इब्सेनचं ‘घोस्टस्’ : मानवी नातेसंबंधांची अस्वस्थ करणारी पडझड
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘घोस्टस्’मधील एक दृश्य
  • Thu , 27 April 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नाटकबिटक Natatbitak अविनाश कोल्हे Avinash Kolhe हेनरिक इब्सेन Henrik Ibsen घोस्टस् Ghosts इला अरुण Ila Arun के. के. रैना K. K. Raina

नॉर्वेजीयन नाटककार हेनरिक इब्सेनची नाटकं नाट्यरसिकाला परिचित असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी रंगभूमीवर इब्सेनच्या नाटकांचा प्रवेश झाला. त्याची काही नाटकं पुरोगामी आशय व्यक्त करणारी असतात, तर काही जीवनातील दैनंदिन संघर्ष व कारुण्य वगैरेंवर प्रकाश टाकणारी. मराठी रंगभूमीवर इब्सेनची पुरोगामी आशय असणारी नाटकं जास्त प्रमाणात सादर झाली. उदाहरणादाखल ‘ए डॉल्स हाऊस’, ‘अ‍ॅन एनिमी ऑफ द पिपल’, ‘पिलर्स ऑफ सोसायटी’ वगैरे नाटकांचा उल्लेख करावा लागेल. मात्र इब्सेनची ‘घोस्टस्’, ‘हेडा गॅब्लर’सारखी इतर नाटकं मराठीत फारशी आलेली नाहीत आणि भारतीय भाषेतही. म्हणूनच अलिकडे मुंबर्इत ‘अंतर्ध्वनी’ या नाट्यसंस्थेतर्फे इब्सेनच्या ‘घोस्टस्’चे हिंदी भाषेतील प्रयोग सादर करण्यात आले, तेव्हा ती एक मेजवानी होती.

इब्सेनने हे नाटक १८८१ मध्ये लिहिलं आहे. इला अरुण यांनी त्याचं स्वैर रूपांतर केले असून त्याला समकालीन संदर्भही दिले आहेत. म्हणूनच या नाटकातील पात्रं मोबार्इल फोन वापरताना दिसतात. इला अरुण यांनी या नाटकाचं स्थळ राजस्थानातील एक राजघराणं घेतलं आहे. यामुळे भारतीय प्रेक्षकांना युरोपियन नाटककाराची ही कलाकृती सहज आस्वाद्य झाली आहे. इला अरुण यांनी ‘घोस्टस्’चं ‘पिछा करती परछाईंया’ असं हिंदी रूपांतर केलं आहे.

हेनरिक इब्सेन आणि इला अरुण

इला अरुण यांनी या नाटकाला फार सफार्इनं भारतीय बाज चढवला आहे. यात महाराज कुंवर विराज भानू प्रताप सिंग यांची व त्यांच्या कुटुंबियांची कथा येते. नाटक सुरू होतं तेव्हा महाराज कुंवर विराज यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झालेला असतो. त्यांची विधवा पत्नी यशोधरा रंगमंचावर कोणाची तरी वाट पाहत असते. तेवढ्यात राजघराण्याचे मित्र पुरोहितजी येतात. दोघांची राजघराण्याच्या इस्टेटीच्या संदर्भात चर्चा सुरू होते. त्यांनी एक शाळा सुरू केलेली असते. तिला दिवंगत महाराज कुंवर विराज यांचं नाव देण्याचं ठरलेलं असतं. दुसऱ्या दिवशी एका जाहीर कार्यक्रमात शाळेचं लोकार्पण होणार असतं. या कार्यक्रमासाठी राजघराण्याचे एकुलते एक वारस युवराज कुंवर खास पॅरिसहून आलेले असतात. त्यांनी पॅरिसमध्ये एक उत्तम चित्रकार व डिझायनर म्हणून नावलौकिक संपादन केलेला असतो. जसजसं नाटक पुढे सरकतं तसतसं प्रेक्षकांना जाणवतं की, या हवेलीच्या पोटात खूप पापं दडलेली आहेत. वरवर सुखी असण्याचा आव आणणारं हे राजघराणं व त्यांची हवेली आतून पोकळ झालेली आहे.

युवराज कुंवरला हे सर्व थोतांड वाटत असतं. मात्र त्याला दिवंगत वडिलांबद्दल आदर असतो. हे त्याच्या आर्इला फारसं आवडत नाही. तिने लहानपणापासून युवराजला त्याच्या वडिलांपासून दूर ठेवलं होतं. याचं कारण यशोधराला मनापासून वाटत होतं की, बापाच्या पापी जीवनाची सावली माझ्या मुलांवर पडू नये, पण तसं होत नाही. यशोधराचे पती महाराज कुंवर अतिशय बार्इलवेडे होते. ते नजर पडेल त्या स्त्रीला भोगण्यासाठी भरपूर प्रयत्न करायचे. या व्यसनात त्यांनी हवेलीत काम करणाऱ्या स्त्रीलासुद्धा सोडलं नव्हतं. याची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी नेहमी पत्नी यशोधराकडे दुर्लक्ष केलं. यामुळे यशोधराची शारीरिक व मानसिक घुसमट होत राहिली. ती फक्त आपल्या मुलाकडे बघत हे सर्व सहन करत राहिली.

नंतर तिच्या लक्षात येतं की, आपला मुलगासुद्धा फार वेगळा नाही. यथावकाश प्रेक्षकांना कळतं की, यशोधरा तिच्या लग्नाला एक वर्ष झाल्यावर एका रात्री पळून पुरोहितजीच्या घरी गेली होती. यशोधरेला जाणवलेलं असतं की, पुरोहितजीचं तिच्यावर प्रेम आहे व तिचंसुद्धा. पण त्या रात्री पुरोहितजी तिची समजूत काढून तिला परत हवेलीत पाठवतो.

राजपुत्र कुंवरला जर आपल्या प्रेमात पाडता आलं तर आपल्यालासुद्धा पॅरिसला जाता येर्इल आणि कुंवरच्या पैशावर जग बघता येर्इल, या हेतूने यशोधरेची तरुण दासी प्रयत्न करत असते. राजपुत्र कुंवर एकदा मद्याच्या नशेत असताना या दासीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून यशोधराच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती काही केल्या त्यांना एकत्र येऊ देत नाही. या मागे एक बारकसं उपकथानक आहे. महाराज कुंवर यांनी ज्या दासीशी तिच्या मनाविरुद्ध संभोग केलेला असतो, तिला महाराज कुंवरपासून झालेली मुलगी म्हणजे ही तरुण दासी असते. म्हणजे ती युवराज कुंवरची सावत्र बहीण असते. यशोधरा हे अघटित होऊ द्यायचं नाही असं ठरवत हळूहळू सर्व कथा राजपुत्र कुंवरला सांगते. यात तिला पुरोहितजींची मोलाची मदत होते. नंतर लक्षात येतं की, पुरोहितजींच्या मनातही यशोधरेबद्दल हळूवार भावना होत्या, पण मित्राची पत्नी म्हटल्यावर त्यांनी त्या भावनांना लगाम दिला. आज मित्रकर्तव्यापायीच ते यशोधरेला मदत करत आहेत.

महाराज कुंवरपासून गरोदर झालेल्या दासीचं लग्न एका गरीब माणसाशी लावून देतात. मात्र हा व्यवहार तसा उघडा असतो. यात फसवणूक नसते. यशोधरा महाराज कुंवरच्या सावत्र मुलीला राजवाड्यात मोठी करते. आता हीच मुलगी तिच्यासमोर मोठं आव्हान उभं करते. सरतेशेवटी त्या मुलीला हे सर्व कळतं, तेव्हा तीसुद्धा तिच्या मनातली खरी योजना उघड करते. ती म्हणजे युवराज कुंवरचा हात पकडून पॅरिसला जायचं आणि मग त्याला टांग मारून नवा पर्याय शोधायचा. एव्हाना प्रेक्षकांच्या लक्षात येतं की, या हवेलीतील प्रत्येक नातेसंबंध या ना त्या प्रकारच्या स्वार्थावर आधारलेला आहे. शुद्ध स्वरूपात इथं काहीही नाही. थोडक्यात, या हवेलीचे एकेक खांब पडत जातात.

असं कमालीचं प्रामाणिक नाटक आपल्याकडे क्वचितच लिहिलं जातं. या संदर्भातील अपवादात्मक नावं म्हणजे विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर वगैरे. इब्सेनने हे नाटक जेव्हा लिहिलं, तेव्हा युरोपात या नाटकावर प्रचंड टीका झाली होती. इब्सेनला याचा अंदाज होता. त्याला युरोपियन समाजात असलेल्या दुटप्पीपणावर प्रकाश टाकायचा होता. त्याचा हा हेतू यशस्वी झाला असं म्हणावं लागतं. याचं कारण या नाटकावर फार उलटसुलट चर्चा झाली होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये या नाटकावर बंदी घालण्यात आली होती.

इला अरुण यांचं रूपांतर फार प्रभावी आहे. त्या स्वतःच्या राजस्थानच्या असल्यामुळे त्यांच्या राजस्थानी हिंदीतील संवादातून पात्रं जिवंत होतात. या नाटकाचं दिग्दर्शन के. के. रैना या ज्येष्ठ रंगकर्मींनी केलं आहे. शिवाय त्यांनी पुरोहितजींची भूमिकाही केली आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्या आहेत. नाटकातील सर्व प्रसंग हवेलीच्या हॉलमध्ये होतात. फक्त एकच महत्त्वाचा प्रसंग हॉलच्या मागच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या बाल्कनीत होतो. तो म्हणजे युवराज कुंवरने दासीशी बळजबरी करण्याचा प्रसंग. नाटकाचं यथोचित नेपथ्य सलिम अख्तर यांचं आहे. त्यांनीच प्रकाशयोजना सांभाळली आहे.

नाटकातील प्रमुख पात्र म्हणजे यशोधरा. ही भूमिका इला अरुण यांनी साकार केली आहे. त्यांच्या उठण्या-बसण्यात महाराणीचा तोरा आहे. हीच यशोधरा जेव्हा मुलाच्या दुःखानं वेडीपिशी होते, तेव्हा इला अरुण यांनी फोडलेला टाहो हृदयाचं पाणी करून जातो. ज्या मुलावर हवेलीचे वार्इट संस्कार होऊ नये म्हणून त्याला स्वतःपासून दूर ठेवला, तोच मुलगा तीच पापं करत आहे, हे बघितल्यावर यशोधरा उदध्वस्त होते. इथं काही मराठी वाचकांना श्री. ना. पेंडसे यांच्या ‘रथचक्र’ या कादंबरीची आठवण होऊ शकते.

इब्सेनसारख्या थोर नाटकाकाराची नाटकं स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून जातात. म्हणून आजसुद्धा ‘घोस्टस्’सारखं नाटक प्रेक्षकांना बघावंसं वाटतं. त्या अनुषंगाने आपल्या आजूबाजूला दिसत असलेला मानवी नातेसंबंधातील स्वार्थ व पडझड अस्वस्थ करून जाते. इब्सेनच्या या नाटकाचं महत्त्व आहे ते यासाठी.                      

लेखक मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ADITYA KORDE

Fri , 28 April 2017

मला वाटते कि आचार्य अत्रे ह्यांनी ह्या विषयावर एक नाटक लिहिले आहे / होते उद्याचा संसार किंवा घराबाहेर . त्यावेळीही त्यांनी ते इब्सेनच्या ह्या घोस्त वरून चोरल्याचा आरोप झाला होता. अर्थात मुलगा आणि वडिलांच्या बाहेरील प्रकरणापासून झालेली मुलगी ह्यांच्यातल्या प्रेम संबंधापेक्षा त्यात काही समान नव्हते ...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख