सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
मुकेश माचकर
  • ‘अ‍ॅनिमल’चं एक पोस्टर
  • Sat , 09 March 2024
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा अ‍ॅनिमल Animal संदीप रेड्डी वांगा Sandeep Reddy Vanga रणबीर कपूर Ranbir Kapoor

अखेर बहुचर्चित आणि वादग्रस्त ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा पाहिला. संदीप वांगा रेड्डीचा ‘अर्जुन रेड्डी’ पाहिला होता. तो अजिबात आवडला नव्हता. प्रेमाची त्याने केलेली व्याख्या काही आपल्या पचनी पडण्यातली नव्हती. अर्थात एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या कोणत्याही दोन माणसांची प्रेमाची व्याख्या आपल्यापेक्षा वेगळी असू शकतेच, ते स्वातंत्र्य त्यांना असतंच. रोज दारू पिऊन मारझोड करणारे नवरे आणि त्यांना आवरायला गेलेल्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या, पोलिसांत तक्रार न करणाऱ्या बायका, अशी नाती आसपास दिसतातच.

आपल्या काही व्याख्या असतात, त्यातून आपली म्हणून काहीएक अभिरुची घडलेली असते. त्यात जे बसत नाही, ते त्याच्या जागी ठीक आहे, म्हणून स्वीकारावं लागतं. ऐतिहासिक सत्यांचा किंवा वर्तमानातल्या गोष्टींचा विपर्यास करून धादान्त अपप्रचार करणारे ‘नथुराम’ सेन्सॉरसंमत बोलत असतात, ‘टॉक्सिक फाइल्स’ आणि स्टोऱ्या प्रदर्शित होत असतात, त्यांचा प्रचार- प्रसार- प्रसिद्धी केली जाते आणि त्यांनी अखेर सत्य उजेडात आणलं, अशा भावनेने ते पाहणारे प्रेक्षकही असतातच की!

हे सगळं आठवलं ते ‘अ‍ॅनिमल’च्या नायकाच्या ‘टॉक्सिसिटी’वरून उडालेल्या धुरळ्यातून. वर उल्लेखलेल्या उदाहरणांच्या तुलनेत ‘अ‍ॅनिमल’चा विजय ‘टॉक्सिक’ आहे, असं म्हणणं म्हणजे किंग कोब्रासमोर पालीला ‘टॉक्सिक’ म्हणण्यासारखं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

‘अ‍ॅनिमल’ ही एक काल्पनिक, अतिरंजित कथा आहे, फार खोल शोधायला गेलं, तरी त्यात मला तरी काही वास्तवाशी जुळणारं रूपक सापडलं नाही. सापडली ती वेगळीच गंमत. संदीप वांगा रेड्डी आणि चित्रपट समीक्षक (ज्यांनी त्याच्या ‘अर्जुन रेड्डी’ आणि त्याचाच रिमेक असलेल्या ‘कबीर सिंग’वर प्रखर टीका केली होती!) यांच्यातलं एक अनोखं नातं.

‘अ‍ॅनिमल’विषयी काहीही मत करून घेण्याआधी काही ‘डिस्क्लेमर’ आपले आपण लक्षात घ्यायला हवे आहेत. एक म्हणजे सिनेमाचं नाव ‘अ‍ॅनिमल’ आहे, ‘अ‍ॅनिमल द हीरो’ असं नाही. तशी सिनेमाची मांडणीही नाही.

जवळपास शेवटच्या प्रसंगापर्यंत नायक ज्याच्यावर विकृत वाटावं इतकं एकतर्फी (मनोरुग्णतेच्या जवळ जाणारं) प्रेम करतो, त्या बापापासून त्याच्या बायकोपर्यंत प्रत्येक जण त्याच्यातली ती वेडाची झाक ओळखून आहे, आणि ती कोणीही स्वीकारून ‘बरं केलंस बाळा, आज दीडशे लोक मारून आलास’, म्हणून औक्षणं करत नाही. किंबहुना त्याच्यात जेव्हा हिंस्त्र ‘मॅडनेस’ डोकावतो, तेव्हा पार्श्वसंगीतात एक वेगळी धुन वाजते. तीही विजयोन्मादी नाही, तर थरकाप उडवणारी आहे.

अब्रार हा त्याचा ‘आल्टर इगो’च भासावा असा खलनायक जेव्हा पहिल्यांदा दिसतो (जमाल कुडू या प्रसिद्ध गाण्यात) तेव्हा याच्या चेहऱ्यावरून पडदा उठून त्याचा, जुळा भाऊ असावा, असा भासणारा चेहरा दिसतो, तेव्हाही हाही एक जनावरच आहे, दोघे समान पातळीवर आहेत (नंतर कळतं की, तोही त्याच्या बापावरच्या अतीव प्रेमापोटीच नायक पार्टीच्या जिवावर उठलेला आहे), हेच स्पष्टपणे सूचित करतो दिग्दर्शक.

हा एक अ‍ॅडल्ट सर्टिफिकेट घेतलेला सिनेमा आहे. जाणीवपूर्वक. काही कट केले असते, तर सर्वांसाठी सर्टिफिकेट मिळू शकलं असतं आणि कदाचित प्रेक्षकवर्गही वाढला असता. पण प्रौढांसाठी सर्टिफिकेट असतं, तेव्हा फक्त त्यात लैंगिक दृश्यं, शिवीगाळ, हिंसा, क्रौर्य आहे यासाठीच नसतं, तर ‘थिमॅटिक’ गोष्टीही प्रौढपणे पाहाव्यात, अशी अपेक्षा असते.

इथे दोन प्रॉब्लेम आहेत. भारतात सेन्सॉर सर्टिफिकेशनला काही अर्थ नाही. हिंदीतला ‘अ‍ॅडल्ट’ सिनेमा असाही कोणीही जाऊन पाहतं, फार अडवलं जात नाही. शिवाय नंतर तो ओटीटीवर येतोच. तो पाहण्याचे हजार मार्ग आहेत. आपल्या मुलांना कोणते सिनेमे दाखवावेत, यासाठीचं ‘पीजी सर्टिफिकेशन’ पाहण्याची सजगताही किती पालक दाखवत असतील, शंका आहे.

दुसरा प्रॉब्लेम अधिक मोठा आहे. सिनेमा पाहणाऱ्यांचं शारीरिक वय काहीही असलं, तरी बौद्धिक वय पौगंडावस्थेतलंच असलेल्यांची इथं बहुसंख्या आहे. साहजिकच इथं ‘अ‍ॅडल्ट्स’साठीचा सिनेमा हाच एक प्रॉब्लेम आहे.

‘अ‍ॅनिमल’ ही वडिलांनी प्रेमानं पाहावं म्हणून तडफडणाऱ्या आणि ते जगातले ‘बेस्ट’ डॅड नाहीत, हे माहिती असताना त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या एका अत्यंत कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्त्वाच्या मुलाची कथा आहे. हा वडील-मुलगा ‘ट्रबल्ड’ नात्याचा ‘सिंड्रोम’ भारतीय सिनेमाच्या एका फार मोठ्या कालखंडाला व्यापून उरलेला आहे. त्यात सलीम-जावेद, प्रकाश मेहरा यांच्यापासून महेश भटपर्यंतच्या अनेक चित्रपटकारांच्या कलाकृतींचा समावेश होतो. किंबहुना या काळातले अ‍ॅब्सेंटी डॅड, मुलांना अनौरस करून गेलेले वडील, एकटीनं मुलांना वाढवणारी एकटी आई हे ‘स्ट्रक्चर’ किती पुनरावृत्त झालं आहे, ते पाहण्यासारखं आहे. त्यावर एखाद्या अभ्यासकाला एक वेगळा थीसिस लिहिता येऊ शकतो.

‘अ‍ॅनिमल’ पाहताना मला राहून राहून ‘त्रिशूल’, ‘शक्ती’, ‘शराबी’ या सिनेमांची आठवण होत होती. त्यांच्यातला अमिताभ बच्चन विजय होता आणि इथला नायकही (आपल्याकडे ‘प्रोटॅगॉनिस्ट’ला म्हणजे मुख्य व्यक्तिरेखेला हीरोसाठी वापरायचा ‘नायक’ हाच शब्द वापरला जातो म्हणून ‘नायक’) विजयच आहे, हा काही योगायोग नसावा!

जावेद अख्तर यांनी हा सिनेमा न पाहताच त्यावर टीका केली असावी. त्यांनी वर्णन केलेला प्रसंग फारच वेगळ्या संदर्भातला आहे आणि जिथं ज्या प्रकारे आहे, त्या तिथं तो संयतच आहे. मुळात हा सिनेमा त्यांच्याच त्या ‘अ‍ॅब्सेंटी डॅड सिंड्रोम’ला पुढे नेणारा आहे.

‘शक्ती’ हा ‘अ‍ॅनिमल’च्या सगळ्यात जवळचा सिनेमा वाटतो. तिथं वडिलांच्या प्रेमासाठी झुरणारा नायक आहे आणि त्यांनी आपल्याऐवजी पोलिसी कर्तव्य मोठं मानलं, याचा त्याने डूख धरला आहे. तो सिनेमा सलीम-जावेदनी लिहिलेला आहे. जावेदना तर निश्चितच ‘अ‍ॅनिमल’ हा प्रकार कळू शकला असता.

सिनेमाची कथा हा मांडणीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. संदीप वांगा रेड्डीने लेखनात बाप-लेकाच्या नात्यावर केलेलं काम अफाट आहे, पण त्याला कोंदण म्हणून जी कथा आहे ती टिपिकल ‘मद्रासी’ सूडकथा आहे. तिच्यातले ‘ट्विस्ट्स’ आणि ‘टर्न्स’ हे बेतीवच आहेत. वांगा रेड्डीचं ‘टेकिंग’ उत्तम आहे आणि बाप-लेकाच्या नात्याचा अंडरकरंट सतत वाहत असल्यानं तो भाग फारसा ताप करून न घेता पुढे जाता येतं… पण साडेतीन तासांच्या सिनेमात काही भाग असह्य होणं स्वाभाविक आहे.

विजयच्या बोलण्यात, वागण्यात सतत ‘फॅलिक’ (पुरुषलिंगाशी संबंधित) संदर्भ येतात. त्यातून ‘मर्दानगी’ नावाची, मुलं जन्माला घालण्याची शक्ती म्हणजे पुरुषत्व, अशी ‘अ‍ॅनिमल’ पातळीवरचीच कल्पना तो सतत मांडत असतो. त्याचा बंदुकींचा शौक आणि उपेंद्र लिमयेने साकारलेल्या फ्रेडीकडून बनवून घेतलेली सगळ्या गन्सची पितामह म्हणावी, अशी फँटसीतली गन, हे सगळं त्या पुरुष लिंगाच्या ‘फॅसिनेशन’मधूनच आलेलं आहे. त्या बाबतीत तो या देशातल्या पुरुषप्रधान संस्कृतीचाच प्रतिनिधी आहे, यात काहीच शंका नाही. पण तो शिक्का त्याच्यावर मारावा, तर बायकोची दोन बाळंतपणं एकट्यानं पार पाडलेला नवराही तो आहेच की!

शिवाय जॉन विकचा हिंसाचार जेवढा ‘माइंडलेस’ आहे, तेवढाच इथलाही आहे. कोरियन सिनेमांमध्ये तर हे फारच पुढच्या पातळीवर कोरिओग्राफ केलं जातं. किमान आजच्या प्रेक्षकांच्या पिढीनं तरी ते सगळे सिनेमे पाहिलेले असतात. त्यामुळे हा सिनेमा त्याबाबतीत काही वाढीव कुसंस्कार करील, अशी शक्यता वाटत नाही.

विजयच्या आणि इतरांच्या तोंडातल्या शिव्या आणि लैंगिकतेचे संदर्भ यांचं ओटीटीच्या जमान्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही. ‘मिर्झापूर’ मालिकेत याहून अधिक झणझणीत मसाला असेल, क्रौर्य आणि हिंसा असेल आणि ‘राणा नायडू’मध्ये अधिक उत्तान लैंगिकता असेल… ते सगळं ‘संस्कारशील’ प्रेक्षकांनी आधीच पचवून ढेकर दिलेला आहेच.

संदीप वांगा रेड्डी हा संकलकही आहे. त्यामुळे त्याने तीन तासांहून अधिक काळ चालणारा सिनेमा रेंगाळू दिलेला नाही, भले परिचयाचे का असेनात, ट्विस्ट दिले आहेत. त्याला संगीताचा कान आहेच. त्याच्या सिनेमातली गाणी उत्तम असतात. याही सिनेमातली आहेत. ‘अर्जन वेल्ली’ आणि ‘सारी दुनिया जला देंगे’ ही गाणी त्याने पार्श्वसंगीत म्हणून ज्या प्रकारे वापरली आहेत, ते पाहण्यासारखं आहे. त्याचा पार्श्वसंगीताचा सेन्स अनुराग कश्यपच्या जातीचा आहे. अनुरागने गोळ्यांच्या वर्षावात जीव वाचवत धावणाऱ्या सरदार खानच्या प्रसंगावर ‘जिया हो बिहार के लाला’ हे नाचरं गाणं फिट बसवून दाखवलं होतं.

संदीप वांगा रेड्डीने फारच उत्तम प्रकारे पार्श्वसंगीत वापरलं आहे. तेलुगू सिनेमातला संगीतकार हर्षवर्धन रामेश्वरने सिनेमातल्या प्रत्येक प्रसंगाची परिणामकारकता वाढवणारं चपखल पार्श्वसंगीत वापरलं आहे, थीम्स वापरल्या आहेत. त्यातून सिनेमाची ध्वनीच्या पातळीवर एक वेगळी जोडणी अनुभवता येते.

संदीप रेड्डी वांगानेच इतर दोन पटकथाकारांसोबत रचलेल्या पटकथेत बरेच प्रसंग जबरदस्त जमून आलेले आहेत. खासकरून वडील-मुलगा एकत्र असतात तेव्हाचे प्रसंग, नायक-नायिका यांच्यातले टिपिकल प्रणयी जोड्यांपेक्षा वेगळे प्रसंग, शेवटी त्याने आपल्याशी प्रतारणा केली, हे कळल्यावर त्या दोघांमध्ये घडणारा प्रसंग आणि कळसाध्यायाला ‘आज मी पापा आणि तुम्ही मुलगा’, असं विजय बापाला सांगतो तो प्रसंग, हे थरारक प्रसंग आहेत, उत्तम लिहिलेले, उत्तम ‘एक्झिक्यूट’ केलेले.

संदीप रेड्डी वांगाच्या व्यक्तिरेखा कचकडी नाहीत (‘मद्रासी सिनेमा’ असं म्हटल्यावर तसा समज होऊ शकतो), प्रत्येक कॅरेक्टरवर काम केलंय… त्यामुळेच अगदी शेवटाला अवतरणारा बॉबी देओलचा अब्रारही फार कमी प्रसंगांमध्ये संपूर्णपणे उलगडून जातो, समजून जातो आणि हा नायकाचा व्यत्यास आहे, हेही कळून जातं… शेवटी विजयसारखा सुडानं पेटलेला नायकही त्याला तुझ्या बाजूनं थांबतोस का, तर मीही थांबतो, असं आवाहन करतोच त्याला… अर्थात, तिथं वर्तुळ पूर्ण होत नाही…

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘अ‍ॅनिमल’ : सद्य परिस्थितीशी संबंधित सामाजिक-सांस्कृतिक पडघम एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ‘हुकुमी एक्क्या’सारखे कशा प्रकारे वापरले जात आहेत, याचे हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे
आपल्या वडिलांचं प्रेम मिळावं म्हणून पशुसारखा वेडा झालेला नायक रणविजय आणि ‘राष्ट्रप्रेमा’ची धुंदी चढून वाट्टेल ते करावं, अशी एक अपेक्षा असलेला भारतीय तरुण, यांतल्या सीमारेषा कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात, हे प्रेक्षकांना सहजपणे कळू नये, यासाठी दिग्दर्शकानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली खरी, पण ते चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात येतंच. कारण हेतू शुद्ध नसेल तर कलाकुसर कितीही बेमालूम असली, तरी ती बेगडीच ठरते.

.................................................................................................................................................................

या सिनेमाच्या सुरुवातीला रणबीर कपूरचं नाव येतं, तेव्हा ‘सुपरस्टार रणबीर कपूर’ असं लिहिलेलं आहे खास दाक्षिणात्य पद्धतीनं. तिथं कमल हासन, रजनीकांत, विजय यांच्यासारख्या महानायकांच्या एन्ट्रीला विशेष संगीत आणि ‘सुपरस्टार’ असा उल्लेख केला जातो… तो अगोचरपणा हिंदीत याआधी झाला नसावा… पण, पण, पण, यापुढचा सुपरस्टार कोणी असेल, तर तो रणबीर कपूर असेल, याबद्दल काही शंका असल्यास त्या फेडून, फाडून टाकणारा परफॉर्मन्स रणबीरने दिला आहे.

रणबीरने अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय याआधीही केला आहे. पण इथं त्याने सुपरस्टारच्या शैलीत एक व्यावसायिक सिनेमा लांबरूंद खांद्यांवर पेलून नेला आहे. त्याचा पडद्यावरचा वावर ‘इलेक्ट्रिफाइंग’ आहे. त्याचं कॅरेक्टर काही क्षणांसाठीही हलत नाही आणि त्याच्या सगळ्या छटा तो अफाट भावदर्शनानं दाखवतो. एकीकडे तो फिल्मी हाणामारी, गोळीबार, रक्तकाढू खुपसाखुपशी हे सगळं स्टायलीत करतो, दुसरीकडे तो भावनिक प्रसंगांमध्ये तेवढाच अव्वल आहे. महानायकानं पडदा व्यापून टाकावा लागतो… ते तो फार समर्थपणे करू शकलेला आहे…

त्याला अनिल कपूरनेही तेवढीच जोरदार साथ दिली आहे. मुलाविषयीची असहाय्यता, त्याचं प्रेम वाटण्याऐवजी त्याची भीतीच वाटणं, आपलं काही चुकलं असेल, याची जाणीवही न होणं, हे सगळं अनिल कपूरने उत्तम उभं केलंय. रश्मिका मंदानाला मंद मानणाऱ्या मंडळींना तिने इथं धक्का दिला आहे. बॉबी देओल तर भलताच कडक आहे इथं. इतरांमध्ये आपला उपेंद्र लिमये आणि सौरभ सचदेवा (‘जाने जाँ’ या सिनेमामधला करीनाचा नवरा) लक्ष वेधून घेतात.

…तर आता एकच मुद्दा… गंमतीचा…

संदीप रेड्डी वांगा हा रामगोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप यांच्याच कुळीतला दिग्दर्शक आहे. व्यक्तिमत्त्व म्हणूनही तो भलताच ‘कॉम्प्लेक्स’ आहे. एकीकडे तो ‘सिनेसमीक्षकांना कोलतो’ असं सांगतो रागानं, पण त्याच सिनेसमीक्षकांनी आपल्या ‘अर्जुन रेड्डी’/ ‘कबीर सिंग’ या प्रेमपटाला हिंस्त्र म्हटलं, तेव्हाच मी ठरवलं होतं की, खरा व्हायोलंट सिनेमा कसा असतो, ते दाखवतो पुढच्या सिनेमात, असं म्हणून त्याने हा सिनेमा केला आहे…

अरे गड्या, तू कोलतोस ना त्यांना, मग त्यांना इतकं महत्त्व का देतो आहेस? सिनेमाच्या सुरुवातीचाच जो प्रसंग आहे आणि जी शेवटची फ्रेम आहे, त्यात एका विशिष्ट वयातला रणबीर कपूर एक माकडाची पाचकळ गोष्ट सांगून शेवटी एक अश्लील अ‍ॅक्शन करतो… हे रेड्डी वांगा समीक्षकांना किंवा त्याच्या सिनेमावर टीका करणाऱ्यांना उद्देशून करतो आहे, असंच वाटतं… ते मजेशीर आहे, बालिश आहे आणि करुणही आहे…

त्याचबरोबर या सिनेमाचा सिक्वेल येत असावा, अशी शंका निर्माण करणारी एक धक्कादायक व्यक्तिरेखा त्याने शेवटी अतिशय क्रूर पद्धतीनं, रक्ताच्या चिळकांड्या उडवत सादर केली आहे, तेही ‘मला व्हायोलंट म्हणताय का, मग अजून दाखवतो तुम्हाला’, असं लहान मुलानं एका विशिष्ट अवयवाचा शोध लागल्यावर तो अवयव नाचवत फिरावं, तसं केल्यासारखं आहे…

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

विजय त्याने स्वत:वर बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. (हे वांगा रेड्डीच्या वाचनात आलं, तर ‘टाइम प्लीज’ म्हणून तो फ्रेडीकडून ती गन घेऊन तिच्यावर बसून माझा शोध घेत दहिसर टोल नाका क्रॉस करून येईल, अशी दाट भीती वाटते आहे… असो…)

मग असाही विचार येतो की, वांगा रेड्डीसारख्या कुशल संकलकानं त्याच्या सिनेमातला हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर कदाचित सिनेमाची लांबी एक तासानं कमी झाली असती आणि तो अधिक ‘कॉम्पॅक्ट’ही झाला असता…

पण, सिनेमा हे त्याचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

.................................................................................................................................................................

लेखक मुकेश माचकर सध्या ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक आहेत. त्याशिवाय नावाजलेले चित्रपटसमीक्षक तर आहेतच.

mamanji@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा