अजूनकाही
दोन दिवसांपूर्वी 'टेक ऑफ' हा मल्याळी सिनेमा मुंबईच्या थिएटरात पहिला. व्यावसायिक आहे आणि दाक्षिणात्य असल्याने प्रथेप्रमाणे तो हिंदी मसालेपटाच्या गर्दीत खूप उजवा आहे.
सध्या (पॉप्युलर मीडियाची चिकित्सा करण्याची अकॅडेमिक टूम असल्याने) ‘स्त्रीशक्ती’ हे चलनी नाणं झालं आहे. कपड्यांची जाहिरातीत शहरी\उच्चभ्रू लेस्बियन मुली, दागिन्यांच्या जाहिरातीमध्ये दुसरं लग्न एन्जॉय करणारी आई, औषधाच्या जाहिरातीत तृतीयपंथीय, नवरा-बायकोत समानता शिकवणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, असं थोडं तोंडी लावायला घेतलं की, तुम्ही शहरी- सवंग- उदारमतवादींच्या (उदा- 'आप'सारखे पक्ष) कळपात सहज सामील होऊ शकतात. या अशा सवंग काळात 'टेक ऑफ' वेगळं बोलतो, लिपस्टिकऐवजी बुरख्यातल्या स्त्रीला दाखवतो, तेही कोणतीही फेसबुकी आरडाओरड ना करता.
गोष्ट (सत्य घटनेवर आधारित पण सिनेमॅटिक स्वातंत्र्य घेतलेली) समीरा आणि तिच्यासारख्याच इतर मध्य पूर्वेत नर्स म्हणून कामाला गेलेल्या केरळी नर्सची आहे. सिनेमाचा पूर्वार्ध हा समीरचा आहे, तर उत्तरार्ध २०१४ च्या इसिसच्या तावडीतून भारतीयांची (समिरासकट इतर २० केरळी नर्सेसची) सुटका करण्याच्या राजनैतिक पातळीवर\वैयक्तिकरित्या केलेल्या प्रयत्नांचा आहे.
'केरळी नर्स' हा जगभरातला पोचलेला लोकप्रिय भारतीय ब्रँड आहे, पण त्यामागे असलेल्या साक्षरता, गरिबी, धार्मिक पगडा, परंपरा या सगळ्या विषयांना पटकथा लेखक, दिग्दर्शक पुढे आणतात. नेमकं पण ठाम मत व्यक्त करतात.
केरळ ही पूर्वापासून व्यापारी कारणांनी जगभराशी संपर्क असलेली बंदर भूमी आहे. फोर्ट कोची शहरात नुसता फेरफटका मारला तर डच, पोर्तुगीज, ज्यू, हिंदू, मुस्लिमांच्या खुणा अत्यंत विशुद्ध रूपात दिसतील. थोडं भाबडेपण जपून असाल तर या कालव्यापी मानव्यसंस्कृतीच्या मेळ्यात 'आपण ते केवढे'? हे उमजून डोळ्यात पाणीही येईल. अशा केरळात तुम्हाला उदारमतवादी आणि तेवढेच कट्टर असे सर्व धर्मातले भेटतील.
समीरा ही अशीच केरळी मुस्लिम, पण धर्माचं जोखड नसलेल्या घरात वाढलेली मुलगी लग्न करून मध्य पूर्वेत जाते. तिचं सासर आधुनिक सोयी आणि 'धार्मिक' कट्टरता असलेलं. तिथं तिचं डोकं न झाकता घरभर वावरणं, नवऱ्याशी सर्वांसमोर आपलेपणा दाखवणं, नर्स म्हणून कामाला जाताना बुरखा न वापरणं… अशा परिस्थितीत तिची होणारी घुसमट, त्यामागून प्रथेप्रमाणे होणार घटस्फोट आणि तिचं रुक्ष वाळवंटातून, बदाबदा पाऊस ओतणाऱ्या मोकळ्या केरळी घरात रडारड न करता परत येणं, हे (फक्त एका प्रसंगामध्येच) मोजक्या दृश्यातून दिग्दर्शक दाखवतो.
समीरा कोलमडून जात नाही, दुबईत वाढत असलेल्या मुलाबरोबर फोनवर बोलून मातृत्वाची तहान भागवते. नर्स म्हणून काम करते, पुन्हा नव्याने प्रेमात पडते आणि त्याच्या-तिच्या घरच्यांना सांभाळत नवीन नवऱ्याबरोबर इराकमध्ये कामाला म्हणून जाते. नवरा डॉक्टर असला, प्रेमळ असला तरी तो भारतीयच. तिला कधी प्रेमानं तर कधी माहेरच्यांना मध्ये घालून तो दुसऱ्या मुलासाठी तयार करतो. सासू, नवऱ्याचं मन राखत गरोदर असतानाही ती नवऱ्याबरोबर इराकला जाण्याचा निर्णय घेते आणि इसिसच्या युद्धात (बंडाळीत) अडकते.
तिचा नवरा युद्धभूमीवर डॉक्टर म्हणून जातो आणि इसिसच्या तावडीत सापडतो. त्याची रवानगी त्यांच्या कॅम्पवर होते. अशा युद्धभूमीवरून ठावठिकाणा नसलेल्या नवऱ्याला परत आणणं, मख्ख राजनैतिक यंत्रणेला हलवणं, स्वतःबरोबरच इतर नर्सेस आणि मुलाला सुरक्षित ठेवणं, सर्वांनी परत सुखरूप भारतात परतणं, याची गोष्ट म्हणजे हा सिनेमा. अगदी ९० च्या दशकात आलेल्या 'रोजा', 'एअर लिफ्ट'सारखा. पण हा सिनेमा एकटीचा होत नाही, दिग्दर्शकाने तो बहुवचनी केला आहे. भावनिक पाल्हाळ न लावता, बायकांना रडू न आणता, देशभक्तीनं ऊर न भरू देता तो एक चांगला सिनेमा पाहायला देतो.
हा सिनेमा व्हिज्युल एफेक्टच्या मदतीनं 'युद्धस्य कथा रम्य' याचबरोबर छोटी छोटी पात्रं आणि त्यांच्या प्रसंगातून जागतिक राजकारण, पडद्याआडच्या चालणारी राजनैतिक खलबतं, कधी इराकी तर कधी इसिस असा तासागणिक बदलणारा इराक, माणसाची बुद्धी\नैतिकता यांच्या गोष्टी सांगतो. भारतीयांनी (धर्मानं मुसलमान असूनही) मुस्लिम देशात मुस्लिम म्हणून कसं 'दिसायचं' अशी टीप देणारा एजंट, अति-गोपनीय कागदपत्रांच्या नावाखाली दारू आणणारा परराष्ट्रीय खात्याचा सचिव, 'मर्यादित दयाळू' पण असणारा इसिसचा म्होरक्या आणि यांच्या बरोबर पळून गेलो तर पगार मिळणार नाही म्हणून बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या इस्पितळाला न सोडणाऱ्या केरळी नर्सेस, पैसे पाठवले नाहीत तर घरी कोणत्या तोंडानं जायचं असा विचार करणाऱ्या. इसिसच्या तावडीत असतानाही मोबाइलसाठी जीव टाकणाऱ्या नर्सेस… त्यांची नावं वेगळी, गावं वेगळी, धर्म वेगळे, पण साऱ्यांची गोष्ट एकच- समीरासारखी.
दुसऱ्या महायुद्धात केरळातून काही मुलींना नर्स म्हणून जर्मनीत नेलं होतं. भयंकर थंडी, भाषा कळत नाही, फोन- पत्र नाही, 'अंड+ आई = चिकन' अशा मोडतोडक्या भाषेत बोलून त्यांनी परदेशात तग धरला. त्या परत आल्या नाहीत. ५० तापमान असो वा -५ थंडी असो, केरळी नर्सेसची ही चिकाटी त्यांच्या गरिबीतून आलेली आहे. ती गरिबी या सिनेमातून दिसते. यात 'केरळ' दिसत नाही, दिसतो तो पावसाळ्यात घर गळणारा, म्हाताऱ्यांनी उरलेला, ISD च्या बुथमधला, मशिदीतला, मोबाईलच्या व्हिडिओ चॅटमधला अंधूक केरळ.
मल्याळी सिनेमा हा अडूर गोपालकृष्णनपासून सुरू होतो आणि तिथेच न थांबता तो शाजी करुण, जयराजमार्गे अमल निराद आणि विपीन विजय यांच्यापर्यंत पोचतो. पृथ्वीराज, मम्मुटी, मोहनलाल सारखे अवाढव्य प्रसिद्धी असलेले नट व्यावसायिक आणि पूर्ण कलात्मक अशा दोन्ही सिनेमांत दिसतात. भडक अंगप्रदर्शनासाठी म्हणून मल्याळी नायिकांची दक्षिणेत प्रसिद्धी आहे, पण त्याच केरळात आता नायिकाप्रधान सिनेमे येतायेत. 'होव ओल्ड आर यु?', 'राणी पद्मिनी', 'नॉर्थ २४ कथाम' या सिनेमांत फक्त नायिकाच आहेत आणि त्यांनी व्यावसायिक यश मिळवलं आहे. फाहाद फाज़िलसारखे नट त्यांना वाट करून देतायत. पार्वतीसारख्या अभिनेत्री त्याचा राजमार्ग करतायेत. या सिनेमातही दोघे आहेतच. 'होव ओल्ड आर यु?' हा मंजू वोरीयर या अभिनेत्रीचा कमबॅक सिनेमा होता. तिच्या 'चर्चित' घटस्फोटानंतरचा! तिच्या अभिनेता असलेल्या नवऱ्याने हा घटस्फोट सार्वजनिक केला होता. पण मंजू उठून उभी राहिली. सिनेमाचा शो हाऊसफुल! सगळ्या बायकांनी भरलेल्या हॉलमध्ये मी कोचीनमधल्या स्त्री प्रेक्षकांचा आलेख बघत होतो.
‘टेक ऑफ’ तुम्ही पहा. पार्वती मेननसारख्या गुणी अभिनेत्रीसाठी. सबटायटल्सशिवाय पहा किंवा सिनॉप्सिस वाचून जा. मल्टिप्लेक्समध्ये पहा किंवा अरोरासारख्या सिंगल थिएटरमध्ये पहा. मेट्रोमध्ये नेव्हीनगरमधून आलेले नाविक दिसतील, कामा, जे.जे.मधल्या नर्सेस घोळक्यानं आलेल्या दिसतील...एकमेकींना धरून...एका हातानं घट्ट पकडलेला मोबाइल फोन आणि छोटा हातरुमाल. त्यांचं सिनेमा संपल्यावर चटचट करून निघून जाणं...घाटकोपरच्या आर सिटीमध्ये कौटुंबिक डोंबिवली दिसेल, अरोरामध्ये सडा फटिंग धारावी-माटुंगा. वाशीतल्या थिएटरात चेंबूर-पनवेल असेल. मुंबईतला केरळ भल्या पहाटे चार वाजता एअरपोर्ट जवळ yellow fever च्या लसीकरण्याच्या लाईनीत, साकीनाक्याच्या छोट्या हॉस्टेलमध्ये, कुलाबा मार्केटमधून (घरी पाठवायला म्हणून) कपडे विकत घेताना दिसेल. सहवेदना असेल तर हा केरळ दिसेलच!
सिनेमा पाहून, फोर्टमधली केरळ थाळी खावी, तिथंच टांगलेली वेलची केळी, इडलीऐवजी पुट्टं खावीत, संध्याकाळी चहाबरोबर पळमपोली किंवा मार्क्सला स्मरून बुर्झ्वा मेदूवडाऐवजी श्रमिकांचा डाळवडा खावा (किंमतसारखी असली तरीही), नाहीच जमलं काही तर केळं वेफर्स आहेतच! या उन्हाळ्यात ‘टेक ऑफ’च्या निमित्ताने मुन्नार, कोचीनऐवजी ‘मुंबईतला केरळ’ पहा.
……………………………………………………………………………………………
लेखक मुक्त फिल्ममेकर आहेत.
mydharavi@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment