प्रभा अत्रे : कलेचं ‘शिवधनुष्य’ रसिकांसाठी ‘इंद्रधनुष्य’ करणारी ‘स्वरयोगिनी’!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
अतिंद्र सरवडीकर
  • ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गातानाच्या काही भावमुद्रा
  • Wed , 13 September 2023
  • कला-संस्कृती सतार ते रॉक प्रभा अत्रे Prabha Atre अतिंद्र सरवडीकर Atindra Sarvadikar

स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचा आज ९१वा (जन्म १३ सप्टेंबर १९३२) वाढदिवस. नितांत सुंदर गायनाबरोबरच चिंतनकार, सिद्धहस्त रचनाकार, लेखिका, कवयित्री आणि गुरू म्हणूनही त्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि सहवासाबद्दल त्यांचे शिष्य आणि गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर यांचा हा लेख…

.................................................................................................................................................................

डॉ. प्रभा अत्रे यांचा नादमय आवाज, सादरीकरणातली अफाट तयारी, नावीन्य, अगदी शेवटपर्यंत कायम राहणारी माधुरी, सहजता, व्यक्तिमत्त्वातली प्रसन्नता, यामुळे श्रोता तात्काळ प्रभावित होतो. पण या सगळ्या मागची त्यांची साधना, अखंड चिंतन, निर्मिती क्षमता हे सगळं पाहून मन थक्क होतं! कलेचं ‘शिवधनुष्य’ रसिकांसाठी त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ केलंय, याची प्रचिती येते.

शास्त्रोक्त संगीताच्या क्षेत्रात ज्यांना पूर्वपरंपरा लाभली आहे, ज्यांच्या घरातच संगीत होतं आणि ज्या गंडाबंध शिष्यांना मोठ्या गुरूंची अनेक वर्षांची विशेष तालीम लाभली, अशांचाच प्रामुख्याने पुढे कलाकार म्हणून बोलबाला झाला. पण प्रभाताईंच्या बाबतीत अगदी उलट घडलं! त्यांच्या घरात पूर्वी कुणी संगीत ऐकणारंसुद्धा नव्हतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रभाताईंना सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून थोड्या कालावधीसाठी प्रत्यक्ष तालीम लाभली. मग पुढचा सगळा प्रवास त्यांनी एकलव्याप्रमाणे स्वाध्यायाने केला. (सुरेशबाबू आणि हिराबाईंनाही आपल्या या प्रज्ञावंत शिष्येचा अतिशय अभिमान होता.) स्वयंप्रतिभेनं संगीताच्या क्षितिजात उंच भरारी घेतली. अढळपद मिळवलं. उस्ताद अमीर खान आणि उस्ताद बडे गुलाम अली खान हीदेखील त्यांची प्रेरणास्थानं. या दोन्ही उस्तादांनाही प्रभाताईंचं कौतुकच वाटायचं. त्यांनी युवावयातल्या प्रभाताईंचं मैफलीतलं गाणं ऐकलं होतं आणि त्याला मनमोकळी दादही दिली होती. एकदा एका मुलाखतीत अमीर खान यांना विचारलं की, तुम्हाला पुढच्या पिढीबद्दल काय वाटतं? तेव्हा त्यांनी उत्तम कलाकार म्हणून प्रभाताईंच नाव घेतलं होतं.

प्रभाताईंनी किराणा घराण्याचा वारसा नुसता चालवला नाही, तर सर्वार्थानं समृद्ध केला. त्यांचं गाणं ‘प्रेडिक्टेबल’ नाही. त्यात अनेक ‘सरप्रायझेस’ असतात. आणि म्हणूनच ते शिकणं महाकठीण! त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, मन मानेल तसा वळणारा आवाज आणि विलक्षण कल्पनाशक्ती क्षणोक्षणी थक्क करते. प्रभाताई अखंड संगीतचिंतनात असलेल्या मला जवळून अनुभवायला मिळालं आणि त्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांच्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, विनम्रता हे गुण लहानसहान गोष्टीतही जाणवले.

गुरुतत्त्वाचा उत्कट अनुभव

भारतीय संगीताच्या क्षेत्रात स्त्री गुरू अगदी कमी दिसतात. भीमसेन जोशींच्या तानेवर केसरबाईंचा प्रभाव पडला, कुमार गंधर्व अंजनीबाई मालपेकरांकडे फार भक्तिभावानं शिकले, मोगुबाई कुर्डीकरांनी काही पुरुष शिष्यांना तालीम दिली, हिराबाईंकडेही काही पुरुष शिष्य शिकले (सुधीर फडके हिराबाईंना गुरू मानत), राजाभाऊ कोगजे रसूलनबाईंकडे ठुमरी शिकले, अशी काही मोजकीच उदाहरणं सापडतात! त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये गंगुबाई हनगल, गिरीजा देवी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, वीणा सहस्त्रबुद्धे, धोंडुताई कुलकर्णी, माणिक भिडे, अश्विनी भिडे यांसारख्या सुप्रसिद्ध गायिकांकडे अनेक पुरुष शिष्य शिकले, असं दिसतं. त्यांपैकी अनेक जण पुढे व्यावसायिक कलाकार म्हणून यशस्वीही ठरले.

प्रभाताईंना मुख्यत्वे सुरेशबाबूंची तालीम मिळाली, तसेच उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांच्यासारख्या भरदार मर्दानी आवाजाच्या पुरुष गायकांच्या गाण्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. परंतु असं असलं, तरी त्यांचं गाणं ‘पुरुषी’ किंवा दुसऱ्या कुणाची ‘नक्कल’ ठरलं नाही.

प्रभाताईंकडे गाणं शिकायला मिळणं, हा माझ्या आयुष्यातला विलक्षण भाग्ययोग आहे. मी मूळचा सोलापूरचा आणि प्रभाताई पुण्या-मुंबईत. पण त्यांच्या गाण्याची मोहिनीच अशी जबरदस्त होती की, शिकायचं तर प्रभाताईंकडेच असं मी नकळत्या वयातच ठरवून टाकलं. कुठलीही ओळख नसताना धाडसानं एकदा मुंबईला गेलो, त्यांची भेट घेतली आणि शिकवण्याची विनंती केली. माझं गाणं ऐकून, थोडी पारख करून प्रभाताईंनी शिष्य म्हणून स्वीकारलं. अशा प्रकारे त्यांच्याकडचा माझ्या शिक्षणाचा प्रवास २००३ साली सुरू झाला.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

बंदिशीच्या शब्दांना सजवण्यासाठी खयाल गायला जात नाही

“शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?”

अपेक्षित आलं तर अपेक्षापूर्ती, नाहीतर सुखद धक्क्याचा अपेक्षाभंग!

..................................................................................................................................................................

सुरुवातीची वर्षं मी प्रभाताईंकडे राहूनच शिकलो. त्यामुळे त्यांचं इतरांना शिकवणंही मला जवळून पाहता आलं. ताईंनी अनेक शिष्यांना प्रेमानं खाऊपिऊ घालून निरपेक्षपणे शिकवलं. एरवी प्रेमळ आणि अत्यंत रुजू व्यक्तिमत्त्वाच्या प्रभाताई शिकवताना फार काटेकोर आणि कडक असतात. एखाद्या स्वराची हालचाल एखादा कण किंवा खटका जरी वेगळा झाला, तरी त्या अस्वस्थ होतात. आपलं ऐकणं एवढं चांगलं हवं की, गाणाऱ्यानं केवढा श्वास घेतलाय तेही समजलं पाहिजे, असं त्या सांगत. बंदिश जशी आहे, तशीच मांडण्याबद्दल त्या आग्रही असतात. शिकवतानाही त्यांच्या गाण्यातली सगळी वळणं, हालचाली इतक्या सुबक असतात की, त्यात एखाद्या डौलदार, प्रमाणबद्ध शिल्पकृतीचा आभास व्हावा.

प्रभाताईंकडची शिक्षणाची सुरुवातीची वर्षं मला फार अवघड गेली. त्यांच्या समोर गाणं म्हणजे अडखळणं आणि धडपडणं याची जणू काही शर्यतच सुरू व्हायची. एकतर माझं सुरुवातीचं संगीतशिक्षण वेगळ्या पद्धतीत झालं होतं. मी होतो १६-१७ वर्षांचा, त्यात पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात सोलापूरहून आलेला. ताईंचं भारदस्त व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आवाजातलं तेज, परिणामकारकता या सगळ्यांचं दडपण येऊन माझ्या तोंडातून स्वरच फुटायचा नाही. शिकावं तर खूप वाटे, पण अप्रूप, भीती, संकोचलेपण अशा संमिश्र भावना मनात दाटून येत. पण कालांतरानं या सगळ्या अडचणींवर मात केली. त्यांचं गाणं हळूहळू उलगडायला लागलं. भीतीची जागा भारावलेपणानं घेतली. झपाटून रियाझ सुरू झाला.

स्वरांची वळणं, त्यांना जोडून येणारे गोड स्वरकण, रसिलेपण, भारदस्तपणा, मींडेची इंद्रधनुष्य आणि खटक्यांची अचूक पेरणी, त्या मागचा कार्यकारणभाव, त्यात ओथंबलेली भावना साद घालू लागली. सरगम अन् तानेचे अद्भुत आकृतिबंध मनात फेर धरू लागले. ताईच्या गाण्याचं आणि विचाराचं वेगळेपण जाणण्याची क्षमता निर्माण होऊ लागली आणि संगीताचा एक वेगळा प्रदेश उलगडू लागला.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

चला, शास्त्रीय संगीत ऐकू या!

“आकाश जसे दिसते तशी म्हणावी गाणी…”

‘चमत्कार’, ‘नमस्कार’ आणि ‘पुरस्कार’ या पलीकडे शास्त्रीय संगीत जाणार का?

सवाई गंधर्व महोत्सव : श्रवणीयतेकडून प्रेक्षणीयतेकडे?

..................................................................................................................................................................

मला शिकवताना प्रभाताईंचं सगळ्या संदर्भात बारीक लक्ष असे. उत्तम आवाज बनण्यासाठीची आवश्यक खर्ज साधना, योग्य उच्चारण, मोकळा आवाज, सर्व सप्तकात गुंजणारा आवाज यासाठी आवश्यक रियाजाची पद्धत त्यांनी मला दाखवली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्यांनी कधीही त्यांच्या पट्टीत गायला लावलं नाही, कायम माझ्या सफेद दोन या सुरात शिकवलं. अर्थात त्यासाठी त्यांना कष्ट पडले!

माझ्या शिक्षणाच्या काळातच पुरुषांनी पुरुष वाचक अर्थ असलेल्या बंदिशीच गाव्यात, असा विचारही त्यांनी मांडला. भारतीय संगीतात असा विचार प्रथमच मांडला गेलाय. स्वतःच्या योग्य बदल केलेल्या बंदिशी त्यांनी मला शिकवल्या. उदा. ‘जिया मोरा ना लागे बैरी बालमुवा’, असं त्यांच्या स्त्री-शिष्या गातात, तर मला त्यांनी ‘जिया मोरा ना लागे बैरी सजनिया’ अशा प्रकारचा बदल करायला लावला.

प्रभाताईंनी सुरुवातीला अनेक दिवस यमनच शिकवला. त्यांच्या सुरातून यमनसारखा रागही असा उभा राहत असे की, आपण सुरुवातीला शिकलेला आपल्याला सोपा वाटलेला यमन तोच हा राग आहे का, असा संभ्रम पडायचा! अत्यंत सुरीला गुंजणारा गंधार आणि टोकदार तीव्र मध्यम अशा स्वरांची विशिष्ट स्थानं, कल्पक आणि प्रशांत आलापीतून रागरूपाला घातलेली साद, गंधारावरून रिषभाच्या मींडेने नादब्रह्मात विलीन होणारा षड्ज, विनासायास येणारे पेंचदार आणि दमसासयुक्त तानांचे गतिमान आकृतिबंध, लयीला लपेटून येणारी सरगम सारंच वेगळं!

प्रभाताईंसारखे विस्तृत, ठेहराव युक्त आणि सुंदर आलाप फार थोड्या कलाकारांनी केले असतील. त्यांची तानांची रचना अत्यंत सौष्ठवपूर्ण, वक्र, वेगवान आणि चांगलीच गुंतागुंतीची असते. परंतु तरीही त्यातलं माधुर्य कुठेही कमी होत नाही, हे विशेष! त्यांच्या गाण्यात विविध वळणवाटांनी जे स्वरकण आणि स्वरबंध वापरले जातात, त्यांचं नोटेशन करणं परीक्षा पाहणारं! त्यामुळे हे गाणं ऐकायला कितीही गोड, सहज सुंदर वाटलं, तरी ते अनुसरायला अतिशय कठीण! स्पष्ट, नादमय शब्दोचार, तालाच्या मात्रांवर आघात न करता भरून राहिलेली सूक्ष्म डौलदार लय, रागातल्या वेगळ्या जागा शोधून आकर्षक नवी स्वरवाक्य बनवणं आणि वेधकपणे समेवर येणं, या सर्व गोष्टीचा एखाद्या संमोहन-अस्त्रासारखा माझ्यावर प्रभाव पडला. तालीम झाली की, कित्येकदा त्या रात्री मला झोप यायची नाही. बंदिशी, लयीची चक्रं, नवनव्या कल्पक जागांची नक्षी, सगळं एकापाठोपाठ एक डोक्यात फिरत राहायचं. ते राग आणि बंदिशी गाताना आजही ताई समोर बसून शिकवत आहेत, असा भास होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला संगीतात मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली, तेव्हा त्यांनी आनंदानं पार्टी मागितली होती. माझ्या लग्नाला आशीर्वाद द्यायला त्या आवर्जून सोलापूरला आल्या होत्या आणि मला करोना झाला, तेव्हा तब्येतीची विचारपूस करायला त्यांचा रोज हॉस्पिटलमध्ये फोन यायचा. अशा अनेक हृद्य आठवणी आहेत. त्यांचं असं प्रेम मिळणं हे त्यांचा शिष्य म्हणून माझ्यासाठी परम भाग्याचं आहे. 

अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा

ज्या काळात शास्त्रोक्त संगीतातले दिग्गज आणि श्रोते केवळ परंपरागत संगीत प्रसुतीलाच अस्सल मानत असत, त्या काळात प्रभाताईंनी केवळ स्वरचित बंदिशी गायल्या. वेगळा कलाविचार धुंडाळला. त्यातल्या वेगळेपणामुळे आणि उच्च गुणवत्तेमुळे जाणकारांना त्याला मान्यता द्यावी लागली. रसिकांना तर या नव्या रचनांनी ‘दिवाणं’ केलं होतं. त्यांच्या पहिल्या स्वरचित बंदिश असलेली मारुबिहाग, कलावती रागाची रेकॉर्ड् आजही घराघरांत वाजत असते. शास्त्रोक्त संगीताची कदाचित ही सर्वाधिक विक्री झालेली रेकॉर्ड असावी! भारतीय शास्त्रोक्त संगीतात केवळ स्वरचित संगीत गाऊन असं उच्च स्थान प्राप्त करणं, ही ऐतिहासिक घटना आहे.

ख्याल, ठुमरी, दादरा, धृपद, धमार, टप्पा, टपख्याल, ठुमख्याल, तराणा, चतुरंग, त्रिवट, गीत, गझल, भक्तिगीत अशा अनेक गानप्रकारांत ५००हून अधिक नव्या बंदिशी त्यांनी रचल्या आहेत. त्या पुस्तक रूपात प्रकशितही केल्या आहेत. जागु मैं सारी रैना - मारुबिहाग, तन मन धन - कलावती, माता भवानी - दुर्गा, नंद नंदन - किरवाणी अशा त्यांच्या अनेक बंदिशी श्रोत्यांनाही तोंडपाठ असतात.

त्यांच्या ख्यालातून होणारा असर, परमोच्च सुरेलपण, आवाजाचा जाणीवपूर्वक केलेला वेगळा प्रयोग, लगावातली विविधता, विविध पैलूंतून उलगडत जाणारं अप्रतिम रागरूप, हळुवारपणे आणि संयतपणे सहजच व्यक्त होणारा भाव, लयीशी लडिवाळपणे खेळत अलगद येणारी सम हे सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं असतं.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

बंदिशीच्या शब्दांना सजवण्यासाठी खयाल गायला जात नाही

“शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?”

अपेक्षित आलं तर अपेक्षापूर्ती, नाहीतर सुखद धक्क्याचा अपेक्षाभंग!

..................................................................................................................................................................

प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना तृप्त करणारा आविष्कार. आलाप, तान, बोल यांच्यापेक्षा वेगळा सांगीतिक आशय व्यक्त करणारी त्यांची सरगम म्हणजे केवळ कसरत नाही, त्यात लालित्याचा परम सुंदर आविष्कार असतो. सरगमचा शास्त्रीय पक्षही सर्वप्रथम प्रभाताईंनीच संगीतजगतासमोर ठेवला. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. 

प्रभाताईंना गाण्याचा कोणताही प्रकार वर्ज्य नाही. ललितरचनांमधला त्यांचा मुलायम, तरल आवाज अंत:करणात रुतून बसतो. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवतो.

प्रभाताईंची ठुमरी म्हणजे नुसतच लाजणं-मुरडणं नाही. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण यामुळे श्रोते कायमच मंत्रमुग्ध झाले. प्रभाताईंनी कोणत्याही नव्या-जुन्या ठुमऱ्या गाव्यात! ‘कौन गली गयो शाम’, ‘बालमा छेडो मत जा’, ‘जा मैं तोसे नाहीं बोलू’, ‘रतीया किधर गवाई’, यांसारख्या ठुमऱ्यांमधल्या खास जागा, गुंफलेल्या अलौकिक स्वरसंगती, पुकार आणि हृदयस्पर्शीपणा आज एवढ्या वर्षानंतरही रसिकांना विसरता येत नाही.

मला आठवतं एकदा प्रभाताईंचा पंढरपूरला कार्यक्रम होता. मला त्यांच्या सोबत जाता आलं. कार्यक्रमानंतर आयोजकांनी ताईंच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली. एक पागोटं बांधलेले वयस्क शेतकरी गृहस्थ दर्शनासाठी तिथे आले होते. त्यांनी प्रभाताईंना अक्षरशः साष्टांग दंडवत घातला. म्हणाले, “ ‘कौन गली गयो श्याम’मध्ये तुम्ही पांडुरंगाला काय आतून हाक मारली आहे. आज तुम्ही आलेलं त्यालाही आवडलं असणार”. त्या सामान्य शेतकऱ्याचे निरागस आणि मनापासून आलेले ते शब्द ऐकून आम्ही सगळेच क्षणभर स्तिमित झालो. असा जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा त्यांच्या गाण्याचा अमिट प्रभाव आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रभाताईंनी उपशास्त्रीय संगीतातही सातत्यानं अनेक नव्या रचना केल्या, तसंच अनेक पारंपरिक रचनांना त्यांनी आपला असा खास ‘रंग’ दिला. ‘घिर के आई बदरिया’, ‘कागा रे जारे जा’, ‘रंग डार गयो मोपे’ अशी अगणित कजरीगीतं, दादरे आणि होरी गीतं त्या ढंगदारपणे गातात. ‘कैसा बालमा दगा दे गया’ (मिश्र कनकांगी), ‘सावरो नंदलाला’ (मिश्र शिवरंजनी), ‘बसंती चुनरिया’ (नायकी कानडा), ‘अजहून आयो मेरो सावरीया’ (मांड भैरव), या वैशिष्ट्यपूर्ण ललितरचनाही प्रभाताईंच्याच. जुने रसिक सांगतात उमेदीच्या काळात ‘जा कुणी शोधूनी आणा’, ‘दारी उभी अशी मी’, ‘हम जूनु मे जिधर निकलते हैं’, ‘बडी आरजू हैं’, ‘कळीचे फूल होताना’ अशा ग़ज़ला गाताना त्या असा माहोल जमवत की बस्स!

साधनेची तप्तमुद्रा

प्रभाताईंनी काही रागांच्या स्वरूपात बदल केला, काही सांगीतिक घाट वेगळ्या प्रकारे हाताळले. सरगमसारख्या संगीतसामग्रीचं वेगळेपण अधोरेखित केलं, राग समय, राग रस यांना शास्त्राच्या कसोटीवर तपासून पाहिलं. अनेकदा विद्वानांनाही विचार करायला उद्युक्त केलं!

या सगळ्या प्रयोगशीलतेमागे विचारांची बैठक भक्कमपणे उभी असलेली दिसते. दूरदृष्टी ठेवून परंपरेला बदलण्याचं त्याचं धाडस आणि क्षमता दिसते. लोकप्रिय असणाऱ्या एखाद्या आघाडीच्या कलाकाराने संगीतावर लेखन करणं, संशोधन करणं, पुस्तकं प्रकाशित करणं किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणं, हे फार क्वचित घडलेलं आहे. प्रभाताईंनी या क्षेत्रांतही मानदंड प्रस्थापित केले.

प्रभाताईंनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीनं फार मोठ्या जनसमूहास सुमारे १९४०-५०च्या दशकांपासून २०२३पर्यंत, म्हणजे ७० -७५ वर्षे आनंद दिला. ५०च्या दशकात जेव्हा क्वचितच कुणी कलाकार परदेशात भारतीय शास्त्रीय संगीत सादर करत, तेव्हा प्रभाताईंनी सतत परदेश दौरे करून कार्यक्रम, व्याख्यानं, शिक्षण या सर्व मार्गांनी भारतीय कंठसंगीत परदेशात लोकप्रिय केलं. परदेशात तिकीट विक्री होऊन सभागृहांमध्ये व्यावसायिक कार्यक्रम केलेल्या प्रभाताई या पहिल्या भारतीय कंठसंगीताच्या कलाकार आहेत. हल्ली ‘दिवाळी पहाट’चे अनेक कार्यक्रम होत असतात, पण असा कार्यक्रम ताईंनीच ७० साली पहिल्यांदा केला होता.   

प्रभाताईंनी वैयक्तिक आयुष्यात प्रचंड चढउतार अनुभवले, आघात पचवले. अडचणींना समर्थपणे तोंड दिलं. एकटीनं वाटचाल केली, पण त्याची कधीही वाच्यता करत नाहीत. सतत असतो, तो एक विलक्षण प्रसन्नपणा आणि चेहऱ्यावरचं समाधान. त्यांच्या वडिलांना फसवून एका भाडेकरूने हडप केलेली पुण्यातली जागा अनेक वर्षांच्या कोर्टकचेरीनंतर त्यांच्या ताब्यात आली. तिथं त्यांनी स्वखर्चानं भव्य स्वरमयी गुरुकुल बांधलं. देश-परदेशातले अनेक विद्यार्थी तिथं राहून शिकतात. नियमित कार्यक्रम आयोजित केले जातात. आई-वडिलांचं आणि गुरूंचं ऋण त्यांनी खऱ्या अर्थानं फेडलं आहे. नव्या पिढीतल्या अनेक शिष्यांना सक्षम बनवलं आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

बंदिशीच्या शब्दांना सजवण्यासाठी खयाल गायला जात नाही

“शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?”

अपेक्षित आलं तर अपेक्षापूर्ती, नाहीतर सुखद धक्क्याचा अपेक्षाभंग!

..................................................................................................................................................................

अनेक कलाकारांच्या मागे त्यांच्या चाहत्यांचे, आयोजकांचे आणि प्रशंसकांचे कंपू असतात. प्रभाताई या सगळ्यापासून कायमच दूर राहिल्या. त्यांच्या स्वभावातच एक अलिप्तपणा आहे. त्यांनी फक्त निखळ साधना केली, अत्यंत सचोटीनं आणि प्रामाणिकपणे. त्यांच्याकडे स्वतःहून पद्मविभूषणसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार चालत आले. पण त्या नेहमी परिधान करतात, तशा शुभ्र वस्त्रासारखं त्यांचं निर्लेप व्यक्तिमत्त्व आहे. त्याला वैराग्याची भगवी किनार आहे. ‘स्वरयोगिनी’ हे विशेषण त्यांना सर्वार्थानं सार्थ वाटतं.

प्रभाताईंसारख्या गुरूकडे शिकायला मिळणं, हा ‘योग’ अलौकिकच म्हणायला हवा! त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझी वाटचाल योग्य दिशेनं होत राहिली. मी प्रत्यक्ष गाण्याबरोबरच त्यांचं संशोधन, चिंतन, योग्य प्रकारे शिकवणं आणि नव्या संगीत रचना करणं, हे गुणही घेण्याचा प्रयत्न करतो आहे. गायक म्हणून काम करत असतानाच माझ्यातल्या रचनाशीलतेला आणि लेखनक्षमतेलाही नकळत कोंब फुटले. बघता बघता अडीचशे-तीनशे बंदिशी करून झाल्या, सुगम संगीतातही अनेक गाणी प्रसिद्ध झाली. काही पुस्तकंही प्रकाशित झाली. कधी कधी मागे वळून पाहताना विचार करतो-, हे कसं शक्य झालं? तेव्हा तुकाराम महाराजांच्या ओळी सहजच समोर येतात-

‘सद्‌गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधीं त्याचे ॥१॥

आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यासी ॥२॥’

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. अतिंद्र सरवडीकर सुप्रसिद्ध गायक असून स्वरायोगिनी डॉ प्रभा अत्रे यांचे वरिष्ठ शिष्य आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......