भारतातील आणि महाभारतातील ‘शिखंडी’ची, तृतीयपंथीयाची कहाणी!
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘शिखंडी’ या इंग्रजी नाटकातील एक दृश्य
  • Sat , 01 April 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नाटकबिटक Natatbitak अविनाश कोल्हे Avinash Kolhe शिखंडी Shikhandi फोएजे जलाली Faezeh Jalali

भारतीय मनाला रामायण व महाभारत या दोन महाकाव्यांबद्दल अपार प्रेम आहे. यातही महाभारताबद्दल तर लेखक/ कलावंतांना फार कुतूहल असतं. हे कुतूहल महाभारताचे सतत वेगवेगळे अन्वयार्थ लावून व्यक्त होत असते. महाभारतावर नेहमी सर्जनशील लेखन केलं जातं. या संदर्भात चटकन आठवणारी नावं म्हणजे शिवाजी सावंतांचं ‘मृत्युजंय’, आनंद साधलेंचं ‘हा जय नावाचा इतिहास आहे’, आणि दाजी पणशीकरांचं ‘महाभारत - एक सूडाचा प्रवास’ ही पुस्तकं. यातील ‘मृत्यूजंय’नं तर लोकप्रियतेचा व खपाचा इतिहास घडवला होता. पिटर ब्रूकसारख्या जागतिक पातळीवर गाजलेल्या दिग्दर्शकाने महाभारतावर सुमारे नऊ तास चालणारं नाटक बसवलं होतं. तरी महाभारताविषयीचं कलाकारांचं कुतूहल संपत नाही. महाभारतातील एखाद्या कथेवर नवनव्या कलाकृती सतत रसिकांसमोर येत असतात. यातील ताजी कलाकृती म्हणजे ‘शिखंडी’ हे इंग्रजी नाटक.

हे नाटक फोएजे जलाली यांनी लिहिलं व दिग्दर्शित केलं असून ‘फॅटस द आर्टस’ या नाटयसंस्थेनं मंचित केलं आहे. या नाटकाची निमिर्ती ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस’ने केली आहे. परिणामी ‘शिखंडी’ची निर्मिती मूल्यं उच्च दर्जाची आहेत.

ही महाभारतातील एक अफलातून कथा आहे. शिखंडी ही व्यक्ती तृतीयपंथी असते. काशीच्या राजाला अंबा, अंबालिका व अंबिका या तीन मुली होत्या. यापैकी अंबाचं शेजारच्या सौबलचा राजा सल्व यांच्यावर प्रेम होतं. भीष्माने विचित्रविर्य या सावत्र भावासाठी या तिघींचं स्वयंवरातून अपहरण केलं. भीष्म या तिघींनी घेऊन हस्तिनापुरात आला. अंबाने भीष्माची समजूत काढली. त्यामुळे भीष्माने तिला परत जाण्याची परवानगी दिली. अंबा जेव्हा सल्वकडे जाते, तेव्हा तो तिचा स्वीकार करण्यास नकार देतो. कारण? अंबाला परपुरुषाने जिंकलेलं असतं. ती विचित्रविर्याकडे जाते. तो तिचा स्वीकार करण्यास नकार देतो. कारण तिचं दुसऱ्या पुरुषावर प्रेम असतं. भीष्म तिचा स्वीकार करू शकत नाही, कारण त्याने आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतलेली असते. आपल्या या स्थितीला भीष्मच जबाबदार आहे म्हणत अंबा घोर तपस्या करते आणि भीष्माचा नायनाट करण्यासाठी शंकराकडून वर प्राप्त करून घेते.

याचाच पुढचा भाग म्हणून अंबा शिखंडीच्या रूपाने राजा ध्रुपदाच्या घरी जन्म घेते. आपल्या ज्ञात इतिहासातील कदाचित पहिली तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे शिखंडी, जिची वाढ दौपदीचा भाऊ म्हणून होते.

जलाली यांनी ही कथा घेऊन एका तृतीयपंथी व्यक्तीची वाढ कशी झाली असेल, वाढ होताना त्या व्यक्तीला कोणकोणत्या सामाजिक गोष्टींना तोंड द्यावं लागलं असेल वगैरेंचा विचार केला आहे. या नाटकात एक असा प्रसंग आहे की, द्रौपदी व शिखंडी लहान असताना इतर समवयस्क मुलांमध्ये खेळत असतात. खेळताना शिखंडीला आपल्या वेगळेपणाची सतत जाणीव होत असे. धडधाकट मुलं शिखंडीला आपल्यात खेळायला घेत नाहीत. त्याचप्रमाणे मुलीसुद्धा त्याला त्यांच्यात घेत नाहीत. यात लहानग्या शिखंडीची घुसमट होत असते. त्याला सतत प्रश्न पडत असतो - मी कोण आहे? मुलगा? मुलगी? की मधलाच कोणीतरी? हा आयडेंटी क्रायसेस या नाटकाचा केंद्रबिंदू आहे.

शिखंडीला मुलासारखं वाढवलं जातं. यथावकाश त्याचं लग्न लावून दिलं जातं. लग्नाच्या रात्री सर्व उघडकीस येतं. लाजेकाजेस्तव शिखंडी जंगलात पळून जातो. तिथं त्याला एक यक्ष भेटतो, जो त्याला स्वतःचं शिस्न लावून देतो.

आता खऱ्या अर्थानं पुरुष झालेला शिखंडी पत्नीला गरोदर करतो. जंगलात जाऊन यक्षाला शिस्न परत करतो. यक्ष शिखंडीला सांगतो की, त्याने भीष्माचा वध केल्यावर शिस्न परत द्यावं.

ही अशी आहे शिखंडीची ढोबळ कथा. यात जलालींनी थोडासा बदल केला आहे. यक्ष जरी पुरुष असला तरी त्याला स्त्री होण्याची इच्छा असते असं दाखवलं आहे. त्यामुळे त्याच्यातील व शिखंडीतील व्यवहार पक्का ठरतो.

महाभारताच्या युद्धात जरी शेवटी पांडवांचा विजय झाला तरी या युद्धातील अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे भीष्माचा वध. हा वध जरी अर्जुनाच्या बाणांनी झाला तरी हा विजय शिखंडीशिवाय शक्य झालाच नसता. याकडे सहसा लक्ष दिलं जात नाही.

जेव्हा ‘शिखंडी’सारखी नाटकं समोर येतात, तेव्हा हा मुद्दा चर्चेत येतो. नाटकाचं कथानक जरी महाभारतकालीन असलं तरी नाटककार जलाली यांनी या विषयाकडे आजच्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती चारचौघांसारखी नसते, तेव्हा इतर सर्व त्या व्यक्तीला सळो की पळो करून सोडतात आणि त्या व्यक्तीला समाजमान्य साच्यात बसण्यास भाग पाडतात. आजही आपल्या समाजात समलिंगी मंडळींना किती मानसिक व प्रसंगी शारिरिक त्रास सहन करावा लागतो, हे डोळ्यांसमोर आणलं की जलाली या नाटकाद्वारे काय करू बघत आहेत याचा अंदाज येतो.

नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शनही जलालींचं यांचंच आहे. जलालींनी अमेरिकेत नाट्यशास्त्राचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. अमेरिकेत असताना त्यांच्या वाचनात देवदत्त पटनाईक यांचं ‘प्रेग्नंट किंग’ हे पुस्तक आलं होतं. तेव्हाच त्यांनी शिखंडीला समोर ठेवून एक दीर्घांक लिहिला होता. जलाली एक कसलेल्या अभिनेत्यासुद्धा आहेत. अलीकडेच त्यांनी रजत कपूर यांच्या ‘आय डोंट लाईक ईट, यू लाईक ईट’ या शेक्सपिअरच्या ‘अॅज यू लाईक’ या सुखान्तिकेवर आधारित इंग्रजी नाटकात अप्रतिम भूमिका केली होती.

जलालींनी ‘शिखंडी’साठी कर्नाटकातील ‘यक्षगान’ आणि केरळातील ‘कूडीयट्टम’चा वापर केला आहे. शिवाय काही प्रसंगात त्यांनी दोरीवरचा मल्लखांबही वापरला आहे. यासाठी त्या सर्व नटमंडळींना घेऊन कर्नाटकातील उडुपी गावात असलेल्या ‘यक्षगान केंद्र’मध्ये गेल्या. यक्षगान केंद्राचे प्राचार्य सुवर्णा व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेत यक्षगानच्या तालमी केल्या. जलालींनी संहितेत अनेक ठिकाणी विनोदी प्रसंग बांधले आहेत. परिणामी हे गंभीर प्रवृत्तीचं नाटक खेळीमेळीच्या वातावरणात सादर होतं. मात्र या नाटकातील विनोद प्रसंगी धारदार होतो आणि प्रस्थापित सामाजिक मूल्यांसमोर काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो.

हा प्रयोग एनसीपीएच्या प्रायोगिक रंगमंचावर झाला. एनसीपीएचा प्रायोगिक रंगमंच हा खऱ्या अर्थानं प्रायोगिक रंगमंच आहे. जलालीनी याचा यथार्थ वापर केला आहे. रंगमंचाच्या चारी बाजूंनी पात्रं येत-जात असतात, दोन कोपऱ्यात सूत्रधार उभे असतात. ते खड्या आवाजात कधी कथानक पुढे नेतात तर कधी एखादं पात्र होतात. 

या नाटकात युद्धाचे प्रसंग आहेत, राजदरबाराचे प्रसंग आहे, लग्नाचा प्रसंग आहे, तसेच पहिल्या रात्रीचाही प्रसंग आहे. शिवाय द्रौपदी, शिखंडी लहानपणी खेळतात असेही भरपूर प्रसंग आहेत. हे सर्वच प्रसंग प्रायोगिक रंगभूमीच्या मर्यादित अवकाशात बसवणं हे आव्हान होतं. दिग्दर्शक जलालींनी सर्व अभिनेत्यांकडून कसून तालमी करवून घेतल्याचं पदोपदी जाणवतं. यक्षगान काय किंवा कुडीयट्टम काय किंवा दोरीचा मल्लखांब काय, या कला शिकण्यासाठी किती वर्षं द्यावी लागतात याचा आपल्याला अंदाज आहे. या नटांनी एका प्रकारे ज्याला मार्शल आर्ट म्हणता येईल, अशा कलेचा वापर एवढ्या सफाईने केला की, आपण भान हरपून बघत राहतो.

हे नाटक एक प्रकारे समूहनाटय असलं तरी काही पात्रांच्या योगदानाची दखल घेतली पाहिजे. यात दोन सूत्रधार आहेत. एकाची भूमिका सादर केली आहे श्रीमती मेहेर अचारिर्यादर तर दुसरा सूत्रधार सादर केला आहे तुषार पांडे यांनी. या दोन्ही कलाकारांचा खडा आवाज रंगमंचाच्या अवकाशात घुमत होता. यामुळे वेगळाच परिणाम साधला जात होता. शिखंडीच्या मध्यवर्ती भूमिकेत महनाझ दमानिया यांनी दर्जेदार रंग भरले आहेत. लहानगा शिखंडीला जेव्हा त्याचे मित्र चिडवतात, तेव्हा त्याची घालमेल या गुणी कलाकाराने छान व्यक्त केली आहे. नंतर जेव्हा जंगलातून यक्षाकडे शिस्न आणल्यावर आणि पत्नी गरोदर झाल्यावर झालेला आनंद वगैरे भावभावनांची दर्जेदार अभिव्यक्ती महनाझ यांनी सादर केली आहे. याच्याच जोडीने सृष्टी यांनी सादर केलेली द्रौपदी दीर्घकाळ लक्षात राहिल. या नाटकाची प्रकाशयोजना अर्घ्या लाहिरी यांनी सांभाळली आहे. अशा नाटकात प्रकाशयोजना फार महत्त्वाची असते. अर्घ्या लाहिरी यांनी ही जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे.

‘शिंखडी’ सारखे नाटक बघणे हा एक बौद्धिक आनंद असतो. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचे कथानक जसे पौराणिक आहे तसेच समकालिन ठरते. आजही एखाद्या कुटुंबात जर शिखंडी सारखे अपत्य जन्मास आले तर ते वाढवता वाढवता पालकांना व वाढत असताना त्या अपत्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं याचा अंदाज असतो. म्हणूनच शिखंडीसारखं नाटक फक्त पौराणिक न राहता समकालिन होतं. हे या नाटकाचं यश आहे.                                

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Girish

Sat , 01 April 2017

अरे भावांनो काही तरी प्रूफ reading करत जा रे, अंबा की अंबिका की अंबाला काय वाट्टेल ते लिहिलं आहे जरा सुधारा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख