‘रेड’ : खूप वर्षांनी असं नाटक बघायला मिळालं, जे पुन्हा बघण्याची इच्छा आहे…
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘रेड’मधील दोन प्रसंग
  • Mon , 20 November 2023
  • कला-संस्कृती नाटकबिटक रेड Red जॉन लोगन John Logan Mark Rothko मार्क रोथको

जगभरच्या अनेक समाजव्यवस्थांत ‘गुरू-शिष्य’ परंपरा दिसतात. आपल्या देशात तर शास्त्रीय संगीत (गायन आणि वादन) आणि शास्त्रीय नृत्यं या दोन क्षेत्रांत या परंपरा फार सशक्त आहेत, आणि गेल्या अनेक शतकांपासून टिकूनही आहेत. भारतावर आधी सुमारे पाचशे वर्षं मुस्लिमांचे आणि नंतर सुमारे दोनशे वर्षं इंग्रजांचे राज्य होते. या दरम्यान आपल्या समाजजीवनात असंख्य बदल झाले. मात्र शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य या दोन कलाप्रकारांत फारसे बदल झाले नाहीत.

मात्र अशी सशक्त गुरू-शिष्य परंपरा ‘चित्रकला’ हा कलाप्रकारात आढळत नाही. आधुनिक काळात कलामहाविद्यालयात चित्रकलेचं अधिकृत शिक्षण दिलं जातं. त्यावर विशिष्ट संस्कार झालेले दिसतात. म्हणूनच ‘बडोद्याची चित्रशैली’, ‘बंगालची चित्रशैली’, ‘कोल्हापूरची चित्रशैली’ वगैरे शब्दप्रयोग केले जातात. याचा अर्थ असा मात्र नव्हे की, या कलामहाविद्यालयातील विद्यार्थी एकाच प्रकारे चित्रं काढतात.

कलामहाविद्यालयांत केवळ चित्रकलेची तंत्रं शिकवली जातात, जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास केला जातो, तसेच कलेचा इतिहास शिकवला जातो. पण नंतर विद्यार्थी स्वत:ला पाहिजे त्याप्रमाणे चित्र रंगवतात, स्वत:च्या आविष्काराचे स्वतंत्र मार्ग स्वत: शोधायला लागतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे अलीकडेच ‘पृथ्वी थिएटर’च्या वार्षिक नाट्यमहोत्सवात ‘रेड’ हे ‘वॉटर लिली’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आलेलं इंग्रजी नाटक. अमेरिकन नाटककार जॉन डेव्हिड लोगन यांनी लिहिलेलं हे नाटक एक पन्नाशीला आलेला प्रस्थापित चित्रकार आणि त्याचा नवा तरुण मदतनीस चित्रकार, यांच्यातील संबंधांवर आधारित आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग अमेरिकेत २००९ साली सादर झाला होता.

हे चरित्रनाटक विसाव्या शतकातील गाजलेला अमूर्तवादी चित्रकार मार्क रोथको (१९०३-१९७०) या चित्रकाराच्या जीवनावर आधारित आहे. या अवलियाने वयाच्या ६७व्या वर्षी आत्महत्या केली. त्याच्या वादळी जीवनावर नाटक लिहिण्याचं शिवधनुष्य लोगन यांनी पेललं आहे.

कला क्षेत्रात नाव झाल्यावर रोथकोला अमेरिकेतील एक नामवंत पंचतारांकित हॉटेल ‘फोर सिझन्स’तर्फे चार म्युरल्स बनवण्याचं काम मिळतं. ते अतिशय प्रतिष्ठेचं असतं आणि भरपूर पैसे मिळवून देणारंसुद्धा.

म्युरल्सचं सुरू असताना एक दिवस रोथकोच्या लक्षात येतं की, त्याने जीव तोडून निर्माण केलेल्या या कलाकृती लोक जेवताना, गप्पा मारताना, मद्यपान करताना बघतील, त्या क्षणी तो ‘फोर सिझन्स’ने दिलेली आगाऊ रक्कम परत करतो.

उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या नाटकातल्या कलावंतांचा अभिनय जसा दर्जेदार अभिनय आहे, तसेच इतर नाट्यघटकही आहेत. पहिलं म्हणजे नेपथ्य. त्याचा खास उल्लेख करावा लागेल. फार क्वचित वेळा असं दिसतं की, रंगमंचावर ठेवलेली प्रत्येक वस्तू नाटकाच्या आशयाला पूरक आहे. अनेकदा तर रंगमंचावर एवढा पसारा मांडलेला असतो की, विचारता सोय नाही. ‘रेड’च्या कल्पक नेपथ्यामुळे सेट जिवंत झाला होता. रंगमंचावरील प्रत्येक वस्तू प्रेक्षकांशी बोलत होती.

काही अभ्यासकांच्या मते दोन पात्रं असलेले नाटक लिहिणं अवघड असतं. म्हणूनच अभ्यासक या नाटकाची तुलना एडवर्ड आल्बीच्या ‘झू स्टोरी’शी आणि सॅम्युएल बेकेटच्या ‘वेटिंग फॉर गोदो’शी करतात. मला स्वत:ला हे नाटक बघताना मिच अल्बॉम या अमेरिकन नाटककाराच्या ‘ट्युसडेज विथ मॉरी’ या नाटकाची आठवण येत होती.

‘रेड’चा प्रयोग सुमारे दीड तासाचा आहे, काळ १९५९च्या आसपासचा. नाटकाच्या सुरुवातीला केन नावाचा एक तरुण चित्रकार रोथकोला त्याच्या स्टुडिओत भेटायला येतो. सबंध नाटक तिथंच घडतं. केन या तरुण चित्रकाराला रोथकोकडे नोकरी करायची असते, चित्रकला शिकायची असते, जागतिक दर्जाची कला कशी निर्माण होते… हे जवळून बघायचं असतं. रोथको त्याला रुक्ष भाषेत त्याच्याकडे नोकरी करणं म्हणजे काय, हे स्पष्ट शब्दांत समजावून सांगतो- ब्रश धुवून ठेवावे लागतील, स्टुडिओची साफसफार्इ करावी लागेल, प्रसंगी फरश्या पुसाव्या लागतील वगैरे. रोथकोचा दबदबा असा असतो की, केन या सर्व अटी मान्य करतो आणि नाटक गती घेतं.

रोथको स्वत: नामवंत चित्रकार तर असतोच, शिवाय पाश्चात्य चित्रकलेचा डोळस अभ्यासकही. त्याच्या बोलण्यात पिकासो, मायकेल एंजेलो, रेम्ब्रा, मातीस, पॉल क्ली वगैरे चित्रकारांचे, त्यांच्या कामाचे, त्यांनी वापरलेल्या रंगांचे सतत उल्लेख येतात. केन हे सर्व जीवाचा कान करून तो आणि प्रसंगी स्वत:चा दृष्टीकोन, स्वत:ची मतं मांडतो. कधी रोथको ते ऐकून घेतो, तर कधी ‘तुला काडीची अक्कल नाही’ असं स्पष्ट शब्दांत ऐकवतो. ‘चित्रकारांच्या तुमच्या पिढीला अक्कल नाही… तुमची कष्ट करण्याची तयारी नाही… तुम्हाला झटपट प्रसिद्धी आणि पैसा हवा आहे’ वगैरे ऐकवतो. म्हणूनच एका मर्यादित अर्थानं हे ‘जनरेशन गॅप’चंसुद्धा नाटक आहे.

रोथको आणि केन यांच्यातल्या गप्पा म्हणजे एका प्रकारे चित्रकलेबद्दलची अमूर्त पातळीवरची चर्चा. एका प्रसंगी रोथको म्हणतो- ‘There is only one thing I fear, my friend… one day the black will swallow the red’.

काही अभ्यासकांच्या मते दोन पात्रं असलेले नाटक लिहिणं अवघड असतं. म्हणूनच अभ्यासक या नाटकाची तुलना एडवर्ड आल्बीच्या ‘झू स्टोरी’शी आणि सॅम्युएल बेकेटच्या ‘वेटिंग फॉर गोदो’शी करतात. मला स्वत:ला हे नाटक बघताना मिच अल्बॉम या अमेरिकन नाटककाराच्या ‘ट्युसडेज विथ मॉरी’ या नाटकाची आठवण येत होती.

सुरुवातीला रोथकोच्या प्रभावाखाली दबलेला केन नंतर मात्र त्याला टोकदार प्रश्न विचारायला लागतो, प्रसंगी प्रतिपश्न करतो, रोथकोच्या कलाविषयक धारणांसमोर आव्हान ठेवतो. रोथको जमेल तसा किल्ला लढवतो. केनशी वाद घालतो. दोन वर्षानंतर म्हणजे नाटकाच्या शेवटी रोथको केनला जवळजवळ हाकलून देतो. म्हणजे रोथकोच्या लक्षात येतं की, आता केनला द्यायला त्याच्याजवळ काही उरलेलं नाही.

उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या नाटकातल्या कलावंतांचा अभिनय जसा दर्जेदार अभिनय आहे, तसेच इतर नाट्यघटकही आहेत. पहिलं म्हणजे नेपथ्य. त्याचा खास उल्लेख करावा लागेल. फार क्वचित वेळा असं दिसतं की, रंगमंचावर ठेवलेली प्रत्येक वस्तू नाटकाच्या आशयाला पूरक आहे. अनेकदा तर रंगमंचावर एवढा पसारा मांडलेला असतो की, विचारता सोय नाही. ‘रेड’च्या कल्पक नेपथ्यामुळे सेट जिवंत झाला होता. रंगमंचावरील प्रत्येक वस्तू प्रेक्षकांशी बोलत होती.

‘चित्रकाराचा स्टुडिओ’ हे नेपथ्य असल्यामुळे सर्वत्र रंग पसरलेलं दिसणं स्वाभाविक होतं. डाव्या बाजूला बाहेर जाण्याची जागा होती, तर उजव्या बाजूला स्टुडिओच्या आतल्या बाजूला. उजवीकडे रंग ठेवण्याचे छोटे-मोठे बॉक्सेस, अनेक प्रकारचे-अनेक आकाराचे ब्रश, रंग एकत्र करण्यासाठी मोठ्या बादल्या, रंग गरम करण्यासाठी असलेला छोटा गॅस, कॅनव्हास माउंट करण्यासाठी लागणाऱ्या फ्रेम्स, चित्रं रंगवताना घालवायचे अ‍ॅप्रन वगैरेंमुळे प्रेक्षकांना आपण चित्रकाराच्या स्टुडिओत असल्याचं भान सतत राहतं. याचं सर्व श्रेय नेपथ्यकार विराज सुशी कर्णिकचं आहे. इतकं आशयपूरक नेपथ्य फार क्वचित बघायला मिळते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

प्रकाशयोजनेची जबाबदारी श्रीमती गुरलीन जज यांनी समर्थपणे पेलली आहे. या नाटकात अभिजात पाश्चात्य संगीताला महत्त्वाचं स्थान आहे. ज्येष्ठ चित्रकार रोथको सतत संगीत ऐकत असतो. त्याच्या मूडनुसार तो संगीताची रेकॉर्ड लावत असतो. ही सवय थोड्या प्रमाणात केनलासुद्धा लागते. नाटक सुरू होतं, तेव्हा प्रेक्षकांना रोथकोची तीन बाजूंना तीन पेंटिंग्ज टांगलेली दिसतात. जसं नाटक पुढे सरकतं, तशी ती खाली काढली जातात. त्यासाठी वापरलेल्या पुलीज वगैरेंमुळे नाटकाच्या परिणामकारकतेत भर पडते.

रोथकोची भूमिका विक्रम कापडियाने, तर केनची भूमिका डॅनियल ओवेन डिसुझा या तरुण नटानं केली आहे. दोघांनी आपापल्या भूमिकेत जान ओतली आहे. कापडिया मुंबर्इतील अमराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. मध्यमवयीन, चित्रकलेबद्दल-चित्रकारांबद्दल स्वत:ची ठाम मतं असलेला, गर्विष्ठ, फटकळ रोथको सादर करणं हे मोठं आव्हान होतं. पण विक्रमनी या भूमिकेचं सोनं केलं आहे.

डॅनियलने तरुण चित्रकार केन फार मन लावून सादर केला आहे. तरुण चित्रकाराच्या मनावरचे ताण, रोथकोसारख्या नामवंत पण फटकळ चित्रकाराबरोबर काम करताना असलेला प्रचंड ताण... जसे दिवस पुढे सरकतात, तसा त्याच्या मनावरचा ताण कमी होतो. नंतर नंतर तर तो रोथकोशी सुरू असलेल्या पेंटिंगमध्ये कोणता रंग वापरला पाहिजे वगैरेबद्दल हुज्जत घालतो. केनच्या व्यक्तिमत्त्वात झालेले हे सर्व बदल डॅनियलने फार तरलतेनं सादर केले आहेत.

खूप वर्षांनी असं नाटक बघायला मिळालं, जे पुन्हा बघण्याची इच्छा आहे…

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख