनवा

ऐसी रिमझिम मे ओ साजन

प्यासे प्यासे मेरे नयन

तेरे ही ख्वाब मे खो गये

सावली सलोनी घटा जब जब छायी

आखियो मे रैना गई निंदीया ना आयी

इतकंच हे गाणं आहे. दुसरं एक गाणं याच चित्रपटात आहे. मोकळी हवा, निसर्ग, झरे, नद्या, डोंगर, आभाळ, धरती, हिरवळ, वारा, ढगाळलेलं आभाळ या सगळ्यांची नेहमीच शैलेंद्रला ओढ जाणवते. सलिल चौधरीसारखा संगीतकार आणि बिमल रॉयसारखा दिग्दर्शक लाभल्यावर तर काही विचारायलाच नको. साधना झाडाजवळ बसली आहे. तिला एक कानातल्या झुमक्यासारखं फुल दिसतं. पाठोपाठ म्हशीच्या पाठीवर बसून जाणार्‍या गुराखी मुलाचा पावा ऐकायला येतो. हा तुकडा फारच सुंदर आहे. सुरांचे असे बारकावे शंकर-जयकिशन फारसे टिपत नाही. साधना त्या सुरावटीप्रमाणे गुणगुणते. परत पावा ऐकू येतो. आणि हे सुंदर गाणंच सुरू होतं-

मिला है किसी का झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीम तले

ओ सच्चे मोतीवाला झुमका, ठंडे ठंड हरे हरे नीम तले

सुनो क्या कहता है झुमका 

प्यार का हिंडोला यहां झूल गये नैना

सपने जो देखे मुझे भूल गये नैना

हाय रे बेचारा झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीम तले   

या गाण्यात गुराखी म्हशीच्या पाठीवर बसून पावा वाजवत आहे. शेळ्या धूळ उडवत निघाल्या आहेत. वासरं हुंदडत आहेत. तळ्याच्या पाण्यात कमळं डोलत आहेत. सगळं आऊटडोअर शुटिंग. कुठेच सेट लावलेला नाही. कृत्रिमता कुठेच नाही. साधनाला तर जवळपास मेकअप नाहीच. गळ्यात एक साधी साखळी. हातात दोन दोन बांगड्या. गडद काठाची कलकत्ता हँडलूमची साडी. लांब हाताचे गळ्यापर्यंत ब्लाऊज.  

बिमल रॉय-सलिल-लता-शैलेंद्र या सांगीतिक समभुज चौकोनाचं पुढचं गाणं ‘उसने कहा था’ (१९६१) मधलं आहे. हा बिमल रॉय यांचं दिग्दर्शन नसलेला, पण निर्मिती असलेला चित्रपट. यात साधनाच्या जागी नंदा आहे. कमळं फुललेल्या तळ्याच्या काठी दोन्ही हातावर ओढणी आभाळासारखी पसरून ती म्हणते आहे-

मचलती आरजू खडी बाहे पुकारे 

ओ मेरे साजना रे धडकता दिल पुकारे आ जा

मेरा आंचल पकड के कह रहा है मेरा दिल, 

जमाने की निगाहो से यहां छूप छूप के मिल, 

यही तनहाईयो मे दिल की कली जायेगी खिल

आता हीच भावना आधीच्याही गाण्यांमध्ये आली आहे. शैलेंद्रच्या डोक्यात निसर्ग आणि प्रेम हे समीकरण काहीतरी पक्कं बसलं आहे. या गाण्यात वडाचं व पिंपळाचं झाड दाखवलं आहे. त्यालाही परत पुराणकथांचे संदर्भ आहेत. वडाशी तर सत्यवान सावित्रीची कथा चिकटलेलीच आहे. याच चित्रपटात तलत-लताचं अविट गोडीचं ‘आ हा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये, आयी रात सुहानी देखो प्रीत लिये’ हे गाणं आहे. 

नंदाच्या वार्‍यावर उडणार्‍या ओढणीसोबतच वार्‍याच्या झुळूकीनं गवतावर उठलेल्या लाटाही जेव्हा बिमल रॉय दाखवतात, तेव्हा खरंच शब्द, सूर, कॅमेरा सगळं सगळं कसं एकजिनसी होऊन एक जिवंत काव्यच आपल्या डोळ्यासमोर जिवंत करतात. ते कानांसोबतच डोळ्यांनाही सुखद अनुभव देऊन जातं. 

बिमल रॉय शिवाय या त्रिकुटाने अजून दोन चित्रपटांत दखल घ्यावी अशी याच आशयाची गाणी दिली आहेत. ‘चार दिवारी’ (१९६१) मध्ये नंदाच्या तोंडी हे गोड गाणं आहे- 

झुक झुक झुक झूम घटा छायी रे, 

मन मोरा लहराये, 

पीहू पीहू पीहू पपिहा गायें रे 

दोरीवर वाळलेले कपडे काढताना, अंथरूण-पांघरूण आवरताना हे गाणं आहे. गाण्यातल्या सगळ्या प्रतिमा परत निसर्गाच्याच आहेत. बाज उभी करून ठेवताना बाजेच्या ताणलेल्या दोर्‍यांआडून तिचा चेहरा दाखवताना केवढी कल्पकता दिग्दर्शक दाखवतो. घरातली साधी साधी कामं करतानाही कॅमेरानं सौंदर्य टिपलं आहे. 

याच वर्षीच्या तनुजाच्या ‘मेमदीदी’ (१९६१) चित्रपटातही या त्रिकुटाने एक-दोन नाही तर तब्बल तीन अशी गाणी दिली आहेत. पहिलं गाणं आहे- 

रातों को जब नींद उड जाये, 

घडी घडी याद कोई आये

यात कोरसचा अतिशय चांगला वापर केला आहे. हिंदी गाण्यात कोरसचा वापर जसा सलिल चौधरी यांनी केला, तसा फार कमी संगीतकारांनी केला. 

दुसरं गाणं आहे-

भुला दो जिंदगी के गम, तराना छेडो प्यार का, 

के आ रहा है आ रहा है कारवा बहार का 

ज्यात परत अतिशय चांगला कोरसचा आणि पाश्चिमात्य सुरावटीचा वापर केला आहे. निसर्ग तर आहेच, जो अशा गाण्यात शैलेंद्रच्या शब्दांचा अविभाज्य भागच आहे. 

कली कली से कह दो हमसे मुस्कुराना सीख ले, 

कहां है भवरा आके हमसे गुनगुनाना सिख ले, 

ये दिन है सारी जिंदगी मे सिर्फ एक बार का 

शैलेंद्रला शब्द सहज सुचत जातात किंवा खरं तर एखादी चाल संगीतकाराने दिली की, त्याच्या डोक्यात असे शब्द फेर धरून नाचायला लागतात की काय अशी शंका येते.

तिसरं गाणं खूपच गोड आहे. तरुणपण आलं म्हणजे बालपण सोडून गेलं आणि त्याच्या जाण्याची लाडिक तक्रार आहे

बचपन ओ बचपन, प्यारे प्यारे बचपन, 

ओ लल्ला सच बतला, कहां गया तू छोड के 

या शब्दांना साजेशी अशी गतिमान चाल गाण्याला आहे. खरं तर हे गाणं गीता किंवा अशासाठी असावं असं वाटतं. पण लताच्या आवाजाची कमाल म्हणजे तिनं याला योग्य तो न्याय दिला आहे. तिच्या आवाजाताला अवखळपणा इथं जाणवतो.

या काही गाण्यांतून सलिल-लता-शैलेंद्र हा सांगीतिक त्रिकोण समभूज आहे हे लक्षात येतं. इथं शब्द-सूर-संगीत सारख्याच ताकदीनं येतात. बिमल रॉयच्या चित्रपटात तर हा त्रिकोण समभूज चौकोन बनतो. असं फार कमी वेळा घडलेलं आहे. 

शंकर-जयकिशनसोबत शैलेंद्रने सगळ्यात जास्त गाणी दिली. पण त्यासोबतच शैलेंद्रच्या शब्दांची जातकुळी ओळखून त्याला न्याय देणारे सलिल चौधरीसारखे संगीतकारही होते. 

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......