तुम्ही ‘फातिमा नूरजहाँ’ला आणि ‘आर्चीज’ या तरुणांच्या चमूला भेटला आहात का? नसाल, तर तातडीने त्यांची भेट घ्या…
कला-संस्कृती - चलत्-चित्र
जयदेव डोळे
  • ‘शेषम माइक-इल फतिमा’ आणि ‘द आर्चीज’ या चित्रपटांची पोस्टर्स
  • Thu , 28 December 2023
  • कला-संस्कृती चलत्-चित्र शेषम माइक-इल फतिमा Sesham Mike-il Fathima द आर्चीज The Archies

बायकांच्या तोंडून तत्त्वज्ञान असो की राजकारण, काहीही बाहेर पडो, ते मुळीच ऐकून न घेणारा पुरुष वर्ग भारतात अजून तरी भरपूर आहे. ‘त्यांना काय कळतेय?’, ‘त्यांची अक्कल ती केवढी?’, अशा निंदेच्या पिचकाऱ्या मारत पुरुष मंडळी स्त्रीला आपल्या बरोबरीला येऊ देत नाहीत आणि त्यांचे ज्ञान वा अनुभव मान्य करत नाहीत. बाई डॉक्टर असली काय अन् पीएच.डी.ची गाईड असली काय, अगदीच नाईलाज झाला, तर त्यांची ‘मसलत’ मंजूर करून घेणार हे पुरुष…

असं असताना फुटबॉलसारख्या पुरुषी, धुसमुसळ्या अन् अफाट लोकप्रिय खेळाची एखादी मुलगी ‘समालोचक’ कशी सहन होणार? आताशा मुली कुस्ती खेळतात, तलवारबाजी करतात आणि मुष्टीयुद्धात तर जगज्जेत्या होतात. पण फुटबॉलचे प्रत्यक्ष समालोचन मुलीच्या आवाजात? छे, छे, छे! कसे शक्य आहे? खेळाचे स्वरूप अन् समालोचकाचा आवाज… कसे जुळणार बाबा!

तरीसुद्धा एक मुलगी फुटबॉल सामन्याचं समालोचन करायचंय असा निर्धार करून बाहेर पडते. खूप अपमान, निराशा सोसते. अखेर चिकाटीमुळे अन् फुटबॉलच्या ज्ञानामुळे तिला राष्ट्रीय फुटबॉल सामन्याचे प्रत्यक्ष धावते समालोचन करण्याची संधी मिळते. स्त्री विरुद्ध पुरुष या एकतर्फी सामन्यात तिचा दणदणीत विजय होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तिचे नाव फातिमा नूरजहाँ. मल्याळी चित्रपटाचे नावही तसेच. म्हणजे ‘शेषम माईक - इल फातिमा’! आपण सारे जाणतो की, केरळ, बंगाल व गोवा ही तीन राज्ये देशभर फुटबॉलप्रेमी म्हणून ओळखली जातात. तिन्ही राज्यांचे फुटबॉल वेड भारताला अचंबित करणारे आहे. कारण उर्वरित भारत क्रिकेटवेडा. अशा केरळमध्ये एका मध्यमवर्गीय मुस्लीम घरात फातिमा अखंड बडबड करताना दिसते. टीव्हीसमोर आडवी पडून ती समोर जे चालले आहे, त्याचे इत्थंभूत वर्णन आपल्या शैलीत करत राहते, अगदी बालपणापासून. त्यात फुटबॉल तिचा आवडता खेळ.

जागतिक फुटबॉलपटू अन् त्यांचे सामने टीव्हीवर चालू असताना ही बया आपले समालोचन सुरू करायची. तिच्या या सवयीमुळे अन् एरवीच्या तिच्या सततच्या बोलण्याने सारा गाव तिला ‘बकबक’ करणारी म्हणून चिडवत असतो. पण ती केवळ बडबडी नसते, तिचे निरीक्षण तीक्ष्ण असून स्मरणशक्तीही जबर असते. बहुतेक सारे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू तिला माहीत असतात. तिचे वडील व थोरला भाऊ हेही फुटबॉलचे गावपातळीवरचे खेळाडू असतात.

एकदा तिच्या भावामुळे तिला एका स्थानिक फुटबॉल सामन्यात बदली समालोचक म्हणून काम करण्याची संधी मिळते. ते ती उत्तमरित्या पार पाडते. त्यामुळे फातिमाचे नाव घरोघरी पोचते. पण कौतुक करणारे तिला हे सुचवत नाहीत की, यातच कौशल्य कमव अन् पूर्ण वेळ समालोचक हो. तिला मात्र वाटत असते की, आपण यासाठी योग्य असून यातच मोठी मजल मारली पाहिजे. मग तिची महत्त्वाकांक्षा आणि समाजाच्या रूढीबद्ध अपेक्षा यांत जे द्वंद सुरू होते, त्याचा तपशील म्हणजे हा चित्रपट.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

मुसलमानांच्या साचेबंद प्रतिमा तोडणारा हा चित्रपट मनु सी. कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. कथानक मल्लापूरम या मुस्लीमबहुल जिल्ह्याच्या गावात घडते… संपते कोचीसारख्या राजधानीत. फातिमा (कल्याणी प्रियदर्शन) हिचे घर नावापुरते धार्मिक असते. त्यामुळे हिजाब, बुरखा, नमाज, पडदा अथवा मित्रमैत्रिणी यांबाबतीत कडेकोट निर्बंध नसतो. तिच्या डोक्यावर कशीबशी घेतलेली ओढणी दिसते. तेवढीच ती धार्मिकतेची खूण. फातिमा जीन्स घालते, बघायला येणाऱ्याला प्रश्न विचारून त्याची बिंगफोड करते आणि फुटबॉल फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याची शय्यासोबतीची मागणी त्याच्या मुलीला सांगून उधळून लावते.

तसे पाहिले तर फातिमाच्या समालोचन-समतेच्या लढाईसोबत क्रीडा संघटनांमधले राजकारण, गटबाजी, दडपशाही, हितसंबंध यांचीही कुलंगडी हा चित्रपट बाहेर काढतो. एक तरुणी आपले कौशल्य दाखवू पाहते; पण तिला संधी न देता नियम, कायदे, मक्तेदारी आणि प्रेक्षकांची पसंती पुढे करून सारे पदाधिकारी कसे स्वार्थी व भ्रष्ट आहेत, याचाही उलगडा हा चित्रपट करतो.

‘दंगल’मध्ये हा प्रकार थोडाफार आहे. राजकीय पुढारी आणि व्यावसायिक कसे सर्व खेळ आपल्या कब्जात घेऊन बसले आहेत, त्याचे उपकथानक या चित्रपटातून आपल्याला समजते. वि. वि. करमरकर यांच्यासारखे पत्रकार अनेक क्रीडा संघटनांमधले राजकीय-आर्थिक हितसंबंध अत्यंत धाडसाने मांडायचे. त्यातून वशिलेबाजी, भ्रष्टाचार आणि खेळाडूंची उपेक्षा या गोष्टी उघड झाल्या अन् क्रीडाविश्व सुधारले.

या वर्षी आपल्या महिला मल्ल अशाच अन्यायाविरुद्ध पेटून उठल्याचे आपण पाहिले. त्यांचा झगडा अर्धा तरी त्यांनी जिंकला. फातिमा मुळात खूप सकारात्मक, उत्साही व धडपडी आहे. परिणामत: तिला शेवटी यश मिळतेच.

स्त्री म्हणून अल्पसंख्य, धर्माने अल्पसंख्याक आणि कौशल्य व आवड यांमध्येही एकटी असलेली फातिमा आजकालच्या धडपड्या, बोलक्या तरुणींसाठी एक आदर्शच आहे. ही फातिमा ‘नेटफ्लिक्स’ या मंचावर भेटते. आवर्जून भेट घ्या तिची.

हा सबंध चित्रपट एक मुस्लीम कुटुंब, एक मुस्लीम तरुणी आणि तिचा अथक प्रयत्न, यांभोवती फिरत असल्याने कैक वर्षांनी असा एका अल्पसंख्याक समाजातल्या बदलत्या पिढ्यांची गोष्ट सांगणारा ‘फातिमा’ वाटतो.

आर्चिबाल्ड अ‍ॅण्ड्रयूज हा मुख्य गायक-वादक असतो आणि त्याचे शाळासोबती ज्यात साथीला असतात, तो बँड म्हणजे ‘द आर्चीज’. प्रेमात अन् गाण्या-बजावण्यात बुडालेल्या या चमूला अचानक जाणीव होते की, आपले व गावाचे मोठेच नुकसान होईल. हॉटेल अवतरले (म्हणजे पर्यटनाद्वारे व्यापारवृद्धी होत चालल्यास) तर आपले सुंदर रिव्हरडेल नाहीसे होईल. त्याप्रमाणे ते एकवटतात अन् जो हॉटेल बांधणारा श्रीमंत आहे, त्याच्या मुलीला आपल्या मतांशी जुळवून घेऊन सारा प्रकल्प उधळून लावतात. त्यासाठी प्रचार, मनधनरणी, युक्तिवाद, संघटन असे सर्व लोकशाही मार्ग वापरतात.

तसेच दुसऱ्या एका महत्त्वाच्या अल्पसंख्याक समाजाचे कथानक पूर्ण लांबीच्या चित्रपटातून मांडायचे धाडस झोया अख्तर या दिग्दर्शिकेने केले आहे. ‘द आर्चीज’ हा तिचा चित्रपट (आणि ‘फातिमा’सुद्धा) नोव्हेंबर महिन्यात पडद्यांवर झळकला. सर्व भारतीय जवळपास ज्यांना विसरून गेले, त्या अँग्लो इंडियन समाजातल्या १९६४मधल्या घडामोडींवरचा हा चित्रपट आहे. अनेकांनी तो त्यांना आवडला नसल्याचे सांगितले आहे. तिकिट खिडकीवर त्याच्या उत्पन्नाचा दाखलाही गटांगळ्यांचाच आहे. माझा या चित्रपटाबाबतचा अभिप्राय मात्र खूप वेगळा आहे.

एक तर अख्तर, बच्चन, खान आणि कपूर या चार बड्या सिनेपरिवारांतल्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढीचा हा एक आविष्कार आहे. कित्येकांनी अमिताभचा नातू अगत्स्य, शाहरूखची कन्या सुहाना आणि बोनी कपूरची मुलगी खुशी, यांचे पर्दापण वशिलेबाजी अन् घराणेशाहीचे प्रतीक आहे, असे मानले. खुद्द झोया ही जावेद अख्तर यांची मुलगी असली, तरी तिने स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे.

महत्त्वाचे असे की, १९६४ हे जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाचे वर्ष. त्यातून ही चारही सिनेकुटुंबे नेहरूनिष्ठ. म्हणजे यातले कोणीही भाजप-मोदी यांच्या मर्जीतले नाहीत. जया बच्चन व जावेद अख्तर थेट व स्पष्ट भाजपविरोधक. शाहरूखचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक. बोनी कपूर व त्याची भावंडे वरकरणी तरी भाजपपासून चार हात लांब दिसणारी. त्यामुळे या चित्रपटाला एक राजकीय पदर आहे, पण तो कित्येकांना कळला तरी नाही किंवा समजल्यामुळे त्यांनी गाजावाजा तरी केलेला नाही.

जागतिक फुटबॉलपटू अन् त्यांचे सामने टीव्हीवर चालू असताना ही बया आपले समालोचन सुरू करायची. तिच्या या सवयीमुळे अन् एरवीच्या तिच्या सततच्या बोलण्याने सारा गाव तिला ‘बकबक’ करणारी म्हणून चिडवत असतो. पण ती केवळ बडबडी नसते, तिचे निरीक्षण तीक्ष्ण असून स्मरणशक्तीही जबर असते. बहुतेक सारे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू तिला माहीत असतात. तिचे वडील व थोरला भाऊ हेही फुटबॉलचे गावपातळीवरचे खेळाडू असतात. एकदा तिच्या भावामुळे तिला एका स्थानिक फुटबॉल सामन्यात बदली समालोचक म्हणून काम करण्याची संधी मिळते. ते ती उत्तमरित्या पार पाडते. त्यामुळे फातिमाचे नाव घरोघरी पोचते. पण कौतुक करणारे तिला हे सुचवत नाहीत की, यातच कौशल्य कमव अन् पूर्ण वेळ समालोचक हो. तिला मात्र वाटत असते की, आपण यासाठी योग्य असून यातच मोठी मजल मारली पाहिजे. मग तिची महत्त्वाकांक्षा आणि समाजाच्या रूढीबद्ध अपेक्षा यांत जे द्वंद सुरू होते, त्याचा तपशील म्हणजे हा चित्रपट.

समाजवादी नेहरूंचा अंतकाळ भांडवलशाहीचा आरंभ असल्याचे प्रतीक म्हणजे या चित्रपटाची मुख्य कथा. ती मुळात खूप उशिरा आपल्याला कळते. कदाचित सबंध चित्रपट मोदी-भाजप यांच्या विकासाच्या ‘मॉडेल’चा प्रतिकार करणारा आणि तरुणांना त्याची प्रेरणा देणारा आहे, हे झाकण्यासाठी सुरुवातीला अँग्लो इंडियन समाजाचे भरपूर चित्रण केले गेले आहे. गाणी, प्रेम, नाच, फॅशन, मैत्री, सहली, गावातले लोक इत्यादी कथानकात प्रेक्षक रमतो न् रमतो तेवढ्यात रिव्हरडेल नामक या गावातले ‘ग्रीन पार्क’ हे एक निसर्गरम्य सुंदर स्थळ एक श्रीमंत व्यावसायिक स्थानिक कारभाऱ्यांना हाताशी धरून त्या जागी एक आलिशान हॉटेल उभे करण्यासाठी हस्तगत करतो.

बस्स! आपली मौजमजा करायची जागा आणि गावची एक शान नष्ट होणार, याची जाणीव आर्चीच्या चमूला अस्वस्थ करते. हा डाव हाणून पाडायचा तर ५० टक्के गावकऱ्यांचे मतदान जमा करणे आवश्यक असते. त्याच धडपडीची कथा म्हणजे ‘आर्चीज’.

आर्चिबाल्ड अ‍ॅण्ड्रयूज हा मुख्य गायक-वादक असतो आणि त्याचे शाळासोबती ज्यात साथीला असतात, तो बँड म्हणजे ‘द आर्चीज’. प्रेमात अन् गाण्या-बजावण्यात बुडालेल्या या चमूला अचानक जाणीव होते की, आपले व गावाचे मोठेच नुकसान होईल. हॉटेल अवतरले (म्हणजे पर्यटनाद्वारे व्यापारवृद्धी होत चालल्यास) तर आपले सुंदर रिव्हरडेल नाहीसे होईल. त्याप्रमाणे ते एकवटतात अन् जो हॉटेल बांधणारा श्रीमंत आहे, त्याच्या मुलीला आपल्या मतांशी जुळवून घेऊन सारा प्रकल्प उधळून लावतात. त्यासाठी प्रचार, मनधनरणी, युक्तिवाद, संघटन असे सर्व लोकशाही मार्ग वापरतात.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘प्रॉफेट साँग’ : आयर्लंडमधल्या हुकूमशाहीच्या आगमनाची चुणूक दाखवणारी ‘बुकर’प्राप्त कादंबरी

मध्यमवर्ग कोण्याही देशाचे बौद्धिक, कलात्मक, वैज्ञानिक वा क्रीडाविषयक नेतृत्व करत असतो, त्याने स्वयंप्रज्ञ होणे थांबवले आहे. तो अंधभक्त व प्रचारक बनला आहे

सत्तेचे आकर्षण, नाही कशाचे चिंतन | संधीचे साधक सारे, पदरी पडे ते छान ||

..................................................................................................................................................................

गंमत म्हणजे ‘एव्हरीथिंग इज पॉलिक्टिक्स’ असे एक गाणे रचून जे कुंपणावरचे आहेत, त्यांना आपली बाजू समजावून देतात. १७ वर्षांचे वय असलेली ही ‘कार्टी’ अशी एकदम शहाणी होऊन गाव वाचवतात. या खटाटोपात संपादकाचे सत्यवादाचे ब्रीद त्यागलेल्या बापाला सत्य, न्याय अन् तरुण पिढीचे भवितव्य, यांची आठवण करून देणारा मुलगा आहे. आपला बाप आपल्यावरचा खर्च अशा लोकविरोधी, निसर्गविरोधी प्रकल्पांमधून पैसा मिळवून करतो, म्हणून त्याच्या विरोधात गेलेली मुलगी आहे. हा लढा लढवण्यासाठी आपले लंडनला जाणे रद्द करणारा एक मुलगा आहे, नवनव्या कल्पना सशास्त्र लढवणारा एक हुशार मुलगा आहे आणि या तरुणांना पाठबळ देणारी भली माणसे आहेत.

‘हा विकास एक-दोन माणसांच्या हितासाठी होतो आहे’, असे एक वाक्य या चित्रपटात आहे. ‘माझ्या जाहिराती बंद होतील, म्हणून तो विकासविरोधी लेख मी काढला’ असे यातला एक संपादक सांगतो. शाळेमधले कँटिन आधीच्या माणसाकडून काढून घेऊन प्री-पॅकेज्ड फूड देणाऱ्या कंपनीला देण्याचा निर्णय मुख्याध्यापक जाहीर करतात (अन् कँटिनवाल्याचा मुलगा दुखावतो).

‘लोकांपर्यंत आपल्याला पोचायचे म्हणता, तर आपल्याला आकाशवाणी कोण वापरू देईल’, असे वाक्य एक नायिका उच्चारते. मग सारे टोळके ‘हॅम रेडिओ’चा वापर करून आपला संदेश पोचवते. ‘मी त्याचा फार विचार करत नाही, राजकारणाचा माझ्या जगण्याशी काय संबंध?’ असे म्हणणाऱ्याला ‘मुली स्कर्ट घालून कुठे जाव्यात ते ठरवते कोण, तर पॉलिटिक्स!’ अशा ओळी काय सांगतात?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

अशी बारीक टीका या चित्रपटात विखुरलेली आहे. ती कान देऊन नीट ऐकली की, तिचे ताजे संदर्भ अन् विद्यमान राजकारण यांचा कोणी तरी थेट वेध घेते आहे, हे उमगते.

शेवट अर्थातच तरुणांच्या मनासारखा होतो.

आणखी एक प्रतीकात्मक प्रसंग मतपत्रिका दडवून ठेवण्याचा! लोकमत आपल्या विरोधात जात असल्याचा अंदाज येताच गावचा कारभारी अन् भांडवलशाहीचा एजंट मतपत्रिकांचा एक गठ्ठा कपाटावर लपवून ठेवतो. मते मोजली जात असताना या पोरांचा एक सरकारी पाठीराखा पंखा सुरू करतो. काही क्षणांत कपाटावरच्या दडवलेल्या मतपत्रिका खोलीभर पसरतात. त्या साऱ्या हॉटेलच्या विरोधात असतात. पोरे जिंकतात, मूठभर असूनही.

पाहिलेत? अशा काही प्रसंगांमधून झोया आणि तिचा चमू ‘द आर्चीज’ची राजकीय मांडणी करतो. अशा प्रसंगांनीही जर कोणी शहाणे, जागरूक अन् लोकशाही वाचवणारे होत नसतील, तर काय म्हणणार? ‘एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स’ हे गाणे कोणत्याच खाजगी केंद्रांवर का ऐकू नाही झाले, तेही समजावून सांगावे लागणार? अरेरे, अ‍ॅनिमल लेकाचे!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख