अजूनकाही
संजय पवारांचं लेखन तिरकस व धारदार असतं आणि समकालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वास्तवावर जळजळीत भाष्य करतं. त्यांच्या १९९० साली आलेल्या ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकानं तेव्हा खळबळ माजवली होती. हे नाटक वादळी आहे, यात शंका नाही. पवार गेली अनेक वर्षं जातीनिर्मूलनाची भूमिका घेऊन लेखन करत आहेत. हे नाटक म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा आहे. अलीकडेच (एप्रिल २०२४मध्ये) पुन्हा एकदा हे नाटक बघण्याची संधी मिळाली.
यात नाटककार पवारांनी (आजही) देशात खदखदत असलेला ‘आरक्षण’ हा विषय केंद्रस्थानी ठेवला आहे. प्रजासत्ताक भारतात आरक्षणाची सुरुवात जरी १९५२ साली झालेली असली, तरी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी १९०२ साली त्यांच्या संस्थानात आरक्षण दिलं होतं. सुरुवातीला हे आरक्षण अनुसूचित जाती-जमातींसाठी होतं. १९९० साली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर ओबीसींनाही आरक्षण मिळालं. याच आयोगाचा आधार घेऊन नंतर दलित मुस्लीम, ओबीसी मुस्लीम, दलित ख्रिश्चन आणि हिंदूंतील मराठा, पटेल, जाट वगैरे निरनिराळ्या राज्यांतील समाजघटक आता आरक्षणाची मागणी करत आहेत.
तसं पाहिलं तर एका पातळीवर आरक्षणाबद्दल एव्हाना उलटसुलट चर्चा संपुष्टात यायला हवी होती. मात्र आजसुद्धा हा विषय आणि उच्चवर्णीय समाजावर असलेले मनूचे घट्ट संस्कार हा चिंतेचा विषय आहे. आरक्षणाला तेव्हासुद्धा आजच्याप्रमाणेच विरोध करणारे होते. आता तर आरक्षणाचा मुद्दा कमालीचा गुंतागुंतीचा झाला आहे.
पवारांनी या नाटकात वेगळ्या प्रकारची कल्पकता दाखवत आपल्या समाजातली जातींची उतरंड आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेची भावना, यावर जळजळीत प्रकाश टाकला आहे. १९९० साली आलेलं हे नाटक २०२४मध्येसुद्धा फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ‘समकालीन’ वाटावं, ही शोकांतिका आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नाटकाची सुरुवात ६०च्या दशकात मराठीत मंचित होत असलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकासारखी आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क या भागात राहणारं आराध्ये कुटुंब. श्रीयुत कमलाकर आराध्ये मध्यमवयीन, पुरोगामी विचारांचे नोकरदार गॄहस्थ, तर त्यांची पत्नी विमला गृहिणी. मोठी मुलगी सुकन्या आणि धाकटा मुलगा सुदर्शन असं हे चौकोनी कुटुंब.
(नाटकाची सुरुवात दिवाणखान्याची साफसफाई करणारा रामा गडी, भिंतीवर बॅडमिंटनची रॅकेट. पडदा वर जातो आणि फोन वाजतो. रामा गडी ‘हालू’ म्हणत फोनला उत्तर देतो… अशीसुद्धा जबरदस्त करता आली असती!).
जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी सरकार एक नवा हुकूम लागू करते. त्यानुसार प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबाला एक दलित समाजातील तरुण घरी ठेवावा लागणार असतो. या हुकमामुळे उच्चवर्णीय समाजात खळबळ माजते. अपेक्षेप्रमाणे सौ. आराध्येंच्या अंगाचा तीळपापड उडतो आणि त्या ‘मी काहीही झालं तरी हा हुकूम मानणार नाही’ अशी भूमिका घेतात. बलशाली ‘हिंदूराष्ट्रा’ची स्वप्नं बघणाऱ्या मुलाकडून त्यांना जबरदस्त पाठिंबा मिळतो. पण मुलगी आणि वडील सरकारी हुकूम आहे तर पाळलाच पाहिजे, असं म्हणतात. हा हुकूम अंमलात आणला नाही, तर जबरदस्त शिक्षेची तरतूद असल्यामुळे शेवटी सौ. आराध्येही तयार होतात आणि त्यांच्या सोज्वळ घरात कचऱ्या धीवर या मागासवर्गीय तरुणाचं आगमन होतं.
हा कचऱ्या म्हणजे हाडाचा आंबेडकरवादी, शब्दाशब्दांत केवळ अंगार असलेला. इथून नाटक वैचारिक चर्चेकडे वळतं. एका बाजूला कचऱ्या, सुकन्या आणि अधूनमधून श्रीयुत आराध्ये, तर दुसरीकडे विमला आराध्ये आणि सुदर्शन, असा वैचारिक सामना अनेकदा रंगतो.
पवारांनी या नाटकात कोरडी वैचारिक चर्चा होणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेतली आहे. त्यासाठी आराध्येंच्या शेजारी राहणारं सौ. नाडकर्णी हे पात्र निर्माण केलं आहे. सरकारी हुकमानुसार नाडकर्णी टोरा नावाच्या एका आदिवासी तरुणाला घेऊन येतात.
कचऱ्या आल्यापासून आराध्येंच्या घरात प्रचंड ताण निर्माण होतो. या कुटुंबाने, खास करून सौ. आराध्येंनी आजपर्यंत कदाचित दोन फूट अंतरावरून एक दलित किंवा आदिवासी तरुणसुद्धा बघितलेला नसेल, आता त्यांच्या घरात थेट कचऱ्या राहायलाच येतो.
खाणंपिणं, भाषा-उच्चार, उपासना वगैरेंबद्दल आराध्ये आणि कचऱ्यात केवढे सांस्कृतिक आणि आर्थिक अंतर आहे, हे प्रेक्षकांना पदोपदी जाणवते. ‘आमच्या घरी कचऱ्या राहातो’ असं वाक्यसुद्धा सौ. आराध्येंना सहन होत नाही. शेवटी तडजोड म्हणून त्याचं नाव ‘कच’ ठेवलं जातं. पवारांनी इथं भारतीय पुराणातील ‘कच-देवयानी’चा संदर्भ चपखलपणे वापरला आहे. प्रत्यक्ष नाटक सुरू होण्यापूर्वी रंगमंचावर देव-दानव यांचा संघर्ष, दानवांचे गुरू शुक्राचार्य वगैरे येतात आणि भाष्य करतात. त्यानंतर मुख्य नाटक सुरू होतं. शिवाजी पार्कला राहणाऱ्या आराध्ये कुटुंबात कचऱ्याचं ‘कच’ होणं, यात एक सुसंगती आहे.
सरकारच्या हुकुमामुळे एकाच देशातल्या, एकाच गावातल्या दोन संस्कृती किती भिन्न आहेत, हे प्रकर्षानं समोर येते. काही अभ्यासक ‘गिरणगाव’ आणि ‘गिरगाव’ अशी मुंबर्इची सांस्कृतिक विभागणी करतात. मला वाटतं की, ही विभागणी अपुरी आहे. यात ‘माटुंगा लेबर कॅम्प’ वगैरेसारख्या दलित वस्तींचा तिसरा गट केला पाहिजे.
आराध्ये कुटुंबात आपण गेल्यामुळे तिथं काय होईल, याची कचऱ्याला पूर्ण कल्पना असते. म्हणून तो एक सेकंदसुद्धा या कुटुंबात बुजत नाही. मात्र आंबेडकरवादी कच आणि हिंदुत्ववादी सुदर्शन यांच्यात असंख्य वाद होतात. कचऱ्याचा धडाडीचा स्वभाव, त्याच्या कविता, त्याचे विद्रोही साहित्याचं वाचन वगैरेंमुळे ‘सुबक-ठेंगणी’ सुकन्या त्याच्या प्रेमात पडते. त्यामुळे तर आराध्येंच्या घरात त्सुनामी येते. खुद्द कचऱ्यालासुद्धा यातील दरीची जाणीव असते. म्हणूनच तो तिला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो.
(इथं मला सिडने पॉयटे, स्पेनसर ट्रसी आणि कॅथरिन हेपबर्नच्या ‘गेस हू इज कम टू डिनर’ या १९६७ सालच्या चित्रपटाची आठवण झाली. यातसुद्धा आपल्या प्रेमात पडलेल्या गौरवर्णीय मुलीला कृष्णवर्णीय नायक सिडने पॉयटे परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो).
सुकन्या मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते. तेवढ्यात सरकार दलित समाजातील व्यक्ती उच्चवर्णीयांनी घरात आणायची, हा निर्णय रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करतं. विमला आणि सुदर्शन आराध्ये आनंदानं जल्लोष करतात. त्यांच्या लक्षात येतं की, आता कचऱ्या धीवरला आपलं घर सोडावं लागेल. कचऱ्या निघून जाण्याची तयारी करतो, पण सुकन्यासुद्धा त्याच्याबरोबर जायचं ठरवते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या नाटकाची संहिता जेवढी जबरदस्त आहे, तेवढाच त्याचा प्रयोग जबरदस्त होतो. त्याचं सर्व श्रेय दिग्दर्शक सुबोध पंडे यांचं. नाटकाच्या परिणामकारकेत महत्त्वाची भर घालते ते अचूक पात्रनिवड. या दृष्टीने हे यशस्वी नाटक आहे. पंडे यांनी श्रीयुत आराध्ये ही भूमिका संयतपणे करत पुरोगामी विचारांचा मध्यमवयीन, मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुख उभा केला आहे. पुरोगामी विचारांची सुकन्या ही महत्त्वाची भूमिका प्रिया मराठेने समरसून सादर केली आहे. तिचा रंगभूमीवरचा वावर फार सहज आहे.
सनातनी विचारांचा सुदर्शन आराध्ये राहुल पेठेने छान सादर केला आहे. त्याच्या संवादफेकीतून बलशाली ‘हिंदूराष्ट्रा’चं स्वप्न लवकरच साकार होर्इल, असा विश्वास व्यक्त होत असतो. खास उल्लेख करावा लागतो, तो सौ. आराध्येच्या भूमिकेतील संयोगिता भावेंचा. स्वत:च्या पारंपरिक मूल्यांशी ठाम असलेली विमला आराध्ये रंगवणं हे वेगळंच आव्हान होतं. त्यांच्यामुळे आणि सुदर्शनमुळे वादाची दुसरी बाजू प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येते. आजकाल महानगरात सहकारी गृहसंकुलात सौ. नाडकर्णीसारख्या बायका अनेक असतात. ही भूमिका पल्लवी वाघ केळकर यांनी सफार्इने सादर केली आहे.
या नाटकाचा खरा हायलाईट आहे, तो कचऱ्याच्या भूमिकेतला अनिकेत विश्वासराव. त्याचा रंगमंचावर प्रवेश होतो, तेव्हाच आगामी नाट्याचा आणि वैचारिक संघर्षाचा अंदाज येतो. त्याच्या चेहऱ्यावरची बेदरकारी फार बोलकी आहे. शिवाय हुशार असल्यामुळे आपल्या येण्यामुळे आराध्ये कुटुंबात काय धमाल उडाली असेल, याचा त्याला व्यवस्थित अंदाज असतो. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एकाही प्रसंगी ताण दिसत नाही. अशा प्रकारे रंगमंचावर वावरणं सोपं नाही. थोडक्यात, या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक पात्रनिवड, जी आजकालच्या मराठी नाटकांत अभावानेच आढळते.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी आराध्ये यांचा शिवाजी पार्कचा फ्लॅट उत्तम उभा केला आहे. सर्व नाटक त्यातच घडतं. शीतल तळपदेंची प्रकाशयोजना महत्त्वाच्या प्रसंगाना योग्य उठाव देते. अजित परबचं पार्श्वसंगीत नाटकाचा आशय गडद करण्यासाठी फार पूरक आहे.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment