अजूनकाही
लौकिक अर्थाच्या प्रेमत्रिकोणात एकत्रित न बांधलेले ते तिघे. त्यातली ती, शैलजा देसाई (शेफाली शाह). स्मृतिभ्रंश (Dementia) झालेली, विस्मरणाच्या एका टप्प्यावर विसरत चाललेली. तिला सावरणारा, तिला या विस्मरणाच्या वाटेवर साथ देणारा तिचा जीवनसाथी दिपांकर देसाई (स्वानंद किरकिरे) आणि तिने नवथर वयापासून मनात साठवून ठेवलेला पण विस्मृतीच्या या टप्प्यावर मनाचा डोह ढवळून वर आलेला तो, प्रदिप कामत (जयदिप अहलावत). या तिघांची एक अलवार कथा आहे – ‘थ्री ऑफ अस’.
इंग्रजी नाव असलेला हा हिंदी सिनेमा महाराष्ट्रातल्या वेंगुर्ल्यात घडतो, तोच भाषा, प्रांत यांच्या सीमारेषा ओलांडत, प्रेमाची भाषा बोलत. हा सिनेमा कुठेही, अगदी कुठेही घडू शकतो, इतकी ही कथा ताजी, सच्ची आणि सकस आहे. दिग्दर्शन, अभिनय आणि पटकथा या तीनही पातळ्यांवर सकसपणे उतरलेली ही कलाकृती तशी शब्दांत वर्णन करण्यापल्याडची अनुभूती देणारी. उणापुऱ्या दीड तासांचा हा सिनेमा महिन्याभरापूर्वी पाहूनही पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत जसाच्या तसा आठवतो, ही आहे या सिनेमाचे सहलेखक, सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक अविनाश अरुण यांची कमाल!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
शेफाली शाह यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्रीने साकारलेली मुख्य व्यक्तिरेखा लाजवाबच. विस्मृतीच्या खोल खोल गर्तेत जात असताना आठवणींचा तळ ढवळून येतो आणि मग त्या तिघांचा प्रवास सुरू होतो. त्यातली आताची ती प्रौढा आठवणींच्या आकाशपाळण्यात बसते, ती नवथर शालेय मुलगी बनून. आणि मग विस्मरणाच्या मागे दडलेली त्याची आठवण अशी जोरकसपणे उसळी मारून बाहेर येईल, याची कल्पनाही नसलेली ती सहचराला म्हणते, ‘वेंगुर्ल्याला जाऊया, सगळं काही विसरायच्या आत’. तेव्हा काळजात गलबलतं.
शेफालीच्या अभिनयापुरतचं बोलायचं झालं, तर मुख्य प्रवाहातील सिनेमांत स्मिता पाटील-शबाना आझमी असायचा काळ गेल्यानंतर कित्येक वर्षांनी फिल्मफेअर अवॉर्ड योग्य अभिनयासाठी शेफालीने मिळवलंय, यातच सर्व काही आलं. पण हा सिनेमा फक्त एकट्या तिचा नाही, तर त्या दोषांचाही आहे आणि तिच्या आयुष्याशी निगडीत संदर्भाचाही, जे तिच्यासाठी स्मृतिभ्रंशामुळे हळूहळू पुसट होत जाणार आहेत. तिच्या सहचराने आणि मुलाने हे वास्तव स्वीकारलेय आणि तिच्याबरोबर ते पुढे निघालेत, हे सध्याच्या भावनिक व्यवहाराकडे बघता खूप आश्वासक आहे.
हा आजार समजून घेऊ शकणे, हे खूप गरजेचं आहे, हे पटलेलं कुटुंब आहे हे! आणि मग तिचं ते शालेयवयातील पाचवी ते आठवीपर्यंतची वर्षं आठवणं, त्यासाठी वेंगुर्ल्याला जाणं आणि मग गहिऱ्या आठवणींच्या कडेकडेनं फिरणं, यातून एक वेदनामयी धागा जाणवत राहतो.
विस्मृतीच्या खोल डोहात पार तळाशी गाडलेला तिच्या बहिणीच्या अपघाताचा प्रसंग, वेंगुर्ल्यातील ती विहिर बघितल्यावर उसळून वर येतो आणि मग तिला आठवत राहतात अनेकानेक गोष्टी, ज्या तिने स्वेच्छेनं दडपून टाकलेल्या असतात कधीच्याच, जगरहाटीपुढे!
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
‘मैं पल दो पल का शायर हूँ’ : साहिर लुधियानवी या कवी-गीतकाराचं जीवन सादर करणारा एक आगळावेगळा प्रयोग
‘लव्ह अँड लावणी’ : लावणीवरच्या प्रेमाचा आणि प्रेमातल्या लावणीचा एक आगळावेगळा सांगीतिक आविष्कार!
.................................................................................................................................................................
तो काळा डोह इतकं काही पोटात घेऊन बसलेला असतो, याची जराही कल्पना नसलेला, तिच्या बालपणातील त्या चार वर्षांबद्दल अनभिज्ञ असलेला तिचा सहचर तिला घेऊन तर आला तिथं, पण मग जे काही घडतं ते इतकं मृदू, अलवार की, त्या प्रेमात आपणही नकळत ओढले जातो.
तिचा शालेय मित्र प्रदिप, त्याचं नांदतं कुटुंब यांच्यामध्ये ती अचानक येते आणि त्रिकोणाची तिसरी भूजा उजागर होत जाते. तिला आठवत असतं बालपण, शाळा, वर्ग, तो बाक, त्यावरची ती कोरलेली अक्षरं आणि आपल्याला वाटतं आता चमत्कार होणार आणि आता ती बरी होणार यातून. पण या विस्मृतीतून मुक्ती नाही, हे सत्य स्वीकारलेली ती त्या आठवणींत रमत जाते. शाळकरी वयातल्या त्याच्याकडे ओढली जाते. तिच्या मानसिक अवस्थेबद्दल अनभिज्ञ असलेला तो तिला भेटून पुन्हा कविता लिहायला लागतो. कुठेतरी त्यालाही ते जादुई दिवस आठवू लागतात.
कथानकात इथं येते त्याची पत्नी. ती त्याला त्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या या वादळाला समजून घेते आणि त्याच्या कवितेचं स्वागत करते. एकमेकांत मुरलेल्या त्यांच्या संसारात मग त्याचं पत्नीसाठी अलवारपणे कशीदाकारीचे धागे विणणं… हे सगळं अनुभवणीयच.
इतक्या वर्षांत बालपणीच्या या चार वर्षांतलं काहीच का नाही सांगितलं, हा विचार तिच्या सहचराच्या, दिपांकरच्या मनात येतोच एका हळव्या क्षणी, पण त्यांचं सहजीवन आताशा अशा वळणावर येऊन थांबलेलं असतं की, त्या हळव्या क्षणाकडेही तटस्थपणे बघायला शिकलाय तो. आणि माहितंय त्याला आत्ता तिला जे हवंय ते द्यायला हवंय. तेवढा समजूतदारपणा आहे त्याच्यात. म्हणून त्याच्यातल्या पुरुषाला वर येऊ न देता बिनधास्त तो त्या दोघांना मोकळं फिरू देतो, आठवणींत रमू देतो. यातून जो आनंद मिळेल तो नंतर जरी तिला आठवणार नसला, तरी आत्तातरी तो तिला मिळावा, यासाठी धडपडत असतो. आणि म्हणूनच विमा एजंट असलेला, स्वप्नं विकणारा तो तिच्या डोळ्यांतल्या स्वप्नांना मालवण्याआधी उजेड दाखवण्याचा प्रयत्न करतो… त्यातून त्यांचं सहजीवन अधिकच गहिरं होत जातं…
पण त्याला तरी कुठे माहीत होता तिचा तो काळाकुट्ट भूतकाळ, जो तिने इतकी वर्षं मनाच्या तळात गाडून टाकलेला आणि त्याबरोबरच गाडून टाकलेल्या त्या नवथर भावना!! आज त्या जुन्या मित्राला भेटून त्या उचंबळून जरी आल्या असल्या, तरी विषादानं भरलेल्या आठवणी अजून ती विसरलेली नाही, हे सत्य त्याला तरी कुठे माहीत होतं? त्या कटू आठवणींचं बोचकं त्याच विहिरीच्या तळाशी सोडून मुक्त झालेली ती मग निघते विस्मृतीच्या गर्तेत जाण्याआधी करायच्या एका महत्त्वाच्या कामासाठी. आपल्या बालपणाच्या मित्राचा त्या वेळी राहिलेला निरोप घेण्यासाठी.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
ती आणि तो जत्रेतल्या आकाशपाळण्यात बसतात, तो प्रसंग म्हणजे सिनेमाचा कळस आहे. तिला लख्ख आठवतं सगळं, जे तिने कधीच आपल्या सहचराला सांगितलेलं नसतं. तिच्या आणि त्याच्या मनात उमलू लागलेली नवथर भावना आणि तेव्हाच बहिणीचा झालेला अपघाती मृत्यू, वडिलांची बदली आणि रातोरात गाव सोडून जाणं, त्याचा निरोपही न घेता येणं, सगळं सगळं आत्ताही तिला तसंच आठवतं. आणि ती विस्मृतीच्या गर्तेत डुबत चाललीय याची जाणीव नसलेला सैरभैर तो!! ‘आधी का नाही आलीस?’ हा आर्त प्रश्न आणि विझत जाणाऱ्या तिच्या डोळ्यांतून ‘आता आले ना!’ हे अवखळ उत्तर.
तिची आता निघायची वेळ झालीय. तिची साडीनं मस्त ओटी भरलीय त्याच्या पत्नीनं आणि हळवा झालेला तो, तिच्या सहचराला बाजूला नेऊन विचारतोय ‘ती बरी आहे ना?’ भरल्या डोळ्यांपुढे धुसर होत जातो सिनेमा आणि निरोप घेताना ‘जास्त दिवस लक्षात ठेवीन की नाही’ म्हणणाऱ्या तिला ‘आता मी आहे ना आठवण करून द्यायला’ या त्याच्या आश्वासक शब्दांनी आपण भानावर येतो, तेव्हा सिनेमा संपलेला असतो.
आता तो फक्त त्या तिघांचा राहिलेला नसतो, तर ‘ऑल ऑफ अस’ झालेला असतो.
‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ या मासिकाच्या मार्च २०२४च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
सिरत सातपुते
satputesirat@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment