अजूनकाही
नुकतीच नाटकाच्या रूढ चौकटींना बाजूला ठेवत सादर झालेला साहिल कबीरलिखित ‘सोलोकोरस’ हा एक आगळावेगळा नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळाली. पूर, करोना काळ यांचा संदर्भ घेऊन साहिलने अनुभवलेले सर्वसामान्य माणसाचे, अगदी तळातल्या माणसाचे जगणे आपल्या या पुस्तकातून मांडले आहे. त्याची स्वगते - मनोगते आहेत ही. कविता, गझल, उपरोध, त्यानेच तयार केलेली त्याची वेगळी भाषा असं सगळं घेऊन साहिल व्यक्त होतो. छोटे छोटे तुकडे असले तरीही ते एकसंध आहेत.
हे सगळं मुळातच समजायला कठीण. त्यातून ते समजून, त्यातील रंगमंचीय आविष्काराच्या जागा शोधून त्यावर नाट्यप्रयोग बसवणे, तो सुयोग्य कलाकारांना घेऊन ताकदीने सादर करणे, हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यासाठी राहुल लामखडेचे करावे, तेवढे कौतुक थोडेच आहे.
आपल्या भवतालात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांकडे अतिशय सजगपणे पाहणाऱ्या एका संवेदनशील व्यक्तीच्या नजरेतून आपण पाहू लागतो जगाकडे. आज आपल्या आजूबाजूला धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भावनिक सगळ्याच बाबतीत प्रचंड असमतोल आहे. यातूनच या सर्वच बाबतीत कमी-अधिक कमकुवत असणाऱ्या भागावर अन्याय घडत राहतो.
रोजचे जगणेच ज्यांच्यासाठी एक परीक्षा आहे, अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि तरीही असे जगणे अपरिहार्य आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वंचित लोक त्यातच जगत- भोगत- सोसत- चिमूटभर आनंद कधी मिळाला, तर मुठीत घट्ट पकडून त्याच्या जीवावर डोंगराएवढे दुःख विसरत राहतात. पण बधिरलेल्या इतर मनांना अणुमात्र स्पर्शत नाहीत, या गोष्टी.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
बहुतांश लोक याकडे कधी बिनदिक्कत, तर कधी सोयीस्कर दुर्लक्ष करतात. काही लोक हळहळतात पण फार थोडे, अगदी मोजके लोक काही करू पाहतात. आपले जगण्याचे पात्र एवढे खुले ठेवतात की, ज्यामध्ये इतरांच्या सोसण्याला थोडं तरी महत्त्व आहे. ‘सोलोकोरस’ ही इतरांच्या दुःखाने ज्यांचे मन भरून येते आणि ते त्यांच्या उक्ती-कृतीतून झिरपत राहते, अशा लोकांशी संवाद साधण्याची धडपड आहे!
सध्याची वेगाने बदलत चाललेली सामाजिक परिस्थिती, राजकीय व्यक्तींच्या हातात सामान्य माणसाचे बाहुले होणे, त्याची मुस्कटदाबी, फुटीचे, द्वेषाचे राजकारण, ठराविक लोकांना एकटे पाडणे, संवेदनशील माणसांची होणारी घुसमट या सगळ्यावर यातून भाष्य केले आहे.
आपल्या मुस्लीम समाजाच्या जगण्यातून साहिल हे व्यक्त करतो, त्यामुळे काही संदर्भ आपोआप येतात. ज्या मातीत जन्मलो, वाढलो, तिथेच अनिकेत ठरण्याचे दुःख, वगळले जाण्याची, एकटे पाडल्याची असहाय्य चीड, वेळोवेळी आपल्या देशभक्तीचे द्यावे लागणारे पुरावे, या गोष्टीतली जिव्हारी लागलेली कळ आपल्याही डोळ्यांत पाणी आणते.
पण खोलात जाऊन विचार केला तर जाणवते की, हे एका वर्गाचे दुखणे नाहीये. आज एकीकडे लोकांच्या श्रद्धा-भावना खूप टोकदार झाल्यात, कोणत्या क्षणी कशाने कुणाच्या भावना दुखावतील, काही सांगता येत नाही; तर दुसरीकडे संवेदनशीलता कमालीची बोथट झालीय. अशा दुहेरी कात्रीत प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत, प्रत्येक शब्द फुंकून उच्चारत सहृदय माणसाला जगावे लागतेय. वरवर पाहता सगळे आलबेल वाटते, पण सुखाचा झिरझिरीत पडदा बाजूला झाल्यावर समजते हे वास्तव नाहीये. ही सुन्न-उद्विग्न परिस्थिती बोचऱ्या पण नेमक्या शब्दांत ‘सोलोकोरस’मधून व्यक्त होते.
ही कोणाही गरिबाची ‘रोजमर्रा की जिंदगी’ आहे. भूक, वेगवेगळे अभाव, कोरोना , महापूर अशा गोष्टी, सगळ्या प्रकारच्या असमानता रोज नवी परीक्षा पाहत असतात. असमानतेच्या भिंतीवर डोके आपटूनही कपाळमोक्ष होऊ न देता केविलवाणे जगावे लागतेच, कधी विव्हळत, कधी आर्त टाहो फोडत. या सर्वांचे आपल्याला अत्यंत प्रत्ययकारी दर्शन या प्रयोगातून घडते. आणि आपण कधी सुन्न, कधी भयचकित होत राहतो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
आपल्यातला खरा माणूस संपत चालल्याच्या, सगळं काही विकावू होत असल्याच्या, पावलोपावली सामान्य माणसाला दडपले जाऊन, फक्त भयभान त्याच्या मनात जागृत ठेवण्याच्या व्याकूळतेतून हे सगळं भाष्य येतं. मुर्दाड बनत चाललेल्या, भ्याड सुरक्षितता कवटाळलेल्या आपल्या प्रत्येकातील आतला खरा माणूस जागा करण्यासाठी हा आक्रोश आहे, हा कळकळीने फोडलेला टाहो आहे.
चांगल्या गोष्टींची, चांगल्या विचारांची, चांगल्या माणसांची शृंखला व्हायला हवी, तरच गांधीजींच्या ‘स्वप्नातला भारत’ अस्तित्वात येऊ शकतो. आपल्या पुढच्या पिढीला आपण जगण्यासाठी निकोप वातावरण देऊ शकतो. त्यासाठी साहिल प्रेमाचे, स्नेहाचे ‘पसायदान’ मागतो - ‘कळ कळो , द्वेष टळो, पीठ मळो सहिष्णूतेचे!’
आपल्यातला ओलावा जागा करत, अस्वस्थ करत नाट्यप्रयोग संपतो आणि आर्त विनवणी आळवणीप्रमाणे कानावर पडते - ‘आपण बोलत राहू... दोस्ता बोलत जा... दोस्ता बोलत जा...’
काही वाक्ये मनात घर करतात. उदाहरणार्थ -
‘प्रेमाची आणि प्रामाणिकपणाची दोन्ही भाषा नाही चालत हल्ली...’
‘...करू म्हणजे सर्टिफिकेट पक्कं होईल आपण देशभक्त असल्याचे!’
‘मैंने रोटी पे गझल लिख दी हैं...’
‘आवाज निघत नाही घशातून आणि आताशा पोचतही नाही...’
‘दिवा पेटवला, तर अंधार सुखद वाटतो. घरं पेटतात, तेव्हा तो उजेड घातक वाटतो...’
‘डोळ्यातले अश्रू दिव्यातले तेल नाही होऊ शकत...’
‘पाणी प्यायला, चिमणी पाहायला, कविता जगायला मिळो...’
काही दिवस तरी नक्की पाठ सोडणार नाहीयेत ती आता.
शिकलेला अब्दुल्ला त्याला सलणारे सर्वच बाबतीतले अज्ञान, अन्याय तळमळीने चव्हाट्यावर आणू पाहतो. आपल्या ‘सोलो’ स्वराला ‘कोरस’ लाभावा, या अपेक्षेने मुर्दाड समाजमनाला मतलबी, स्वार्थी, आत्मकेंद्री अशा कोषातून बाहेर काढू पाहतो. त्याला दिसणारा, अस्वस्थ करणारा ‘नाही रे’ वर्गाचा कोलाहल ‘आहे रे’ वर्गापर्यंत पोचवू पाहतो. त्यांना विचार करायला भाग पाडतो.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
गौतमी, डॉ. श्रीकांत, पवन, राहुल हे चार कलाकार हा नाट्यप्रयोग सादर करतात. चौघांचा समर्थ अभिनय साहिलचे म्हणणे, त्याची वेदना आपल्यापर्यंत पोचवतो. कुठलाही उसना अभिनिवेश, भडकपणा जाणवत नाही. आपण त्या त्या ठिकाणी त्या त्या पात्रांच्या सोसण्याशी जोडले जातो, हे त्यांच्या अभिनयाचे यश आहे.
नेपथ्यामध्ये नीरजच्या रेखाचित्रांचा सुरेख वापर करून घेतलेला आहे. एक चित्र प्रयोगादरम्यानच आपल्यासमोर साकार होते, त्याचाही सुयोग्य वापर करण्याच्या क्लृप्तीला टाळ्या मिळतात.
काही मोजक्याच कपड्याच्या बदलातून वेगवेगळ्या व्यक्तीरेखा प्रेक्षकांसमोर उभ्या राहतात. त्यासाठी वेशभूषाकार सईचेही कौतुक!
चांगुलपणाचा काफीला तयार व्हावा आणि आपल्या आजूबाजूला दिसणारा घनदाट अंधार थोडा तरी विरळ करावा, यासाठीची ही एक धडपड आहे.
आपणही त्यातला एक भाग होण्यासाठी, आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या आतल्या, गोठत चाललेल्या संवेदनशीलतेला जागं करण्यासाठी, माणूसपणाच्या निकषावर आपण नेमके कुठे आहोत, हे तपासून पाहण्यासाठी आणि संवादाचा पूल अव्याहत चालू ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी, ‘सोलोकोरस’ पाहायला हवा!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment