रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करतो, अपप्रचार करतो आणि ‘ऐतिहासिक वास्तवा’ला विकृत करतो...
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
भूषण देशमुख | अमित भगत
  • ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचे एक पोस्टर
  • Thu , 23 May 2024
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर Swatantra Veer Savarkar

रणदीप हुड्डा दिग्दर्शित व अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. तो सिनेमाविश्वात एक नवीन उंची गाठेल, असा त्याच्या निर्मात्यांना ठाम विश्वास वाटत होता. सावरकरांच्या अनुयायांकडून ही एक ‘स्वर्गीय पर्वणी’ असल्याचे सांगत सिनेमाचा बेसुमार प्रचार सुरू होता, तर सावरकरांवर टीका करणाऱ्या पुरोगामी लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली होती.  

या पार्श्वभूमीवर हा सिनेमा प्रंचड गर्दी खेचेल असा कयास होता, परंतु तसे काही झाले नाही. या सिनेमाने अगदी जेमतेमच कमाई केली. मात्र स्वातंत्र्यसंग्रामातील आघाडीच्या नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये हा एक उल्लेखनीय सिनेमा म्हणून गणला जाईल, यात शंका असण्याचे कारण नाही.

आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून महिनाभराचा काळ उलटल्यानंतर आणि त्यासंबंधीची बऱ्या-वाईट मतांची आणि साधक-बाधक चर्चेची वावटळ शमल्यावर त्याचे परीक्षण करणे अधिक संयुक्तिक ठरेल.

माहितीपट की ऐतिहासिक सिनेमा?

फक्त रचित कथेसाठी तिचे सादरीकरण व कथानकाअंतर्गत सत्य या कसोट्या लागू पडतात. त्यावर तो सिनेमा उतरला की, झाले! उदाहरणार्थ, देवानंदचा ‘गाईड’. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कथानक कल्पित असेल, तर जबाबदारी थोडी वाढते. ढोबळ ऐतिहासिक आकलन समोर ठेवून सादरीकरण बेतावे लागते. उदाहरणार्थ, ‘मुघल-ए-आझम’. एखादा सिनेमा ऐतिहासिक अंगाने वास्तवाच्या खूप जवळ गेला, तर त्याचे सादरीकरण माहितीपटासारखे (डॉक्युमेंटरी) होण्याची शक्यता असते. ती व्यावसायिक कलाकृती म्हणून चांगली असेलच असे नाही. उदा. गोविंद निहलानी यांचा ‘नेताजी’. त्यामुळे सिनेमा निर्मात्याने सर्वप्रथम ते स्पष्ट करणे गरजेचे आहे, म्हणजे प्रेक्षकांचा गोंधळ उडत नाही.

ऐतिहासिक कथावस्तू व उत्कृष्ट कलात्मक सादरीकरण असा मिलाफ दुर्मीळ. उदाहरणादाखल रिचर्ड एटर्नबरोचा ‘गांधी’. इतिहास व कलात्मक सादरीकरण यात कशाला झुकते माप द्यावे? तर कलात्मक सादरीकरणाला. सिनेमा या माध्यमात सादरीकरणाच्या अगणित क्षमता आहेत. ‘Cinema is a complete art’, असे म्हणतात ते त्यामुळेच. ऐतिहासिक तथ्यांशी तडजोड न करतादेखील उत्कृष्ट कलात्मक सिनेमा बनवता येऊ शकतो.

ऐतिहासिक विषयावर कादंबरी लिहिताना जो गोंधळ उडतो, तो सिनेमा हे माध्यम हाताळतानासुद्धा होऊ शकतो. त्यात निर्मात्याला कलात्मक स्वातंत्र्य घेण्याची मुभा जरी असली, तरी ऐतिहासिक तथ्य व घटना यांची मोडतोड होऊ नये, याची पुरेशी दक्षता घ्यावी लागते. अन्यथा ऐतिहासिक घटनांपासून फारकत घेतलेल्या कलाकृतीला ‘ऐतिहासिक’ म्हणण्याच्या अट्टाहास सोडून द्यावा लागतो. उदा. गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा सिनेमा. फार तर ऐतिहासिक घटनांवरून प्रेरित अशी, रंजक पद्धतीने रंगवलेली कलाकृती त्यास म्हणता येईल. परंतु या दोघांसाठी समीक्षेचे मापदंड मात्र पूर्णतः वेगळे असतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रचारकी सिनेमा

‘प्रचारकी सिनेमा’ मूलतः एक सांस्कृतिक व राजकीय विचारसरणी पसरवण्याचे वाहन म्हणून वापरला जातो. पहिल्या महायुद्धापासून ‘प्रचारकी सिनेमा’ (propaganda film) काढण्याची परंपरा रुजली. एखादी उत्कृष्ट कलाकृती जगाला अर्पण करावी, या हेतूने असा सिनेमा निर्माण केला जात नाही. सिनेमाचे सत्य किंवा खोटेपणा कथानकाची निवड व मांडणी, समालोचनाची शब्दबद्धता आणि निर्देशित करण्याच्या जाणीवपूर्वक हेतूमध्ये असते. न्याय्य भाग व त्यावरील सांगोपांग चर्चा वगळणे आणि जोर देऊन व काळजीपूर्वक शब्दबद्ध केलेल्या समालोचनाद्वारे ठरावीक प्रसंगांची मालिका राष्ट्रीय प्रेक्षकांना सहजपणे भुरळ घालू शकते. त्यामुळे पडद्यावर जे दिसते तेच सत्य आहे, अशी त्यांची समजूत होऊ लागते.

‘प्रचारकी सिनेमा’च्या या परंपरेतील बरेचसे सिनेमा आपण मागील काही वर्षांत अनुभवले आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘ताश्कंद फाईल’ हा प्रचारकी सिनेमा आला. अशा सिनेमाची एक कसोटी अशी असते की, तो ‘प्रचारकी’ वाटता कामा नये. तसा तो वाटला, तर तो आपल्या उद्दिष्टामध्ये असफल होतो. या कसोटीवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा कुठे उतरतो?

क्रांतिकार्याचा पहिला टप्पा (१९०० ते १९१५)

सावरकर पहिल्या टप्प्यातील क्रांतिकारक. हा असा टप्पा होता, जेव्हा क्रांतिकार्य व त्याचे महत्त्व अजून जनमानसात पुरेसे रुजलेले नव्हते. स्वातंत्र्यलढा व त्याचा भाग असलेले ‘क्रांतिकार्य’ अखिल भारतीय स्तरावर पुरेसे संघटित नव्हते. क्रांतिकार्य करणारे कमी व पकडून देणारे जास्त होते. अजून रशियाची ‘बोल्शेविक क्रांती’ व्हायची होती. त्यामुळे ‘डावे क्रांतिकार्य’ (भगतसिंग व सहकारी) उदयाला यायचे होते. त्याआधीचे हे उजवीकडे झुकलेले क्रांतिकार्य होते... १८५७चा उठाव, वासुदेव बळवंत फडके व चापेकर बंधूंना आदर्श मानणारे. शिवरायांना स्मरून व तुळजाभवानीच्या आणाभाका घेत केलेले. प्रामुख्याने राज्यक्रांती (सत्ताबदल) या ध्येयावर केंद्रित असलेले. सामाजिक, आर्थिक पैलू या टप्प्यात जोडले गेले नव्हते. पुढे सावरकरांनी काही प्रमाणात सामाजिक दिशा शोधल्या, तरी आर्थिक चर्चांचा स्पर्श होऊ दिला नाही. उजव्या धाटणीचे राजकारणी असल्याने पुढे धार्मिक दिशांचा मात्र भूतकाळात जाऊन कसून शोध घेतला गेला.

लोकमान्य टिळकांचे महाराष्ट्रातील ब्राह्मण अनुयायी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते. टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांचे जर सावरकर पुढारी झाले असते, तर चित्र बरेच वेगळे दिसले असते, परंतु या अनुयायांनी गांधीमार्ग पत्करल्याने बव्हंशी प्रतिगामी अनुयायीच सावरकरांच्या वाट्याला उरले. हे अनुयायी गांधींच्या राजकारणाला तुच्छतेने हेटाळत, राजकारणातील वेगवेगळे मार्ग चाचपडत आपला पुढारी शोधत होते.

अशा प्रतिगामी व कर्मठ राजकारण्यांचा मुख्य भरणा असलेल्या ‘हिंदू महासभे’चे सावरकर पुढे पुढारी झाले. त्यामुळे हिंदू महासभेचे राजकारण मुख्यत्वेकरून हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवतीच फेर धरत होते. नेपाळ हे ‘हिंदूराष्ट्र’ असल्याने त्यांना अधिक जवळचे वाटत होते. भारतातील संस्थानांचे हिंदुत्वीकरण व्हावे, यासाठी त्यांचे प्रयन्त चालू होते. मुस्लिमांबद्दलचा विद्वेष समाजात पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न ‘मुस्लीम लीग’च्या प्रयत्नांचा व्यत्यास होता.

नाही चिरा, नाही पणती

पहिल्या टप्प्यातील क्रांतिकार्य (गदर, अजित सिंह, अवधबिहारी, डॉक्टर खानखोजे इ.) पुढे आलेल्या मोठ्या क्रांतिकारी टप्प्यामुळे (भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन इ.) काहीसे झाकोळले गेले. त्यांच्या आठवणी व बलिदान भर स्वातंत्र्यलढ्यातही विस्मरणात गेले. उदाहरणार्थ, मॅडम कामा मुंबईत वृद्धत्वाने वारल्या, तेव्हा फार कमी लोकांनी त्यांच्या दुष्कर स्थितीकडे लक्ष दिले. उल्हासकर दत्त, बारिंद्रकुमार घोष, पृथ्वीसिंह आझाद, सोहनसिंह बाखना या अंदमानातील इतर क्रांतिकारकांचाही समाजाला विसर पडला. फार कशाला, या टप्प्यातील अनेक सहकाऱ्यांना खुद्द सावरकरांनीदेखील भेट नाकारली.

हिंसा व अहिंसेची तुलना या सिनेमात (अपेक्षेप्रमाणे) खूप तकलादू पद्धतीने येते. हिंसा हे तत्त्व मानले, तर माणसांना ‘खलत्व’ चिटकवावे लागते. माणसांचे खलत्व दूर करायचे की, त्याला यमसदनी पाठवायचे, असा साधा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरांनी ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे सांगून तो सोडवला आहे, त्यासाठी दुरितांना संपवायची गरज नाही.

‘हू किल्ड हिज स्टोरी?’

ही या सिनेमाची टॅगलाईन आहे. सावरकर हे महाराष्ट्रात सर्वश्रुत असले, तरी महाराष्ट्राबाहेर त्यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. ती करून देणे, हे एखाद्या सिनेमाचे मूळ उद्दिष्ट असू शकते. परंतु तशी माहिती होऊ न देणे, यामागे राष्ट्रीय पातळीवर एक कट आहे, असे स्वतः मानणे आणि तसे समाजामध्ये ठासून बिंबवणे, यामुळे हा सिनेमा ‘प्रचारकी’ होतो.

यापूर्वीच म्हणजे २००१ साली ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’चे तत्कालीन अध्यक्ष सुधीर फडके यांनी खूप गाजावाजा करून सावरकरांवर हिंदी सिनेमा काढला होता. जनतेकडून पैसे गोळा करून काढलेला जगातील पहिला सिनेमा म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. समाजात सावरकरांची लोकप्रियता असल्याशिवाय असे करणे शक्य नाही. अगदी अटलबिहारी वाजपेयी, आशा भोसले, पंडित भीमसेन जोशी, अनुप जलोटा आदींनी त्यासाठी निधी गोळा करून दिला होता. ८ दिग्दर्शक व १० कथालेखक बदलून सिनेमा निर्माण झाला. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१२ साली या सिनेमाची गुजराती भाषेतील आवृत्ती प्रकाशित झाली. एकूण १४ भाषांमध्ये हा सिनेमा भाषांतरित झाला. त्यामुळे सदर सिनेमा हा काही सावरकरांवरील हिंदीतला पहिला सिनेमा आहे, असे म्हणता येत नाही. 

दोन आयुष्ये

सावरकरांना सुनावण्यात आलेल्या दोन जन्मठेपा म्हणजे दोन आयुष्याची ग्वाही आहे, असे चित्र या सिनेमात चितारण्यात आले आहे. देशप्रेमास्तव स्वतःच्या आयुष्याची होळी करणारे सावरकर, अंदमानात मरणासन्न यातना भोगणारे सावरकर, अशातही जीवनावरची श्रद्धा दृढ ठेवून इतर कैद्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारे सावरकर, तुरुंगाच्या अरुंद व बंदिस्त खोलीत कारागृहाच्या दगडी भिंतीवर बोरीच्या काट्याने ‘कमला’ हे खंडकाव्य लिहिणारे प्रतिभावंत सावरकर हे पूर्वार्धाचे आयुष्य क्रमाने स्वातंत्र्यरूपी महायज्ञात आपल्या सर्वस्वाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकाचे ज्वलज्वलनतेजस आयुष्य आहे. परंतु याउलट अंदमानातून सुटून आलेले सावरकर गांधीवादी राजकारणाला अगदी तुच्छतेने लेखणारे ‘उजवेपंथी राजकारणी’ बनतात. ‘गांधी घोटाळा’मध्ये अगदी अश्लाघ्य भाषेत गांधींच्या विचारांचे व व्यक्तित्वाचे कडवे विरोधक बनतात.

दोन जन्मठेप होऊनही सावरकर दीर्घायुष्य जगले. परत आल्यावर राजकीय नेता म्हणून समाजात वावरले. त्यांच्या भूमिका चर्चेचा विषय ठरल्या. त्यांचे पुरेसे कौतुकही झाले. संपूर्ण देशभरातून अनेक वेळा लोकांनी त्यांना पैशाच्या थैल्या अर्पण केल्या. आधी ब्रिटिश व नंतर भारत सरकारने त्यांना पेन्शन दिली. असे दुहेरी आयुष्य त्यांच्यासारख्या फारच कमी क्रांतिकारकांना मिळाले.

सावरकरांचे पूर्वायुष्य केवळ लक्षात ठेवून उत्तरायुष्याकडे दुर्लक्ष करावयाचे, तर हाच न्याय बॅ. जीना यांनाही लागू होतो. पूर्वायुष्यातील त्यांच्या देशभक्तीची साक्ष केवळ गोखले व गांधी यांनीच नाही, तर लो. टिळक, गोखले, डॉ. आंबेडकर व नेताजी बोस यांनीही दिली आहे. जर उत्तरायुष्यातील विचार व भूमिका यांबद्दल जिना यांना दोष द्यायचा असेल, तर त्या न्यायाने सावरकरही दोषी ठरतात. पण मुळात केवळ भावनिक होऊन महापुरुषांच्या गुण-दोषांची उथळ चर्चा न करता, त्यांच्या व्यक्तित्वाचे, त्यांच्या विचारांचे, भूमिकांचे व कृतींचे मूल्यमापन करणे आवश्यक ठरते.

काँग्रेसच्या नेत्यांना ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा का झाली नाही?

काँग्रेसने उघडउघड क्रांतिकार्याची बाजू घेतली नाही. मवाळांनी ते त्याज्य मानले, तर जहालांनी फक्त सहानुभूती देऊ केली. गांधीचा अहिंसेचा महामार्ग बनवून त्यावरून स्वातंत्र्याचा जथ्या पुढे नेला. ‘काळे पाणी’ (अंदमानचा सेल्युलर जेल) हा प्रामुख्याने खतरनाक गुन्हेगार व क्रांतिकारक यांच्यासाठी वापरला गेला. काँग्रेसच्या नेत्यांना कोणताही साधा तुरुंग पुरेसा होई. तुरुंगात जाणाऱ्या काँग्रेस सदस्यांची संख्याही मोठी होती. याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांनी खडतर शिक्षा कधी भोगल्या नाहीत, असा अर्थ होत नाही. ब्रह्मदेशातील मंडाले येथील गरम हवामान व जुलमी वागणूक भोगणारे काँग्रेसचे नेते होते. त्यात लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, सुभाषचंद्र बोस यांची नावे सांगता येतील.

गांधी नसते, तर स्वातंत्र्य ३५ वर्षे आधीच मिळाले असते

हा एक वादाचा मुद्दा ठरू शकेल. निश्चितपणे ३५ वर्षांपूर्वी नाही, पण १९४७च्या काही वर्षे आधी ते मिळवता आले असते, असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. गांधींनी व त्याआधी टिळकांनी ओळखले होते की, भारताचे मुख्य आव्हान स्वातंत्र्य मिळवणे, हे नसून ते टिकवून ठेवण्याचे आहे. टिळक तर म्हणत की, सर्व भारतीय एकाच वेळी थुंकले, तर त्या प्रवाहात ब्रिटिश वाहून जातील. मुद्दा हा होता की, ब्रिटिश गेल्यावर आपण कोणत्या पद्धतीची राज्यव्यवस्था स्वीकारणार आहोत? आपली सामाजिक मूल्ये कोणत्या प्रकारची असणार?

आगरकरांनी मागेच त्यांच्या ‘हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी’ या अग्रलेखात हा आक्षेप घेतला होता. ज्या समाजात ब्राह्मण व महार एकमेकांच्या मांडीला मांडी घालून जेवायला बसत नाहीत, तिथे हे स्वराज्य कोणासाठी असणार आहे? हा त्यांचा मार्मिक प्रश्न होता. भगतसिंग व त्याच्या सहकाऱ्यांचेसुद्धा हेच मत होते. त्यामुळेच त्यांनी ‘हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन’ (HRA) या नावात ‘हिंदुस्तान सोशियालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ (HSRA) असा बदल केला.

जर भारताने या सर्व बाबींवर काम केलं नाही, तर स्वातंत्र्याचा आनंद क्षणिक ठरला असता. तसा अनुभव पाकिस्तान सध्या घेत आहे. आफ्रिकन देशांना तर फार मोठा संघर्ष न करता स्वातंत्र्य मिळाले. पण त्यांना त्याची किंमत ओळखता आली नाही. अनेक आफ्रिकन देश नागरी संघर्ष, टोळीयुद्ध यांच्या गर्तेत सापडले आहेत. मोझांबिकच्या झेंड्यावरच तर AK47चे चित्र आहे. म्हणूनच टिळक, गांधींनी घाई केलेली दिसत नाही. ब्रिटिशांचे राज्य निदान एक निमित्त ठरले एकीचे. गांधींनी तर १९३३मध्येच काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

सिनेमातील खोटेपणा व इतिहासाचे विकृतीकरण

सिनेमाच्या सुरुवातीलाच रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्लेग निवारणाच्या नावाखाली पुण्यातील लोकांवर चालवलेला अत्याचार चित्रित केला आहे. त्यात त्याला गोळीबारास प्रोत्साहन देणारा व स्त्रियांची अब्रू लुटणारा दाखवण्यात आला आहे. दामोदर चापेकरांनी आपल्या आत्मचरित्रात रँडबद्दल लिहिले आहे - “रॅंडसाहेबाच्या पाठीमागे आम्ही सरासरी तीन-साडेतीन महिने संचार केला. इतक्या सहवासांत आमचे मन त्यांचेविषयी फारच उत्तम होते. नव्हे, आम्ही मानी आहोत तसा रॅंड साहेबही मानी होता. रॅंडसाहेबास कोणतेही व्यसन नसावे असे आमचे मत अहे. त्याचे ठिकाणी बालंटपणा बिलकुल नव्हता. परस्त्रीचा त्याला तिटकारा होता. इत्यादी त्याचे बरेच गुण आमच्या लक्षांत आले. पण उपयोग काय? तो आमचा धर्मशत्रू बनला. त्यामुळे त्याचा सूड घेणे आम्हांला जरुर पडले. त्याला इलाज नाही.”

सावरकरांचे चरित्रकार म्हणून धनंजय कीर यांचा मोठा लौकिक आहे. तात्यारावांच्या मुलाखती घेऊन माहिती संकलित केल्यामुळे त्यांनी लिहिलेले चरित्र अधिक विश्वासार्ह बनले आहे. त्याशिवाय शि.ल. करंदीकर, द.न. गोखले आदींनी त्यांची चरित्रे लिहिली आहेत. य.दि. फडके यांनी ‘शोध सावरकरांचा’ लिहून सावरकरांच्या विचारसृष्टीचा संशोधनात्मक वेध घेतला आहे. या साऱ्यांचा उल्लेख न करता विक्रम संपथ व वैभव पुरंदरे यांची पुस्तके संदर्भ म्हणून घेतली आहेत. हे दोन्ही अभ्यासक हिंदुत्वाच्या राजकीय विचारांचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे सिनेमातील ऐतिहासिक प्रंसंग व त्यांची विश्वासार्हता याबद्दल शंका उत्पन्न होऊ लागते. सिनेमाचा पोत व दिशा तशी का आहे, याचीही उकल हळूहळू होऊ लागते.

सिनेमात १९१०मध्ये पॅरिस येथे मादाम कामा व श्यामजी कृष्ण वर्मा सावरकरांना ब्रिटनमध्ये जाण्यापासून परावृत्त करताना दाखवले आहे. अन्यथा अटकेची दाट शक्यता असल्याचेही सांगतात. त्या वेळेस सोबत पकडले गेल्यास फार तर तीन वर्षांची सजा होईल, असे सावरकर सांगतात. तर दुसरीकडे १९१२ला ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा करण्याचेही निक्षून सांगतात. या दोन्ही गोष्टींचा मेळ बसत नाही. गदर संघटनेने पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर बंड पुकारले होते. तशी कसलीच पार्श्वभूमी वा संधी नसताना सावरकर कोणत्या समीकरणाच्या आधारे १९१२ला भारतातील ब्रिटिश राजवट नष्ट करण्याचा चंग बांधतात, ते सर्वथा अनाकलनीय आहे.

बाबारावांचा खटला व जॅक्सनची हत्या

जॅक्सनने अगदी क्रूरपणे जनतेसमोर बाबारावांची धिंड काढली, ही गोष्ट काही खरी नव्हे. आपल्या क्रांतिकार्याचे पुरावे नष्ट न करता ते पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवणे बाबारावांना भोवले, अशी कबुली ‘अभिनव भारत’ या गुप्त संघटनेचा इतिहास लिहिणाऱ्या विष्णुपंत भटांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. बाबारावांना सजा फर्मावणारे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केनेडी होते, जॅक्सन नव्हते. वेद-उपनिषिदे व भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यासक असणारा जॅक्सन हा ‘पंडित जॅक्सन’ म्हणून ओळखला जात होता. दुर्गा भागवत यांच्या ‘भावमुद्रा’ या पुस्तकातील जॅक्सनवरील लेख त्याच्या या योगदानाची माहिती देतो. त्यामुळे जॅक्सनची हत्या करण्याचा अनंत कान्हेरेंचा निर्णय अतिरेकी होता हे दिसते, आणि तरीही त्याचे समर्थन सावरकर आयुष्यभर करत होते.

लोकमान्य टिळक व सावरकर

पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांशी सहकार करण्यासाठी गोखले व गांधी लो. टिळकांना समजावण्याचा प्रयत्न करतात, असे दाखवले आहे. जणू काही टिळकांनी हा निर्णय स्वतःहून घेतला नसून, त्यात त्यांना सामील करण्यात आले, असे दाखवण्याचा कयास दिसतो. इतिहासाच्या अभ्यासकांना हे चांगलेच माहिती आहे की, लोकमान्यांचा हा निर्णय मुत्सद्दीपणाचा निर्णय होता. ‘प्रतियोगी सहकारीते’चे धोरण स्वीकारून लोकमान्यांनी ब्रिटिशांना सहकार्य केले होते. या सहकार्याच्या मोबदल्यात ब्रिटिशांकडून वसाहतीअंतर्गत स्वराज्य मिळावे, ही टिळकांची अपेक्षा होती.

गांधींना व गांधींच्या राजकारणाला सिनेमात सातत्याने मुस्लीमधार्जिणे दाखवण्यात आले आहे. पण टिळकांनी मुस्लीम लीगसोबत १९१६चा ‘लखनऊ करार’ केल्याचा नामोल्लेखही त टाळण्यात आला आहे. या करारान्वये २२ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लीम समाजास ३३ टक्के स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मान्य करण्यात आले होते. आपल्या अनुयायांचा विरोध झुगारून टिळकांनी हा करार केला होता. जर मुस्लीम समाजास नेतृत्व देऊन ब्रिटिश सरकार देश सोडून जाण्यास तयार असतील, तर माझी त्यालासुद्धा संमती आहे, असे टिळक म्हणत. त्याही पुढे जाऊन ते ‘आपला पुढील शिवाजी कदाचित मुसलमान असू शकेल’ असे म्हणाले होते. याउलट स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचे काँग्रेसचे त्यापुढील राजकारण हे लखनऊ करारापासून क्रमाक्रमाने मागे सरत जाणारे राजकारण होते. हा संदर्भ टाळल्याने गांधींवर त्याचे खापर फोडणे सोयीस्कर होते. हाच मार्ग सिनेमाने जाणीवपूर्वक स्वीकारल्याचे दिसते.

गांधी व सावरकर

गांधींनी स्थानिक झुलू जमातीविरुद्धच्या ब्रिटिशांच्या दुसऱ्या बोअर युद्धात आपल्या अहिंसा या तत्त्वाला टांगणीला लावून ब्रिटिशांना सहकार्य केले होते, असे या सिनेमातून बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता गांधीजींनी अहिंसा हे तत्त्व बोअर युद्धानंतर बऱ्याच वर्षांनी, १९०६ साली झांजीबारच्या जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रथमतः वापरात आणले. त्यामुळे गांधीविरुद्धचा हा अपप्रचार सर्वथा अनाठायी आहे. इंडिया हाऊसमधील विजयादशमी निमित्तच्या भाषणातील गांधीजींच्या भाषणांचा जाणीवपूर्वक विपर्यास केल्याचे दिसते. त्या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या भाषणाला अधोरेखित करून गांधीजींच्या विचारांना व धोरणांना कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न केला गेल्याचे प्रकर्षाने जाणवते. अंदमानातून सुटका झाल्यावर, ‘गांधी इतना बडा हो गया!’ या सावरकरांच्या तोंडी दिलेल्या वाक्यातील कुत्सितपणा नजरेत भरतो.

नेहरू व सावरकर

१९५० साली लियाकत अली खान व नेहरू यांच्या भेटीदरम्यान सावरकरांना अटक करण्यात आली. त्या वेळेस कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहमंत्री या अधिकाराने सरदार पटेल यांची होती. तरीही त्याचे खापर सिनेमाने नेहरूंवर फोडले आहे. त्या प्रसंगाचे चित्रण करताना नेहरू हे ‘Elected’ पंतप्रधान नसून ‘Selected’ आहेत, असे उद्गार सावरकरांच्या तोंडी घालून नेहरुविरुद्धच्या अपप्रचाराची ‘री’ ओढली आहे.

१९३७ व १९४६च्या निवडणूक प्रचारादरम्यान ‘Star campaigner’ म्हणून नेहरूंनी नावलौकिक मिळवल्याचे दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने लोकांना भुरळ घातली आणि काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे नेहरूंचे योगदान कुणालाच नाकारता येणार नाही. १९५२ सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतसुद्धा त्यांनी स्वतःचा व काँग्रेसचा विजय सुनिश्चित केला. त्यांच्या या लोकप्रियतेची जाणीव सरदार पटेलांनाही असल्याचे सरदारांच्या पत्रव्यवहारातून व कागदपत्रांतून दिसते. तरीही जाणीवपूर्वक चाललेल्या अप्रप्रचाराचे हा सिनेमा देशव्यापी पातळीवर प्रतिनिधित्व करत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. नेहरूंनी भगतसिंगचे कृत्य ‘दहशतवादी’ म्हटल्याचे सिनेमातून दाखवले आहे. याउलट नेहरूंनी भगतसिंग व त्याच्या साथीदारांची तुरुंगात भेट घेतली, आणि अंधःकाराचा नाश करणाऱ्या ‘क्रांतिज्योती’ची उपमा देऊन त्याच्या क्रांतिकार्याचा गौरव केला, हे एक ऐतिहासिक सत्य आहे.

आंबेडकर व सावरकर

डॉ. आंबेडकर हे मुख्यतः दलितांचे हक्क व त्यांच्या राजकीय व सामाजिक न्यायासाठी लढा देत होते. सावरकरांनी अस्पृश्यांच्या उद्धारार्थ केलेले कार्य वरकरणी आंबेडकरांच्या कार्याला सहाय्यभूत असे वाटते. परंतु सावरकरांचा त्यामागचा हेतू हिंदूंचे एकीकरण करणे हा होता. अनिष्ट प्रथा व चालीरिती यांमुळे हिंदू समाज हा विखंडित झाला असल्याने, त्या दूर करून हिंदूंना एकत्र करणे सावरकरांना अगत्याचे वाटत होते.

याउलट आंबेडकरांचा झगडा न्याय्य पातळीवरचा होता. दलितांना त्यांचे हक्क न्यायिक पातळीवरून मिळावेत, अशा तरतुदी असणारी न्यायव्यवस्था निर्माण करणे त्यांना अभिप्रेत होते. त्यास धार्मिक राजकारणाची किनार नव्हती. डॉ. आंबेडकर मानवमुक्तीच्या लढ्यातील योद्धे होते. त्या प्रयत्नात हिंदुधर्म टिकतो की संपतो, याच्याशी त्यांना देणेघेणे नव्हते.

याउलट रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यात बंदी असल्याने अस्पृश्यतानिवारणाचा कार्यक्रम सावरकरांनी हाती घेतला, पण १९३७ साली त्यांची बिनशर्त मुक्तता झाल्यावर आणि राजकारणात सहभागी होण्याचा त्यांचा मार्ग खुला झाल्यावर अस्पृश्यतानिवारणाचा कार्यक्रम त्यांनी गुंडाळून ठेवला.

सिनेमात खिलाफत चळवळ सुरू करतानाच्या बैठकीत व नंतर मोपला बंडादरम्यानच्या चर्चेत गांधींसोबत बॅ. जीना व डॉ. आंबेडकर दाखवले आहेत. डाॕ. आंबेडकरांचा समावेश केव्हापासून काँग्रेस कार्यकारणीत झाला? डॉ.आंबेडकरांना दाखवायचेच झाले, तर सावरकरांच्या समाजसुधारणा चळवळीच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः पतितपावन मंदिराच्या स्थापनेदरम्यानच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दाखवणे अधिक उचित ठरले असते. निदान त्यातून सामाईक मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांच्या परस्परविरुद्ध भूमिका लोकांना कळाल्या असत्या. कदाचित त्या कळू नयेत म्हणूनच डॉ. आंबेडकरांना अतिशिय विचित्र परिस्थितीत विचित्र मते मांडताना दाखवले आहे.

१९४०च्या दरम्यान धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी मांडलेले मत लक्षात घेण्याजोगे आहे - “एक राष्ट्र विरुद्ध द्विराष्ट्र या मुद्द्यावर सावरकर आणि जीना हे एकमेकांचे विरोधक जरी वाटत असले, तरी ते याबद्दल पूर्ण सहमत असल्याचे चित्र दिसते. दोघेही केवळ मान्य करत नाहीत, तर आग्रही भूमिका मांडतात की भारतात दोन राष्ट्रे आहेत, एक मुस्लीम राष्ट्र आणि दुसरे हिंदूराष्ट्र.”

नेताजी व सावरकर

नेताजींना जागतिक राजकारणातील विचारसरणींचा उदारणार्थ भांडवलवाद, समाजवाद, साम्यवाद, फॅसिझम यांचा चांगला परिचय होता. ते जिनिव्हा येथे विजनवासात असताना रोमला जाऊन मुसोलिनीची भेट घेऊन आले होते. सैनिकी शिस्त, वीरता याचे त्यांना आकर्षण होते. अहिंसा त्यांनी तंत्र म्हणून मान्य केले असले, तरी तत्त्व म्हणून त्यांना ते मान्य नव्हते. एकदा काँग्रेसचे संयोजक असताना सुभाषबाबूंनी कार्यकर्त्यांना लष्करी परिधान घालून उभे केले होते.

१९३९ साली गांधी, नेहरू व नेताजी यांच्यात भारताची दुसऱ्या महायुद्धातील भूमिका या मुद्द्यावर मतभेद झाले. संघर्ष करत सुभाषचंद्र यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद जिंकले खरे, पण त्यांना कार्यकारणी समितीला आपल्या बाजूला वळवता आले नाही. सुभाषचंद्रानी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व काँग्रेसने त्यांना बाहेरचे दार दाखवले.

अशा स्थितीत पुढच्या राजकीय प्रवासाची चाचपणी करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षातील अनेकांची भेट घेतली. त्यात मोहम्मद अली जिना देखील होते. सुभाषचंद्रांचा ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष आणि सावरकरांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभा यांची राजकीय युती करता येईल का, याचा अदमास घेण्यासाठी त्यांनी १९४०मध्ये दादर येथे सावरकर सदनात सावरकरांची भेट घेतली.

सावरकर जपानमध्ये स्थायिक झालेले प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक रास बिहारी बोस यांच्या संपर्कात होते. त्या संदर्भातदेखील काही बोलणी झाली असल्याचा संभव आहे. पण जसे दाखवले जाते की, या भेटीमुळे सुभाषचंद्र जपानला पोहोचले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व हाती घेतले, तर त्या कालक्रमाने पुढच्या गोष्टी आहेत. उलट सुभाषचंद्र पश्चिमेला जर्मनीकडे गेले, कारण तेव्हा जपान युद्धात उतरलेला नव्हता. पुढे सुभाषचंद्र जपानला पोहोचले. त्यानंतरचा पुढील पराक्रम जगप्रसिद्ध आहे.

आपण जर असे मानणार असू की, पुढे घडणाऱ्या सर्व गोष्टींची सावरकरांना आधीच कल्पना होती व त्यामुळे तसे सल्ले त्यांनी नेताजींना दिले (व त्यांनी ते मानले) तर ही इतिहासाची ओढाताण होईल. तेव्हा एका भेटीत सावरकरांनी पुढची सर्व भाकिते केली आणि नेताजींनी ती सर्व शिष्यासारखी ग्रहण केली, असे कोणी म्हणत असेल, तर ‘वडाची साल पिंपळाला’च काय आंब्यालाही लावता येईल. पुढे आझाद हिंद सेनेला फायदा होईल, अशी कोणती भूमिका सावरकरांनी घेतल्याचे दिसत नाही. उलट युद्धकाळात ब्रिटिशांचे हात बळकट करण्याची त्यांनी भूमिका घेतली.

आझाद हिंद सेनेची स्थापना केल्यानंतर सुभाषबाबूंनी त्याच्या ‘गांधी ब्रिगेड’, ‘नेहरू ब्रिगेड’, ‘आझाद ब्रिगेड’ व ‘सुभाष ब्रिगेड’ अशा पलटणी तयार केल्या. महिलांच्या पलटणीला ‘झासी राणी रेजिमेंट’ हे नाव देण्यात आले. ही सारी नावे अत्यंत सूचक होती. काँग्रेसचा राजीनामा दिलेले व गांधीजींशी तात्त्विक राजकीय मुद्द्यांवर मतभेद असलेले सुभाषबाबू या साऱ्या प्रभूतींचे मोठेपण व जनमानसांवरील त्यांची पकड जाणून होते. जर सावरकरांकडूनच त्यांनी लढ्याची प्रेरणा घेतली असती, तर आपल्या सशस्त्र पलटणीचे नाव ‘सावरकर बिग्रेड’ ठेवणे अधिक समर्पक ठरले असते.

महात्मा गांधी, पंडित नेहरू व मौलाना आझाद हे तिन्ही नेते हिंदू-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते होते. त्यांची नावे सुभाषबाबूंनी आपल्या रेजिमेंटला देऊन हिंदू-मुस्लीम एकतेबाबतचे आपले धोरण अधोरेखित केले होते. सुभाषबाबू जातीयवादाला कडाडून विरोध करत असत. त्यांची भाषणे व लेख चाळणाऱ्या प्रत्येकास हे जाणवल्यावाचून राहणार नाही. ‘द इंडियन स्ट्रगल’मध्ये नेताजी म्हणतात - “सावरकर हे आंतरराष्ट्रीय राजकारणापासून पूर्णत: अनभिज्ञ आहेत. हिंदू ब्रिटिश सैन्यात प्रवेश करून लष्करी प्रशिक्षण कसे घेऊ शकतील, केवळ याचीच काळजी वाहताना ते दिसतात.”

भगतसिंग व सावरकर

मागच्या पिढीतील प्रेरणादायक क्रांतिकारक म्हणून भगतसिंगला सावरकरांबद्दल आदर होता. तसा त्याने तो वेळोवेळी व्यक्तही केला आहे. सावरकरांचे ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’, ‘हिंदूपदपादशाही’ या पुस्तकांचे सखोल वाचन भगतसिंगने केले होते. ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती भगतसिंगाने प्रसारित केली. या सर्वांतून भगतसिंगची प्रगल्भता दिसते. त्यापलीकडे मात्र विचारसरणीत दोघे दोन टोकावर होते.

सावरकरांना भगतसिंगचा साम्यवाद व धर्मविरोध मानवण्यासारखा नव्हता, याउलट भगतसिंगला धार्मिक राष्ट्रवाद व राष्ट्रभोळी वृत्ती मानवणारी नव्हती. १९२८ सालच्या ‘नये नेताओं के अलग-अलग विचार’ या लेखात भगतसिंगने पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाचे मूल्यमापन केले आहे. त्यात तरुणांना बोस यांच्या राष्ट्रीय पुनर्जागृतीच्या मार्गापेक्षा नेहरूंच्या आधुनिक राष्ट्रीयत्वाच्या मार्गाचे अनुसरण करण्याचे सुचवले आहे.

यावरून भगतसिंगला सावरकरांचे राजकारण पटण्याचा संभव वाटत नाही. भगतसिंग जगला असता, तर सावरकरांना एक मोठा राजकीय विरोधक म्हणून वावरला असता, यात मात्र कुठलीही शंका नाही. या सिनेमात साँडर्सच्या हत्येनंतर भगतसिंगने सावरकरांची रत्नागिरीत भेट घेतल्याचे दाखवले आहे. त्याही पुढे जाऊन आपण मदनलाल धिंग्रासारखे कृत्य केल्याबद्दल धन्यता व्यक्त केली आहे. भगतसिंगला सावरकरांचे वैचारिक शिष्यत्व देण्याचा हा प्रयत्न अगदी केविलवाणा तर वाटतोच, पण हे चित्रण अगदी बाळबोध,अनैतिहासिक व भगतसिंगच्या एकंदर व्यक्तित्वाची प्रतारणा करणारे असे आहे.

मुसलमान व सावरकर

मुसलमान या उपखंडावर पुन्हा दावा करतील व स्वतःचे राज्य स्थापित करतील, अशी भीती सावरकरांना होती. हिंदू ‘सद्गगुणविकृती’ने ग्रस्त असल्याने ते काहीच करणार नाहीत, या भयाने (न्यूनगंडाने?) सावरकर पछाडलेले होते. टिळकांना ही शक्यता माहीत होती, पण न्यूनगंड नव्हता. १९१६च्या ‘लखनऊ करारा’च्या वेळी त्यांनी सांगून टाकले की, ‘फक्त मुसलमानांना स्वराज्य मिळाले व हिंदू त्यांच्या हाताखाली गेले तरी मला चालेल. आधी इंग्रज जाऊ द्या.’

मात्र मुसलमान डोईजड होतील, या भीतीने सावरकर पुढे इतके ग्रस्त झाले की, त्यांनी टिळकांच्या विरुद्ध भूमिका घेतली. ब्रिटिशांचे राज्य राहू दे, पण मुसलमानांचे राज्य येता कामा नये. १९४२ दरम्यान तर ब्रिटिशांनी सैन्य इथेच ठेवावे, अशी भूमिका घेताना ते दिसतात.

थोर नेत्यांनी व व्यक्तींनी केलेली प्रशंसा

जनरल करिअप्पानेच काय तर सॅम माणेकशॉ यांनीसुद्धा सावरकरांबद्दल आदरभाव व्यक्त केला आहे. असा आदरभाव इंदिरा गांधी यांनीसुद्धा व्यक्त केला आहे. केला नसेल तर तो फक्त नेहरू व पटेल यांनी. कारण त्यांच्यासमोर गांधीहत्या व त्याचा खटला यांचे सत्य व तत्सबंधीची द्वेषाची पार्श्वभूमी व पुरावे होते. ते त्यांना नजरेआड करणे शक्यच नव्हते. गांधी व काँग्रेसविरुद्ध द्वेषाची पेरणी समाजात केली जात होती व त्यातूनच समाजाच्या ध्रुवीकरणाला दिशा मिळत होती.

१९६२च्या चीनसोबतच्या युद्धात भारताला नामुष्की सहन करावी लागली. सावरकरांच्या सशस्त्रीकरणाचा मार्ग अवलंबला असता, तर ही वेळ आली नसती, असे करिअप्पा यांनी म्हटल्याचे सिनेमातून ठामपणे सांगण्यात आले आहे. लष्कर प्रमुखांनी राजकारणावर टीकाटिपण्णी केल्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. जनरल थिमय्या, जनरल चौधरी, फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनीही राजकारणाविरुद्ध वक्तव्ये केली आहेत.

याच करिअप्पा यांनी १९५८मध्ये पाकिस्तानच्या भेटीत तेथील जनरल अयुबखान यांच्या लष्करी राजवटीचे समर्थन केले आहे. लष्करप्रमुखांचा ओढा नागरी प्रशासनापेक्षा लष्करीकरणाकडे असणे स्वाभाविक आहे. परंतू अशी काही तुरळक उदाहरणे वगळता लष्करव्यवस्था ही प्रशासनाच्या नियंत्रणात असल्याचेच चित्र आढळून येते. आणि याचा पायंडा घालण्याचे महत्त्वाचे कार्य करीअप्पा यांनी केल्याचे माणेकशॉ यांनी म्हटले आहे.

गांधींचा स्वतंत्र मतदारसंघांना पाठिंबा होता?

टिळकांकडून ‘लखनऊ करार’ (१९१६) गांधींना वारसा म्हणून मिळाला. त्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले होते. संधी मिळताच काँग्रेसने ‘लखनऊ करारा’ची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. १९२८च्या नेहरू अहवालाने स्वतंत्र मतदारसंघ नाकारले, पण ब्रिटिशांनी कुरघोडी करत मुस्लिमांचे स्वतंत्र मतदारसंघ कायम ठेवलेच, पुढे ते अजून वाढवले. मुस्लिमांप्रमाणे अस्पृश्यांनाही ते १९३२च्या जातीय निवाड्याद्वारे देऊ केले. शेवटी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ‘पुणे करार’ (१९३२) करत अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द करवून घेतले. त्यासाठी गांधींनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती. स्वतंत्र भारतात कोणालाही स्वतंत्र मतदारसंघ देऊ केले नाहीत, हा काँग्रेसच्या धोरणात्मक सातत्याचा पुरावा सांगता येईल.

सावरकरांचे माफीनामे

सावरकरांनी कारावासात असताना वारंवार दया दाखवायची विनंती ब्रिटिश सरकारकडे केली. त्या याचिकांमध्ये जे शब्द त्यांनी वापरले तेही सिनेमाने दाखवून टाकले, हे बरे केले. ‘सावरकरांचे माफीनामे’ हा स्वातंत्र्य लढ्यातील एक तंत्राचा भाग आहे, म्हणून आपण सोडून देऊ शकलो असतो. कधीकधी युद्ध जिंकण्यासाठी लढाईतून माघारही घ्यावी लागते. मात्र अशी काही भूमिका सावरकरांची आहे का, हे या सिनेमात मात्र कुठेही दाखवलेले नाही. उलट त्यांना क्रांतिकार्याचा पश्चाताप झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे त्याच काळात भारतात क्रांतिकार्य जोरात चालू होते. तेही सिनेमात दाखवले आहे. त्या पार्श्वभूमीवर सावरकर वारंवार दयेची याचना करत आहेत, हे विसंगत वाटत राहते.

लाहोर-ढाका रस्ता पाकिस्तानला दिला जावा म्हणून गांधींनी उपोषण केले?

हा सिनेमा असत्य किती आत्मविश्वासाने सादर करत आहे, याचे याहून चांगले उदाहरण असू शकत नाही. असा रस्ता मिळावा अशी जीनांची इच्छा होती. ज्यामुळे पश्चिम व पूर्व पाकिस्तानात जमीन मार्गाने एकमेकांशी संपर्क निर्माण झाला असता. काँग्रेसने ही मागणी मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने भारतच भौगोलिकदृष्ट्या विभागाला गेला असता. गांधींचे उपोषण हे दिल्लीतील दंगली थांबवण्यासाठी होते. मुस्लिमानी दबावाखाली देश सोडून जायची गरज नाही, असे गांधीचे म्हणणे होते. नागरिक म्हणून त्यांची संपत्ती, सुरक्षा याची जबाबदारी भारत सरकारने घेतली पाहिजे, असा गांधींचा आग्रह होता.

गांधी, सावरकर आणि क्रांतिकारकांची बंदिवासातून मुक्तता

गांधीजींचा मार्ग पूर्णतः अहिंसावादी होता. त्यामुळे हिंसात्मक मार्गाने जाणाऱ्या सशस्त्र क्रांतिकार्याची बाजू त्यांनी घेणे शक्यच नव्हते. तसे करणेही दुटप्पीपणाचे झाले असते. परंतु असे असले तरीही देशप्रेमाखातर आपला जीव धोक्यात घालणाऱ्या, जीवाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल त्यांना आदर वाटत असे. त्यामुळे त्यांना ते ‘वाट चुकलेले देशभक्त’ म्हणत. कारण सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने ब्रिटिशांची सत्ता उलथवून लावणे त्यांना अव्यवहार्य वाटत होते. केवळ सत्य व अहिंसेचा मार्ग स्वीकारून, देशव्यापी चळवळींद्वारेच ते शक्य होऊ शकते, असा त्यांना ठाम विश्वास होता. अगदी बाबाराव व तात्याराव या सावरकर बंधूंच्या मुक्ततेबरोबर भगतसिंग व त्याच्या सहकाऱ्यांच्या मुक्ततेसाठी गांधींनी प्रयत्न केल्याचे पुरावे आढळून येतात.

१९३७ साली काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावर गांधीजींच्या सांगण्यानुसार महाराष्ट्र, बंगाल, पंजाब व उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांची मुक्तता केल्याचे दिसून येते. जुलै १९३७ रोजी अंदमानच्या कारागृहात अन्नत्याग केलेल्या सव्वा दोनशे कैद्यांनी गांधीजींच्या सांगण्यावरून आपले उपोषण मागे घेतले. गांधीजी आणि गुरुदेव टागोर यांनी अंदमानातील सेल्युलर जेल बंद व्हावे, यासाठी मोहीम सुरू केली होती. त्याचे पर्यावसान ब्रिटिश सरकारने १९३७-३८ साली या जेलमधील राजकीय कैद्यांना आपापल्या राज्यात परत पाठवण्यात आणि सेल्युलर जेल कायमचे बंद होण्यात झाली. याउलट १९३७ साली बिनशर्त मुक्तता झाल्यावर आणि पुढे १९४७ साली देश स्वतंत्न होईपर्यंत सावरकरांनी क्रांतिकारकांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केल्याचे पुरावे आढळून येत नाहीत.

गांधीहत्या व सावरकर

गांधीहत्येपूर्वी नथुराम गोडसे व विनायक आपटे यांनी जानेवारी १९४८मध्ये सावरकर सदन या सावरकरांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन किमान तीन वेळेस त्यांची भेट घेतली होती. ग्वाल्हेर येथील सावरकरांचे कट्टर शिष्य असणाऱ्या डॉ.दत्तात्रय परचुरे यांनी नथुरामला गांधीहत्येच्या तीन दिवस आधी इटालियन बनावटीचे बेरेटा हे ऑटोमॅटीक पिस्तूल पुरवले होते. ज्यातून तीन गोळ्या झाडून गोडसेने गांधींची निर्घृण हत्या केली होती. या अणि अशा बऱ्याच पुराव्यांमुळे गांधीहत्येच्या खटल्यात या कटातील सातवे आरोपी म्हणून सावरकरांचाही समावेश करण्यात आला. मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे यांनी घडवलेल्या हत्येप्रमाणे याही कटापासून ते नामानिराळे राहिले. ब्रिटिश शासनासारखी दडपशाही भारत सरकारने केली नाही. त्यामुळे सावरकर या आरोपांतून निर्दोष सुटले.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

या सिनेमात गांधीहत्येवर आश्चर्य व्यक्त करताना, २० जानेवारीच्या हल्ल्यानंतरही काँग्रेसने त्यांची सुरक्षा का काढली, यावर प्रश्न उपस्थित करून आधी ‘बापू’, मग ‘महात्मा’ आणि नंतर ‘राष्ट्रपिता’ अशी बिरुदे लावणाऱ्या काँग्रेसनेच गांधींकडे दुर्लक्ष केले, अशी दूषणे काँग्रेसला लावली. आणि शेवटी त्याही पुढे जाऊन गांधीहत्येच्या कटात आपल्याला गोवता यावे, म्हणून सुरक्षा काढल्याचा निष्कर्ष काढून भलतीच चलाखी दाखवली आहे.

पुढे १९६४ साली या खटल्यातून जन्मठेपेची सजा सुनावण्यात आलेल्या गोपाळ गोडसे, विष्णू करकरे व मदनलाल पहावा या तीन आरोपींची सुटका झाली. त्यांच्या सत्कारसमारंभ पुण्यात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लोकमान्य टिळकांचे नातू व पूर्वी दै. ‘केसरी’चे व नंतर ‘तरुण भारत’चे संपादक ग.वि.केतकर यांनी नथुराम गांधीहत्येच्या योजनेची चर्चा आपल्यासोबत हत्येच्या तीन महिने आधीपासून करत असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या या भाषणामुळे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत एकच वावटळ उठली. देशभर याचे पडसाद उमटले. संसदेतील खासदारांनी यासंबंधीच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाचे गठन करण्याची मागणी केली. या सर्व दबावाचा परिणाम मार्च १९६५ साली ‘पाठक आयोगा’ची नेमणूक करण्यात झाला. पण पुढे त्यांची केंद्रीय मंत्री व नंतर राज्यपाल पदावर पदोन्नती झाल्याने हे काम नोव्हेंबर १९६६मध्ये जीवनलाल कपूर यांच्याकडे सोपवण्यात आले. हाच तो सुप्रसिद्ध ‘कपूर आयोग’.

सिनेमात सावरकरांच्या अंत्ययात्रेला तब्बल ६ लाख लोकांचा प्रचंड जनसमुदाय जमा झाल्याने त्याला घाबरून भारत सरकारने कपूर कमिशनचे गठन केल्याचा धादान्त खोटा प्रचार करण्यात आला आहे. सावरकरांचे अंगरक्षक आप्पा कासार व सचिव गजानन दामले या दोघांच्या निर्णायक साक्षीवरून सावरकरांचा या कटामागे हाता होता, हे अगदी उघड झाले. कपूर कमिशननेदेखील तसा निष्कर्ष काढला.

मूळ खटल्यात सावरकर हे प्रमुख आरोपी असूनही पुराव्यांच्या अभावी त्यांची सुटका झाली. २०१८ साली ती केस पुनर्विचारासाठी घ्यावी, असा खटला ‘अभिनव भारत’ या संघटनेने टाकला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार गांधींवर चौथी गोळी देखील झाडली गेली होती. त्यात काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांचा हात होता. हा खटला निरर्थक आहे म्हणून न्यायालयाने रद्द केला. त्याचा अर्थ सावरकरांच्या निर्दोषीपणावर नव्याने शिक्कामोर्तब केले, असा होत नाही.

या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता एक निष्कर्ष हमखास निघतो की, ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड न करता, व त्यास जाणीवपूर्वक अपप्रचाराचे वाहन न बनवता सिनेमा निर्माण करता येणे निश्चितपणे शक्य होते. प्रसंग व संवाद निवडीचे स्वातंत्र्य घेऊन तो प्रेक्षणीय करणे, हीच खरी कसोटी होती. ‘इतिहास घडवला’ या अभिनिवेशापेक्षा तो कसा घडत गेला, याचे चित्रण पाहणे प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडले असते. मानवी भावना मिश्रित ऐतिहासिक प्रसंगाचे पदर उलगडवून दाखवणे अधिक वास्तवकारी झाले असते. इतिहासाच्या निरनिराळ्या प्रवाहांचे मूळ कमीअधिक प्रमाणात एकाच ठिकाणातून उगम पावल्याचे दाखवण्यापेक्षा मूलतः ते आहे तसेच दाखवणे फार प्रत्ययकारी ठरले असते.

या साऱ्या संभाव्य शक्यता या सिनेमाने विचारात घेतल्याचे जाणवून येत नाही. त्यामुळे या सिनेमाने अपेक्षाभंग केला आहे, असेच म्हणावे लागेल.

.................................................................................................................................................................

भूषण देशमुख

bhushan2006@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख