‘अँग्री ओल्ड मॅन’च्या अवतारातला घायाळ शाहरूख खान सिस्टिमच्या डोळ्याला डोळा भिडवत, खर्जातला आवाज लावत सिस्टिमवर चामड्याच्या बेल्टने सपासप फटके मारत असतो...
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
दीपांकर
  • ‘पठाण’चं पोस्टर, शाहरूख खान आणि ‘जवान’ची पोस्टर
  • Fri , 01 December 2023
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा शाहरूख खान Shah Rukh Khan पठाण Pathaan जवान Jawan

शाहरूख खान दिसतो, समोर येतो, कोणाला भेटतो, कोणाची गळाभेट घेती, कोणाला स्टाइलीत आपली ‘सिग्नेचर स्टेप’ करून दाखवतो. ‘मन्नत’च्या त्रिकोणी कठड्यावरून रस्त्यावर श्वास रोखून उभ्या असलेल्या शेकडो मुग्ध चाहत्यांवर प्रेमाची बरसात करतो… तेव्हा तो एक पुरुष नाही, तर प्रेमाने ओथंबलेला, चैतन्याने बहरलेला, वीजेसम सळसळणारा माणूस असतो. पुरुष नव्हे की स्त्री नव्हे, निव्वळ माणूस! पण आपल्या पुरुषपणाची नव्हे, तर ‘माणूसपणा’ची छाप इतरांवर सदानकदा सोडत राहणं, हा कोणाचा सहजभाव असू शकतो? आम पब्लिकमध्ये असं लिंगनिरपेक्ष जगणं कोणाला अव्याहतपणे सहज साधू शकतं? बायाबापडे, म्हातारे - मुश्टंडे, धर्मांध, सत्तांध, माजलेले मदांध, नोकरशहा अशा साऱ्यांना एकाच न्यायाने जिंकून घेणं कोणाला जमू शकतं? मित्रांना वश करणं तर साऱ्यांनाच जमतं, न दुखावता बड्या नामचीन शत्रूंनाही वश करून एकाच वेळी आपल्यातल्या बंडखोराचंही दर्शन घडवणं कोणाला जमू शकतं?

राजकारण असो वा फिल्मी दुनिया, इथला परसेप्शनचा खेळ मोठा डेंजरस. खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करणं, हा या खेळाचा उद्देश. त्यात भले भले चमकतात. भलेभले अडकतात. याच परसेप्शनच्या खेळाने आमीर खानवर ‘कोटअनकोट बुद्धिवादी’ असा शिक्का मारला. सलमान खानवर ‘कोटअनकोट दबंग’ असा ठप्पा मारला आणि लाज कोळून प्यालेला, नीतिमूल्यं, कुटुंब, समाज, देश, धर्म अशा कशाशीही देणंघेणं नसलेला, उद्दाम, आक्रमक, ‘कोटअनकोट धंदेबाज ऊर्फ लफडेबाज’ असा ठपका शाहरूख खानवर ठेवला. याचा एक अर्थ, शाहरूख इंटेलेक्चुअली सोसो आहे; हिमतीने कचखाऊ आहे आणि चारित्र्याने भलताच हलका आहे, असाही निघाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गंमत म्हणजे फिल्मी दुनियेत आणि या दुनियेबाहेर तिघेही प्रस्थापित व्यवस्थेचा, ‘पॉवर स्ट्रक्चर’चा पहिल्यापासून भाग होते. वाट्याला आलेली प्रेक्षकांवरची, इंडस्ट्रीतली सत्ता आपापल्या परीने राबवतही होते. पण २०१४नंतर कोणतंही क्षेत्र आणि कोणीही व्यक्ती या देशात अ-राजकीय उरली नाही. हे तिघे तर बोलूनचालून स्टार्स, सेलिब्रेटी, युथ आयकॉन्स वगैरे वगैरे. इच्छा असो वा नसो राजकारणाच्या कमी-अधिक चक्रवाती भोवऱ्यात खेचले गेले. तुम्ही कोण, कोणाच्या बाजूचे याची उत्तरं देता देता सोशल मीडियाच्या दबावातून कलेकलेने एक्सपोज होत गेले; पोळतही गेले आणि अधेमधे अंतर्धानही पावत राहिले.

मात्र इतर दोघांपेक्षा शाहरूखच अधिक ‘टार्गेट’ होत राहिला. ‘पॉवर स्ट्रक्चर’मध्ये किंवा प्रस्थापित व्यवस्थेत तर आमीर आणि सलमान हे दोघेही खान आपलं स्थान राखून होतेच की! म्हणजे सलमान विद्यमान सर्वोच्च नेत्याच्या ‘गुडबुक्स’मध्ये ‘गुजरात काळा’पासून होता. ‘सोशली रिस्पॉन्सिबल’ आमीर राज्य शासनाचा गेल्या दशकापासून पार्टनर होता, तर शाहरुख तर राजकारणी - उद्योगपती- सटोडिये-नोकरशहा यांची मिलिभगत असलेल्या ‘आयपीएल’ नावाच्या क्रिकेटच्या नित्य सर्कशीत एका टीमचा मालक होता. म्हणजे इतर दोघांपेक्षा त्याची इनव्हेंस्टमेंट, इनव्हॉल्व्हमेंट आणि रिस्क मोठी होती. व्हिजिबिलिटीसुद्धा मोठी होती. सिस्टमशी असलेली लगटही इतरांना हेवा वाटावी, अशी होती. श्रीमंतीचं, ग्लॅमरचं प्रदर्शनही इतर खानांच्या तुलनेत डोळ्यांत भरणारं, प्रसंगी खुपणारंही होतं.

असा कानामागून येऊन तिखट झालेला म्हणजेच बाहेरून येऊन डोक्यावर मिऱ्या वाटणारा, यशाचे इमले चढत थेट बुर्ज खलिफाची उंची गाठणारा परधर्मीय असेल, तो जगात झेंडे रोवणारा असेल, बुद्धिवाद्याचा आव न आणता जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत इथे तिथे मांडत फिरत असेल, त्याची बायको हिंदू असेल, तो सेक्युलॅरिझमची भाषा करत असेल, घरात गणपती बसवत असेल, होळी-दिवाळी जोशात साजरी करत असेल, तर तो आधी धर्मव्यवस्थेचा शत्रू बनतो.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

काळाचा गुणच तसा आहे. तुझ्या धंद्यात काय काशी करायची ती कर; पण सेक्युलॅरिझम, होळी-दिवाळी, भाईचारा हे धर्मव्यवस्थेच्या ग्रँड डिझाइनला उद्ध्वस्त करणारे बॉम्ब. त्यामुळे या अजेंड्याला आडवा जातो तो शत्रू. स्वधर्मीय असो की परधर्मीय. हा तर बोलूनचालून परधर्मीय शत्रूदेश पाकिस्तानशी नाळ जुळलेला. त्यामुळे या गुणांना जागून ‘एक धर्म एक राष्ट्रा’ची आरोळी ठोकणारे धर्माचे मुखंड समाजाला ‘दिशादर्शन’ करतात. त्याबरहुकूम समाज बॅन, बंदी, बॉयकॉटचे शस्त्र उपसतो. कधी त्याच्या सिनेमाचे पोस्टर फाड; कधी घरासमोर धिंगाणा घाल; कधी सोशल मीडियावर त्याच्याच नव्हे, तर त्याच्या अख्ख्या खानदानाची इज्जत काढ असं सुरू होतं. नि मग धर्म आणि समाजव्यवस्थेने दिलेले इशारे ओळखून प्रस्थापित राजकीय व्यवस्था बरोबर टाइमिंग साधून आपले मजबूत जाळे त्याच्यावर टाकते. ते टाकताना एका बाजूला ती लक्ष्याला आपल्या वर्तुळातही प्रवेश देते आणि दुसऱ्या बाजूला ताटाखालचं मांजर झालेल्या नोकरशहांना, पोलीसदादांना वाघाचे मुखवटे चढवून आपल्या लक्ष्यावरही सोडते. जाओ, उसकी खटिया खड़ी करके आओ...

अगदीच असंच शाहरूख खानच्या बाबतीत घडत गेलं. नाही म्हणायला धर्म, समाज आणि राजकीय व्यवस्थेच्या आगीची थोडीफार झळ ‘बुद्धिवादी’ आमीर खान आणि ‘दबंग’ सलमान खानलाही बसली. पण तिघांतही शत्रू क्रमांक एक शाहरूखच. परधर्मीय, त्यात परका. आज या दोन्ही गुन्ह्यांना माफी नाही.

मग सुरू झाला पिच्छा. ऑनलाइन आणि ऑफलाइन. लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी त्याने इस्लामी परंपरेनुसार मृताम्याच्या शांतीसाठी फुंकर काय घातली. शाहरूख भारतरत्न लता मंगेशकरांच्या पार्थिवाच्या पुढ्यात थुंकला, म्हणत ऑनलाइन रान पेटवलं गेलं. त्याचा धर्म, त्याच्यावर झालेले संस्कार, त्याच्यातला उद्दामपणा असं सारं बाहेर काढलं गेलं. पण त्याने आपला तोल जाऊ दिला नाही. पाय घसरू दिला नाही.

तोल गेला, पाय घसरला तो त्याच्या मुलाचा. बाप नहीं तो बेटा सही. व्यवस्थेनं राष्ट्रीय तमाशा रचत मुलाच्या मुसक्या आवळल्या. नाही, ‘मुसक्या आवळल्या’ या क्रियापदात तो ‘फील’ येत नाही, मुलाला ‘दबोचलं’ हेच जास्त योग्य. बाप नाही हाताला लागत तर पोरगा. दिल्ली ते मुंबई सर्व बाजूंनी शिकारी कुत्रे सोडले गेले. मीडियाने तर चोवीस तास शाहरूखच्या खानदानाची बेइज्जती करण्याचा धडाकाचा लावला. या एकेका शिकारी कुत्र्याच्या पुढ्यात पोरगं भिरभिरलं. पण बाप शाहरूख हलला नाही. आर्थर रोड जेलमध्ये पोराच्या भेटीला जाताना जमलेल्या असंख्यांचा दुवा घेत गेला. ज्या सिस्टिमने अंगावर गोणपाट टाकून कुटायचा प्लॅन बनवला होता, त्याच सिस्टिममधल्या खरं तर सिस्टिम-स्नेही कोर्टात नुस्तं उभं राहायचे लाखो रुपये फी वसूल करणाऱ्या तगड्या वकिलांची फौज त्याने तैनात केली. पोरगं सहीसलामत बाहेर आलं. खेळ तुमचा, नियम तुमचे, जीत माझी.

या दीड-दोन महिन्यांच्या काळात शाहरूख आणि त्याच्या कुटुंबावर बदनामीचा चिखल बदाबदा ओतण्यात आला. चेनस्मोकर बापाचा चरसी पोरगा काय, संस्कारशून्य पोरगी काय, श्रीमंतीचा माज असलेली बायको काय... म्हणजे तेव्हा असंच जणू भासवलं जात होतं. अख्ख्या देशात एकटं शाहरूखचंच कुटुंब तेवढं कॅरेक्टरलेस, करप्ट, बाकी सारे संस्कारी. सोशल मीडियावाले तर इतके बहकले की, त्यांनी सत्तेशी जिव्हाळा असलेल्या आर. माधवन नावाच्या नटाच्या जानवे घातलेल्या पोराचे आणि शाहरूखच्या इडी कस्टडीत भेदरलेल्या पोराचे एकत्र छायाचित्र व्हायरल करून ‘याला म्हणतात संस्कार’ अशी भंपकबाजी सुरू केली.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया

२०२१ साली लिहिली गेलेली, पण २१२१ साली उजेडात आलेली ‘शिरोजीची बखर’ : प्रकरण पाचवे - आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

'डिअर जिंदगी' : बालिश कामासाठी शाबासकी

सध्या तरी मी निखिलचा नंबर ‘‘निखिल ‘मन्नत’ महाजन’’ म्हणून सेव्ह केलाय!

.................................................................................................................................................................

एका जाळ्यातून खुबीने शाहरूख सुटला, पण सिस्टिमच ती. क्रूरपणा हा तिचा स्थायीभाव. तिने दुसरं जाळं फेकलं. ‘पठाण’च्या गाण्यात परमपवित्र भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये त्याच्यासोबत दीपिका बेशरमपणे थिरकली. सबब, धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. ‘बॅन शाहरूख खान’, ‘बॉयकॉट पठाण’, पोस्टर जलाओ. ‘आपडे व्हायब्रंट गुजरात मा’ थेटर फोडो आंदोलन सुरू झालं. मध्य प्रदेशात मंत्री म्हणून फिरणाऱ्या गणंग नरोत्तमाने तर फतवाच काढला- शाहरूख देशात राहता कामा नये. धर्मांध गँग एकवटली. सत्तेतले मनसबदार बहकले. आमच्या धर्माचा अपमान करतो म्हणजे काय? आमच्या संस्कृतीला आव्हान देतो म्हणजे काय? न्याय तो होगा. करना पडेगा, असा या नरोत्तमाचा तेव्हा तोरा होता.

हात दगडाखाली असूनही या पट्ट्यानेही जोर लावला. अंगावर चाल करून येणाऱ्यांकडे न पाहता प्रेमाची भाषा तेवढी बोलत राहिला. आयपीएल नावाच्या व्यवस्थेने मास्टरी मिळवलेल्या सर्कशीच्या लिलावात छोटा मालक म्हणून पोरीसोबत बदनाम पोरालाच धाडला. बेटे का कॉन्फिडन्स बढना चाहिये. हेच कशाला, सत्तावर्तुळात अद्वातद्वा बोलण्यात भलत्याच फेमस, आता सर्वोच्च नेतृत्वाच्या जवळच्या वर्तुळातल्या कल्याणकारी खात्याच्या, मूळची नटी असलेल्या पण धर्मव्यवस्थेचा आवाज बनलेल्या मंत्रीणबाईच्या सावत्र मुलीच्या लग्नात तितक्याच सहजपणे वावरलाही. पण ‘पोलिटिकली करेक्ट’ असूनही त्याच्या विरोधातल्या द्वेषाची धग अंशानेही कमी झाली नाही. लिहून ठेवा. पॉइंट टु बी नोटेड मिलॉर्ड... व्यवस्था ही जन्मजात क्रूर असते! समाज हा जन्मजात निष्ठुर असतो !!

इकडे ‘पठाण’ रिलीज झाला. हिट झाला. सुपरहिट झाला. सुपरडुपर हिट झाला. हजार करोडचा हक्कदार बनला. सबंध सिस्टिम विरोधात असताना त्याने एकट्याच्या बळावर, खरं तर करिश्म्यावर कला कमी आणि तांत्रिक कलाकुसर अधिक असलेला ‘पठाण’ गाजवून दाखवला.

कोणी म्हणालं, सर्वोच्च नेतृत्वाला व्यवस्थेची चूक उमगली. कोणी म्हणालं, ‘शाहरूखने सर्वोच्च नेतृत्वाशी खाजगीत गुफ्तगू केलं’. कोणी म्हणालं, ‘ते ‘बिझनेस डिल’ होतं’. म्हणून ‘पठाण’चा मार्ग मोकळा झाला’. कोणी म्हणालं, ‘भले धर्म, समाज आणि राजकीय व्यवस्थेने टार्गेट केलं असेल, पण बाजारव्यवस्थेने त्याला अंतर दिलं नाही. बाजारव्यवस्थेचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. त्याच्या ब्रँडनेमवर एक साधा ओरखडा उठला नाही. म्हणूनही सर्वोच्च नेतृत्व बधलं’. काही का असेना. तो ‘बिझनेस डिल’च्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याआधीच लटपटला नाही. हरला नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘पठाण’ गाजला. पाठोपाठ ‘जवान’ आला. पुन्हा धर्म आणि राजकीय व्यवस्थेने पोसलेली गँग सक्रिय झाली. बॅन ‘जवान’, बॉयकॉट शाहरूख खान, पोस्टर फाडो. पुन्हा शाहरूख आणि फॅमिलीचे धिंडवडे काढले गेले. इंडस्ट्री गपगार. संकटांचं, अडचणींचं तेच आवर्तन. कोणी म्हणालं, ‘ ‘पठाण’च्या वेळी जमलं. आता नाही. तेवढी ऊर्जा, तेवढा त्वेष आणि तेवढी ताकद दरवेळी कुठून आणणार?’ पण कयामतीला रोखण्यासाठी ‘जवान’ युद्धात उतरला. उतरल्या उतरल्या गुरगुरला. बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर... पब्लिकला मुजोर ईडीवाला ऑफिसर आठवला. बापाचं भेदरलेलं पोर आठवलं.

टकलू हैवानासारखा दिसणारा कोणी गोसावी आठवला. पोराची कॉलर धरून त्याला ईडी ऑफिसमध्ये ढकलत नेणारा कोणी भाजपाई भानुशाली आठवला. पुढे हा गोसावी गायब झाला. भानुशाली अंडरग्राउंड झाला. अँड दे लिव्हर हॅपली एव्हर!

‘पठाण’प्रमाणे ‘जवान’ही कलेपेक्षा कलाकुसर ज्यादा, पण थेट सत्तेसाठीचा कडक राजकीय-सामजिक मेसेज असलेला सिनेमा. खरं तर हा मेसेजच लाखमोलाचा. बाकीचा सगळा तामझाम नेहमीचाच. एका शहरातून दुसऱ्या शहरात... चेन्नई टु दुबई... जगभरच्या फॅन्सच्या साक्षीने बुर्ज खलिफावर तर ‘जवान’चा जल्लोश साजरा झाला. प्रेमाने ओतप्रोत ‘जवान’च्या जोशात जवान शाहरूख अहोरात्र धावत राहिला. शत्रूंच्या राज्यात मनं जिंकत राहिला. शाहरूखने प्रेमाची अशी पखरण केली की, असंख्य छिद्र असूनही बहुतेकांनी ‘पठाण’प्रमाणे ‘जवान’ही गोड मानून घेतला. थेटरं डोक्यावर घेतली. बेहोषीत चिल्लर उधळली. नोटा फेकल्या. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला.

सिस्टिमने पोसलेली ‘नफरती गँग’ पाहतच राहिली. आपण ज्याचा द्वेष केला, तोच जनप्रिय ठरला. १०० करोड... २०० करोड... ५०० करोड... १००० करोड... वास्तविक १०० करोड काय किंवा हजार करोड काय. निर्माती बायको गौरी खान आणि शाहरूख सोडून कोणाच्या खिशात यातला एक छदाम जाणार नाही, हे ठाऊक असूनही जणू आपलीच कमाई झाल्याच्या थाटात सिस्टिमला फाट्यावर मारत अनेकांनी ‘जवान’ सेलिब्रेट केला.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया

२०२१ साली लिहिली गेलेली, पण २१२१ साली उजेडात आलेली ‘शिरोजीची बखर’ : प्रकरण पाचवे - आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

'डिअर जिंदगी' : बालिश कामासाठी शाबासकी

सध्या तरी मी निखिलचा नंबर ‘‘निखिल ‘मन्नत’ महाजन’’ म्हणून सेव्ह केलाय!

.................................................................................................................................................................

नेहमीप्रमाणे सिस्टिमने पोसलेला शत्रू नानाविध अस्त्र-शस्त्र घेऊन अंगावर आला. शाहरूखने त्याकडे लक्षच दिलं नाही. रिअॅक्टच झाला नाही. इग्नोरन्स इज दि बेस्ट पॉलिसी. तू कौन, मैं खामखाँ. चुकून जरी रिअॅक्ट झाला असता, तर मामला चिघळला असता. मग ‘पठाण’ही कधीच धारातीर्थी पडला असता आणि ‘जवान’ही हकनाक बळी गेला असता. सिस्टिम चक्रावली. धर्म, समाज आणि राजकीय सिस्टिम विरोधात गेली. तिने सुरू केलेल्या विखारी खेळात शाहरूख तिला पुरून उरला.

पण सिस्टिम महावस्ताद. केलेलं पाप आपलं नव्हतंच, अशा शाहजोगपणे शाहरूखला गणपतीच्या दर्शनाला बोलावलं. हासुद्धा घट्ट यारीदोस्ती असल्यागत सिस्टिमच्या दर्शनाला गेला. सिस्टिम ओंगळ हसली; पण सिस्टिमच कशाला, सिस्टिमला पोसणाऱ्या महाउद्योगपतीच्या घरीसुद्धा तो गणपतीदर्शनासाठी गेला. ‘पेज थ्री’ वर्तुळातल्या महाउद्योगिनीला केजीतल्या पोराच्या उत्साहाने मिठी मारता झाला. त्याचं ग्लॅमर, ‘जवान’चं छप्परफाड यश यात पुन्हा एकदा सिस्टिमच्या ‘नफरती गँग’चाच गेम झाला, पण ही काय सारी ‘पठाण’ आणि ‘जवान’ हीट करण्यापुरती कसरत - कवायत होती? कसंही करून स्वतःची तिजोरी भरण्यापुरता केलेला एकमेव उपदव्याप होता?

नाही. कदापि नाही. यात फिल्म इंडस्ट्री, धर्माची इंडस्ट्री, राजकारणाची इंडस्ट्री अशा अनेक सिस्टिमसाठी, या सिस्टिमच्या प्रत्येक अंगासाठी स्वतंत्र मेसेज होता. लाऊड अँड क्लिअर! त्यात त्याच्यामधला ‘बुद्धिवादी’ झळकत होता, ‘दबंग’ही झळकत होता आणि डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून शत्रूलाही वश करणारा निव्वळ ‘धंदेबाज’ही झळकत होता. परसेप्शनच्या दुनियेने त्याच्यावर केवळ ‘धंदेबाज’ शिक्का मारला होता. धोखा खा गये ना बाप्पू.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मग हे सारं होतं तरी काय? त्याला संपवू पाहणाऱ्या सिस्टिमविरोधातलं हे सरळ सरळ बंड होतं. माझा धर्म असेल अमुकतमुक, पण हा देश, इथली जमीन, इथली आबोहवा, इथली माणसं, इथली संस्कृती माझीसुद्धा आहे. यावर हक्क जितका तुमचा आणि तुमच्या बापाचा आहे, तितकाच तो माझा आणि माझ्याही बापाचा आहे, असा त्या बंडामागचा खरमरीत सूर होता. तुम्ही द्वेष पसरवा, मी त्यावर प्रेमाची फवारणी करतो, असा मिलाफ स्वर होता...

पण हे साधणं सोपं नसतं. गेल्या तीसेक वर्षांत गमावण्याइतपत देश-विदेशात खूप काही मिळवलं असताना तर ते अजिबातच सोपं नसतं... एरवी, बुद्धिवादी नस्ती भानगड नको म्हणून सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसतो. ‘दबंग’ सत्तेसोबत पतंग उडवतो. इंडस्ट्रीत बडे बडे निर्माते, नट-नट्या ‘हुकूम सरकार’ म्हणत सिनेमाच्या नावाखाली ‘स्टेट स्पॉन्सर्ड प्रोपगंडा’ करतात, तेव्हा ‘अँग्री ओल्ड मॅन’च्या अवतारातला घायाळ शाहरूख खान सिस्टिमच्या डोळ्याला डोळा भिडवत, खर्जातला आवाज लावत सिस्टिमवर चामड्याच्या बेल्टने सपासप फटके मारत असतो... ते पाहून पब्लिक तुफानी शिट्ट्या मारत असतं. तेव्हा इज्जतीचा पार खुर्दा झालेली ही विखारी - विद्वेषी सिस्टिम कुणाला न दिसता सटकण्यासाठी ‘पतली गली’चा शोध घेत असते...

अनुवाद - सायली परांजपे

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या दिवाळी २०२३मधून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......