‘तोडी मिल फॅंटसी’ : सॉल्लीड! तुम्हाला वास्तव माहीत असेल, तर ही फॅंटसी पाहून तुम्ही नक्की अंतर्मुख व्हाल!  
कला-संस्कृती - नाटकबिटक
महेंद्र तेरेदेसाई
  • ‘तोडी मिल फॅंटसी’ची दोन पोस्टर्स आणि त्यातील काही प्रसंग
  • Fri , 30 December 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक तोडी मिल फॅंटसी Todi Mill Fantasy

फॅंटसीचा वास्तवाशी काय संबंध?

वास्तव ठरवतं फँटसी काय आहे ते.

पण ज्यांना वास्तवच माहीत नाही, किंवा ज्यांना माहीतच करून घ्यायचं नाही, किंबहुना ज्यांना ते नाकारायचंच आहे, ते फँटसीतच जगतात किंवा तसं जगणंच पसंत करतात.

उदाहरणार्थ, गिरणगाव! 

गिरणगाव हा मुंबईचा इतिहास म्हणावा की, उत्क्रांतीचा एक टप्पा?

त्या काही वर्षांत इतक्या झपाट्यानं बदललीय मुंबई की, तो इतिहास न वाटता ‘उत्क्रांती’च वाटावी!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

रोजगार शोधत कोकणातून मुंबईत आलेला व ऐटबाज झालेला चाकरमानी पोटाची खळगी भरल्यावर, या शहरावर, कोकणातल्या संस्कृतीचं कलम करू लागला. श्रावणातल्या शिमगा-दहीकाल्यापासून भाद्रपदातल्या गणपतीपर्यंतचे सण तो इथं साजरे करू लागला. शहरातल्या दिवाळीचा त्याचा उत्साह त्याला मिळणाऱ्या बोनसपर्यंतच मर्यादित राहिला. 

त्याने इथं आपलं गाव वसवलं… गिरणगाव!

ते वसवलं खरं, पण भोवताली शहर होतंच. तेही मुंबई. जिचं गारूड त्याला नाही, तरी त्याच्या दुसऱ्या पिढीला बदलू लागलं. त्यातून कामगार, नेते, कवी, चित्रकार यांच्यापासून बुद्धिवंत ते अंडरवर्ल्डचे पंटर निर्माण झाले. नंतर राजकारणी आले. संपाची ठिणगी पडली नि वसू लागलेली रावणाची लंका पेटली. काही काळानं आग विझू लागली. काही ठिकाणी राख झाली होती, तर काही ठिकाणी निखारे उरले. राजकारण्यांनी बिल्डर व गुंडांच्या साहाय्यानं त्या राखेतून टॉवर उभारले. निखारे तिथंच उरले. नंतर त्यावरही राख जमू लागली. फॅंटसीची राख.

आज एकविसाव्या शतकातली ही पिढी.

त्यांचं नाटक ‘तोडी मिल फॅंटसी’.

सुजय जाधव लिखित व विनायक कोळवणकर दिग्दर्शित एक म्युझिकल उधळण.

जावेद अख़्तर म्हणाले होते, ‘दिन में उम्मीद हो, तो ही रातों को सपने आते हैं’.

त्या निखाऱ्यात ती उम्मीद आहे. म्हणूनच ते स्वप्नही पाहताहेत. पण त्या निखाऱ्यात आयुष्य उजळून टाकण्याची क्षमता मात्र दिसत नाहीय. एकेकाळी टोलेजंग वाटणाऱ्या चाळी, त्याच पाडून उभ्या राहिलेल्या टॉवर आणि मॅाल्स समोर खुज्याच नाही, तर दिसेनाश्या झाल्यात. तिथल्याच सुलभ शौचालयाच्या टाकीवर बसून ते निखारे स्वतःच्या नवीन व्यवसायाच्या योजना आखताहेत. आपल्या विझत चाललेल्या संस्कृतीचा वापर ‘हेरिटेज टुरिझम’सारखा करून त्यांना पैसे कमवायचे आहेत. सोशल मीडिया नि ओटीटीच्या खिडकीतून जग पाहणाऱ्या त्यांना आता चाळीतून टॉवरमध्ये शिफ्ट व्हायचंय. ते शिफ्ट होतील की नाही, माहीत नाही, पण आज त्यांना जगवायला ती फॅंटसी पुरेशी आहे. ही फॅंटसी लेखकानं उत्तम मांडली आहे. दिग्दर्शक व म्युझिक कंपोझर ती एन्जॉय करतात. पण….

उस में और थोडा नमक होता, तो मजा आता!

‘तोडी मिल’ फॅंटसीमध्ये वास्तवाचं मीठ थोडं कमी पडलंय. त्यामुळे फॅंटसी एन्जॉय करण्याच्या नादात प्रेक्षकांना वास्तवाचं भान येत नाही.

नाटककाराचा तोच हेतू होता का? माहीत नाही.

या म्युझिकलमधलं म्युझिक लाईव्ह आहे. ते खटकत नाही, पण ते त्या नाटकाचं बलस्थान असायला हवं, ते मात्र होत नाही. लेकीन कंपोझर देसी रिफ्फ और कपिल रेडेकर में दम तो लगा बॉस! आणि तेवढाच दम सगळ्या ॲक्टर पोरांमध्येही वाटला. ती तीन पोरं आजच्या तिथल्या युवकांचं प्रतिनिधत्व करणारी वाटली. तिघांनी आपल्या खास शैलीतून ती पेश केलीत. खूप भूमिका करणारा एक पोरगा अष्टपैलू होता. और, इशाचा रोल करणारी पोरगी तर यकदम सड्डम में टड्डम. तिला पाहून ‘गुलाम’मधल्या राणीची आठवण होते!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे नाटक आजचा युवक (जो फक्त एकांकिका स्पर्धांना जातो) डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलंय. त्यात ते यशस्वीही झालंय. आता त्या युवकांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. दिला, तर मराठी थिएटरला त्याचा खूप फायदा होईल.

बाकी थिएटर फ्लेमिंगो व देसीरिफ्फची ही ‘तोडी मिल फॅंटसी’ सॉल्लीडय! तुम्हाला वास्तव माहीत असेल, तर ही फॅंटसी पाहून तुम्ही नक्की अंतर्मुख व्हाल!  

.............................................................................................................................................

लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख