एस.एन.त्रिपाठी : पौराणिकतेचा शिक्का बसलेला गुणी संगीतकार
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • संगीतकार एस.एन.त्रिपाठी
  • Sat , 25 March 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi एस.एन.त्रिपाठी S. N. Tripathi

गीता दत्तचा अगदी सुरुवातीचा कोवळा आवाज. तरुणपणीची देखणी मीनाकुमारी. गीताचे बोल आहेत -

मेरे नैनों में प्रीत, मेरे होठों पे गीत

मेरे सपनों मे तुम हो समाये 

आज मन की कली फुल बनके खिली

चांदनी जैसे चंदासे हसकर मिली

बजी मुरली मोहन लगी मन मे लगन

मेरी आशा ने दीप जलाऐ

गाण्याची चाल अतिशय मधुर. पण सगळा घोटाळा होतो तो चित्रपटाचं नाव ऐकलं की! चित्रपटाचं नाव आहे- ‘श्री गणेश महिमा’ (१९५०). बस्स, मग पुढचं काहीच ऐकून न घेता रसिक पाठ फिरवतो. एस.एन.त्रिपाठीसारख्या गुणी संगीतकाराचं हे दुर्दैव. पौराणिक चित्रपटाचा शिक्का त्रिपाठी यांच्यावर एकदाचा पडला आणि त्यांची प्रतिभा काहीशी उपेक्षिली गेली.

वाराणसीत १४ मार्च १९१३ ला जन्मलेल्या श्रीनाथ त्रिपाठी यांचं नशिब पौराणिक चित्रपटांशी असं काही जोडलं गेलं की, त्यांना प्रचंड काम मिळालं, पण सोबतच मुख्य धारेतल्या संगीतापासून ते दूर फेकले गेले. पंचाहत्तर वर्षं जगलेल्या त्रिपाठींनी पंचाहत्तरहून अधिक चित्रपटांना (७९) संगीत दिलं. फक्त इतकंच नाही तर २७ चित्रपटांमधून अभिनय केला, १८ चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. यामुळेही असावं कदाचित त्रिपाठी यांची संगीतकार म्हणून प्रतिमा रसिकांच्या मनात ठसली नाही. 

पण त्रिपाठी यांच्यातील संगीतगुणांची एका मोठ्या व्यक्तीनं खुलेपणाने तारीफ करून त्यांच्यावरील हा अन्याय दूर करण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. महान संगीतकार गायक उस्ताद अमीर खान यांनी हिंदी चित्रपट संगीतातील केवळ चारच संगीतकारांच्या कामांबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यांनी नौशाद आणि वसंत देसाई यांची नावं घेणं स्वाभाविकच होतं. कारण या दोघांना शास्त्रीय संगीताची बारीक जाण होती. एका मर्यादेपर्यंत सी.रामचंद्र यांनाही त्यांनी गौरवलं. पण चौथं नाव त्यांनी त्रिपाठी यांचं घेतलं. ही बाब निश्चितच समाधान देणारी होती. 

त्रिपाठी यांच्या संगीताचा विचार करताना चार महत्त्वाच्या चित्रपटांमधील गाण्याचा विचार करावा लागेल.

१९४१ पासून संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या त्रिपाठी यांना व्यावसायिक यश आणि लोकप्रियता मिळायला तब्बल १६ वर्षं लागली. ‘जनम जनम के फेरे’ (१९५७) या चित्रपटात रफी आणि लताच्या गोड आवाजात ‘जरा सामने तो आवो छलिये, छुप छुपके चलने में क्या राज है, ये छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है’ हे गाणं झळकलं. आणि बघता बघता त्याला लोकांनी उचलून धरलं. बिनाकात हे गाणं त्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आलं. या चित्रपटातील इतरही गाणी मधुर होती. मन्ना डेच्या आवाजात ‘तन के तंबोरे में सासों की तार बोले जय राधेश्याम’ हे गाणं- जे पुढे अनुप जलोटानीही गायलं - याच चित्रपटात आहे. या भजनाची चालही गोड आहे. 

दुसरा चित्रपट, ‘रानी रूपमती’ (१९५९9) याने त्रिपाठींना यश मिळवून दिलं. यातील मुकेशचं ‘आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है’ बिनाकात सहाव्या क्रमांकावर होतं. रानी रूपमतीच्या निमित्तानं अजून एक गोष्ट घडली. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला त्रिपाठींचा हा पहिलाच चित्रपट. शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांचंच होतं. हे यशच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीतील अडथळा बनलं. कारण पुढे त्यांना दिग्दर्शनासाठी भरमसाठ पौराणिक चित्रपट मिळत गेले. परिणामी त्यांच्या संगीतावर परिणाम झाला. 

‘रानी रूपमती’मधील एक निसर्ग गीत अगदी अप्रतिम आहे. ‘फुल बगिया में बुलबुल बोले, डालपे बोले कोयलिया, प्यार करो रूत प्यार की आयी, भवरें से कहती है कलिया’ या भरत व्यासांच्या शब्दांना लता-रफीच्या आवाजानं अजूनच रंग चढला आहे. 

तिसरा चित्रपट ज्याला व्यावसायिक यश मिळालं तो म्हणजे ‘संगीत सम्राट तानसेन’ (१९६२). यातील मुकेशचं गाणं ‘झुमती चली हवा, याद आ गया कोई’ विशेष गाजलं. या सगळ्या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा अप्रतिम असा स्पर्श त्रिपाठी यांनी दिला होता. अर्थात ती विषयाची गरज होतीच. ‘झुमती चली हवा’ राग सोहनीवर बेतलेलं होतं.

त्रिपाठी यांची ताकद म्हणजे १९६० ला प्रदर्शित झालेल्या ‘मोगल-ए-आझम’मध्ये सोहनी रागातली  ‘प्रेम जोगन बन के’ ही उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्या आवाजातली बंदिश नौशाद यांनी वापरली होती. प्रेमासाठी वापरलेला हा राग मुकेशच्या आवाजात दु:ख व्यक्त करण्यासाठी त्रिपाठी यांनी वापरला. रागदारीचा कल्पक वापर त्रिपाठी यांनी केला आणि त्याला रसिकांनीही प्रतिसाद दिला.

त्रिपाठी यांचा अजून एक चित्रपट विशेष उल्लेख करावा असा आहे. पौराणिकतेचा शिक्का असतानाही त्यांनी ‘लाल किला’ (१९६१) नावाचा चित्रपट केला. त्यातील बहादूरशहा जफरची प्रसिद्ध रचना ‘न किसी की आंख का नूर हू’ रफीकडून गावून घेतली. यात वाद्यांचा वापर जवळपास नाहीच. ही नज्म आहे. पण बऱ्याच ठिकाणी चुकून ग़ज़ल असाच तिचा उल्लेख केला जातो.

याच चित्रपटात बहादूरशहा जफरची दुसरी रचना ‘लगता नही दिल मेरा उजडे दयार मे’ रफीच्याच आवाजात आहे. ही जफरची सुंदर ग़ज़ल आहे. 

लगता नही दिल मेरा उजडे दयार मे

किसी की बनी है आलम-ए-ना-पायेदार मे

कह दो इन हसरतों से कही और जा बसे

इतनी जगह कहां है दिल-ए-दागदार मे  

याच ग़ज़लमध्ये तो सुप्रसिद्ध शेर आहे ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो.

उम्रे दाराज से मांग के लाये थे चार दिन

दो आरजू में कट गये, दो इंतजार में

(याच ओळींवर पुढे प्रसिद्ध मराठी कवी नारायण सुर्वे यांनी कविता लिहिली होती ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले, हिशोब करतोय किती राहिलेत डोईवरती उन्हाळे’.)

जफरला ब्रह्मदेशात नजरकैदेत ठेवलं गेलं होतं. परिणामी त्याला माहीत होतं की, तो आता परत हिंदुस्थानात येऊ शकत नाही. तेव्हा जफरने लिहिलं -

कितना है बदनसीब जफर दफन के लिए

दो गज जमि भी न मिली कु-ए-यार में

त्रिपाठी यांची इतर गाणी आज फारशी ऐकायला मिळत नाहीत. मराठी रसिकांसाठी त्रिपाठी यांच्याबाबतचा एक छोटा संदर्भ. काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेल्या मराठी गायिका कृष्णा कल्ले यांचं एक गीत ‘तूने मुस्कुराके देखा’ हे ‘शंकर खान’ (१९६६) चित्रपटात रफीसोबत त्यांनी दिलं आहे. पण ते फार विशेष नाही.

२८ मार्च १९८८ ला त्रिपाठी यांचं निधन झालं. ‘मी माझ्या कैफात नांदतो ऐश्वर्याचा राजा’ असं त्यांनी आपल्या पौराणिक चित्रपटाच्या क्षेत्रात धुंदीत आयुष्य घालवलं. आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचा कधी फारसा उल्लेख केला नाही. हे त्यांच्या मनाचं मोठेपणच म्हणावं लागेल.  

  

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख