बालकृष्ण दाभाडे - विस्मयचकित करणारा अनुभव!
कला-संस्कृती - चित्रनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • बालकृष्ण दाभाडे यांचं पोर्ट्रेट ‘चिन्ह’च्या २०११-१२च्या वार्षिक अंकावरून साभार. हे पोर्ट्रेट दाभाडे यांचे नातू मनिषी यांनी फोटोशॉप तंत्रज्ञानानं तयार केलेलं आहे. सोबत दाभाडे यांच्या एका पुस्तकाचे मुखपृष्ठ व ‘चिन्ह’चे बोधचिन्ह
  • Tue , 04 April 2023
  • कला-संस्कृती चित्रनामा बालकृष्ण दाभाडे Balkrushna Dabhade

तुमचा कोणता लेख तुम्हाला सर्वांत जास्त चांगला वाटतो, असा प्रश्न गेल्या आठवड्यात एका विद्यार्थ्यानं विचारला, तेव्हा त्याचं नेमकं उत्तर देता आलं नाही. प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत नेमकं हेच एकमेव अत्युत्तम सांगणं कठीणच असणार. मी तर प्रदीर्घ काळ पत्रकार आहे. बातमी आणि बातमीच्या अनुषंगानं जास्त लेखन झालं. मी रूढार्थानं काही साहित्यिक नाही, तरी व्यक्तिचित्रं आणि भरपूर ललितलेखन केलं, करतो आहे, हे खरं आहे, पण एक अत्युत्तम लेख असं सांगता येणं कठीण आहे. मग तोच विषय काही दिवस डोक्यात भिरभिरत राहिला आणि लक्षात आलं- चित्रकला, चित्रकार आणि चित्ररसिकांसाठी चळवळ म्हणून एका चित्रकारानं चालवलेल्या ‘चिन्ह’ या नियतकालिकासाठी लिहिलेल्या ‘बालकृष्ण-लीला’ या लेखानं एका वेगळ्या पातळीवरचं समाधान दिलं होतं. 

‘चिन्ह’ या चळवळीचा सर्वेसर्वा सतीश नाईक हा ‘लोकसत्ता’तील माझा सहकारी. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या दुर्दशेविषयी पोटतिडकेनं लिहिणारा, कलाविषयक वेगवेगळ्या विषयावर ‘चिन्ह’चे संपन्न अंक प्रकाशित करणारा हाच तो मनस्वी सतीश नाईक. मी काही चित्रकार नाही, पण चित्रकलेविषयी मनात बालपणापासूनच एक उत्सुकतेची पणती कायम तेवती आहे. पत्रकारितेच्या धबडग्यात शिरण्यापूर्वी भरपूर रेखाटनं करत असे. त्यातील काही प्रकाशितही झाली. विशेषत: राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आल्यावर पुढे तो छंद मागे पडला तो मागेच पडला.

आमच्या घरात आजही गगेंद्रनाथ टागोर यांनी १९२५ साली काढलेले ‘द प्रिन्सेस’, प्रसिद्ध चित्रकार दिगंबर मनोहर (शेफ विष्णू मनोहर यांचे वडील) यांचा ‘विठ्ठल’ यासह विवेक रानडे, दिलीप बडे यांची भरपूर चित्रं आहेत. बहुदा हा संदर्भ बोलण्यात आलेला असावा आणि तो लक्षात ठेवून एका दिवशी सतीश नाईकचा फोन आला. आम्ही दोघंही तेव्हा ‘लोकसत्ता’पासून दूर झालेलो होतो. सतीशनं ‘चिन्ह’साठी स्वत:ला वाहून घेतलेलं होतं आणि चित्रकार गायतोंडे यांच्यावर एका महत्त्वाकांक्षी पुस्तक प्रकाशनाचा प्रकल्प हाती घेतला होता. मीही ‘डायरीनंतरच्या नोंदी’, ‘दिवस असे की...’ आणि ‘ग्रेस नावाचं गारुड’ अशा एकाच वेळी तीन पुस्तकांवर काम करत होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘चिन्ह’साठी’ बालकृष्ण दाभाडे (६ ऑगस्ट १९०९ ते २२ मे १९७९) यांच्यावर एक लेख हवा आहे, असा हुकूम सतीशनं सोडला आणि ‘हे काम तूच करू शकतो’, असंही मला झाडावर चढवलं.

दाभाडे कुटुंब मूळचं हे सांगलीजवळ असलेल्या मिरज इथलं. त्यांचे आजोबा १८१८च्या दरम्यान औंधला येऊन स्थायिक झाले. श्लोक, पदं, आर्या, दिंड्या, पोवाडे, जोगवे रचणारे मार्तंडबुवा दाभाडे हे बालकृष्ण यांचे वडील. मार्तंडबुवांचा तोच साहित्य, चित्रकला आणि संगीताचा वारसा बालकृष्ण यांच्या रक्तात जन्माजात आला. औंध संस्थानाच्या दरबारात केलेल्या पहिल्या किर्तनानंतर बालकृष्णला ‘बाल हरदास दाभाडे’ असा सन्मान प्रदान करण्यात आला.

दाभाडे यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे स्वांतत्र्याच्या चळवळीत ते ओढले गेले. त्यांनी खादीचं व्रत स्वीकारलं. त्यांना राजकारणाची ओढ लागली. मुलानं राजकारणात जाऊ नये म्हणून मार्तंडबुवा यांनी बालकृष्णला औंधला बोलावून घेतलं आणि पंतप्रतिनिधीच्या शाळेत कीर्तन शिक्षक म्हणून नोकरी लावून दिली.

याच काळात भारतीय कला आणि संस्कृतीचा थक्क व्हावा, असा व्यासंग दाभाडे यांनी केला. संस्थानच्या नोकरीतच असताना भारतीय चौसष्ट कलांची माहिती समग्रपणे देणारा ‘भारतीय चित्रकला’ हा ग्रंथ लिहिला. त्याला आता प्रकाशित होऊन ९० वर्षं उलटली, तरी भारतीय चित्रकला, तसंच शिल्पकलेवर मूलभूत आणि चिकित्सकतेनं झालेलं साक्षेपी लेखन म्हणून हा ग्रंथ आजही प्रमाण मानला जातो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

औंधच्या दरबारातच बालकृष्ण दाभाडे आणि औंधची राजकन्या वासंतिका यांच्यात प्रेमांकुर रुजले आणि बहरलेही. तोपर्यंत बालकृष्ण दाभाडे हे नाव मराठी साहित्य, सौंदर्य अभ्यासक, लेखक, कवी, गीतकार म्हणून दुमदुमू लागलं होतं. ‘शशांक’ या नावानं काव्यलेखन करणाऱ्या दाभाडे यांच्या कवितांना माधवराव पटवर्धन, ना. गो. चाफेकर, अ. य. देशपांडे, केशव सीताराम ठाकरे, आचार्य अत्रे, अनंत काणेकर सारख्यांची दाद मिळाली होती.

वासंतिका आणि बालकृष्ण तोपर्यंत विवाहबंधनात अडकण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले होते. पुढे हा विवाह प्रख्यात महानुभाव संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी नागपुरात लावून दिला. त्याची हकिकत डॉ. वि. भि. कोलते यांच्या ‘अजूनही चालतोचि वाट’ या आत्मचरित्रात पृष्ठ २३७वर आहे. दरम्यान या प्रमादामुळे दाभाडे यांच्यावर मराठी साहित्य जगतानं बहिष्कार घातला, म्हणून प्रेमविवाहानंतर दाभाडे मध्य प्रदेशात स्थायिक झाले आणि त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांनी चित्रकला थांबवली, गाणं थांबवलं, कीर्तन बंद केलं आणि कवितेलाही संन्यास ठोकला. उर्वरित आयुष्य संशोधन आणि संकलन या क्षेत्रांना वाहून घेतलं. त्यांनी अनेक हस्तलिखित जमा केली. अनेक दुर्मीळ ग्रंथ शोधून काढले. सुमारे ८०० हस्तलिखितं जमा केली. अखेरचा श्वास घेईपर्यंत दाभाडे संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत होते.

थोडक्यात, काय तर स्वकैफात जगलेला एक कलासक्त ज्ञानोपासक दाभाडे होत आणि प्रेमविवाहानंतर मराठी साहित्य क्षेत्रातील अभिजनांनी त्यांना वाळीत टाकलेलं होतं. ही सर्व माहिती ‘चिन्ह’च्या रौप्य महोत्सवी वार्षिक अंकात (२०११-१२) लेखात आलेली आहे. हा लेख माझ्या ‘क्लोजअप’ (प्रकाशक- देशमुख आणि कंपनी, पुणे) या व्यक्तिचित्रसंग्रहातही आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पण ही माहिती मिळवणं सोपं नव्हतं. त्यासाठी मी औंधला, मिरजेलाही जाऊन आलो, जबलपूरलाही गेलो. या सर्व ठिकाणी सलग काही नाही, तर तुटक तुटक काही हाती येत होतं. याच भटकंतीत दाभाडे यांचा मुलगा नागपुरात असल्याचं समजलं. जबलपूर ते नागपूर प्रवासात ते दाभाडे कोण असावेत, हाच विचार मनात घोळत असताना अचानक वीज चमकावी, तसं ‘पंचम’ हे नाव आठवलं. मी नागपूरला १९८१ साली पत्रकारिता करण्यासाठी आलो. तेव्हा ८२ का ८३ साली ‘पंचम’ या नावानं पाच छायाचित्रकारांनी त्यांच्या छायाचित्रांचं एक प्रदर्शन भरवलं होतं. त्याचा एक पानभर वृत्तांत भरपूर छायाचित्रांसह मी लिहिला होता. तो वाचल्यावर ‘पंचम’च्या त्या पाचपैकी एक असलेले डॉ. श्रीकांत दाभाडे मला भेटण्यासाठी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या कार्यालयात आले होते, पण नंतर त्यांच्याशी माझा कोणताच संपर्क राहिलेला नव्हता. एलआयटी या उच्च शिक्षण संस्थेत ते प्राध्यापक होते, हेही आठवलं.

नागपूरला परतल्यावर एलआयटी गाठलं, पण तोपर्यंत श्रीकांत दाभाडे सेवानिवृत्त झाले होते. मग एलआयटीच्या निवृत्त प्राध्यापकांचा शोध आणि टेलिफोन डिरेक्टरीत असलेल्या ‘दाभाडें’ना संपर्क साधणे अशी मोहिमच हाती घेतली. एक फोन उचलला, तो नेमका श्रीकांत दाभाडे यांनीच! चौकशीअंती बालकृष्ण दाभाडे यांचे चिरंजीव तेच असल्याचं समजलं आणि लेख पूर्ण होण्याच्या दिशेनं एक पाऊल ठामपणे पुढे पडलं.

मग त्यांना जाऊन भेटलो. अनेकदा भेटलो. बालकृष्ण दाभाडे यांनी लेखन, काव्य, संशोधन, समीक्षा, चित्रकला, शिल्पकलेसोबतच अनेक क्षेत्रांत सोनेरी पताका झळकवलेल्या होत्या, हे श्रीकांत दाभाडे यांच्या बोलण्यातून लक्षात येतं गेलं. १९४६ साली हडप्पाच्या संशोधनात नंतर तत्कालीन म्हैसूर प्रांतातील ब्रह्मगिरी परिसरात झालेल्या पुरातत्त्व संशोधनात बाळकृष्ण दाभाडे कसे सहभागी झाले होते, ही नवीन माहिती मिळाली. बालकृष्ण दाभाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची मिळाली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाची छायाचित्रंही मिळाली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

श्रीकांत दाभाडे यांनी ‘प्रा. बा. मा. दाभाडे व्यक्ती आणि वाड्मय’ हे दुर्मीळ पुस्तकही भेट म्हणून दिलं. वृत्तपत्रीय भाषेत सांगायचं तर डेडलाइन पाळता आली नव्हती, पण सतीश नाईक यांची बालकृष्ण दाभाडे यांच्यावरची निष्ठा, लेखाबाबतचा संयम आणि उत्साह दाद देण्यासारखा होता. अफाट कर्तृत्व बजावलेल्या, पण कृतज्ञ स्मरणाची ‘नाही चिरा नाही पणती’; उपेक्षाच वाट्याला आल्याची, ही अशी अवस्था असणाऱ्या बालकृष्ण दाभाडे यांच्याबद्दल ‘चिन्ह’साठी लिहिता आलं. लेख प्रकाशित झाला, कला जगतातून त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. जवळजवळ साडेचार महिने झालेली धावपळ एक विस्मयचकित करणारा अनुभव देऊन थांबली.

अगदी प्रामाणिकपणे सांगतो, लेखांमुळे कायमच लेखनानंद मिळाला, असंख्य वाचकांचं प्रेम मिळालं, मात्र ‘बालकृष्ण-लीला’, तसंच ‘माई’ या माझ्या आईवर लिहिलेल्या दोन लेखांनी जितकं थकवलं आणि मोठ्ठं समाधान दिलं, तेवढं अन्य मजकुरानं दिलेलं नाही.

.................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख