‘आत्मपॅम्फ्लेट’ या सिनेमाविषयी त्याचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हापासून सोशल मीडिया, मुद्रित मीडिया यांतून वाचलं होतं. या सिनेमाचं काहीसं सुरस व चमत्कारिक वाटेल असं नाव आणि एखाद्या ‘पॅम्फ्लेट’सारखं पोस्टर पाहून त्याच्याबद्दल कुतूहलही चाळवलं होतं, पण तो या ना त्या कारणानं पाहायचा राहून जात होता. अखेर परवा पाहिला. हा जेमतेम दीड तासाचा मराठी चित्रपट उदाहरणार्थ थोर म्हणावा असा आहे.
आशीष बेंडे या एका सामान्य माणसाची ही कथा. खरं तर त्याचं आत्मचरित्रच. ते सांगितलंय तेदेखील आत्मचरित्रासारखंच, फक्त नर्मविनोदी शैलीत. म्हणून त्याचं नाव ‘आत्मपॅम्फ्लेट’. आशीषचं कौटुंबिक, सामाजिक, शालेय आयुष्य आणि त्यावर झालेला राजकीय-सामाजिक परिस्थितीचा परिणाम याची ही कथा आहे.
हा सिनेमा पाहिल्यावर पहिल्यांदा आठवण झाली ती, ज्येष्ठ पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या आत्मचरित्राची, ‘रसीदी टिकट’ची. प्रसिद्ध पंजाबी लेखक खुशवंतसिंग यांनी उपहासानं अमृता प्रीतम यांना म्हटलं होतं की, ‘तुझं आयुष्य ते केवढं, बसच्या तिकिटाच्या पाठीमागे लिहून संपेल एवढं.’ त्यामुळे त्यांनी तेच नाव आपल्या आत्मचरित्राला दिलं. पण अमृता प्रीतम या काही सामान्य व्यक्ती नव्हेत. त्या भारतातल्या पहिल्या ‘सेलिब्रेटी’ लेखिका आहेत. त्यामुळे त्यांनी उपहासानं आपल्या आत्मचरित्राला ‘रसीदी टिकट’ असं नाव देणं, हे खुशवंतसिंग यांना दिलेलं प्रत्युत्तरच होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
आशीष बेंडे या सामान्य माणसाने आपली कथा (जो या सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि ही त्याचीच आत्मकथाही आहे.) परेश मोकाशी या तिरकस शैलीच्या लेखक-दिग्दर्शकाला सांगितली. त्याने तिचा आपल्या पद्धतीनं ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा सिनेमा केला. त्यामुळे हे नाव प्रेक्षकांना आवडेल की नाही, याचा विचार करून ठेवलेलं गेलेलं नाही, हे नक्की. ते कथानकाचा अर्थबोध करतंय ना, या हेतूनं आणि हा सिनेमा ज्या तिरकस शैलीत आहे, त्या अनुषंगानं ठेवलेलं आहे.
आत्मचरित्र आपलं आपणच सांगावं लागतं, त्याशिवाय त्याला ‘ऑथेंटिसीटी’ येत नाही. तृतीयपुरुषी निवेदन केलं असतं, तर हा सिनेमा आशीष बेंडे या नायकाचा चरित्रपट झाला असता, आणि सामान्य नायकाचा ‘चरित्रपट’ सहसा कुणी काढत नाही. (त्यांची चरित्रंही कुणी लिहीत नाही.)
ह्युमर आणि पॅशन, ही जगण्यासाठी धडपडणाऱ्या सामान्य माणसांची व्यवच्छेदक म्हणावीत अशी वैशिष्ट्यंच असतात, हे हा सिनेमा फार चांगल्या प्रकारे अधोरेखित करतो. मराठीत आत्मचरित्रांची फार मोठी परंपरा आहे, पण त्यातली जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक आत्मचरित्रं ही प्रामाणिकपणे लिहिलेली नाहीत. ती संबंधित लेखकांनी स्वत:च्या सोयीनं आणि सोयीनुसार लिहिलेली आहेत. अर्थात हा प्रकार मोठ्या लोकांच्या बाबतीत प्राधान्यानं दिसतो. जे सामान्य लोक आत्मचरित्र लिहितात, ते आपल्या जगण्याविषयी इतकं गागत बसतात की, ती ‘अ-वाचनीय’ होऊन जातात. माणूस ‘सामान्य’ असतो आणि तो स्वत:शी ‘प्रामाणिक’ असतो, आणि तो ‘आत्मचरित्र’ लिहितो, तेव्हा लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रा’सारखी कलाकृती जन्मते. आशिष बेंडे या प्रामाणिक नायकाची ‘आत्मपॅम्फ्लेट’ ही ‘(सिने) आत्मकथा’ त्याच परंपरेचा वारसा सांगते.
तर सांगायचा मुद्दा असा की, या सिनेमानं पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत कुठेही कंटाळा आणला नाही. लेखन-दिग्दर्शन, अभिनय, शैला, मांडणी, अशा सगळ्या पातळ्यांवर तो सरस म्हणावा असा आहे. हा सिनेमा शेवटपर्यंत आपल्याला स्वत:सोबत घेऊन जातो. त्याचं मुख्य कारण असं आहे, ही आपल्यासारख्याच, नव्हे आपल्यातल्याच एका सामान्य तरुणाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यात अतर्क्य, अजब, गजब, सुरस, चमत्कारिक अशा कुठल्याच गोष्टी ‘सिनेमॅटिक मीठ-मिर्च-मसाला’ लावून सांगितल्या जात नाहीत. त्या आपल्या आयुष्यात घडतात, तशाच पद्धतीनं सांगितल्या आहेत. किंबहुना असं म्हणता येईल की, आपण आपल्याविषयी आपल्या जवळच्या मित्रांना सांगताना जसे आपले प्रयत्न, महत्त्वाकांक्षा आणि फजिती हेही हसत-खेळत सांगू, तसंच या सिनेमात सांगितलंय.
निवेदनकर्ता नायक जरा जास्त गमत्या असल्यामुळे तो सगळ्याच गोष्टी नर्मविनोदी पद्धतीनं सांगतो. दुसरं म्हणजे, या सिनेमाचा नायक आशीष बेंडे असला तरी, ही गोष्ट केवळ त्याच्या एकट्याचीच राहत नाही. ती त्याच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांची गोष्ट होते. त्याचबरोबर त्याच्या समाजाची आणि देशाचीही. नायकही आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांचं औचित्य त्या त्या वेळी देशात घडलेल्या घटनांशी लावून दाखवतो. ‘पर्सनल इज पॉलिटिकल अँड पॉलिटिकल इज पर्सनल’, याचं एक उत्तम उदाहरण म्हणूनही या सिनेमाचं नाव सांगता येईल, सांगत राहता येईल आणि सांगावंही.
हा सिनेमा घडतो ऐंशी-नव्वदच्या दशकात. या काळात देशात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर जे काही घडत होतं, त्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांचे पडसाद या सिनेमातही उमटलेले आहेत. पण ते ज्या पद्धतीनं आले आहेत, त्यात या सिनेमाची खरी गंमत आहे. जनता पक्षाचं सरकार पडणं, व्ही. पी. सिंगांचं सरकार येणं, बाबरी मशिद पडणं, मुंबईतले बॉम्बस्फोट, मंडल आयोग या यातल्या काही प्रमुख घटना. खरं या अनुषंगिक घटना आहेत. त्यावर काही सिनेमाचा ‘फोकस’ नाही. पण देशाच्या पातळीवर ही उलथापालथ होत असताना त्याचा परिणाम नायकाच्या आयुष्यावरही या ना त्या प्रकारे होत होता. या काळात या देशात राजकीय पातळीवर जी प्रचंड घुसळण झाली, सत्तावर्चस्वाच्या राजकारणाचे जे इष्ट-अनिष्ट परिणाम झाले, त्यातून देश सामाजिक पातळीवरही घुसळून निघत होता, पण ज्यांनी या समस्यांचा सामना एकत्र येऊन, सांघिकपणे केला, ते मोडून पडले नाहीत, कुठल्याही एकारलेल्या दिशेनं वाहवत गेले नाहीत आणि त्यामुळेच त्यांची फरपटही झाली नाही.
त्यातून नायक आशीषला आणि त्याच्या मित्रांना माणसांची, कुटुंबांची, नातेवाईकांची, मित्रांची, समाजाची ओळख होत जाते, आणि त्यातून तो जगण्याचं तत्त्वज्ञान आत्मसात करत होता. नायक आणि त्याचे मित्र आपापल्या घरी, शाळेत, आजूबाजूला, समाजात आणि देशात जे काही घडतं, त्यातून काय शिकतात, तर ‘मेंढूरपाक’ची रेसिपी. ‘मेंढूरपाक मूर्दाबाद’ म्हणण्याची समज, त्याचा उच्चार करण्याचं धाडस आणि त्यावर विश्वास ठेवण्याचं विवेकी तारतम्य, ही या सिनेमाची ‘बिटवीन द लाइन’ आहे.
खरं नायक आशीष बेंडेची ही ‘आत्मपॅम्फ्लेट’ ही एक अशा तरुणाची कथा आहे, जी आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करते की, जात, धर्म आणि प्रेम या तिन्हीतल्या दुष्प्रवृत्तींचा सामना एकत्रितपणे, एकमेकांना साथ देत-घेत केला, तर आपलं जगणं कुठल्याही प्रकारच्या कुकर्माच्या आहारी जात नाही. उलट ते सरळ, निष्कलंक आणि निर्मळ होत जातं. त्यात संघर्ष असतो, दैनंदिन परिस्थितीशी झोंबी घ्यावी लागते, पण त्यासाठी कुठल्याही गैरमार्गाचा, भ्रष्ट उपायांचा आधार घ्यावा लागत नाही. (आणि अतर्क्य सिनेमॅटिक फँटसी पाहून स्वत:चा मनोविनोदन करायची वेळही येत नाही!) थोडक्यात, जात, धर्म या व्यवस्थांना आव्हान देत आणि त्यासाठी उगाचाच जिवाचा आटापिटा करत वेळ घालवण्यापेक्षा त्यांना ‘माणूसपणा’पेक्षा वरचढ होऊ दिलं नाही की, त्या आपोआपच आयाळ काढलेल्या सिंहासारख्या होऊन जातात, हे आशीष, त्याचं कुटुंब आणि त्याचे मित्र जागोजागी दाखवून देतात.
त्यामुळे जात-धर्म या मानवांनी तयार केलेल्या आणि गेल्या काही काळात भारतीयांच्या मुळावर उठलेल्या व्यवस्थांचा पराभव करण्याचा विडा उचलून, त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या नायकाची ही कथा नाही. ही या दोन्ही व्यवस्थांशी प्रेमाच्या जोरावर कसं लढता येतं, हे सांगणाऱ्या नायकाची कथा आहे.
बाबरी मशिदीच्या पाडावानंतर आपल्या देशात जात-धर्म हे कधी नव्हे इतक्या प्रखरपणे राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. आणि तेव्हापासून त्यांचं राजकीय प्रस्थ वाढतच गेलेलं दिसतं. २०००नंतर सोशल मीडियाचा गवगवा सुरू झाल्यानंतर माणसामाणसांना एकमेकांपासून तोडण्याचं, त्यांच्यात फूट पाडून एकमेकांचा द्वेष, तिरस्कार करण्याचं काम जोरात सुरू झालं. ‘आपण आणि ते’ ही तिरस्कारग्रस्त मांडणी केवळ राजकारणच नाही, तर समाजकारण, अर्थकारण, संस्कृती, भाषा, दैनंदिन व्यवहार, नाती, अशा सगळ्याच क्षेत्रांतच केली जाऊ लागली. गेल्या दशकभरात तर या तिरस्कारानं जळीस्थळीकाष्ठीपाषाणी माणसांच्या मनात अक्षरक्ष: थैमान घातलं आहे.
या तिरस्काराच्या, द्वेषाच्या मांडणीला या सिनेमाचा नायक आणि त्याचे मित्र सणसणीत चपराक लगावतात. पण तीही अतिशय सभ्य, सुसंस्कृतपणे आणि मुख्य म्हणजे लोकशाही पद्धतीनं. नर्मविनोदाचा आधार घेत विद्यमान भारतीय राजकारण, समाजकारण आणि जात-धर्मातल्या अपप्रवृत्तींची चांगली हजेरी हा सिनेमा घेतो. अतिशय उत्तम प्रकारे त्यावर भाष्य करतो. आणि तिरस्काराच्या-द्वेषाच्या आगडोंबाला विझवायचं असेल, तर ‘प्रेम’ हे एकच उत्तर आहे, हेही स्पष्टपणे सांगतो.
प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी सोशल मीडिया, तिरस्कारग्रस्त राजकारण आणि जातीय-धार्मिक भेदभाव यांनी बिघडून, संकुचित करून टाकली आहे. प्रेम ही माणसांसाठी एक नितांत सुंदर अशी निकडीची गोष्ट असते. पण ती संपादन करण्याची एक कला आहे. ती नीट प्रकारे आत्मसात करून घ्यावी लागते. आपल्याला प्रेम मिळालं पाहिजे, असं वाटणं एकापरीनं स्वाभाविकच आहे. पण आपल्याला ते मिळायचं असेल, तर मग इतरांनाही मिळावं लागतं. त्यांना त्यांचं प्रेम मिळण्यासाठी आपल्यालाही त्यांच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी ‘सगळ्यांसह मलाही प्रेम मिळायला हवं’, असा ‘स्वातंत्र्या’सारखाच प्रेमाचाही दृष्टीकोन असावा लागतो. हेही आशीष बेंडे आणि त्याचे मित्र पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात.
त्यामुळे ही केवळ आशीष आणि सृष्टीच्या शाळकरी वयातल्या प्रेमाची गोष्ट राहत नाही, ती कौटुंबिक, मित्रपरिवार, सामाजिक पातळीवरच्या ‘प्रेम’ या सार्वकालिक व सर्वव्यापी भावनेची कथा होते. प्रेमाला अनंत छटा असतात. त्याचे आविष्कारही अनंतविध असतात. पण त्याचा कितीही विस्तार केला, तरी त्यात तिटकारा, द्वेष, तिरस्कार, हिंसाचारी वृत्ती या गोष्टी कधीही येऊ शकत नाहीत. इतरांना तुच्छ लेखणाऱ्या, त्यांचा द्वेष-तिरस्कार करणाऱ्या आणि त्यांच्याबाबत हिंसाचारी वृत्तीनं बोलणाऱ्या-वागणाऱ्यांना कधीच प्रेम मिळत नाही, मिळते ती केवळ प्रेमाची आभासी, सिनेमॅटिक फँटसी. गोष्टींपासून आशीष बेंडे आणि त्याच्या मित्रांनी स्वत:ला वाचवलेलं आहे.
या सिनेमाचा नायक आपल्या कौटुंबिक परिस्थितीवर, आपल्या आई-वडिलांवर, केवळ जन्मामुळे मिळालेल्या जात-धर्माच्या ओळखीवर प्रेम करत जगतो, त्याचबरोबर तो आपल्या मित्रांच्या वेगवेगळ्या जातीय-धार्मिक ओळखींसह त्यांच्यावरही प्रेम करतो, तेही त्याच्यावर आणि एकमेकांवर करतात. या मित्रांपैकी कुणीही कपटी, खुनशी, महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, लबाड, ढोंगी नाही, हे विशेषत्वानं लक्षात घ्यायला हवं. तसं त्यांच्यातलं कुणी नाही म्हणून ते एकत्र येऊन नायक आशीष बेंडेला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी हरप्रकारे मदत करतात आणि ते करत असतानाच एकमेकांवरही प्रेम करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्नही करतात. ‘प्रेम लाभे प्रेमळाला’ अशी जगरहाटी सांगितली जाते. त्याचा मूर्तीमंत आविष्कार बेंडेसह त्याच्या सगळ्याच मित्रांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळेच बेंडेच्या चितळे नावाच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठीही ते कुठलाही टोकाचा, ‘सिनेमॅटिक हिरोगिरी’चा मार्ग अवलंबत नाहीत, तर लोकशाही मार्गाचा वापर करूनच त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात.
आणि हे सगळं करत असताना त्यांच्याकडून चुका होतात. त्या ते निस्तारत असताना दिग्दर्शक-लेखकाने कुठलाही ड्रामा, थ्रिलर आणि सस्पेन्स निर्माण केलेला नाही. कारण त्याची या कथानकात गरजच नाही. सरळ साधी माणसं मनानंही सरळ, साधीच असतात, त्यामुळे ती आपलं यश जसं सहज-साध्यापणानं सांगतात, तशाच चुकाही सांगतात. त्या कबूलही करतात आणि दुरुस्त करताना इतरांकडून अनवधानानं घडलेल्या आगळिकीचा बाऊ न करता, त्याला ‘खलनायक’ न करता दुरुस्तही करतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
हा सिनेमा ऐंशी-नव्वदच्या दशकात घडत असला तरी, तो प्रदर्शित झालाय एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला. सध्याचा काळ द्वेष, तिरस्कार, आभासी वास्तव यांवर जगू पाहणाऱ्या माणसांचा व समाजाचा झालेला आहे. वर्चस्ववादी जातवास्तव, राजकीय सत्ताकेंद्राकडून होणारा जात-धर्माचा अतिरेकी उदोउदो आणि समाजवास्तव म्हणजे केवळ सोशल मीडिया, असं समीकरण झालेल्या समाजात हा साधा, सरळ, निर्मळ. निष्कपट, पण तरीही उदात्त मानवी मूल्यांची कौटुंबिक ते सामाजिक पातळीपर्यंत जोपासना करणारा सिनेमा समजून घेणं किंवा तो पचवणं किंवा आवडणं हे सोपं राहिलेलं नाही.
त्यात या सिनेमाचा नायक दलित तरुण आहे. त्याच्या मित्रमंडळींत ब्राह्ण, शीख, मुसलमान अशा विविध जातिधर्माची मुलं आहेत. पण कुणीच जातीच्या मत्सरानं, धर्माच्या कडवट तिरस्कारानं ग्रासलेलं नाही. खरं या सिनेमाकडे आजच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक स्थितीगतीच्या संदर्भात एक ‘रूपक’ म्हणून पाहायला हवं. पण तसं पाहण्यासाठीही तुमचं मन मोठं असावं लागेल.
या सिनेमाचा नायक दलित तरुण असणं, हा हल्ली सिनेमा चालण्याचा हमखास मार्ग म्हणून केलेला प्रयोग आहे, असा भंपक युक्तिवाद ज्यांना सुचू शकतो, त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करावं. एका ब्राह्मण लेखकाने ब्राह्मणी पद्धतीने ब्राह्मणांसाठी लिहिलेला एका दलित नायकाचा सिनेमा असा छद्मी आरोपही या सिनेमावर केला जाण्याची शक्यता आहेच. ज्यांना जळीस्थळीकाष्ठीपाषाणी ‘जाती’शिवाय दुसरं काहीच दिसत नाही, अशांना इतकंच सांगावंसं वाटतं की, तरीही हा सिनेमा चांगला आहे. खरं तर दलित समाजाने, विशेषत: दलित तरुणांनी हा सिनेमा डोक्यावर घ्यायला हवा, कारण तो ‘जातिअंता’चा पुरस्कार करतो. शेवटी सृष्टीच पुढाकार घेऊन आशीषला भेटायला बाेलावते आणि त्यांची भेट चालू असतानाच दोघांचेही आई-वडील तिथं येऊन त्यांना सहजपणे सांगतात की, तुमचं ठरलं असेल तर आमची काही हरकत नाही. आणि ते चौघं सृष्टी-आशीषला तिथंच सोडून चहा प्यायला जातात. हेही पचायला जरा जडच आहे. पण अशा घटना आपल्या समाजात अगदी तुरळक स्वरूपात का होईना घडलेल्या आहेत, हेही नाकारून चालणार नाही.
शेवटी तर प्रौढ आशीष-सृष्टी एलियन्ससोबत चहा घेतात. पण काहींना हा शेवट खटकलाय. हा कल्पनाविलास अतिशयोक्त आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. पण ज्यांनी हा सिनेमा त्यातल्या ‘अंडरकरंटस्’सह आणि ‘बिटवीन द लाइन्स’सह पाहिलाय, त्यांना हा शेवट अजिबात खटकणार नाही. माणसामाणसांमध्ये प्रेमाची यथेच्छ देवघेव करून झाल्यावर आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता संपली, असं मानणाऱ्या पंथातला आशीष बेंडे नाही. तो माणसांपल्याड जात एलियन्सशीही प्रेमाचं नातं जोडतो, हा या शेवटाचा सांगावा आहे. त्याला ‘आदर्शवाद’ समजण्याचं काही कारण नाही. ‘मेंढूरपाक’ला ‘मुर्दा’ नव्हे, ‘जिंदा’च गाडून पुढे चालत राहिलेल्या आशीष बेंडेचा तो गंतव्य प्रवास आहे.
काहींना हा सिनेमा पाहून ‘लाल सिंग चड्डा’ची आठवण झाली, काहींना ‘शाळा’ची. खरं तर ‘लाल सिंग चड्डा’ऐवजी अलीकडेच आलेल्या झोया अख्तर यांच्या ‘द आर्चीज’ या सिनेमाची आठवण व्हायला हवी. कारण दोन्हींची जातकुळी जास्त साधर्म्य असलेली आहे. आणि ‘शाळा’ऐवजी नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ची आठवण व्हायला हवी. ‘सैराट’ ही आपल्या देशातल्या वर्चस्ववादी जातवास्तवाची भेदक शोकांतिका आहे, तर ‘आत्मपॅम्फ्लेट’ ही आपल्या वर्चस्ववादी जातवास्तवाची छेदक सुखात्मिका आहे.
पण ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा सिनेमा ‘सैराट’सारखा गाजणार, नावाजला जाणार नाही. कारण कुणाच्या तरी पराकोटीच्या त्यागाशिवाय आपल्यात उदात्त भावनेची प्रेरणा जागृत होत नाही. हे माणूस आणि समाज म्हणून आपली अभिरुची बिघडल्याचं लक्षण आहे. ही आपली अभिरुची सुधारेल, तेव्हा आशीष बेंडेच्या सुखात्मिकेची महत्ता आपल्याला कळेल. तेव्हा आपली माणूस म्हणून, समाज म्हणून ‘इयत्ता’ वाढलेली असेल. त्यासाठी ‘मेंढूरपाक मुर्दाबाद’ हा आशीष बेंडे आणि त्याच्या मित्रांचा आयुष्यमंत्र आपल्याला आत्मसात करावा लागेल. तो आपण जेव्हा केव्हा करू, तेव्हा हा ‘आदर्शवाद’ आहे, हे ‘अशक्य’ आहे, हे ‘दिवास्वप्न’ आहे, असा सूर आपण काढणार नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment