अजूनकाही
हिंसा, युद्धं वगैरे नकारात्मक भावना आदिम गोष्टी समजल्या जातात. ‘रामायण’, ‘महाभारत’ वगैरे महाकाव्यांत युद्धं आहेत, तसेच पाश्चाय संस्कृतीत प्राचीन काळात भीषण युद्धं झाल्याचे उल्लेख आहेत. आज २०२३मध्येसुद्धा जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू आहेतच. चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे रशिया-युक्रेन.
जगभरच्या संवेदनशील व्यक्तींनी युद्धाला वेळोवेळी विरोध केला आहे. या संदर्भात विसाव्या शतकातली मोठी नावं म्हणजे बर्ट्रांड रसेल आणि आपले महात्मा गांधीजी. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकले. तेव्हापासून मानवाला अणुयुद्धाची म्हणजेच जगाच्या सर्वनाशाची भीती वाटत आहे.
सुदैवानं आजपर्यंत तरी तिसरं महायुद्ध झालेलं नसलं, तरी जगभर अनेक ठिकाणी युद्धं सुरू आहेत, युद्धसदृश्य वातावरण आहे, हे नाकारता येत नाही. उदा., भारत-पाक किंवा भारत-चीन.
दुसरं म्हणजे युद्धाने खरोखरच प्रश्न सुटतात का? पहिल्या महायुद्धादरम्यान एक जाहिरात केली जात असे- ‘A Great War that will end all wars’. प्रत्यक्षात असं काही झालं नाही. उलट १९१८ साली पहिलं महायुद्ध संपल्यानंतर अवघ्या २१ वर्षांनी म्हणजे १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. आज हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे मकरंद देशपांडेंचं ताचं एकपात्री, एक अंकी हिंदी नाटक- ‘सैनिक’.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मकरंद मुंबर्इतल्या हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवरचा ज्येष्ठ रंगकमी आहे. त्याची रंगमंचावरची ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे. मकरंदने काही हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. अलीकडेच पंचवीस वर्षे पूर्ण केलेल्या ‘सत्या’ या चित्रपटात त्याची वकिलाची भूमिका होती. सुमारे तीन दशकांपूर्वी त्याने ‘अंश’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. मकरंदची नाटकं खास त्याची असतात. त्याच्या अनेक नाटकांची ‘सबकुछ मकरंद’ अशी स्थिती असते. सध्या चर्चेत असलेलं ‘सैनिक’सुद्धा त्यानेच लिहिलं असून दिग्दर्शित आणि सादरही केलं आहे.
मराठी प्रेक्षकांना पु. ल. देशपांडेंची ‘बटाट्याची चाळ’, लक्ष्मण देशपांडेचं ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ आणि सदानंद जोशींचं ‘मी अत्रे बोलतोय’ वगैरे एकपात्री प्रयोग माहिती असतात. मात्र दुर्दैवानं ‘एकपात्री प्रयोग म्हणजे विनोदाचा पाऊस, मिनिटामिनिटाला टाळ्या आणि हशा’ असं समीकरण रूढ झालं आहे. मकरंदचा ‘सैनिक’ या समीकरणाला सुखद धक्का देतो. १९७४ साली पु. ल. देशपांडे इचलकरंजीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्या निमित्तानं त्यांची विस्तृत मुलाखत ‘ललित’मध्ये आली होती. त्यात ते म्हणाले होते- ‘आमच्या सुनीताचा ‘राजमाता जिजाबार्इ’ हा एकपात्री प्रयोग गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे चालला नाही’. मलासुद्धा एवढी वर्षं वाटत होतं की, एका पात्रानं जर प्रेक्षकांना तास-दीड तास धरून ठेवायचं असेल, तर विनोदाला पर्याय नाही. मकरंदचा ‘सैनिक’ या गृहितकांना खोटं ठरवतो. हे त्याचं फार मोठं यश आहे.
प्राचीन व मध्ययुगीन काळात राजे-महाराजे लढाया करत असत. आधुनिक काळात त्यात खंड पडला नसला, तरी आता युद्धात निष्कारण होत असलेल्या हिंसेबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. १९९९ साली पाकिस्तानने आपल्यावर कारगील युद्ध लादलं. पाकिस्तानने व्यापलेली कारगील भागातील भूमी भारताने जरी यथावकाश मुक्त केली, तरी त्यात सुमारे पाचशे सैनिकांचं रक्त सांडलं. हे पाचशे जीव नाहक गेले का, वगैरेंची चर्चा तेव्हा झाली होती.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘युद्धात होणारे आणि अंतिम: व्यर्थ ठरणारे सैनिकांचे बलिदान’ हा विषय विसाव्या शतकापासून चर्चेत आहे. १९२९ साली प्रकाशित झालेल्या एरिका मारिया रेमार्क यांनी लिहिलेल्या ‘ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ या कादंबरीत प्रथमच उघडपणे सैनिकाच्या नजरेतून युद्धविरोधी भूमिका व्यक्त झाली होती. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या या कादंबरीवर अपेक्षेनुसार नाझी जर्मनीत बंदी होती. तरीही प्रकाशित झाल्यानंतरच्या दोन वर्षांत तिच्या सुमारे पंचवीस लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. नंतर तिच्यावर सिनेमाही आला.
या कादंबरीने तेव्हा एक मुद्दा चर्चत आणला होता. तो म्हणजे ज्या व्यक्तीनं आपलं व्यक्तिश: काहीही वाकडं केलेलं नाही, त्याला केवळ शत्रूपक्षाचा आहे, म्हणून ठार मारणं योग्य आहे का? आजही या प्रश्नाचं समाधानकारक देता येत नाही.
मकरंदने या नाटकाच्या निमित्तानं अशा अनेक प्रश्नांना हात घातला आहे. ‘युद्धस्य कथा रम्य’ असं म्हणतात आणि त्यात तथ्यही आहे. लहानपणी वा तरुणपणी सैनिकी पेशाचं, त्यातील पुरुषीपणाचं आकर्षण असतं. नंतर मात्र त्यातली (प्रसंगी निरर्थक) हिंसा कशी आवडत नाही, वगैरे चर्चा सुरू होते. दुसरं म्हणजे आता युद्ध हा एक ‘मीडिया इव्हेंट’ झाला आहे. त्यामुळे मकरंदच्या नाटकात एक पत्रकार-छायाचित्रकार येतो आणि युद्धाची छायाचित्रं काढतो.
मुंबर्इसारख्या महानगरात राहणाऱ्यांना १९९०-१९९१ दरम्यान झालेलं आखाती युद्ध आठवत असेल. तेव्हा सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीने प्रथमच या युद्धाचं भारतात ‘थेट प्रक्षेपण’ केलं होतं. त्याचा फायदा घेत मुंबर्इतील अनेक पंचतारांकित हॉटेल्सनी ‘युद्धाचं थेट प्रक्षेपण बघत न्याहरी-जेवण करा’ वगैरे जाहिराती केल्या होत्या. शिवाय युद्धांमुळे युद्धसामग्री बनवणाऱ्या कारखान्यांचा होत असलेला कोट्यवधी रुपयांचा फायदा. अमेरिका, फ्रान्स, स्वित्झर्लंडसारख्या देशातील युद्धसामग्रीचे कारखानदार, तर युद्ध व्हावं, म्हणून दोन देशांतील संबंध कसे बिघडवतात वगैरे दाहक वस्तुस्थितीची ‘सैनिक’मध्ये दखल घेतली आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
एवढंच नव्हे तर प्रसंगी देशाचे प्रमुखसुद्धा युद्धज्वर वाढवतात आणि राजकीय फायदा लाटतात. १९८६च्या आसपास भारतात बोफोर्स बंदुकातील गैरव्यवहाराच्या आरोपांना राजीव गांधींना सामोरं जावं लागत होतं. दररोज त्यांचा पाय अधिक खोलात जात होता. सीमेपलीकडे पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुत्तोंसुद्धा देशाच्या राजकारणात अडचणीत आल्या होत्या. तेव्हा अशी जबरदस्त अफवा उठली होती की, हे दोन्ही नेते आपापली पदं राखण्यासाठी एखादे छोटंसं युद्ध खेळतील आणि राष्ट्रप्रेमाचा ज्वर पसवतील. दोन्ही बाजूंनी पाच-पंचवीस सैनिक मारले गेले की, युद्ध थांबवतील. युद्धाकडे, सैनिकांकडे बघण्याचा हा आधुनिक दृष्टीकोन आहे.
मकरंदने यातील अनेक बाबींना स्पर्श केला आहे. पु. ल. देशपांडे, लक्ष्मण देशपांडे वगैरेंच्या एकपात्री प्रयोगात आणि मकरंदच्या एकपात्री प्रयोगात जमीन-अस्मानाचा फरक आहे. देशपांडे मंडळींच्या प्रयोगात नेपथ्य औषधालासुद्धा नसे. एक मार्इक आणि एक खुर्ची एवढ्यावरच त्यांनी प्रयोग सादर केले होते. मकरंदने मात्र अतिशय आशयगर्भ नेपथ्य वापरून ‘सैनिक’चा प्रयोग सादर केला आहे. हे नेपथ्य पृथ्वी थिएटरसारख्या आकारानं छोट्या रंगमंचावर होतं, याचीसुद्धा दखल घेतली पाहिजे.
या नाटकात प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर युद्धभूमी अक्षरश: जिवंत होते. बॅरिकेड, सिमेंटच्या गोण्या वगैरेंमुळे आपण सैनिकांच्या बाजूला उभे आहोत, ही भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यात नेपथ्यकार सुमीत पाटील यशस्वी झाला आहे.
मकरंदने एकुण दहा उपकथानकं सादर केली आहेत. प्रत्येक उपकथानक सुरू होण्याअगोदर केलेली प्रकाशयोजना प्रेक्षकांना पुढच्या उपकथानकाबद्दल मानसिक पातळीवर तयार करते. शिवाय युद्धाच्या प्रसंगाच्या वेळची प्रकाशयोजना तर लाजबाब. त्यासाठी प्रकाशयोजनाकार अमोघ फडकेचं खास अभिनंदन.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मकरंदच्या अभिनयाबद्दल नव्यानं काय बोलावं? ‘जबरदस्त सादरीकरण’ म्हणजे काय, हे जर बघायचं असेल, तर हे नाटक बघावं. अतिशय गंभीर विषयावरील एकपात्री नाटकसुद्धा कसं प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘सैनिक’.
मकरंदने प्रकाशयोजना, वेशभूषा, नेपथ्य, संगीत वगैरे घटक योग्य प्रमाणात वापरल्यामुळे प्रेक्षकांना आपण ‘एक नाटक’ बघत आहोत, ‘एकपात्री प्रयोग नाही’ याची सतत जाणीव असते. हे या नाटकाचं फार मोठं यश आहे.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment