अजूनकाही
आपण ‘देणे’ लागतो या भावनेतून मी हिंदी सिनेमा बघतो. आमच्या घरात सिनेमा बघण्याचे काही नियम बनवलेले आहेत. पहिला म्हणजे कितीही कंटाळवाणा असला तरी सिनेमा अर्धवट सोडता कामा नये, नाहीतर सिनेमा बनवणाऱ्याचा अपमान होतो. दुसरा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला कुठल्याही इतर नावाने संबोधायचे नाही. तिला ‘बॉलिवुड’ म्हणण्याला इतर वेळी राष्ट्रीयत्वावर गाढ विश्वास असलेल्या एकाही महाभागाचा विरोध नसावा, याची खंत वाटते. ‘हॉलिवुड’ या संकल्पनेवरून हा शब्द आला असल्याने त्याला आपसूकच विरोध असायला हवा. त्यामुळे भारतीय सिनेसृष्टीला त्याच नावाने ओळखण्याकडे माझा कटाक्ष असतो. घरात, मित्रमंडळींत या नियमाचे पालन मी करतो, पण इतरांच्या लेखी या नियमांना फार काही महत्त्व नाही.
सिनेमाच्या ‘अगाध’ ज्ञानामुळे मी सिनेमाच्या शिफारसीसुद्धा चांगल्या करतो, असा समज मीच माझ्याबद्दल पसरवून ठेवला आहे. काही वर्षांपूर्वी शिकागोच्या एक उपनगरात, कडाक्याच्या थंडीत मी पंधरा-सोळा मित्रमैत्रिणींना ‘The Man on the moon’ हा जिम कॅरीचा सिनेमा खूप चांगला आहे, म्हणून दाखवायला घेऊन गेलो. हा सिनेमा एका वादग्रस्त टीव्ही अँकर, स्टॅन्ड अप कॉमेडियन अँडी कॉफमनच्या जीवनावर बेतलेला होता. तेव्हा आम्हा सगळ्या नव-स्थलांतरितांना त्यातील कुठलीही व्यक्ती माहिती नसल्याने हा सिनेमा सगळ्यांच्याच डोक्यावरून गेला, तसेच जिम कॅरीचा अभिनयही पचनी पडला नाही. चित्रपट निवडीतील इतकी भयंकर चूक होऊनसुद्धा माझी विश्वासार्हता कमी झाल्याचे मला आठवत नाही - निदान उघडपणे तरी तसे कोणी बोलले नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पण हल्ली हिंदी सिनेमे बघताना हा विश्वास डळमळीत होतोय, असे वाटते. एक तर हिंदी सिनेमे बघण्यासाठी ‘रिस्क’च घ्यावी लागते. किती तासांची गुंतवणूक करावी हाही प्रश्न असतो. तसेच या ‘इन्व्हेस्टमेंट’चे ‘रिटर्न्स’ मिळतीलच याची कमीत कमी हमी असतानाही ‘रिस्क’ घ्यावी लागते. करोना काळात तयार झालेल्या, विशेष करून फक्त ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वर झळकणाऱ्या सिनेमांचं गणित कुठे तरी चुकतंय, असंच वाटतं. कुठे कथा अपूर्ण, तर कुठे शेवट घाई-घाई केलेला, एखादं पात्र मध्येच छाटलेलं, असं काहीसं बघायला मिळतं आणि विरस होतो.
सिनेमा हे सगळ्यांसोबत बघण्याचं मनोरंजनाचं साधन आहे, असं आम्ही मानतो. हल्ली घरात सिनेमा एकत्र बघणं दुरापास्तच झालं आहे म्हणा! म्हणजे सहकुटुंब सिनेमा बघण्याचे दिवस एकतर सिनेमाच्या दर्ज्यामुळे किंवा प्रत्येकाला मिळालेल्या वैयक्तिक स्क्रीनमुळे म्हणा, दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहेत. पण महिन्या-दोन महिन्यांत कुटुंबासोबत निदान एखादा तरी सिनेमा बघण्याची प्रथा मी घरावर लादतो. त्यात कुटुंबाचा उत्साह यथातथाच असतो. पण थेटरात जाऊन सिनेमा बघण्याच्या आटापिट्याला हा उतारा बरा आहे, असे सगळ्यांचं मत पडतं, तेही एका अटीवर की, सिनेमा चांगलाच असायला हवा.
एखादा सिनेमा निवडून व सुचवून बघायला खूप पूर्वतयारी करावी लागते. त्या संशोधनाची जबाबदारी अर्थात माझी असते. कारण सिनेमा सुचवून तो वाईट निघाल्यास नट, दिग्दर्शक वा निर्माता यांच्याआधी मला जबाबदार ठरवलं जातं. त्यामुळे त्याच्या किमान दर्जाची हमी घेतल्याशिवाय आमच्याकडे सिनेमा बघितला जात नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
सिनेमाची कथा, त्यातील पात्रं, त्यांची आपापसांतील नाती-गोती, तसंच त्यांच्या सगळ्या काल्पनिक कृतींवर एक ‘डिफेन्स’ तयार ठेवावा लागतो. याच जबाबदारीमुळे मला सिनेमा बनवणाऱ्या लोकांबद्दल नितांत आदर निर्माण झाला आहे. मला बघताना जर एवढा विचार करावा लागत असेल, तर त्यांना बनवताना किती करावा लागत असेल!
कुठलाही सिनेमा ‘जस्टीफाय’ करायला सिनेमातील बारीकसारीक गोष्टींतला चांगलेपणा शोधून तयार ठेवायला लागतो - तोही प्रत्यक्ष सिनेमा बघताना. ही कला आता मला छान ‘आत्मसात’ झाली आहे. मग मी एखादा सहकलाकार, एखादं सूत्र, उप-सूत्र, एखादं ठिकाण, सिनेमाचा आशय (जे फक्त माझंच मत असेल) असे सिनेमाचे ‘प्लस पॉइंट्स’ गोळा करतो. खरं तर या निर्मात्यांनीच मला सिनेमा बघण्याचे पैसे द्यायला हवेत, असं कधी-कधी वाटतं. ही तयारी करताना सिनेमाची जाहिरात, तसंच त्याची इतर नट-नट्यांनी केलेली यथायोग्य केलेली टीका-टिप्पणी, अशा सगळ्या साधनांचा वापर मी वातावरणनिर्मितीसाठी करतो. या तयारीनंतर एखाद्या नवनिर्मात्यासारखी धाकधूक मनात ठेवून कुटुंबासोबत सिनेमा बघायला बसतो.
गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी मनात अशीच धाकधूक असून दोन सिनेमे बघण्यासाठी मी कुटुंबियांना उद्युक्त केलं. पण ‘लूप लपेटा’ नावाच्या आपत्तीनं माझी पार धूळधाण उडवून टाकली. सुरुवातीलाच हा सिनेमा ‘रन लोला रन’ नावाच्या सिनेमावरून नुसता प्रेरित नसून त्याची ‘कॉपी’ आहे, याची प्रांजळ कबुली होती. माझ्या आनंदास पारावार न उरला नाही. मी लगेच बायकोला म्हणालो, ‘आज-काल दिवस बदलले हं. नवी पिढी बघ कशी प्रामाणिक आहे. सिनेमा नक्कीच चांगला असणार.’ बायको फणकाऱ्याने म्हणाली, ‘सिनेमा आणि आंब्याची पेटी पैसे खर्च केल्यानंतरच कळते.’ मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मी एक छान, फास्ट तसंच मॉडर्न हिंदी सिनेमा बघायला मिळणार, याच आनंदात होतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पण त्यानंतरचे अडीच तास माझे नव्हते. या सिनेमाची सगळी टीम ‘रन लोला रन’ला ‘रन ऑफ दी मिल’ म्हणजे सुमार सिनेमा बनवून माझ्या संसारात काडी लावून पाहत होती. माझा प्रत्येक क्षणाला यात काही तरी चांगलं, न्याय्य शोधण्याच्या प्रयत्न हाणून पाडला जात होता. त्यातील कलाकार, कॉमेडी, ट्रॅजेडी, सामाजिक समस्या, थोडक्यात अभिनय सोडून सगळं काही एकाच वेळेस करू बघत होते. शेवटी मी हताशपणे टीव्हीकडे बघत हा अत्याचार संपण्याची वाट बघत राहिलो.
‘डायरेक्टरला कळत कसे नाही की, हे पिक्चर हातून जातंय ते?’, ‘आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही?’, ‘हल्ली बॉलिवुडमध्ये काळा पैसा फार आलाय’. इथे ‘बॉलिवुड’चा उल्लेख आम्हाला अनुल्लेखाने मारण्यासाठी करत बायकोची सरबत्ती सुरू होते.
‘अगं, असं होतं कधी-कधी. कदाचित सिनेमा बंद करण्याऐवजी तो पूर्ण करणं स्वस्तात पडलं असेल त्याला.’ आमची वकिली सुरू होते. खरा क्रिकेटप्रेमी कसा ‘मॅच फिक्सिंग’ म्हटलं की, उसळून बोलतो, तसंच मी जोरकसपणे बाजू मांडायला लागलो.
पण सहसंबंध व कार्यकारणभाव हे दोन्हीही माझ्या बाजूनं नव्हते. पाच-दहा मिनिटांच्या वादानंतर आम्ही परत सिनेमाकडे वळलो, तर त्यात काही फारसं ‘मिस’ झालेलं नव्हतं, कारण सिनेमा ‘लूप’मध्येच होता ना!
सरते शेवटी मला या ‘लपेटा’ने पुरतं लुटलं. असंबद्ध मांडणी, कल्पनाहीन अभिनय, वर पिक्चरची लांबी या सगळ्यांनी माझा सपशेल पराभव केला. सिनेमा वाईट निघाला याचं दुःख नव्हतं, पण ‘पत’ही गेली होती.
पण बोली दोन सिनेमांची होती. हिंदी सिनेसृष्टीतल्या तथाकथित राष्ट्रीय बाण्याच्या एका अभिनेत्रीनं ‘गहराईयाँ’ची तुलना फक्त प्रौढांसाठीच्या सिनेमाशी केली, तेव्हा माझी उत्सुकता वाढवली. म्हणजे हा सिनेमा अश्लील असून तो सामान्यांनी बघू नये, हे कळायला जर तिला तीन तास लागले असतील, तर यात नक्कीच काही तरी बरं असावं, असं वाटून गेलं. पण उगाच धोका पत्करायला नको, म्हणून मी त्याचे ‘ट्रेलर’ बघून घेतले. त्यावरून तरी हा सिनेमा वूडी अॅलनच्या सिनेमांसारखा असावा, असं वाटू लागलं. अशी नावं मी जाहिरातींसाठी तयार ठेवतो.
‘गहराईयाँ’चं ओपनिंग बरंच चांगलं निघालं. त्यानं आधुनिक मानवी आयुष्यातील गुंतागुंत बऱ्यापैकी मांडायला सुरुवात केली. ‘दिल चाहता हैं’ आठवतो का तुम्हाला? त्यातील पात्रं आपल्या श्रीमंतीचा निःसंकोचपणे देखावा करतात. त्यांच्या जीवनातील अपयशांवर बिनधास्तपणे बोलतात. म्हणजे अत्यंत दुःखातसुद्धा हिरो बीएमडब्लूमध्ये बसून दर्दभरी गाणी म्हणतो आणि जीवनात होरपळून निघाल्यावर ‘नेपो’ किडसारखा आपल्या बापाचा व्यवसाय चालवतो. त्यात त्या काळाचा एक नवीन म्हणून समजला जाणारा बदल होता, पुरुष स्वतःपेक्षा मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. या गोष्टी त्या काळी खूपच नवीन होत्या.
तर ‘गहराईयाँ’ हा अत्याधुनिक काळातील ‘दिल चाहता हैं’ असं तासाभरात वाटू लागलं. म्हणजे यात नाती होती, पण लग्न नव्हतं. कालसुसंगत विवाहबाह्यसंबंध होते, बोटींवरील घरं होती, आर्थिक गुंतवणूक व फसवणुकीचे धडे होते, विविधरंगी पोशाख होते. हे सगळे कुठे तरी थांबायला हवं, म्हणून एक अगम्य शेवटसुद्धा होता. त्यातील पात्रं आपण आधुनिक आहोत, हे कळू देण्यासाठी क्षणोक्षणी शिव्या देत होती... म्हणजे वाक्यातील व्याकरणाच्या सगळ्या जागा एकदा तरी शिव्यांनी कशा भरून काढता येतील, याचा पुरेपूर विचार ‘स्क्रिप्ट’ लिहिणाऱ्यांनी केला होता. नट मंडळीसुद्धा डायलॉग बोलल्यासारख्या शिव्या देत होती.
वूडी अॅलनसारख्या सिनेमाच्या अपेक्षेनं बसल्याने आम्हाला ‘गहराईयाँ’ घेऱ्या आणत होता. मानवी मनाचे कंगोरे वगैरे पुढे येत असताना एकदम कंटाळा आला (किंवा ‘बजेट संपलं’- अर्थातच सौ.) म्हणून की काय ‘गहराईयाँ’ संपतो. कुठल्याशा अनाकलनीय कारणांमुळे, वाक्याला ठाशीव शिव्या म्हणजे अभिनय या भ्रामक समजुतीमुळे, तसंच शेवटाला एक विचित्र ‘सस्पेंस’ निर्माण (म्हणजे सिक्वेल काढणार की काय आता याचा? इति पुन्हा सौ.च) करून, आमचा सिनेमाबद्दलचा आत्मविश्वास घालवून आणि आमची उरलीसुरली पत खाईत टाकून मोकळा होतो.
सद्यपरिस्थितीत कुटुंबानं माझ्यावर ‘सांस्कृतिक बहिष्कार’ टाकला असून मला या(ही) विषयातील काही कळत नाही, असं ठाम मत तयार करून घेतलं आहे.
‘लूप’ किंवा ‘गहराईयाँ’तून गेल्यामुळे तूर्तास मी सिनेमाच्या लांबीवर नियंत्रण ठेवता येतं काय, यावर चिंतन करतोय...
.................................................................................................................................................................
लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.
salilsudhirjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment