‘द ग्रॅज्युएट’ : माणसाच्या सनातन एकटेपणावर भाष्य करणारं नाटक
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘द ग्रॅज्युएट’ या नाटकातील दोन प्रसंग
  • Tue , 20 June 2023
  • कला-संस्कृती नाटकबिटक द ग्रॅज्युएट The Graduate चार्ल्स वेब Charles Webb डस्टिन हॉफमन Dustin Hoffman

चार्ल्स वेब या लेखकाची ‘द ग्रॅज्युएट’ ही १९६३ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी. तिच्यावर १९६७मध्ये हॉलिवुडने सिनेमा बनवला होता. सत्तरच्या दशकात पुण्यात शिकत असताना हा डस्टिन हॉफमनचा ‘द ग्रॅज्युएट’ सिनेमा बघितला होता. त्यानं माझं भावविश्व ढवळून निघालं. त्यात डस्टिन हॉफमनने ‘बेंजामिन ब्रॅडॉक’ या कॉलेजात शिकणाऱ्या तरुणाची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी हॉफमनला अ‍ॅकेडमी पुरस्काराचं नामांकनही मिळालं होतं.

नुकतीच ‘द ग्रॅज्युएट’ या कादंबरीवरील त्याच नावाचं नाटक बघण्याची संधी मिळाली. अलीकडे पृथ्वी थिएटरमध्ये हे नाटक मुंबईच्या ‘टी पॉट’ या नाट्यसंस्थेनं सादर केलं होतं. त्रिश्लाची रंगभूमीवरील कारकीर्द पं. सत्यदेव दुबे, नासिरुद्दीन शहा, सुनील शानबाग वगैरेंसारख्या दिग्गजांच्या सहवासात फुलत गेली.

‘द ग्रॅज्युएट’चं कथानक त्या काळीच काय, आजसुद्धा धक्कादायक वाटतं. बेंजामिन शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि कर्तृत्ववान तरुण म्हणून नावाजला जातो. ‘उद्याचा यशस्वी तरुण’ म्हणून आजूबाजूचे लोक त्याच्याकडे बघत असतात. तो पदवीधर झाल्याच्या निमित्तानं त्याचे आई-वडील पार्टी देतात. बेंजामिनच्या वडिलांचा वकिलीचा व्यवसाय असतो. पण त्यांची इच्छा असते की, त्याने प्लॅस्टिकचा व्यवसाय करावा. त्यांच्या मते या व्यवसायात लवकरच बरकत येणार आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

या पार्टीला त्यांचे व्यावसायिक भागीदार रॉबिन्सन दाम्पत्य आलेलं असतं. बेंजामिन पार्टीला कंटाळून वरच्या मजल्यावरच्या स्वत:च्या खोलीत येऊन पडतो. त्याच्या मागे मागे सौ. रॉबिन्सन येतात आणि बेंजामिनला मोहात पाडण्याचे बरेच प्रयत्न करतात. तो दचकतो, घाबरतो, नर्व्हस होतो, पण प्रतिसाद देत नाही.

नंतर त्याच्या लक्षात येतं की, त्याचा आणि आई-वडिलांचा संवाद होत नाही, होऊ शकत नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी तो सौ. रॉबिन्सनशी मैत्री करतो. नंतर त्यांचे शरीरसंबंध सुरू होतात. आपल्या वडिलांच्या भागीदाराच्या पत्नीशी - जी त्याच्या आईच्या वयाची असते - शरीरसंबंध ठेवताना बेंजामिनला अनेक मानसिक अडथळे पार करावे लागतात.

रॉबिन्सन दाम्पत्याची एलेन ही मुलगी बेंजामिनच्याच वयाची असते. एकदा बेंजामिन गमतीनं म्हणतो, मला एलेनशी मैत्री करायला आवडेल. सौ. रॉबिन्सन त्याला तीव्र आक्षेप घेतात.

दुसरीकडे बेंजामिन-एलेन यांची मैत्री व्हावी आणि नंतर लग्न, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा असते. ते त्या दृष्टीनं बेंजामिनच्या मागे लकडा लावत असतात. आई-वडिलांच्या कटकटीला कंटाळून एकदा बेंजामिन एलेनला गप्पा करायला बोलावतो. सुरुवातीला त्यांच्यात अपेक्षित ताण असतो, नंतर मात्र आपापल्या भविष्याबद्दल अंधारात असलेले, काही प्रमाणात त्रस्त असलेले हे दोन तरुण जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

तिकडे सौ. रॉबिन्सन काही झालं तरी बेंजामिन-एलेन यांचं लग्न होऊ द्यायचं नाही, असं ठरवतात. एलेनच्या मनात बेंजामिनबद्दल घृणा निर्माण करण्यासाठी त्या ‘बेंजामिनने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला’ असं तद्दन खोटं सांगतात. एलेन रागारागानं घर सोडून निघून जाते. बेंजामिन तिला हडकून काढतो. त्यांच्यातले गैरसमज दूर होतात. आपल्या आईनं आपल्याला खोटं सांगितलं, हे एलेनच्या लक्षात येतं.

तेवढ्यात तिथं रागानं लालेलाल झालेले एलेनचे वडील येतात आणि तिला सांगतात, ‘मी तुझ्या आईला घटस्फोट देणार आहे.. तू बेंजामिनशी लग्न करू नको. मी तुझं लग्न चांगल्या मुलाशी लावून देईन.’ आणि एलेनला घेऊन जातात. बेंजामिन रागारागानं सौ. रॉबिन्सनच्या घरात शिरतो. त्या फार चिडतात. त्या बेंजामिनला धमकी देतात- ‘पोलिसांना बोलवून घुसखोरीच्या आरोपावरून तुला तुरुंगात पाठवीन. एवढंच नव्हे, तर त्याचं-एलेनचं लग्न कधीही होऊ देणार नाहीत.’ बेंजामिन घाईघाईनं तेथून बाहेर पडतो आणि एलेनचं लग्न कोणत्या चर्चमध्ये होणार आहे, हे हुडकून काढतो. तिथं जाऊन अभूतपूर्व गोंधळ घालतो. एलेनला बेंजामिनच्या तरल आणि प्रामाणिक भावनांची जाणीव होते आणि दोघं पळून जातात. इथं नाटक संपतं.

अगदी वरवर पाहता हे नाटक एक प्रौढ, विवाहित, पण वैवाहिक जीवनात कमालीचं एकटेपण भोगत असलेली बाई आणि तिच्या ओळखीतील विशीचा तरुण यांच्यातल्या भानगडीवर आहे, असं वाटतं. पण खरं तर हे नाटक आधुनिक जीवनातील एकटेपणावर, विशेषत: गर्दीतल्या एकटेपणावर, समाजाच्या अपेक्षा आई-वडिलांच्या अपेक्षा आणि आपल्या स्वत:च्या जीवनाकडूनच्या अपेक्षा, यातील विसंवादावर आहे. म्हणूनच एकट्या असलेल्या सौ. रॉबिन्सन आणि बेंजामिन आपसूकच एकमेकांकडे ओढले जातात.

या टप्प्यावर नाटकात एक वेगळाच मुद्दा प्रेक्षकांसमोर येतो. लैंगिक सुखाचं स्वरूप, त्यासाठी करावे लागणाऱ्या गोष्टी जरी थोड्या फार्सिकल पद्धतीनं मंचित झालेल्या असल्या, तरी त्यातील दाहक सत्य समोर येतं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

हे नाटक दोन अंकी आहे. मंचित करण्याच्या दृष्टीनं पहिला अंक तसा सोपा आहे, तर दुसरा अंक अवघड. पण दिग्दर्शक त्रिश्ला पटेलने हे आव्हान यशस्वीपणे पेललं आहे. त्यात तिला तेजस्विनी कोल्हापुरे (सौ. रॉबिन्सन) आणि शंशाक विष्णू दत्त (बेंजामिन) यांची लाखमोलाची साथ लाभली आहे. त्यांना रंगमंचावर एकत्र पाहणं, हा एक प्रसन्न अनुभव होता. दोघांनी परस्परपूरक अभिनय केला आहे. आपापल्या पात्रांच्या भावविश्वातले बदल व्यवस्थित उभे केले आहेत.

तरुण हुशार पण भविष्याविषयी अजून अंदाज न आलेला बेंजामिन, आई-वडिलांच्या सततच्या कटकटीला मनोमन वैतागलेला बेंजामिन आणि नंतर सौ. रॉबिन्सन यांच्या सहवासात खुलत गेलेला बेंजामिन… हे सर्व बदल शंशाकने उत्कटतेनं सादर केले आहेत.

तेजस्विनी कोल्हापुरे सुमारे पंधरा वर्षांनी रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. त्यांनी साकारलेल्या सौ. रॉबिन्सन बघताना मला १९६३ साली आलेल्या ‘गुमराह’ या हिंदी सिनेमाची आठवण येत होती. त्यात चित्रपटात शशिकलाने ज्या सफाईनं भूमिका सादर केली होती, तीच सफाई तेजस्विनी कोल्हापुरेंच्या अभिनयात होती. त्यांना योग्य वेशभूषेचा आधार मिळाला. शिवाय त्यांची सतत एक्सटेंडर वापरून सिगरेट ओढण्याची शैली! १९६०च्या दशकात हिंदी सिनेमांतील हेलेन वगैरे खलनायिका हमखास एक्सटेंडर लावून ध्रूमपान करत असत.

या नाटकाची प्रकाशयोजना अमोघ फडके, शंतनू साळवी यांची; तर नेपथ्य धनेंद्र कावडे यांचं होतं. या सर्व नाट्यघटकांचा योग्य मेळ बसवत त्रिश्ला पटेलने एक सुंदर प्रयोग सादर केला आहे.

१९६०च्या दशकात समोर आलेली कलाकृती आज २०२३ साली कालबाह्य वाटू शकते. त्यात जर प्रौढ विवाहित स्त्री आणि तिच्या मुलीच्या वयाचा तिचा प्रियकर यांच्यातील संबंध केंद्रस्थानी असतील, तर नाटकाचं कथानक किती स्फोटक असेल, याची कल्पना येऊ शकते. त्रिश्लाने धोका पत्करून हे नाटक सादर केलं आहे. कारण माणसाचं एकटेपण, त्यातही गर्दीतलं एकटेपण हा कालातीत विषय आहे. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या शतकात हे नाटक बघतानाही त्यातील एकटेपण भिडतं.

आज संपर्काची साधनं एवढी वाढली आणि स्वस्त झालेली असली, तरी माणसाचं एकटेपण चिमूटभरही कमी झालेलं नाही. या वास्तवाकडे हे नाटक अंगुलीनिर्देश करतं. दर्जेदार कलाकृतीचंच हे लक्षण आहे.

.................................................................................................................................................................

लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......