अजूनकाही
निथीलन स्वामिनाथनचा ‘महाराजा’ हा अत्यंत विलक्षण सिनेमा आहे. त्याचं मुख्य कारण आहे, ‘कथन’ (storytelling). त्याची पटकथा अ-क्रमिक (नॉन-लिनीयर) आहे. तीच जर क्रमिक (लिनीयर) असती, तर ‘महाराजा’ हा एका चांगल्या कथेवर आधारित साधारण सिनेमा झाला असता. पण निव्वळ तो अ-क्रमिक शैलीत सांगितल्यामुळे असाधारण झाला आहे. कारण कथेमध्ये जी नैतिकता, शील आहे, ती पटकथेमुळे एकदम प्रकर्षाने पुढे मांडली जाते. कथेतली ती नैतिकता, ते शील म्हणजे ‘लक्ष्मी’ हा लोखंडी कचऱ्याचा डबा.
चेन्नईच्या दक्षिणेकडील पल्लीकरनाई नावाच्या एका छोट्या शहरातल्या सलूनचा मालक, गिर्हाईकाची वाट बघत आपल्या दुकानातील कर्मचाऱ्यांबरोबर अंताक्षरी खेळत असतो. त्यातल्या एकावर ‘क’ येतो. तो महाराजा, विजय सेतुपती, एक नाभिक असतो. महत्त्वाची भूमिका असलेल्या व्यक्तिरेखेची ही अत्यंत साधी आणि सामान्य ओळख, सिनेमाच्या पहिल्याच दृश्यात. हीच सामान्य साधारण व्यक्तिरेखा अ-क्रमिक पटकथेतून उलगडत असामान्य, असाधारण होत जाते.
कथेला खरी सुरुवात होते ती महाराजा पोलीस स्टेशनात जाऊन आपल्या घरातली ‘लक्ष्मी’ चोरीला गेल्याची तक्रार करायला जातो तिथून. ‘तुझा कचऱ्याचा डबा शोधायला पोलीस यंत्रणा काय रिकामी बसली आहे काय?’ पोलीस त्याची हेटाळणी करून त्याला वाटेला लावायला बघतात. पण महाराजा खूप हट्टी असतो. तो त्याच्या लक्ष्मीला कचऱ्याचा डबा मानायला तयार नसतो. उलट तो त्याच्या शोधाकरता पोलिसांना काही लाख रुपये लाच द्यायलाही तयार होतो. इथून पुढे पोलीस यंत्रणेचं चरित्रही उलगडत जातं.
पटकथा म्हणजे निव्वळ एका मागून एक रचलेली दृश्यांची मालिका नव्हे. त्यातून फक्त गोष्ट उलगडत जात नाही, तर अनेक संकल्पना आणि व्यक्तिरेखाही उलगडत जातात. सुरुवातीला भ्रष्टाचारी वाटणारी पोलीस यंत्रणा कालांतराने कार्यक्षम वाटू लागते आणि पुढे तर ती न्यायिकही होताना दिसते.
चांगल्या पटकथेत व्यक्तिरेखेत होणारा हा सकारात्मक किंवा नकारात्मक बदल अभिप्रेत असतो. तो एकरेषीय असत नाही. माणूस केव्हा कसा वागेल, याला काही ‘लॉजिक’ नसतं. चांगल्या पटकथेतल्या व्यक्तिरेखा माणसाप्रमाणे वागतात. लेखक लिहिल तशा त्या वागत नाहीत. महाराजातल्या व्यक्तिरेखांबद्दल मात्र इथं सविस्तर लिहिता येणार नाही, कारण त्यामुळे कथा उलगडण्याची भीती आहे.
चांगल्या अ-क्रमिक पटकथेचं हे काही पहिलं उदाहरण नाही. असंख्य आहेत. ग़ुलज़ार यांनी ती शैली आपल्या चित्रपटांतून अनेकदा परिणामकारकतेने वापरली आहे. नुकताच अॅटलीच्या शाहरुख खान अभिनीत ‘जवान’ची पटकथाही अशीच आहे. एखादा परिणाम साधण्यासाठी कथेचा केलेला गुंता सिनेमाच्या शेवटाला अल्लद सोडवता आला पाहिजे. तो कळायला प्रेक्षकाला त्रास झाला तरी चालेल, पण तो सोडवता आला पाहिजे. पटकथेत तुम्ही निर्माण केलेल्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरं दिली पाहिजेत. ती शोधण्याचे प्रयत्न प्रेक्षक जितका करेल, तितका तो त्यात गुंतत जाईल.
कधी कधी फ्लॅशबॅकने दाखवलेल्या कथेला आपण अ-क्रमिक शैली समजून मोकळे होतो. ‘दीवार’ आणि ‘शोले’ही मग अ-क्रमिक समजले जातात, पण तसे ते नाहीत.
मुळात अशा पद्धतीने कथा सांगण्याची गरज चित्रकर्त्याला का वाटत असावी? याचं प्रयोजनच त्याची परिणामकारकता ठरवतं. निव्वळ ‘मला वाटलं!’ म्हणून ते होत नाही. कथेच्या ओघात मुद्दाम काही तपशील लपवल्याने प्रेक्षक गोंधळून वेगळा विचार करतो. पुढे ते तपशील त्याला दाखवल्यावर आपण कसे फसलो, या विचाराने तो आधी चकित होतो आणि मग सुखावतोही.
हे, असं प्रेक्षकाने चकित होणं आणि सुखावणं सिनेमाकर्त्याला अपेक्षित असतं. यामुळे प्रेक्षक चित्रपटात गुंतवण्यात तो यशस्वी होत असतो. नाहीतर आजकाल सिनेमे ओटीटीवर आल्यामुळे घरातली कामं करत मालिका बघितल्यासारखे बघितले जातात. ज्याला आपण ‘Captive audience’ म्हणतो, तो मिळणं आता दुरापास्त झालं आहे. आज थिएटरमध्ये ही पॉपकॉर्न खात खात उरलेल्या वेळात सिनेमा बघितला जातो.
ओटीटीमुळे चित्रपट थांबवून थांबवून बघता येऊ शकतो. तरी तो पुस्तकासारखा, वाचताना बाजूला ठेवता येत नाही. तो सलग बघण्यातच मजा असते. म्हणून त्या कथेत चित्रकर्त्याला अभिप्रेत असलेले वेगळे अर्थ आणि संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शैलीची गरज भासू लागते.
हा चित्रपट पाहिल्यावर एक प्रश्न प्रकर्षाने पडतो की, गुन्हेगारी किंवा थ्रिलर पटात, माणसाच्या स्वभावाचे कंगोरे जितके टोकदारपणे बाहेर येऊ शकतात, तसे ते इतर सामाजिक विषयातून बाहेर येत नाहीत का? (‘गॉडफादर’ हे त्याचं आद्य उदाहरण आहे)
आता थोडं सिनेमातील ‘महाराजा’ची मुख्य भूमिका करणाऱ्या विजय सेतुपथी या नटाबद्दल आणि त्याच्या अभिनयाबद्दल. ‘तो पडद्यावर अत्यंत कोऱ्या (किंवा मख्ख) चेहऱ्याने वावरत असतो’ हा त्याच्यावर होणारा जनरल आरोप. म्हणून, काही लोक त्याला चांगला अभिनेता मानत नाहीत. आपल्याकडे चांगल्या अभिनयाचे काही ठोकताळे आहेत. म्हणजे हसता हसता रडणे किंवा रडता रडता कोणी हसलं की, तो चांगला अभिनेता मानला जातो.
एकदा एका नामांकित मराठी अभिनेत्याने त्याच्या मुलाखतीत त्याचं प्रात्यक्षिकच करून दाखवलं होतं. पण खरं तर तुम्ही असलेल्या प्रत्येक दृश्यात तुमचं अस्तित्व जाणवणं हेच आणि इतकंच उत्तम अभिनेत्याचं कसब असतं.
विजय सेतुपथी असलेल्या प्रत्येक दृश्यात तुम्हाला त्याचच अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. आपल्या लक्ष्मीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना विनवणारा, त्यांची पडेल ती कामं करणारा हतबल महाराजा, ते त्याची हेटाळणी होऊन त्याला पोलीस स्टेशनातून हाकलून लावतात, तेव्हा रौद्र रूप धारण करणारा हट्टी महाराजा विजय सेतुपथी लीलया उभा करतो.
सामान्य माणसांतलं असामान्यत्व दाखवण्यासाठी विजय सेतुपथी मोक्याच्या क्षणी, बरोबर, काळजी, आगतिकता, राग, लोभ, शौर्य, क्रौर्य, दाखवून तुम्हाला चकित करतो. सामान्य माणसांतलं असामान्यत्व दाखवणं हा त्याचा गुणही आहे आणि हीच त्याची मर्यादाही असू शकते. म्हणूनच ‘जवान’ या सिनेमात तो तितका परिणामकारक होत नाही. त्यातला खलनायक हा मुळातच अत्यंत शक्तिशाली आहे. एखाद्या सामान्य माणसांतलं खलत्व (किंवा असामान्यत्व) विजय सेतुपथी जितकं परिणामकारकपणे दाखवतो, तितकं तो शक्तिशाली माणसातील खलत्व (किंवा असामान्यत्व) दाखवण्यात यशस्वी होताना दिसत नाही.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
दुसरी महत्त्वाची बाब- अभिनय माध्यमागणिक बदलतो. नटाला त्या माध्यमाची ताकद आणि जाण असणं गरजेचं असतं. विजय सेतुपथीतल्या नटाला सिनेमा माध्यमाची नस गवसली आहे, हे नक्की.
महाराजा ‘flawless’ (अचूक) आहे का? नसावा. उदाहरणार्थ, त्यातला विनोद चांगला असला तरी काही ठिकाणी तो अस्थाई वाटतो. दुसरं उदाहरण. एका दृश्यात आलेला नाग. (नागाला आपल्या मिथकात अनेक संदर्भ आणि आयाम आहेत.) त्याचं प्रयोजन शेवटपर्यंत कळत नाही. पण त्या वेळी तो तुमच्या मानसिकतेवर एक परिणाम नक्कीच साधतो. मग प्रश्न पडतो की, कलाकृती अचूक असणं खरंच गरजेचं असतं का? विज्ञान आणि कलेत हाच तर फरक असतो. विज्ञान अचूक असावं, कला परिणामकारक असावी. महाराजा कमालीचा ‘परिणामकारक’ झाला आहे.
जाता जाता एक सूचना : हा सिनेमा मूळचा तमिळमध्ये तयार झाला आहे. तो हिंदीत डब केला आहे. तसे करताना काही घोळ झाले आहेत. ते इंग्लिश सबटाइटल वाचतानाच लक्षात येतात. उदा. पोलीस महाराजाला त्या कचऱ्याच्या डब्याची किंमत विचारातात. तेव्हा तो हिंदीत म्हणतो की, ‘मी तेव्हा तो ३००-३५०ला विकत घेतला होता.’ आणि सबटाइटलमध्ये असं लिहिलं आहे की, ‘Then it may be worth around rs. 300-350’ म्हणजे सबटाइटलमध्ये त्याने तो विकत घेतल्याचा कुठे उल्लेख नाही. आणि हा तपशील खूप महत्त्वाचा आहे, जो डबिंगमध्ये चुकीचा दिला जातो. मूळ भाषेत तो तपशील नेमका दिला असावा. तेव्हा हा सिनेमा हिंदीत बघतानाही सबटाइटलवर लक्ष ठेवा.
दुसरी सूचना : नेटफ्लिक्सवर ‘महाराज’ नावाचा एक अत्यंत वाईट हिंदी सिनेमा आहे. जो गुजरातमधील एका बाबा महाराजवर आधारित आहे. तोही नवीनच आहे. त्यापासून सावध राहा.
.................................................................................................................................................................
लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.
mahendrateredesai@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment