पं. कुमार गंधर्व : संगीताचे आपले सगळे अनुबंध कुमारजींजवळ येऊन थांबतात. हा प्रवास थकवणारा नाही, तर दिवसेंदिवस चैतन्याचा झरा बनून वाहणारा आहे!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
अंजली अंबेकर
  • पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेलं एक पोस्टर
  • Thu , 06 April 2023
  • कला-संस्कृती सतार ते रॉक कुमार गंधर्व Kumar Gandharva

८ एप्रिल २०२३ पासून पंडित कुमार गंधर्व यांचं जन्मशताब्दी वर्षं सुरू होतंय. त्या निमित्तानं मुंबईच्या एनसीपीए ऑडिटोरिअममध्ये ८ आणि ९ एप्रिल अशा दोन दिवशी मैफलींचं आयोजन करण्यात आलंय...

.................................................................................................................................................................

तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची आठवण आहे. मी उन्हाळी सुट्यात औरंगाबादवरून गंगाखेडला, आमच्या गावी आले होते. पंधरा-सोळाव्या वर्षीची सुस्त सकाळ. मी झोपेत. अंगणातून ‘जमुना किनारे मोरा गाँव…’ असे सूर कानावर पडले. झोपमोड झाली. त्या करवादल्या अवस्थेत डोळे चोळत चोळत मी तशीच उठून बाहेर आले. समोर अंगणाच्या एका कोपऱ्यात बीपीएलच्या मोठ्या टेपरेकॅार्डरवर गाणं लागलेलं आणि आमचे अण्णा त्याच्या अवतीभवती तंद्रीत फेऱ्या मारत होते. मी चिडून काहीतरी बोलणारंच, तेवढ्यात तेच स्वतःहून सांगायला लागले, ‘अगं ऐक जरा, केवढा मोठा गायक! कसलं जीव तोडून गातोय!’ ते कुमारजी होते.

तेव्हा शास्त्रीय संगीत ‘विअर्ड’ वाटण्याच्या वयात मी होते… आणि आता शास्त्रीय संगीत सोडून इतर सगळं संगीत ‘विअर्ड’ आहे, असं वाटण्याच्या वयात आहे. या मधल्या भलाथोरल्या कालखंडाचे कुमारजी साक्षीदार आहेत. त्यांनीच या प्रवासात सूरांची अजोड साथ दिली आहे.

दुसरा संदर्भ. प्रसिद्ध लेखिका मेघना पेठे या गौरी देशपांडे या लेखिकेवर लिहिलेल्या स्मृतिलेखांत म्हणतात, “जसा कुमारांचा मालकंस सगळी संपूर्ण संध्याकाळ आपली आणि फक्त आपलीच असताना, कुणाकुणाचीही वाट बघायची नसताना आणि अगदी कशाचीही आठवण काढायची नसताना ऐकावा. मग आपण वाट ही बघू लागतो आणि आठवणीही काढू लागतो. मन रितं असताना करायच्या काही गोष्टी असतात. त्यातच हा कुमारांचा मालकंस.”

अर्थात, मेघनांनी पुढचा संदर्भ वेगळा दिलाय, पण इथं तो प्रस्तुत नाही. आपण कधी पुलंचे, सुनीताबाईंचे, अशोक वाजपेयी यांचे, वसंत पोतदार आणि पंढरीनाथांचे कुमारजी वाचू लागतो, ऐकू लागतो… या सगळ्या प्रवासात आपल्याला आपले असे एकटे कुमारजी भेटतात. मग मात्र पुढचा प्रवास आपला आणि कुमारजींचा होतो… अनेक संदर्भांचं जोखड मानेवर घेऊन.

खरं तर हा प्रवास होतो, पण अलगद जोखड गळून पडतं आणि कुमारजींचे स्वर आपल्याला अनेकविध व्यवधानांतून मुक्त करत जातात. या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाला पुढे वैश्विक परिमाण लाभत जातं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

वडिलांनी आमच्यात लहानपणीच संगीताचं बीज रोवलं. ते गंगाखेडसारख्या आडगावी राहूनही, हैद्राबादपर्यंतचा लांब पल्ल्याचा प्रवास करून शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकायला जात असत. त्यांच्याकडे रेकॅार्ड केलेल्या अनेक दुर्मीळ कॅसेट्सचा संग्रह होता. कुमारजींच्या कॅसेट्स सीडीवर ‘ट्रान्सफर’ करण्याचाही उद्योग मी करून बघितला, पण त्यांचं गाणं डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्यावर तो सोडून दिला.

माझा नवरा सतीशदेखील बावनकशी कुमारभक्त. आम्ही केरळमधील मुन्नारला फिरायला गेलो असताना, चांदण्या साक्षी असताना, हॅाटेलच्या झोपाळ्यावर बसून कुमारांचा हमीर ऐकला आणि लुब्ध झालो. आम्हाला मुलगा झाल्यावर त्याचं नाव ‘हमीर’च ठेवायचं, असं निश्चित केलं होतं. पण ते अनेक बाबींमुळे शक्य होऊ शकलं नाही.

मी पु.ल. देशपांडे कला अकादमीत असताना ‘मालव के रंग’ हा माळवी लोकगीतांवरचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा कलापिनीताई आणि भुवनेशजींचा प्रत्यक्ष परिचय झाला. मी सहज बोलताना हा संदर्भ दिला, तर भुवनेशजी स्वतःच्या संग्रहात हमीर राग सीडीवर कॉपी करून माझ्यासाठी आठवणीने घेऊन आले होते. तो माझ्यासाठी मोलाचा ठेवा आहे. कुमारजींनी गायलेल्या अनेक रागांची अशीच स्वतंत्र आठवण आहे.

संगीताचं व्याकरण मला कळत नाही, पण ते न कळताही संगीताचा मनःपूत आनंद कसा घ्यायचा, हे कुमारजींनी शिकवलं. साहित्याचा अभ्यास न करताही शब्दांना भिडता येतंच, तसंच हेही आहे. कुमारजींची राग शुद्ध श्याममधील ‘मोहे बुलाए…’ ही बंदिश आहे. त्यातल्या ‘समझूना परे… उलझायो रे’ या भावनेसारखं समजून घेता घेता निसटून जातं, असंच काहीसं ‘जो जाने सो कहे नहीं, जो कहे सो जाने ना…’

मीराबाईचं ‘सखी, मोरी निंद नसानी होय...’ हे भजन ऐकताना त्यातली आर्तता स्पर्शून जाते. ‘बिन देखे कल नहीं, परत जिया ऐसी ठानी हो…’ मीराबाईची ही व्याकूळता त्यांच्या शब्दांतून आणि कुमारजींच्या स्वरातून व्यक्त होते. पार्श्वभूमीला वसुंधराताईंच्या आवाजाची त्यांच्या स्वरातील गर्भितार्थ समजून घेऊन तितकीच समर्थ साथ-संगत आहे. ‘पियाजी म्हारे’ या गाण्यातही त्यांचा आवाज ऐकताना तीच आठवण येते… इतक्या या दोन्ही बंदिशी एकमेकांमध्ये मिसळून गेलेल्या आहेत.

कुमारजींचा एकूण संगीत प्रवास, त्यातला संगीत अभ्यास, नवनिर्मिती, पारंपरिक संगीताचं पुनरुज्जीवन, माळवी लोकगीतांचा शोध-बोध हा विस्मयकारी प्रवास आहे. त्यांत अनेकदा प्रकृतीची, नियतीची साथ नसताना जो मोठा स्वरपल्ला त्यांनी गाठला, तो पुढच्या संगीतातील कित्येक पिढ्यांना पुरून उरणारा, आपल्याच स्वरखुणांचा वारंवार मागोवा घ्यायला लावणारा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मानवी भाव-भावनांना स्वरांतून व्यक्त करण्याची कुमारजींची पद्धत अभिनव आहे. मग ती मराठी भावगीतं असो, ‘मला उमजलेले बालगंधर्व’ असो किंवा त्यांनी रचित केलेले ‘निर्गुणी भजनं’ असो. कुमारजी थेट भिडत जातात. निर्गुणी भजनांचा तर त्यांच्या गायकीशी इतका अन्योन्य संबंध आहे की, ‘निर्गुणी’ शब्द उच्चारल्यावर फक्त कुमारजीच दिसतात.

माळवा प्रांत कुमारजींची कर्मभूमी, तिथल्या मातीतलं संगीत कुमारजींना भावलं आणि त्या लोकगीतांना त्यांनी वैश्विक परिमाण देऊन जगासमोर आणलं. माळव्यातील लोकगीतं आणि कुमारजी हेही समीकरण जुळलंच. असे कितीतरी संगीत आशय कुमारजींपाशीच येऊन थांबतात. इतकं पारंपरिक आणि तितकंच प्रयोगशील फक्त कुमारजींचंच गाणं असू शकतं. ‘शुद्ध श्याम’मधील कुमारजी आणि राग केदार गातानाचे कुमारजी वेगळेच. संगीताचे आपले सगळे अनुबंध कुमारजींजवळ येऊन थांबतात. हा प्रवास थकवणारा नाही, तर दिवसेंदिवस चैतन्याचा झरा बनून वाहणारा आहे.

कुमारजी एकीकडे ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’, ‘गीत वर्षा’ आणि ‘गीत शिशिर’ असं ऋतूंमधलं संगीत कवेत घेतात, तर दुसरीकडे सूरदास, मीराबाई, कबीर, तुलसीदास यांच्या रचनांना वेगळा नाद देतात. तुकारामदर्शनाचं विश्वव्यापी तत्त्वज्ञान सुबोध सांगितिक पद्धतीनं आपल्यासमोर सादर करतात. तिसरीकडे गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं निर्मिलेला ‘गांधी मल्हार’ हा राग असतो.

..................................................................................................................................................................  

कुमार गंधर्व गाउनि गेले, तो सूर आपुला आतला - संकलित        

शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नसताना मी एका प्रतिभावंत गायकाचा ‘आतला’ स्वर ऐकला होता!

एखादा स्वयंप्रकाशित तारा आकाशात सदैव चमकत असतो आणि किती तरी प्रकाशवर्षे दूर असणार्‍या दुसर्‍या ग्रहांना तो जाणवतो. त्याप्रमाणे मला कुमारजी थोडेसे जाणवले आहेत, बस इतकंच!

..................................................................................................................................................................          

कुमारजींचं जगणं, जगण्यातलं आकळलेलं सर्व संगीतातूनच अभिव्यक्त व्हायचं, म्हणूनच एवढा मोठा संगीताचा खजिना ते आपल्यासाठी ठेवून गेले. ‘अनुपरागविलास १ व २’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी २५०पेक्षाही जास्त स्वरचित बंदिशी संग्रहित केल्या आहेत. हीदेखील अजोड कामगिरीच म्हणावी लागेल.

इतकी वर्षं इतकं संगीत ऐकल्यानंतरही नेमकं कुमारजींच्या गाण्याबद्दल काय वाटतं? कधी कधी दिवसेंदिवस त्यांचं गाणं ऐकण्यात येत नाही, पण मध्येच मन रितं करून, स्वरांत स्वतःला चिंब करावंसं वाटतं आणि पटकन कुमारजींची ‘प्ले-लिस्ट’ पुढ्यात येते. वाद्यसंगीताच्या मेळांत, दुर्मीळ होत गेलेल्या सूरबहारचं सादरीकरण ऐकल्यावर चित्तवृत्तींमध्ये जो झंकार निर्माण होतो, नेमकं ते आणि तेच कुमारजींचं दीर्घ कालावधीनंतर गाणं कानांवर पडल्यावर होतं.

एकदा नागझिऱ्याच्या जंगलात गच्चं चांदण्यांनी भरलेलं आभाळ पुढ्यात असताना, सोबत माझा (तेव्हाचा पाच वर्षांचा मुलगा) असताना, दोघांनाही एकच गाणं एकदमच आठवलं… ते कुमारजींचं होतं-

गगन में आवाज हो रही हैं,

झिनी झिनी….

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......