अजूनकाही
आदित्य बिर्ला उद्योगसमूहातर्फे ‘आद्यम’ या प्रकल्पांतर्गत २०१५पासून दरवर्षी दर्जेदार नाटकं सादर केली जातात. २०२३ हे या उपक्रमाचे सहावे वर्ष. यंदा त्यात ‘बागी अलबेले’ हे हिंदी-पंजाबी नाटक बघण्याचा योग आला. हे नाटक निक व्हिटबी (जन्म : १९६३) या ब्रिटिश नाटककाराच्या ‘टू बी ऑर नॉट टू बी’ या नाटकावर आधारित आहे. या पुरोगामी विचारांच्या नाटककाराची ‘बोलेव्हिया’ (१९८४), ‘डर्टी डिशेस’ (१९८६), ‘कोलंबियन कझीन्स’ (१९८७) ही इतर काही प्रसिद्ध नाटकं आहेत.
ज्येष्ठ दिग्दर्शक अतुल कुमार यांनी हे नाटक दिग्दर्शित करण्याचे आणि त्याचे ‘भारतीयीकरण’ करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांच्यासमोर पंजाब प्रांत, पंजाबी भाषा आली. या प्रांतातून अनेक क्रांतिकारक पुढे आलेले आहेत. म्हणून या प्रयोगाची जाहिरात ‘हिंदी-पंजाबी’तील नाटक अशी केली आहे.
नाटकाचा काळ आहे विसावं शतक संपतानाचा. कथानक घडतं, पंजाबमधील लुधियाना शहरात. अचानक सरकारी हुकूम जारी होतो- सर्व प्रकारच्या कलांवर बंदी आहे. त्यानुसार ग्रंथालयं बंद केली जातात, वस्तुसंग्रहालयं जाळून टाकण्यात येतात.
या नाटकाच्या केंद्रस्थानी एक ‘ढ’ दर्जाची नाट्यसंस्था आहे. ती नावाप्रमाणेच अतिशय वाईट नाटकं करण्याबद्दल कुप्रसिद्ध आहे. मात्र ही नाटक गल्लाभरू असल्यामुळे नाटकांतून चांगलं उत्पन्न होत असतं. सरकारी हुकमाप्रमाणे आता ही नाट्यसंस्था बंद करावी लागेल. त्यामुळे नटांच्या आणि इतरांच्या उदरनिर्वाहाची समस्या उभी राहते. ‘बागी अलबेले’ म्हणजे त्या नाट्यसंस्थेची टिकून राहण्याची धडपड. ‘बागी’ म्हणजे बंडखोर.
वर उल्लेख केल्याप्रमाणे हे नाटक दुसऱ्या महायुद्धाची टिंगल करणाऱ्या पोलिश नाटकावर आधारलेलं आहे. तेव्हाचा पोलंड हा देश नाझी जर्मनीच्या टाचेखाली होता. या नाटकात ‘बंड’ हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. आधुनिक पंजाबाचा इतिहास बंडखोरांनी भरलेला आहे. त्यातलं चटकन आठवणारं नाव म्हणजे शहिद भगतसिंग. म्हणूनच दिग्दर्शक अतुल कुमार यांची पंजाबची, पंजाबी भाषेची निवड योग्य आहे, असं म्हणावं लागतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘हॅम्लेट’ या नाटकात जॉनी मखिजा आणि मिनी मखिजा हे पती-पत्नी भूमिका करत असतात. हॅम्लेटच्या भूमिकेत असलेला जॉनी मखिजा जेव्हा ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हे गाजलेलं स्वगत सादर करायला सुरुवात करतो तेव्हा भूमिगत, चळवळीतील सुखिंदर नावाचा एक देखणा कार्यकर्ता प्रवेश करतो. सरकारी गुप्तहेर अशा कार्यकर्त्यांच्या मागावर असतात. हा बंडखोर कार्यकर्ता नाट्यसंचाला मदत मागतो.
पोलीस मागावर असल्यामुळे नाट्यकर्मी वेगवेगळ्या प्रकारे सरकारी गुप्तहेरांना गुंगारा देतात. मात्र त्यांना अंदाज असतो की, हे फार काळ चालणार नाही आणि एके दिवशी आपल्याला इंग्लंडला पळून जावं लागेल. सर्व नाट्यसंच त्या दृष्टीनं प्रयत्नाला लागतात.
इथं मला ‘एस्केप टू व्हिक्टरी’ या १९८१ साली प्रदर्शित झालेल्या हॉलिवुडच्या चित्रपटाची आठवण झाली. त्यात फुटबॉल सामना खेळता खेळता सर्व संघ नाझींच्या तुरुंगातून पळून जातो.
कार्यकर्त्यांच्या अशा अवेळी निघून जाण्यामुळे जॉनीची एकाग्रता भंग पावते, तर त्याची पत्नी मिनी मखिजा त्या तरुण, देखण्या कार्यकर्त्याच्या प्रेमात पडते. या स्थितीत कलेवर बंदी आणणारा सरकारी हुकूम जारी केला जातो. सर्व नटसंच एकीकडे आता कसं जगायचं, या विवंचनेत असतो; तर दुसरीकडे या ना त्या प्रकारे नाटक कसं सादर करता येईल, याचा विचार करत असतो.
हे नाटक बघताना मला ‘टेकिंग साईडस’, ‘माय लास्ट प्ले’ वगैरे आधुनिक कलाकृतींची आठवण येत होती. त्यांत लेखक-कलाकारांनी कधी नाझी राजवटीची, तर कधी हुकूमशाहीची खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर कधी लेखक-कलाकारांच्या जबाबदारीवरही प्रकाश टाकला आहे.
दिग्दर्शक अतुल कुमारचं मोठेपण असं की, त्याने मूळ नाटकात नाझी राजवटीचा काळ दाखवला असला, तरी आता जगातील अनेक देशांत असं वातावरण आहे, हे लक्षात घेऊन त्याला एक प्रकारचा कालातीत स्पर्श दिला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नाटकाची सुरुवात होते, तेव्हा नटसंच ‘कलाकारों का कब्रस्तान’ या नाटकाची तालीम करत असतो. तेवढ्यात सर्व कलांवर बंदी घालणारा सरकारी हुकूम येतो. ही नाट्यसंस्था त्याकडे दुर्लक्ष करत पुढच्या आठवड्यात ‘हॅम्लेट’चा प्रयोग सादर करायचा ठरवते. त्यामुळे त्यांच्यात आणि सरकारी यंत्रणेत वाद सुरू होतो. या गडबडीत नाट्यसंस्था इंग्लंडला पळून जाण्यात यशस्वी होते. तिथं ते त्यांचा ढिसाळ दर्जाचा ‘हॅम्लेट’ सादर करतात. इंग्रज प्रेक्षक हे नाटक सुरू असताना, खास करून ‘टू बी ऑर नॉट बी’ हे स्वगत सुरू असताना उठून जातात.
हे नाटक वेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करतं. सामान्य दर्जाची कला समाजावर कितपत प्रभाव टाकू शकते? अशा कलांवर सरकारने बंदी घालावी का? यात सरकारात नोकरी करणाऱ्या नोकरशहांचा अहम गोंजारला जातो का? अशा प्रकारे सत्ताधारी वर्गाने स्वत:ला कलेपासून दूर ठेवावं का? वगैरे प्रश्न कळत-नकळत उभे राहतात.
या नाटकात एक महत्त्वाचा संवाद आहे. ‘कलाकारों का कब्रस्तान’च्या दिग्दर्शकाला पोलीस इन्स्पेक्टर सांगतो- ‘नवीन नियमांप्रमाणे सत्य दाखवणे गुन्हा आहे. तुम्ही देशद्रोही आहात’. त्यावर दिग्दर्शक उत्तरतो- ‘आरसा तोडून कोणाचं भलं झालं आहे?’ नाटकातल्या हॅम्लेटला ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हा संवाद पूर्णपणाने सादर करण्याची संधी मिळत नाही. मात्र बघता बघता शेक्सपिअरचा हा अजरामर संवाद वेगळ्या प्रकारे अर्थपूर्ण होतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’मधील आणखी एक महत्त्वाचा संवाद म्हणजे – “Something is rotten in the state of Denmark. That one may smile and smile and be a villain. There are more things in heaven and earth, Horatio, than are dreamt of in our philosophy.” अशा सडलेल्या देशात राहायचं की नाही, टू बी ऑर नॉट टू बी, हा खरा प्रश्न आहे. असे टोकदार प्रश्न उपस्थित करणारी खरी कालातीत कला.
या नाटकाच्या संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत अतुल कुमार म्हणाला की, “The Orwellian image of art and artists in India is slowly coming true. The siege under which the freedom of art and artists find themselves is now real & terrifying. The shows are cancelled, support is withdrawn, threats are issued, long & drawn-out court cases are filed, and eventually all performance platforms and access are bought. It is within this political-cultural climate, where art and artists’ freedom are targeted, that we set our play, ‘Baaghi Albele’. An attempt to underline, through our performance, the relevance of art and artists to the healthy growth of a nation. And their resilience and resolve to exist, to express themselves, and to fight against all hurdles & curbs. I honestly couldn’t think of a better story to adapt and play out as a farce.”
अतुल कुमार ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत. त्यांना दिग्दर्शनाचा सुमारे ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हे नाटक उत्तम प्रकारे सादर केलं आहे. हे एक प्रकारचं समूह नाट्य आहे. यासाठी त्यांना अदिती अरोरा (इंदू), आयेषा रझा (मिनी मखिजा), विमल ओबेरॉय (इन्स्पेक्टर किलमाडी) वगैरे ज्येष्ठ नटांची साथ लाभली आहे. राहुल जोगळेकर (प्रकाशयोजना), गुंजन शुक्ला (पार्श्वसंगीत) यांनी नाटकाच्या आशयाला पूरक अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे हे नाटक हा एक प्रसन्न अनुभव ठरतो. मात्र नाटकाचा गंभीर आशय गुदमरत नाही, याची आवर्जून उल्लेख केला पाहिजे.
लेखक-कलाकार आणि त्यांना लगाम घालणारी शासनव्यवस्था, हा एका प्रकारे सनातन विषय आहे. कला निर्माण झाली, तेव्हापासून या दोन शक्तींत रस्सीखेच सुरू आहे. म्हणूनच या नाटकासारख्या कलाकृती सतत सादर होत राहिल्या पाहिजेत, जेणेकरून लेखक-कलाकारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल.
.................................................................................................................................................................
लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment