अजूनकाही
गोष्ट सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याने दिलेली पोचपावती म्हणजे ‘हुंकारो’. मराठीत यालाच ‘हुंकार’ असं म्हणतात. कोणी गोष्ट सांगत असतं, तेव्हा आपण ‘हं’, ‘हम्म’, ‘अच्छा’, ‘बरं बरं’, ‘मग पुढे’ असं आपसूकच पुटपुटतो. मारवाडी भाषेत यालाच ‘हुंकारो’ म्हणतात. याच संकल्पनेवर आधारलेलं ‘हुंकारो’ हे २०२३ ‘मेटा अवॉर्ड्स’मध्ये पहिलं आलेलं आणि मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शन केलेलं नाटक आहे. नुकताच त्याचा एनसीपीएमध्ये प्रयोग पाहिला.
गोष्टी सांगणं हे आपल्याकडे भाषा अवगत होण्याच्याही आधीपासून आहे. भाषा नव्हती, तेव्हा केवळ हातवाऱ्यांच्या आधारे गोष्टी सांगितल्या जायच्या. पुढे भाषा निर्माण झाल्या आणि गोष्टींना शब्द उपलब्ध झाले. नंतर गोष्ट सांगण्याच्या पद्धती निर्माण झाल्या. भारतात जेवढ्या समाज- संस्कृती आहेत, तेवढ्याच गोष्टी सांगण्याच्या पद्धतीही.
या विविधतेत समान काय असेल, तर ते गोष्टी सांगणं आणि त्या समरस होऊन ऐकणं. पण आपण खरंच ऐकतो का? आपलं ऐकणं कमी झालंय, याची अनुभूती आपल्या सर्वांनाच करोनाकाळात झाली. आपली जगण्याची पद्धत तपासून पाहण्याची संधी कमी-अधिक फरकानं सर्वांना या काळात मिळाली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘हुंकारो’मध्ये तीन गोष्टी ऐकायला मिळतात. त्यापैकी ‘आशा अमर धन’ ही पहिली गोष्ट आहे प्रसिद्ध राजस्थानी लेखक विजयदान देथा यांची. एका मारवाडी शेतकऱ्याची पहिली बायको आपल्या दोन मुलांना मागे ठेवून मृत्यू पावली आहे. मुलांना आई हवी म्हणून आजूबाजूचे नातेवाईक शेतकऱ्याचं दुसरं लग्न लावून देतात. पण गावात दुष्काळ पडतो, खाण्यापिण्याची आबाळ होते, म्हणून शहरात जाऊन काही कामधंदा शोधून पैसे कमवू, असा विचार ही बायको शेतकऱ्याला सुचवते. मुलांना गुपचूप मारून टाकू आणि आपण आपलं नशीब आजमावायला शहरात जाऊया, असं ती नवऱ्याला सुचवते. शेतकरी याला विरोध करतो. त्याऐवजी त्यांच्यासाठी जेवण ठेवू आणि संध्याकाळी परत येऊ, या बोलीवर निघून जाऊया, म्हणजे जीव घेतला असं होणार नाही, असं तो सांगतो. बायकोला येणारं वर्ष सुख देणारं असेल, अशी आशा असते. शेतकऱ्याला आपल्या मुलांना गावातलं कुणीतरी वाचवेल अशी आशा असते. तर मुलांची संध्याकाळ होईल आणि आपले आई-बाबा घरी परत येतील, अशी आशा असते.
वर्षभराने शेतकरी बायको व बाळासोबत गावी परत येतो, आपल्या घरात जातो, तेव्हा नक्की कुणाची आशा पूर्ण होते, हे गोष्टीत प्रतीकात्मक रूपात सांगितलं आहे.
दुसरी चिराग खंडेलवाल यांची गोष्ट आहे ‘वो चलता हैं’. ही आहे करोनाकाळात हजारो मैलांवर असलेल्या गावाकडे चालत निघालेल्या शहरातल्या अनेक कामगारांसारख्या एका ‘अमर’ची गोष्ट. हाताशी पैसा, जेवण आणि साधं पाणीसुद्धा नाही; पण आपलं घर लवकरच जवळ येईल, या आशेवर तो चालत निघाला आहे. वाटेत त्याला एक अनाकलनीय पक्षी भेटतो आणि प्रवासात त्याचा ‘मितवा’ बनतो. लेखकाने ‘अमर’च्या ठायी असलेली आशा किती बळकट आहे, यासाठी योजलेलं पक्ष्याचं रूपक अर्थपूर्ण आहे. या पक्षाच्या रूपात जीवन आणि मरण यांच्या मधोमध उभी असलेली ‘अमर’ची ‘आशा’कुठवर प्रवास करते, हे सांगितलं आहे.
तिसरी, ‘माई’ ही दोन भावांची गोष्ट करोनाकाळात कामगारांचं जे स्थलांतर झालं, त्यावर बेतलेली आहे. मुंबईतल्या एका छोट्या चाळीत आपल्या दिव्यांग आईसोबत बिरजू-मांडू हे भाऊ राहत असतात. लॉकडाऊन लागलं आणि अनेकांचं जगणं कठीण झालं. आपल्याला गावी जगता येईल, या आशेनं प्रत्येक जण मिळेल त्या मार्गानं मुंबई सोडून गावी जायला लागतो. आपण दोघं भाऊ गावी एकत्र काही करू शकू, असं बिरजू-मांडू यांना वाटतं. पण प्रवास लांबचा आहे, वाहन नाही म्हणून ते दिव्यांग आईला तिच्या नशिबाच्या हवाली सोडून, गावी (राजस्थानला) जातात.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
आपण चांगला निर्णय घेतला, असं बिरजूला वाटतं, तर काहीच करता न येणाऱ्या आईला मागे एकटं सोडून आलो, याचा अपराधी भाव मांडूला छळत राहतो. वर्षभराने करोनाचं वातावरण निवळल्यावर ते दोघं पुन्हा नवी उमेद घेऊन मुंबईत येतात. पण दोघांच्या मनात आशेसोबत आईला शहरात एकटं सोडल्याचा अपराधीभाव असतो.
या तिन्ही गोष्टींचा भवताल वेगवेगळा असला, तरी त्या आशयाच्या समान धाग्यानं एकत्र विणल्या आहेत. ‘आशा’ माणसाला जिवंत ठेवते. जिथं आशा संपते, तिथं माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो. या कथांमध्ये आशेची समान पटलावर असणारी विविध रूपं सांगितली आहेत. शिवाय जगण्याच्या आशेसोबत ईर्ष्या, अपराधीभाव, नाकारलं जाण्याची भावना, यांची रूपंसुद्धा.
रंगमंचावर या तिन्ही गोष्टी एकसुरी न होऊ देता सादर करण्यातून दिग्दर्शक मोहित टाकळकर यांचं कौशल्य दिसतं. कथेतील घटना-प्रसंग प्रत्यक्ष उभे न करता सहा कलाकारांच्या माध्यमातून या गोष्टी टाकळकर यांनी सांगितल्या आहेत.
प्रयोग सुरू होतो. रंगमंचावरील मंद पिवळसर, निळसर प्रकाशात राजस्थानी पारंपरिक वेशातले सहा कलाकार येऊन बसतात. त्यातला एक राजस्थानी बोलीभाषेत कथा सांगायला सुरुवात करतो. काही वेळानं थांबतो आणि गोष्ट समजली की नाही, विचारून ती हिंदी भाषेत समजावून सांगतो. प्रदेशानुसार भाषा, शब्द, उच्चार बदलतात, पण त्यामागच्या भावना सर्वत्र समान असतात, हा मुद्दा लक्षात येतो. पुन्हा तीच कथा राजस्थानीत सांगायला सुरुवात करतो. दिग्दर्शकाची ही क्लृप्ती शेवटपर्यंत प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यात सफल होते.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
पुढच्या कथा राजस्थानी, हिंदी, अवधी, मारवाडी या भाषांतून कलाकार सांगतात, परंतु आपण कथेत इतके ओढले जातो की, त्या समजण्यासाठी भाषा हा अडथळा उरत नाही. दिग्दर्शनातला पुढचा विशेष म्हणजे कोणतीच कथा सलग सादर होत नाही. एकूण तीन वेळा कलाकार रंगमंचावर प्रवेश-निगमन करतात. सुरुवातीला तीनही कथांचा आरंभ, दुसऱ्यांदा प्रवेश केल्यावर कथेचा मध्य आणि शेवटच्या प्रवेशात तिन्ही कथांचा उत्तरार्ध सांगितला जातो. या सादरणीकरणामुळे निर्माण झालेला अनुभव प्रभावी होतो.
या तिन्ही कथा वेगवेगळ्या परिसरात घडत असल्या, तरी त्यातला आशय समान आहे. कदाचित सलग एका कथेनंतर दुसरी सांगितली असती, तर हा आशय इतका प्रभावी झाला नसता. कथा सांगण्याच्या तीन स्वरूपाच्या पद्धती योजिल्या आहेत. पहिली, कथाकार प्रेक्षकांना गोष्ट सांगतो. ती सांगताना कथेतील पात्रंसुद्धा तो साकारत असतो. ‘आशा अमर धन’ या गोष्टीसाठी ही पद्धत योजिली आहे.
‘वो चलता हैं’ या कथेतील वातावरण करोनाकाळातलं. तेव्हा आपल्या सर्वांमध्ये अंतर निर्माण झालेलं, सर्वच बाबी आपण घरात राहून, दुरून ऐकत होतो आणि त्यावर व्यक्त होत होतो. हे अंतर ठळक करण्यासाठी ही गोष्ट रेडिओवर सांगितल्यासारखी/ माहिती दिल्यासारखी सादर केली आहे. ‘माई’सुद्धा करोनाकाळातली एका कुटुंबाची गोष्ट. यातील पात्रच संवादरूपानं ती सांगतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या प्रयोगात नेपथ्य म्हणून केवळ मागचा काळा पडदा आहे. कलाकारांना बसण्यासाठी उशांचा उपयोग केला आहे, त्या व्यतिरिक्त रंगमंचावर कोणतीच वस्तू नाही. राजस्थानमध्ये मांगनियार समाज सुफी संगीत आणि लोकगीत समारंभात, गावोगावी जाऊन गात असे आणि त्यातून कथा सांगत असे. त्याचा वापर संगीतकार हकम खान केसुबाला यांनी केला आहे.
दुसरा मुद्दा एक सलग गोष्ट ऐकण्यातून प्रेक्षक त्यातून बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रेक्षकाला जोडून ठेवण्यासाठी अशी रचना केली असावी. त्यामुळे या प्रयोगात संगीताचा केलेला वापर कौतुकाचा ठरतो. कलाकाराच गाणी गातात आणि ती गाताना जोडीला ना कोणती वाद्यं आहेत, ना कोणत्या रेकॉर्डेड धून. तरीसुद्धा ही गाणी वाद्यासहित ऐकल्याची अनुभूती मिळते.
मोहित टाकळकर यांनी संहितेचं गोळीबंद दिग्दर्शन केलं आहे. सुरुवातीला संहितेशी जोडलेला प्रेक्षक शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. असं म्हणतात की, रंगमंचावरचा प्रयोग हा ना लेखकाचा असतो, ना दिग्दर्शकाचा; तो कलाकारांचा. आणि कलाकार ज्या पद्धतीनं सादर करतील, ते त्या प्रयोगाचं प्रत्यक्ष रूप असतं. या प्रयोगाच्या बाबतीत संहिता, दिग्दर्शन, संगीत यांना सर्व कलाकारांनी पुरेपूर न्याय दिला आहे.
यातल्या बोलीभाषा, त्यांचा लहेजा, गाण्यांवरची पकड, यासाठी सहाही कलाकारांनी घेतलेली मेहनत दिसून येते. अजित सिंग पलावत, ईप्सिता चक्रवर्ती, पुनीत मिश्रा, भारती पेरवानी, महेश सैनी, भास्कर शर्मा हे सहाही कलाकार आपल्या अभिनयाची गुणवत्ता दाखवण्यात यशस्वी झाले आहेत.
.................................................................................................................................................................
लेखिका श्रेया संतोष पांचाळ मुंबई विद्यापीठात ‘एम.ए. मराठी’च्या विद्यार्थिनी आहेत.
shreya.panchal8298@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment