मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांना नुकतंच ‘चतुरंग जीवनगौरव पुरस्कारा’नं गौरवण्यात आलं. ४ डिसेंबर २०२२ रोजी गोव्यात झालेल्या शानदार समारंभात राजदत्त यांना हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेतील लेखाचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ ‘राजदत्त’ यांचा जन्म २१ जानेवारी १९३२ रोजी अमरावतीमधील धामणगाव येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेत तिकीट तपासनीस होते. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असे. त्यामुळे दत्ताजींचे शिक्षण अकोला, अमरावती, बडनेरा, भंडारा अशा विविध ठिकाणी झाले. सततच्या बदलीमुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांचे वडील कुटुंबाला धामणगाव येथे ठेवून नोकरीच्या ठिकाणी जात असत.
१९५० साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दत्ताजींनी वर्धा येथील ‘गोविंदराम सक्सेरिया कॉलेज ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ग. त्र्यं. माडखोलकरांनी दत्ताजींना दै. ‘तरुण भारत’मध्ये ‘युनिव्हर्सिटी’ हे सदर लिहायला सांगितले. त्यात ते महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, कॉलेज विश्वातील घडामोडी इत्यादींवर लिहू लागले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर व १९५४मध्ये बी.कॉम.ची पदवी मिळाल्यानंतर पत्रकारितेत काम करायचं ठरवून ते माडखोलकरांकडे काम मागायला गेले. माडखोलकरांनी ‘येथे आता जागा नाही, पण तुझी पुण्याच्या दै. ‘भारत’मध्ये व्यवस्था करतो. त्यासाठी तुला पुण्याला जावे लागेल’, असे सांगितले. राहण्याची व जेवणाची सोय करत असल्यामुळे तसेच पत्रकारिता करायला मिळणार म्हणून दत्ताजी पुण्याला आले आणि दै. ‘भारत’मध्ये काम करू लागले.
दत्ताजींचे बस्तान बसत नाही, तोपर्यंत वर्ष- दीड वर्षात दै. ‘भारत’ बंद पडले. आता काय करायचे? हा प्रश्न दत्ताजींना पडला. त्यांनी काही महिने दै. ‘सकाळ’मध्ये काम केले. शिकवण्या घेतल्या. दीक्षित यांच्या ‘इंटरनॅशनल बुक डेपो’ या पुस्तकांच्या दुकानात पुस्तके विकण्याचे काम केले. त्यातच त्यांना वाचनाची आवड असल्याने पाश्चात्त्य साहित्यिकांची ओळख झाली. हे काम करत असतानाच त्यांना मद्रासला मुलांच्या ‘चांदोबा’ मासिकात संपादक तथा अनुवादक या पदावर काम करण्याची संधी मिळाली. राहायला उत्तम घर, जेवण, चांगला पगार अशा सुखसोयींनी युक्त असलेले काम मिळाले. मुलांच्या गोष्टी अनुवाद करण्याचे काम सात-आठ दिवसांत पूर्ण व्हायचे. मग उर्वरित महिना काय काम करायचे, हा मोठा प्रश्न दत्ताजींना पडला. त्यांना मग कंटाळा येऊ लागला. शेवटी त्यांनी ‘चांदोबा’चे मालक रेड्डी यांची भेट घेतली आणि आपली अडचण सांगितली. ‘एवढा पगार घेऊन मी फक्त सात-आठ दिवसच काम करतोय, मला येथे कंटाळा येतोय.’ तेव्हा रेड्डींनी स्टुडिओत फिरून चित्रीकरण कसे केले जाते, हे पाहायची परवानगी दिली. हे काम करत असतानाच दत्ताजींची राजाभाऊंशी ओळख झाली.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
१९६० साली राजाभाऊंकडे पुण्याला आल्यावर दत्ताजींना ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठी राजाभाऊंचा सहावा साहाय्यक म्हणून काम मिळाले. काम काय, तर ‘हे आण, ते आण, हे उचल, ते उचल’ अशी सर्व पडेल ती कामे त्यांनी केली. हे करत असताना दत्ताजींना ‘कोणतेही काम हलके नसते, काम हे काम असते’ ही बालपणापासूनच मिळालेली संघाची शिकवण कामी आली. त्यामुळे त्यांना त्याचे काहीही वाटत नसे. त्यांनी ‘सुवासिनी’ (१९६१), ‘बायको माहेरी जाते’ (१९६३), ‘हा माझा मार्ग एकला’ (१९६३), ‘पाठलाग’ (१९६४), ‘गुरुकिल्ली’ (१९६६), ‘काका मला वाचवा’ (१९६७), ‘लव्ह अँड मर्डर’ (हिंदी, १९६६), ‘आधार’ (१९६९) अशा चित्रपटांत राजाभाऊंबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामे केली. राजाभाऊंकडे काम करत असताना बाबुजी - सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर यांच्यासोबत त्यांचे चांगले सूर जुळले.
चित्रपट
‘पाठलाग’ या चित्रपटाचे कोल्हापूरला चित्रीकरण सुरू असताना राजाभाऊंना त्यांची आई खूपच आजारी असल्याचा निरोप आला. मातृभक्त राजाभाऊंना आईला भेटायला जायचेच होते; परंतु पुण्याला गेलो, तर चित्रीकरण थांबवावं लागणार, त्यामुळे निर्मात्याचे नुकसान होणार. काय करावं कळेना. शेवटी त्यांनी दत्ताजींना गाण्याचे कोणते प्रसंग कसे चित्रित करायचे ते सांगितले आणि ते आईला पाहायला पुण्याला निघून गेले. राजाभाऊंशिवाय चित्रीकरण करण्याचा हा दत्ताजींचा पहिलाच प्रसंग होता. त्यांनी न डगमगता राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे गाण्याचे प्रसंग चित्रित केले. संकलनाच्या वेळी राजाभाऊंनी ते प्रसंग पाहिले आणि त्यांनी दत्ताजींची पाठ थोपटली. संकलनाच्या वेळी वसंत साठे व एम. बी. सामंत हे दोघेही तेथे उपस्थित होते. त्यांनाही ते चित्रित केलेले प्रसंग आवडले. त्या दोघांनीही तेथेच ‘माझा एक चित्रपट राजाभाऊ करणार आणि दुसरा दत्ता करणार’ असे जाहीर केले.
लगेचच दोघांनीही चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. दत्ताजींना त्यांनी कथा विचारली. दत्ताजींनी त्यांना प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांची ‘अल्ला जाने क्या होगा आगे’ ही विनोदी कथा ऐकवली. या कथेची हकीकत अशी की, राजाभाऊंच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना त्या वेळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाल्याची बातमी आली. सर्व जण हळहळले. राजाभाऊंना तर खूपच दुःख झाले. त्यांनी तात्काळ चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला. काम थांबल्यामुळे दत्ताजी आपल्या खोलीत गेले. मोकळ्या वेळेत दत्ताजींना वाचन करण्याची सवय असल्याने त्यांनी पिशवीतले पुस्तक काढले आणि वाचायला सुरुवात केली. कथा वाचनात ते इतके गुंगून गेले की, बाहेरचे दुःखद वातावरण विसरून ते गालातल्या गालात हसू लागले. तात्काळ त्यांना जाणीव झाली की, इतका दुःखद प्रसंग असतानाही ही कथा आपल्याला दुःख विसरायला लावून हसायला लावतेय. या कथेवर आपण चित्रपट काढायचा, असे त्यांनी ठरवले. दत्ताजींनी सुचवलेल्या या कथेवर सामंत, साठे यांच्या ‘मधुवसंत’ या चित्र कंपनीने चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दत्ताजींच्या खांद्यावर दिली. दिग्दर्शक म्हणून दत्ताजींचा हा पहिला स्वतंत्र चित्रपट होता ‘मधुचंद्र’.
‘मधुचंद्र’ (१९६७)ची पटकथा व संवाद लिहून घेण्यासाठी ते गदिमांकडे गेले. गदिमांनी कथा वाचली आणि ते दत्ताजींना म्हणाले, ‘अरे, तुला साधं हसता येत नाही आणि तू विनोदी चित्रपट बनवतो आहेस. जा, एखादी कौटुंबिक- सामाजिक कथा घेऊन ये. मी तुला लिहून देतो.’ गदिमांनी असे म्हणण्याचे कारण असे की, गदिमा, बाबूजी व राजाभाऊ एखाद्या चित्रपटावर काम करत असताना दत्ताजीही तेथे असायचे. या सर्व थोर मंडळींच्या गप्पा हसतखेळत चालायच्या. त्यांच्याबरोबर आपण कसे सहभागी व्हायचे असे वाटून दत्ताजी गप्प राहून ते सर्व पाहायचे, ऐकायचे. बोलायचे मात्र काहीच नाही. त्यामुळे या मंडळींना वाटायचं की दत्ताजींना हसताच येत नाही.
मग दत्ताजी मधुसूदन कालेलकर यांच्याकडे गेले व त्यांना ‘मधुचंद्र’ची कथा ऐकवली. दिनू खरेला रेल्वेत नोकरी करणाऱ्या एका काकाशिवाय जवळचं असं कुणीच नसतं. दिनू हा बेकार तरुण असतो, त्याच्यावर श्रीमंत वडिलांची मालू प्रेम करत असते. आपले वडील आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही, हे तिला माहीत असतं. म्हणून ते दोघं चोरून लग्न करतात. मधुचंद्राच्या रात्रीच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी राहावे लागते. दुसऱ्या दिवशी दिनू व मालू मामांच्या मुलामुलीच्या रेल्वे पासावर बहीण-भाऊ बनून हिल स्टेशनवर जायला निघतात. पण रेल्वेत राजा राजवाडे नावाचे टी.सी. त्यांना पकडतो. एक रात्र त्यांना आपल्या घरी मुक्कामाला घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी त्यांची रवानगी तुरुंगात होते. वेगवेगळ्या त्यांना ठेवले जाते. शेवटी त्यांची सुटका होते आणि शेवटी ते मधुचंद्रासाठी चंद्रनगरला जातात.
कालेलकरांना ही गोष्ट आवडली. त्यांनी दत्ताजीना पटकथा-संवाद लिहून दिले. अशा प्रकारे चित्रपट पूर्ण झाला. राजाभाऊंकडे उमेदवारी केल्याने गुरुचे ऋण तर आपल्यावर आहे. ते फेडता येणे कदापिही शक्य नाही, याची जाणीव दत्ताजींना कायम होती. राजाभाऊंबरोबर सतत सावलीसारखे वावरणारे दत्ताजी, त्यांना स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शित करायला मिळाल्यावर आनंद तर झालाच. त्याचबरोबर गुरुच्या ऋणाची काही अंशी का होईना परतफेड करता यावी, तसेच गुरुही सतत आपल्यासोबत असावेत या हेतूने त्यांनी राजाभाऊंच्या नावातील ‘राज’ आणि स्वतः च्या दत्तात्रय या नावातील ‘दत्त’ घेऊन ‘राजदत्त’ नाव धारण केले.
मुंबईच्या प्लाझा सिनेमागृहात दिग्दर्शक राजदत्त या नावाने ‘मधुचंद्र’ हा चित्रपट मोठ्या दिमाखदारपणे प्रदर्शित करून आपली दिग्दर्शकाची कारकीर्द सुरू केली. एखाद्या शिष्याला चांगला गुरू मिळणे महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे एखाद्या गुरुलाही चांगला शिष्य मिळणे तितकेच महत्त्वाचे असते. ते या राजाभाऊ आणि दत्ताजी या गुरुशिष्याने सर्व जगाला दाखवून दिले.
‘मधुचंद्रा’नंतर जवळ जवळ सातआठ महिने दत्ताजीकडे काम नव्हते. दत्ताजी सुलोचनादीदींच्या सांगण्यावरून भालजी पेंढारकर यांच्याकडे कोल्हापूरला गेले. भालजींनी त्यांना ‘आता माझ्याकडे काम नाही, पण तू येथे राहून माझ्या लिखाणाच्या पसाऱ्यात माझ्या बऱ्याच कथा पडल्या आहेत, त्या वाचून व्यवस्थित लावून ठेव. मग बघू’ असे सांगितले. त्यानंतर आठ दिवसांनी भालजींनी त्यांना ‘कोणती कथा आवडली?’ असे विचारले. दत्ताजींना त्यांची एक कथा आवडली होती. ती होती ‘घरची राणी’ या चित्रपटाची.
‘घरची राणी’ (१९६८) हा चित्रपट दत्ताजींनी दिग्दर्शित केला. चित्रपटाचा नायक सरनौबत हा सरनौबतवाडीला आपल्या आईसह राहत असतो. गोव्याचे एक खाणमालक राजमाने यांची आपल्या मुलीचे जयवंतीचे लग्न बाळासाहेबांशी व्हावे, अशी इच्छा असते. त्याप्रमाणे हे लग्न होते. पण राजमाने माईन्स या खाणीचा मॅनेजर सुधीर याचा जयवंतीवर डोळा असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर खाणीची सर्व व्यवस्था राजमाने हे बाळासाहेबांवर सोपवण्याचे ठरवतात, पण सुधीर हा बेत सफल होऊ देत नाही. बाळासाहेबांच्या मनात जयवंतीविषयी गैरसमज निर्माण करतो. ही गोष्ट जयवंतीच्या लक्षात येते आणि ती सुधीरचे कट-कारस्थान त्याच्यावरच उलटवते.
अशी कौटुंबिक कथा असलेल्या या चित्रपटात हिंदीतील ‘दोस्ती’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेला सुधीर कुमार याला नायक म्हणून घेतले, तर नायिका म्हणून अनुपमाला घेतले. हा चित्रपट खूप चांगला चालला आणि या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक असा दुहेरी बहुमान मिळाला. त्यांचे ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ म्हणून हे पहिले पारितोषिक होते. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावे लागले नाही.
एकदा मुंबईतील ‘प्लाझा’ चित्रपटगृहा- समोरच्या कोतवाल उद्यानात दत्ताजी, त्यांचे मित्र कॅमेरामन दत्ता गोर्ले गप्पा मारत बसले होते. त्या वेळी तेथे सुप्रसिद्ध निर्माते शरद पिळगावकर हे आले आणि दत्ताजींना चंद्रकांत काकोडकर यांची ‘आसावरी’ ही कादंबरी वाचायला दिली.
‘यावर चांगला चित्रपट निघू शकेल, वाचून बघ’ असेही सांगितले. खरोखरच त्या कादंबरीवर शरद पिळगावकर यांनी ‘अपराध’ (१९६९) चित्रपट काढायचे ठरवले आणि त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दत्ताजींवरच टाकली. दत्ताजीच्या या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक अशी महाराष्ट्र शासनाची दोन पारितोषिके मिळाली.
‘देवमाणूस’ (१९७०) या सत्य-असत्याच्या संघर्षावर आधारित चित्रपटाचे कथानक आजवर अनेक वेळा आले आहे. विठ्ठलवाडी हे इनामदारी असलेले गाव. आज इनामदारी संपलेली असली तरी इनामदारबाईंच्या प्रेमळ, सौजन्यपूर्ण वागणूकीमुळे इनामदारांच्या घराला गावात मान आहे, प्रतिष्ठा आहे. म्हणून बाईसाहेबांना संपूर्ण गाव त्यांना मान देत असतो. बाईसाहेबांना शेखर नावाचा स्वतःचा मुलगा असतो तर पोटच्या मुलासारखा वाढवलेला प्रसाद नावाचा दूसरा मुलगा असतो. शेखर हा बाई बाटलीच्या नादात गुरफटलेला तर प्रसाद हा सदगुणी, प्रामाणिक, सत्यप्रिय, सामाजिक कार्य करणारा असतो. या दोघांमधल्या संघर्षात सत्याचाच नेहमी विजय होत असतो असे साधे, सरळ नेहमीचे कथानक आहे. पुवई कृष्णन यांच्या कथेवर श्रीनिवास जोशी यांनी पटकथा लिहिली आहे. दत्ता गोर्ले यांच्या छायाचित्रणाला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक लाभले.
‘धाकटी बहीण’ (१९७०) हा चित्रपट चंद्रकांत काकोडकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या कादंबरीवर आधारित आहे. यातील नायक माधव जन्मतो त्याच वेळेस त्याचे वडील आप्पा खोट्या व्यवहाराच्या आरोपावरून पकडले जातात. हा माधवचाच पायगुण आहे, असे समजून आप्पा त्याचा तिरस्कार करू लागतात. एके दिवशी शाळेत घड्याळाची चोरी होते आणि त्याचा आळही माधववर येतो. त्यामुळे आप्पा माधवला घरातून हाकलून देतात. माधव गुंड बनतो. बहीण मीना हिचे भावावर प्रेम असते, ती माधवला राखी बांधते. आप्पांच्या संकटकाळी माधव पैसे पाठवतो. आप्पांना नंतर पश्चाताप होतो आणि आप्पा जग सोडून जातात. शेवटी माधव आपल्या प्रेयसीसाठी वाईट धंदे सोडून देतो. बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमवायला सुरुवात करतो. त्याचा वैरी बासू हे सर्व पोलिसांना कळवतो आणि माधव पकडला जातो.
अशा या सामाजिक, कौटुंबिक चित्रपटात अरुण सरनाईक, सुरेखा, अनुपमा, कमलाकर टाकळकर ही त्या वेळची लोकप्रिय कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटातील ‘साजण आला, असा दूर का जवळ ये जरा’ या गीतामध्ये हिंदीतील त्या वेळी कॅब्रे डान्सर म्हणून प्रसिद्धीस येत असलेल्या हेलन हिचे नृत्य आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री सुरेखा हिला महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’ या गीतासाठी सुधीर फडके यांना उत्कृष्ट पार्श्वगायकाचे तर ‘धागा जुळला, जीव फुलला, वेड्या बहिणीला भाऊ मिळाला’ या गीतासाठी उत्कृष्ट पार्श्वगायिकेचे पारितोषिक आशा भोसले यांना मिळाले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री वैजयंतीमाला बाली हिची एकमेव निर्मिती असलेला मराठी चित्रपट म्हणजे ‘झेप’ (१९७१). तिचे पती डॉ. सी. बाली यांच्या कथेला पटकथा व संवादांची जोड दिली होती. श्रीनिवास जोशी यांनी चित्रपटाचा नायक असलेला दादा हा आपल्या सहकाऱ्यांसोबत लुटालूट करून, चोऱ्यामाऱ्या करून पैसा उकळत असतो. प्रेम, दया, करुणा, वात्सल्य या गोष्टी त्याच्या गावीही नसतात. फक्त कोणत्याही मार्गाने पैसा मिळवणे, हे त्याचे एकच ध्येय असते. एक दिवस या दादाला रवी नावाचा एक प्रामाणिक व कष्टाळू तरुण भेटतो. दादा त्याला आसरा देतो. त्यामुळे रवी भारावून जातो. दादा पैशाच्या मोहापायी एका व्यक्तीचा खून करतो. तर त्याच व्यक्तीच्या अंजू नावाच्या अनाथ मुलीला रवी त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतो. दादा रवीच्या खोलीवर येतो तेव्हा तेथे अंजू असते. यावरून दादा व रवीमध्ये वैर निर्माण होते. असे हे थोडक्यात कथानक आहे.
या चित्रपटात ग. दि. माडगूळकर यांची ‘चिंधी बांधते द्रौपदी, हरीच्या बोटाला’ हे आशा भोसले यांनी व ‘मधुराणी तुला सांगू का, मधुराजा तुला सांगू का’ हे आशा व सुधीर फडके यांनी गायलेली गीते लोकप्रिय आहेत. या चित्रपटास सुधीर फडके यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. १९७१च्या सुमारास मराठी चित्रपटसृष्टीच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेने एक चित्रपट शाखा सुरू केली होती. मुंबईत चित्रपट प्रदर्शनासाठी सिनेमागृह मिळणे आजच्यासारखेच अवघड होते. तेव्हा शिवसेना चित्रपट शाखेने, मुंबईतील गिरगाव येथील मॅजेस्टिक सिनेमागृहात सेन्सॉर प्रमाणपत्राच्या तारखांनुसार मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा नियम केला होता. या नियमानुसार ‘गणानं घुंगरू हरवलं’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण तो चित्रपट व नियम बाजूला सारून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रशस्तीपत्रासह ‘झेप’ प्रदर्शित करण्यात आला. तरीही या चित्रपटाला प्रेक्षकांची हवी तशी पसंती लाभली नाही. यावर ‘शिवसेना चित्र शाखेची चुकीची झेप’ असा एक लेखही त्या वेळी छापून आला होता, हे विशेष.
‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’ (१९७३) हा चित्रपट तयार करण्याची योजना आखण्यात आली, तेव्हा त्याचे दिग्दर्शन राजा परांजपे हे करणार होते आणि चित्रपटाचे सुरुवातीचे नाव ‘कानडीने केला मऱ्हाठी भ्रतार’ असे ठेवण्यात आले होते. पण या ना त्या कारणाने या चित्रपटाची योजना लांबणीवर पडली. १९७९ साली त्याला मूर्त स्वरूप आले. चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची वेळ आली, तेव्हा राजाभाऊ परांजपे यांनी चित्रपट दिग्दर्शन करण्याचे थांबवले होते. मग त्यांचेच साहाय्यक असलेल्या दत्ताजी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे असे ठरले. दत्ताजींच्या दिग्दर्शनाखाली राजाभाऊंनी फक्त अभिनयाचे काम केले. यात ग. दि. माडगूळकर यांनीही अभिनय केला. राजाभाऊ व गदिमा ही जोडी तत्पूर्वी १९६०मध्ये ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात एकत्र झळकली होती. त्यानंतर १३ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र आली. दुर्देवाने या दोघांचाही हा शेवटचा चित्रपट ठरला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद या चित्रपटाचा विषय होता. त्यामुळेच या चित्रपटाचे नाव ‘मराठीने केला कानडी भ्रतार’ असे ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद या त्या वेळच्या ज्वलंत समस्येचा उपयोग यामध्ये करून घेतला होता. हुंडा पद्धतीचा विघातकपणासुद्धा यात दाखवलेला होता. या सगळ्यांचे एकच सूत्र होते- आपापसांतील तंटा, तेढ्यामुळे कुणाचेच भले होत नाही. त्यासाठी सामंजस्य हा एकमेव उपाय आहे. एकमेकांबद्दल प्रेम, बंधुभाव निर्माण झाला तर सीमावादाचा प्रश्न त्यापुढे गौण ठरेल.
‘अपराध’ (१९६९)मधील नायिका ही खलप्रवृत्तीची दाखवली होती, तर ‘भोळी भाबडी’ (१९७३) या चित्रपटात नायक हा खलप्रवृत्तीचा दाखवला आहे. १९७२च्या काळात घरासंबंधी, जागेसंबंधीच्या आकर्षक जाहिरातींना भुलून कोणताही मागचा-पुढचा विचार न करता लोकांनी आपली आयुष्यभराची कमाई त्यामध्ये गुंतवली होती. आणि त्यात ते फसवले गेले होते. त्यांची लुबाडणूक झाली होती. अशा काही प्रकरणांचा धागा पकडून ‘भोळी भाबडी’ हा चित्रपट बनवायचे ठरले. या चित्रपटातील नायक स्वतःचा दिवस आनंदी घालवण्यासाठी आपले गुरु मित्र यांच्यासोबत स्वार्थी वृत्तीने वागतो. इतकेच नव्हे तर तो आपल्या पत्नीशीही त्याच पद्धतीने वागत असतो.
चित्रपट प्रचारकी थाटाचा होऊ नये म्हणून हा चित्रपट नायिका, जनता यांच्याभोवती न फिरता नायकाभोवती फिरतो. विशेष म्हणजे खलनायकी रूपातला नायक प्रेक्षकांनी स्वीकारला. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट चित्रपटाचे, दिग्दर्शनाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर गीतासाठी जगदीश खेबुडकर, संवादासाठी शंकर पाटील तर कला दिग्दर्शनासाठी के. द. महाजनी यांनाही पारितोषिके मिळाली. यातील ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंगं’ हे भीमसेन जोशींच्या आवाजातील भक्तीगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे.
‘या सुखांनो या’ (१९७५) हा अभिनेत्री सीमा यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट. रमेश देव यांची कथा असलेल्या या चित्रपटाची पटकथा व संवाद शंकर पाटील व द. मा. मिरासदार यांनी लिहिलेले आहेत. एका त्यागी तरुणाची ही कथा आहे. एके काळी त्याच्या घरी नोकरीला असलेल्या मुलीला तो डॉक्टर होण्यासाठी फार मोठी मदत करतो. तिची डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होते. दोघे लग्न करतात. तरी त्याने तिच्यासाठी किती मोठा त्याग केलाय, याची तिला जाणीव नसते. तिची एक मैत्रीण या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करते आणि नेहमीप्रमाणे हे गैरसमज दूर होऊन शेवट गोड होतो. असे सामाजिक कथानक असलेल्या या चित्रपटासाठी पद्मा चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचे विशेष अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. तर सुधीर फडके यांना उत्कृष्ट पार्श्वगायकाचे पारितोषिक मिळाले.
विदर्भातील प्रा. डॉ. डॅडी देशमुख यांची पहिलीच निर्मिती म्हणजे ‘देवकी नंदन गोपाला’ (१९७७) हा चित्रपट. गो. नी. दांडेकर यांच्या ‘श्री गाडगे महाराज’ या चरित्रात्मक कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाची पटकथा ग.दि. माडगूळकर व शंकर पाटील या दोघांनी लिहिली. दत्ताजीकडे हा चित्रपट आला, तेव्हा त्यांना गाडगेबाबा यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. गाडगेबाबांना भेटलेली जी माणसे होती, त्यांच्या भेटी दत्ताजींनी घेतल्या. समाजातल्या वाईट परंपरा, घातक रूढी नाहीशा करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धांचे निर्मूलन करत असताना श्रद्धाही नष्ट होता कामा नयेत. माणूस ज्या श्रद्धेवर जगत असतो, मग ती देवावरची असो की देशावरची असो की दगडावरची असो, तीच उखडून काढली तर मातृत्व, वात्सल्य, प्रेम या भावना न मानणारी अशी दिशाहीन अवस्था समाजाचीही होईल या भावनेने दत्ताजींनी गाडगेमहाराजांचे देवत्व बाजूला ठेवून त्यांच्यातला माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटासाठी दत्ताजींना प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘श्री संत गाडगे बाबा’ या पुस्तकाचा उपयोग झाला.
डॉ. श्रीराम लागू यांना गाडगे महाराजांच्या भूमिकेसाठी जेव्हा डॅडी देशमुख यांनी विचारणा केली, तेव्हा डॉ. लागू यांनी ही भूमिका करण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा डॅडी देशमुख यांनी डॉ. लागू यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगेमहाराजांवर लिहिलेले पुस्तक वाचायला दिले. गाडगेबाबांचे ते चरित्र वाचल्यावर डॉ. लागू आश्चर्यचकित झाले. ‘मी गाडगेबाबांची भूमिका करणार. तुम्ही मला पैसे द्या किंवा देऊ नका’ असं डॅडी देशमुख यांना म्हणून ते भूमिका करायला तयार झाले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘पारध’ (१९७७)चे निर्माते किशोर मिस्कीन यांना हा चित्रपट मराठी भाषेत तयार करायचा होता. नंतर चित्रपटाला आर्थिक मदत करायला मोहन बिजलानी नामक अमराठी गृहस्थ पुढे आले. त्यामुळे हा चित्रपट ‘अंजाम’ नावाने हिंदीमध्ये पण करायचा ठरले. चित्रपटाच्या कामात कोणीही ढवळाढवळ करणार नाही, हे आधीच ठरलेले होते. तरीही चित्रीकरण चालू असताना बिजलानी कलावंतांना सूचना देऊ लागले. त्यांचे हे वागणे न पटल्यामुळे दत्ताजी बाहेर जाऊन बसले. अखेर चित्रपटाची अभिनेत्री नूतन, ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांनीही बिजलानींना दत्ताजीच्या कामात ढवळाढवळ न करण्याबाबत समजावले. त्या वेळी बिजलानी यांनी दत्ताजींची माफी मागितली. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर संकलनाच्या वेळी मात्र बिजलानींनी त्यांना हवे तसे संकलन करण्यास सुरुवात केली. मग दत्ताजींनी आठ दिवस काम थांबवण्याचा निर्णय घेतला. काही कामानिमित्त ते पुण्याला जाऊन आले. येऊन पाहिले तर बिजलानींनी त्या आठ दिवसांत दत्ताजींना काहीही न कळवता, त्यांच्या परवानगीशिवाय स्वतःला हवे, त्या पद्धतीने संकलनाचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे ‘या चित्रपटाला दिग्दर्शक म्हणून माझे नाव देता कामा नये आणि जर दिलेत तर त्याचा गंभीर विचार करावा लागेल’, अशा कडक शब्दांत दम देऊन, दत्ताजींनी चित्रपट सोडला आणि बाकी असलेल्या पैशांवरही पाणी सोडले. या सर्व प्रकारामुळे पडद्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून निर्माते किशोर मिस्कीन यांचे नाव झळकले. तत्त्वांसाठी पैशांवर पाणी सोडणारे दत्ताजींसारखे दिग्दर्शक चित्रपटसृष्टीत विरळच.
‘चंद्र होता साक्षीला’ (१९७८) हा चित्रपट म्हणजे राम केळकर यांची मित्रप्रेम व त्यागाची कथा आहे. ‘अष्टविनायक’ (१९७९) हा चित्रपट करण्याआधी दत्ताजींनी ‘देवकी नंदन गोपाला’ हा गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित, अंधश्रद्धेवर प्रहार करणारा चित्रपट केला होता. ‘अष्टविनायक’ आणि ‘देवकी नंदन गोपाला’ची कथानके ही परस्परविरोधी होती. पण ती निर्मात्यांनी आणलेली होती. एक दिग्दर्शक म्हणून दत्ताजीनी निर्मात्यांच्या कथानकावर चित्रपट केले, असे त्यांच्याशी चर्चा केल्यावर कळले.
हा सुप्रसिद्ध निर्माते शरद पिळगावकर यांचा चित्रपट होता. त्यात नायकाची भूमिका त्यांच्या मुलानेच म्हणजे त्या वेळी हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असलेल्या सचिनने केली आणि नायिकेची भूमिका त्या वेळी दूरदर्शनवर बातम्यांचे निवेदन करणाऱ्या वंदना पंडितने केली. तिचा हा नायिका म्हणून पहिलाच चित्रपट होता. अष्टविनायकचा नायक शेवटपर्यंत अंधश्रद्धेपुढे झुकत नाही. गणपतीचे देऊळ पाडून त्या जागेवर फॅक्टरी उभारली म्हणून आपल्यावर संकटे येतात, असा नायिकेचा समज झालेला असतो. त्यामुळे ती आजारी पडते. ती बरी व्हावी म्हणून स्वतःचा देवावर विश्वास नसतानाही केवळ बायकोला बरे वाटावे म्हणून नायक तिच्यासोबत अष्टविनायक यात्रेला जातो. यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नसून बायकोची श्रद्धा जपण्यासाठी नवऱ्याने केलेली तडजोड दिसून येते.
या चित्रपटाला अनिल-अरुण यांचे संगीत आहे. अनुराधा पौडवाल यांनी गायलेले ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गीत असो की, मुलीला सासरी पाठवणी करताना चित्रित केलेले, डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेले ‘दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे’ हे गीत आणि ‘प्रथम तुला वंदितो’ हे गणेशगीत असो, सर्वच गाणी अप्रतिम झालेली आहेत. चित्रपटातील सुप्रसिद्ध बीजगीत ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे जगदीश खेबुडकरांनी अष्टविनायकांचे प्रत्यक्ष दर्शन न घेता केवळ अष्टविनायकांची महिती सांगणारे पुस्तक वाचून लिहिलेले आहे. आजही ते प्रचंड लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचे दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक तसेच शरद पोळ यांना कला दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले.
‘भालू’ (१९८०) हा उमा व प्रकाश भेडे यांची पहिलीच निर्मिती असलेला चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांच्या ‘भालू’ या कादंबरीवर आधारित आहे. सरपंच रामराव हा जमिनीवरचा हक्क सोडण्याच्या वादावरून शेतकरी भगवानरावचा खून करतो. भगवानरावची एकुलती एक मुलगी उज्ज्वला व कुत्रा भालू यांना आप्पाकाका आधार देतात. उज्ज्वला वयात आल्यावर तिने आपल्या मुलाशी लग्न करावे म्हणून रामराव तिला मागणी घालतो. पण आण्णाकाकांच्या मनात उज्ज्वलासाठी वर म्हणून जयंत इनामदार हा उमदा तरुण असतो. त्याला शह देण्यासाठी रामराव हा ‘उज्ज्वला ही भगवानरावच्या रखेलीची मुलगी आहे’ अशी अफवा पसरवतो. जयंत या गोष्टीचा बारकाईने शोध घेतो, तेव्हा त्याला हे सर्व खोटे असल्याचे समजते. नंतर रामराव जयंतला बोलावून त्याच्यावर विषप्रयोग करतो. याच विषप्रयोगाच्या आरोपावरून आप्पाकाकाला अटक केली जाते. पुढे ते निर्दोष सुटतात. जयंत-उज्ज्वलाचे लग्न होते. असे सामाजिक कथानक असलेल्या या चित्रपटात भालू या कुत्र्याचे काम अप्रतिम झाले आहे.
उमा व प्रकाश भेंडे या कलाकार दाम्पत्याने या चित्रपटाच्या निर्मितीबरोबर प्रमुख भूमिका केली आहे. विश्वनाथ मोरे यांचे संगीत आणि पी. सावळाराम यांची रचना असलेले ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मीलन’ हे सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांमधील या चित्रपटातील गीत आजही लोकप्रिय आहे.
‘अरे संसार संसार’ (१९८१) हा चित्रपट पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘तीन मुलांची आई’ या कथेवर आधारित असून त्याची पटकथा व संवाद शंकर पाटील यांचे आहेत. रत्ना ही सुंदर तरुणी लग्न होऊन इनामदारांच्या घरी येते. इमामदारांवर कर्जाचा फार मोठा बोजा असतो. पापी सावकाराची नजर रत्नावर पडते. त्याचा हेतू उधळून लावून ती त्याला पुरून उरते. जीवघेण्या संघर्षात तिचा संसार उघडा पडतो. शेतजमीनीच्या शिल्लक तुकड्यात मोती पिकवून ती सुखाचा संसार सुरू करते. तिला तीन मुले होतात. सावकाराने धरलेला डूख कायम असतो. त्याच्या कारवायांना रत्नाचा पती बळी पडतो. मुले मोठी होतात. त्यांची लग्ने होतात. सावकाराच्या कारस्थानांना साथ देणारी धाकटी सून घरभेदी निघते. घराच्या तीन वाटण्या होतात. रत्नाच्या नशीबी पुन्हा वनवास येतो. मुलांना जेव्हा त्यांची चूक लक्षात येते, तोपर्यंत रत्नाने ‘राम’ म्हटलेला असतो. अशा या चित्रपटात रंजना या अभिनेत्रीने रत्नाची तारुण्यापासून वार्धक्यापर्यंतची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. सावकाराची भूमिका अशोक सराफ यांनी समर्थपणे केली आहे. विशेष म्हणजे अशोक सराफ व रंजना यांनी नायक-नायिका म्हणून अनेक यशस्वी मराठी चित्रपट केले असले तरी या चित्रपटात मात्र अशोक सराफ यांनी धूर्त, कपटी सावकाराची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटातील ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते’ या गीतासाठी कवी विठ्ठल वाघ यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट गीतकाराचे, तर रंजना हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल यांना उत्कृष्ट पार्श्वगायनाचे पारितोषिक मिळाले. या चित्रपटातील ‘राजा ललकारी अशी दे’ हे गीतही प्रचंड गाजले.
स्नेहलता दसनूरकर यांची ‘वज्रादपि’ ही कथा ग. रा. कामत यांच्या वाचनात आली आणि त्यांनी त्या कथेवर ‘शापित’ (१९८२) या चित्रपटाची पटकथा लिहिली. सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अरविंद देशपांडे यांनी केले. चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण झालेले असताना देशपांडे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते आजारी पडल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण करणे कठीण होऊन बसले. दत्ताजी एके दिवशी अरविंद देशपांडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले. त्यांची चौकशी केली आणि ‘तुमची परवानगी असेल तर मी तुमचा चित्रपट पूर्ण करू शकतो का, मला त्याचे मानधनही नको.’ असे दत्ताजींनी त्यांना विचारले. देशपांडे यांनीही मोठ्या मनाने त्यांना चित्रीकरण करण्यास होकार दिला.
‘शापित’ची कथा तशी वेठबिगारीच्या पद्धतीवर आधारित होती. बापाने काढलेले कर्ज मुलाने फेडायचे. आयुष्यभर राबले तरी मुद्दलच फिटत नाही आणि व्याज फिटणे तर दूरची गोष्ट. ही कथा ढोर समाजातील युवकावर आधारित असल्यामुळे दत्ताजींनी त्यात जिवंतपणा यावा म्हणून मेलेली जनावरे टाकण्याची जागा, तेथील मृत जनावरांचे चामडे काढण्याची पद्धत, या सर्वांचा बारकाईने अभ्यास केला आणि मग चित्रीकरणाला सुरुवात केली. ‘पुत्रकामेष्टी’ या नाटकातून प्रसिद्धीला आलेल्या व चित्रपटाचा अजिबात अनुभव नसलेल्या मधु कांबीकरसारख्या नवख्या अभिनेत्रीकडून दत्ताजींनी अगदी जिवंत अभिनय करून घेतला. हा चित्रपटही लोकांना प्रचंड आवडला.
या चित्रपटाला राजदरबारीही प्रतिष्ठा मिळाली. महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनाचे पारितोषिक चित्रपटाला मिळाले. त्याचबरोबर कथा- स्नेहलता दसनूरकर, पटकथा- ग. रा. कामत, छाया इशान आर्य, संकलन- दास धायमाडे, अभिनेता- यशवंत दत्त, अभिनेत्री मधु कांबीकर अशी एकूण आठ पारितोषिके मिळाली. तसेच उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री असे तीन फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाले. या सर्वांवर कळस म्हणजे उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा व दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. अशा तऱ्हेने राजदत्त यांनी राष्ट्रीय पुरस्काराच्या रजत कमलावर पहिल्यांदा आपले नाव कोरले आणि दत्ताजींच्या परीसस्पर्शाने या चित्रपटाचे सोने झाले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दत्ताजींचा नंतरचा चित्रपट ‘राघू मैना’ (१९८३) हा तमासगीरांच्या जीवनावर आधारित आहे. वसंत सबनीस यांचे ‘तमासगीर’ हे नाटक, चित्रपट निर्माते डॅडी देशमुख यांच्या वाचनात आल्यावर त्यांना ते इतके आवडले की, ते सरळ दत्ताजींकडे आले व ‘यावर मला चित्रपट बनवायचा आहे’ असे त्यांना सांगितले. दत्ताजींनी याआधी कधीही तमाशाप्रधान चित्रपट केलेला नव्हता. तमाशा कलावंत हे स्वतःची वैयक्तिक सुखदुःखे बाजूला ठेवून ‘शो मस्ट गो ऑन’ या ब्रीदाला जागून जगत असतात. या कलावंतांची व्यथा ही एकच मध्यवर्ती कल्पना न मानता तमासगीरांना समाजात असलेले स्थान, सुशिक्षित ‘शापित’ची कथा तशी वेठबिगारीच्या तमासगीरांची होणारी ओढाताण, कुचंबणा यांसारखे अनेक सामाजिक संदर्भ या चित्रपटात होता. दिलदार स्वभावाच्या या माणसाकडे आलेले आहेत.
नाना पाटेकर व मधु कांबीकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच दिग्दर्शनाचेही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राजदत्त यांना मिळाले. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘राघव’ या नायकाची भूमिका करणाऱ्या नाना पाटेकर यांना तर कला दिग्दर्शनाचे पारितोषिक किशोर मोरे यांना मिळाले.
‘हेच माझं माहेर’ (१९८४) या चित्रपटातली नायिका शकू ही बिनआईबापाची पोर तिचा सांभाळ तिच्या मामा-मामीने केलेला असतो. मामीच्या सततच्या छळवादाला ती कंटाळून गेलेली, पण काही करू शकत नसते. लग्न होऊन सासरी आल्यानंतरसुद्धा ‘आगीतून फुफाट्यात’ अशी तिची अवस्था होते. त्यातच नवऱ्याचा अपघाती मृत्यू होऊन तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पांढऱ्या पायाची म्हणून सासू तिचा छळ करते. अशाही परिस्थितीत न डगमगता ती मोठ्या धैर्याने आपल्या मुलाला मोठे करते. अनेक संकटांना तोंड देत त्यावर विजय मिळवते. तिचे अपार कष्ट, श्रद्धा, साधना बघून सासूसुद्धा तिच्यापुढे शरणागती पत्करते. सासूला तिची चूक उमगते. दिनानाथ पंगे यांच्या या कथेला ज्येष्ठ नाटककार शं. ना. नवरे यांच्या पटकथा-संवादांची जोड लाभली आहे.
या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या प्रथम पुरस्कारासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीही राजदत्त यांना प्रथम पारितोषिक मिळाले. याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मधु कांबीकर, विशेष अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांडे यांना पारितोषिक मिळाले. तसेच पटकथा - शं. ना. नवरे, छाया- देबू देवधर, संकलन- अशोक पटवर्धन, ध्वनी - मनोहर घाणेकर, रंगभूषा- विश्वास गोवेकर अशी एकूण नऊ पारितोषिके या चित्रपटाला मिळाली.
‘मुंबईचा फौजदार’ (१९८४) हा मनोहर रणदिवे निर्मित हलकाफुलका विनोदी चित्रपट होता. मनोहर रणदिवे यांचा दादर स्टेशनपासून जवळच फोटो स्टुडिओ होता. रणदिवे हे स्वतः छायाचित्रकार असल्याने त्यांचा स्वभाव बोलका होता. दिलदार स्वभावाच्या या माणसाकडे दत्ताजींबरोबर दत्ता केशव, राम गबाले, कमलाकर तोरणे, पेंटर अशी चित्रपटसृष्टीतली अनेक मंडळी, तंत्रज्ञ फावल्या वेळेत गप्पा मारायला जमायची. चर्चा करायची. एकमेकांच्या चांगल्या सिनला दादही द्यायची. त्या काळी मोबाईल नसल्यामुळे कलाकार, तंत्रज्ञ यांना निरोप देणे, भेटीगाठी घेणे यासाठी या जागेचा फायदा व्हायचा. रणदिवे येणाऱ्या प्रत्येकाला चहा-नाश्ता देऊन त्याचे स्वागत करायचे. त्यांना चित्रपटांबद्दल या कलेबद्दल आदर होता. अनिल बर्वे यांच्या ‘मिशन गोल्डन गँग’ या कथेवर चित्रपट काढायचा रणदिवेंनी ठरवल्यावर त्याचे ‘मुंबईचा फौजदार’ असे नामकरण त्यांनी केले आणि दिग्दर्शनाची जबाबदारी विश्वासाने दत्ताजींच्या खांद्यावर टाकण्यात आली. पटकथा व खुसखुशीत संवाद वसंत सबनीस यांचे आहेत. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक अशी दोन पारितोषिके विभागून मिळाली आहेत.
सासू-सुनेच्या संघर्षाची मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा हा ‘माझं घर माझा संसार’ (१९८६) या चित्रपटाचा विषय आहे. रत्नाकर मतकरी यांनी डोंबिवली येथे घडलेल्या सत्यघटनेवर लिहिलेल्या ‘जौळ’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. पतीच्या निधनानंतर सिंधुताई आपला मुलगा प्रसाद याला वाढवते. त्याचे नयनशी लग्न लावून देते. दोघांचे लग्न हे घरातल्या सर्वांच्या संमतीनेच झालेले असते. सून घरात आल्यावर सिंधुताईंना वाटते ‘आता आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार, आपली सून आपल्या मुलाला आपल्यापासून तोडणार’ या विचाराने ती अस्वस्थ होते. उठता-बसता नयनला टोचून बोलते. त्यामुळे होणाऱ्या रोजच्या भांडणांमुळे प्रसादची मनःशांती ढळते. प्रसाद व नयन दोघेही अखेर रेल्वेतून उडी मारून आत्महत्या करतात.
या चित्रपटात अभिनेत्री म्हणून व. पु. काळे यांच्याबरोबर केलेल्या कथाकथनांमुळे महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली मुग्धा चिटणीसची निवड दत्ताजींनी केली. सुधीर मोघे यांचे ‘दृष्ट लागण्या जोगे सारे’ हे गीत असो की, ‘हसणार कधी, बोलणार कधी’ हे अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकर यांनी गायलेले गीत असो, अरुण पौडवलांच्या सुमधुर संगीतामुळे श्रवणीय झालेली आहेत. या चित्रपटाबद्दल रत्नाकर मतकरी यांना कथालेखनासाठी महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले.
१९७६-७७ दरम्यान पुणे येथे घडलेल्या जोशी-अभ्यंकर कुटुंबाच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सुशिक्षित कुटुंबातील कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या चार तरुण मुलांनी एकत्र येऊन स्वतःच्या मित्राचाच शांत डोक्याने रात्री खून केला व सकाळी ‘काही घडलेच नाही’ अशा आविर्भावात वावरले. त्यामुळे कुणाला काहीही कळले नाही. सराईत खुन्यांप्रमाणे मागे कोणताही पुरावा राहणार नाही याची ते काळजी घेत असत. हे हत्याकांड खूप गाजले. सहा-सात वर्षे हा खटला चालला. आरोपींवर गुन्हा सिद्ध होऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली. हे सर्व कसे घडले, या तरुणांचा हेतू काय होता. त्यांची मानसिकता काय होती, हे दाखवण्यासाठी ‘माफीचा साक्षीदार’ (१९८६) या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरले.
या चित्रपटातील प्रमुख भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. दत्ताजींनी या घटनेचा बारकाईने अभ्यास केला. नाना पाटेकर यांना घेऊन येरवड्याच्या तुरुंगात जाऊन आरोपींना भेटले. ते कसे दिसतात, कसे बोलतात, त्यांची मानसिकता कशी आहे, अशी तरुण मुले गुन्हेगारीकडे का वळतात, याचा अभ्यास केला आणि चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूरुवात केली. केवळ एक खळबळजनक सनसनाटी कथा प्रेक्षकांपुढे मांडण्याऐवजी त्यामागील तरुणांची मानसिकता, भूमिका काय होती हे मांडणे उचित ठरणार होते. पण दिग्दर्शकापेक्षा निर्माता हिरालाल शहा यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. दत्ताजींना त्या कदापिही मान्य होणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे हा चित्रपट जवळ जवळ पूर्ण झालेला असतानाही त्यांनी तो सोडला. दिग्दर्शक म्हणून स्वतःचे नाव लावण्यासही त्यांनी परवानगी दिली नाही. शेवटी दिग्दर्शकाच्या नावाशिवाय हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदीमध्ये डब करून ‘फांसी का फंदा’ या नावाने प्रदर्शित झाला.
‘आज झाले मुक्त मी’ (१९८६) या पुनर्जन्मावर आधारित असलेल्या चित्रपटात देवदासीची प्रमुख भूमिका मधू कांबीकर यांनी साकारली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद अशी तिहेरी जबाबदारी ही ‘यशोदीप चित्रकथा विभागा’ने पार पाडली आहे. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट चित्रपटाचे क्रमांक तीनचे त्यासोबतच राजदत्त यांनाही उत्कृष्ट दिग्दर्शकाचे क्रमांक तीनचे पारितोषिक मिळाले. तसेच उत्कृष्ट अभिनेता - मोहन गोखले, उत्कृष्ट संगीतकार - अनिल अरुण, छायाचित्रण - इशान आर्य, संकलक - एस. बी. माने, वेशभूषा - दिगंबर जाधव यांनाही पारितोषिके मिळाली.
‘अर्धांगी’ (१९८५) हा चित्रपट ज्योत्स्ना देवधर यांच्या ‘कल्याणी’ या कादंबरीवर आधारित आहे. यापूर्वी या कादंबरीवर तेरा भागांची ‘कल्याणी’ याच नावाने दूरदर्शनवर मालिका आली होती. तिचे दिग्दर्शनही दत्ताजींनीच केले होते. चित्रपटाची नायिका गौरी ही लग्न होऊन मोहित्यांच्या वाड्यात येते, त्याच दिवशी तिच्या नणंदेच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे तिला पांढऱ्या पायाची, अपशकुनी म्हणून घरातले सर्व जण हिणवतात. तिचा छळ करतात. तिला मुलगा होतो, तो पण तिच्याजवळ दिला जात नाही. गौरीच्या चारित्र्यावर आळ घेऊन तिला कुलटा ठरवण्यात येते. मुलाच्या स्पर्शासाठी ती आसुसलेली असते. ऐन दिवाळीत मुलगा तापाने फणफणलेला असतानाही तिला जवळ येऊ दिले जात नाही. शेवटी तिची सहनशक्ती संपते. बंद खोलीत ती स्वतःला पेटवून घेते. मोहित्यांच्या वाड्याला, घराण्याला शाप देते आणि मरते. त्यानंतर घरातल्या पुरुषांचा एका पाठोपाठ एक असा मृत्यू होतो आणि तिचा आत्मा एक नवीन रूप घेतो.
अशा या पुनर्जन्मावर आधारित चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शकाच्या पुरस्काराबरोबरच संगीत : अशोक पत्की, पटकथा व संवाद : यशवंत रांजणकर, विशेष अभिनेता : अजिंक्य देव, विशेष अभिनेत्री : भारती आचरेकर, पार्श्वगायिका : देवकी पंडीत, नृत्य : सुबल सरकार, रंगभूषा : रमेश नहाटे, जाहिरात : श्रीकांत धोंगडे अशी त्या वर्षीची सर्वांत जास्त अकरा पारितोषिके मिळाली. अजिंक्य देव याची भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता.
‘पुढचं पाऊल’ (१९८६) हा चित्रपट जयवंत दळवी यांच्या ‘पर्याय’ या नाटकावर आधारित आहे. हा केवळ एक कौटुंबिक चित्रपट नसून आजच्या समाजात घडणाऱ्या हृदयद्रावक घटनांचे चित्रण यात आहे. ही एक हुंडाबळी समस्या नाही, तर लालसा आणि हव्यासापोटी माणसाचा पशू कसा बनतो, याचं वास्तववादी दर्शन दत्ताजींनी यात घडवले आहे. तसेच समाजजागृतीने या दुष्ट प्रवृत्तीला आळा कसा घालता येईल, त्याचा प्रतिबंध कसा करता येईल याचे चित्रण म्हणजे हा चित्रपट.
या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबर दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर गीते : सुधीर मोघे, कला दिग्दर्शक : दिगंबर कुलकर्णी, विशेष अभिनेता : यशवंत दत्त, विशेष अभिनेत्री : आशालता, बाल कलाकर : मा. अमिताभ, पार्श्वगायिका : आशा भोसले, जाहिरात : सुबोध गुरुजी यांनाही पारितोषिके मिळाली. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट व दिग्दर्शकाच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या रजत कमलावर राजदत्तांचे नाव दुसऱ्यांदा कोरले गेले.
‘सर्जा’ (१९८७) हा सीमा देव यांची निर्मिती असलेला दुसरा चित्रपट. त्यांनी यापूर्वी ‘या सुखांनो या’ची निर्मिती केली होती. हा चित्रपट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शेलारखिंड’ या शिवकालीन कादंबरीवर आधारित आहे. लाखा डोंबारी आणि त्याचा वयात आलेला मुलगा सर्जा आणि गौरा डोबारीण व तिची नक्षत्रासारखी मुलगी कस्तुरा यांचे बालवयात लग्न झालेले असते. एके दिवशी जत्रेमध्ये कस्तुरा खेळ करीत असताना चंद्रभान बक्षी तिला पळवतो. सर्जा तिला वाचवू शकत नाही. बहिर्जी नाईक व त्याचे शिपाई तिला वाचवतात. आपण तिला वाचवू शकत नाही, याचे सर्जाला खूप वाईट वाटते. बायकोचे रक्षण करू न शकणारा एक डोंबारी, अशी त्याची हेटाळणी होते. एके दिवशी गडाचे राजमार्ग सोडून अन्य मार्गाने गडावर प्रवेश करणाऱ्यांना भरघोस इनाम जाहीर होते आणि सर्जा ते जिंकतो.
या चित्रपटासाठी पटकथा-संवाद यशवंत रांजणकर यांनी लिहिले. ना. धों. महानोर यांची ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ व ‘मी काट्यातून चालून थकले, तू घोड्यावर भरदारी’ ही दोन्ही गीते हृदयनाथ मंगेशकराच्या चालीने व लता मंगेशकर व सुरेश वाडकर यांच्या सुंदर सुरांनी श्रवणीय झाली आहेत.
या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विशेष पारितोषिक मिळाले, तर विशेष अभिनेता म्हणून बलदेव इंगवले, गीतांसाठी ना. धों. महानोर, ध्वनिमुद्रक के. दशरथ यांनाही पारितोषिके मिळाली. उत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून तिसऱ्यांदा रजत कमळाच्या राष्ट्रीय पारितोषिकावर राजदत्तांनी मोहोर उमटवली.
या चित्रपटांबरोबरच दत्ताजींनी अशोक सराफ यांना घेऊन ‘आपलेच दात आपलेच ओठ’ (१९८२), ‘सासू वरचढ जावई’ (१९८३) हे दोन चित्रपट केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्याद्वारे भारताचे पहिले कृषि मंत्री डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘ज्ञानगंगेचा भगीरथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही राजदत्त यांनी केले. चित्रपट पूर्ण होऊनही काही अपरिहार्य कारणामुळे तो सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकला नाही.
‘दूरी’ (१९८९) हा दत्ताजींनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट सुरेश खरे यांच्या ‘एका घरात होती’ या नाटकावर आधारित आहे. एक मध्यमवर्गीय नायिका तिच्या पतीचे अपघातात दोन्ही पाय निकामी होतात. त्यामुळे तिला नोकरी करावी लागते. सोबत छोटी मुलगी व दीर असतात. नोकरी करत असताना तिचे तिच्या बॉसबरोबर संबंध आहेत असा तिच्या नवऱ्याला संशय येतो. तिच्या बॉसबरोबरच्या वागण्यावरून एकदा तिचे नवऱ्याशी भांडण होते. बॉस अत्यंत सज्जन असल्याची तिला खात्री असते पण नंतर तिच्या मोकळ्या स्वभावाचा बॉसने गैरअर्थ लावल्याचे तिच्या लक्षात येते. घरी आल्यावर ती कोणाशी बोलत नाही. न बोलता ती वावरत असते. शेवटी तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करतो.
या चित्रपटात शर्मिला टागोर, मार्क झुबेर, यशवंत दत्त, विक्रम गोखले असे कसलेले कलावंत होते. निर्मात्याच्या आर्थिक अडचणींमुळे हा चित्रपट सेन्सॉर होऊनही प्रदर्शित झाला नाही.
दूरदर्शन मालिका
चित्रपटांसोबतच त्यांनी दूरदर्शन मालिकाही दिग्दर्शित केल्या आहेत. ना. धों. ताम्हणकर यांनी लोकप्रिय केलेली व्यक्तिरेखा म्हणजे ‘गोट्याया’. या नावानेच त्यांनी दूरदर्शनसाठी मालिका दिग्दर्शित केली. जॉय घाणेकर याने ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. आजही ‘गोट्या’ ही मालिका मुलांना आवडते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
निलकांती पाटेकर निर्मित ‘मन वढाय वढाय’ ही मालिका मराठी साहित्यातील वेगवेगळ्या कथांवर आधारित आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात मंजू सिंग निर्मित ‘एक कहानी’ या हिंदी मालिकेत मधु मंगेश कर्णिक यांची ‘गोकुळ’ कथा दत्ताजींनी दिग्दर्शित केली होती. ती आता युनेस्कोच्या ग्रंथालयात संग्रही ठेवण्यात आली आहे.
युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्याचबरोबर उत्तम आध्यात्मिक संस्कार व्हावेत, या हेतूने १९८२ साली पूज्य गुरुदेव चिन्मयानंदजी यांच्या सांगण्यावरून चिन्मय मिशन, पुणे यांच्यासाठी दत्ताजींनी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदवनभुवनी’ हा दृकश्राव्य नाट्यमय कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे जवळ जवळ शंभरएक कलाकारांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ८०-९० प्रयोग केले. या कार्यक्रमाची पटकथा सुधीर मोघे यांनी लिहिली, संगीताची बाजू दत्ता डावजेकर यांनी सांभाळली, तर नृत्य दिग्दर्शन कृष्णदेव मुळगुंद यांनी केले होते.
अभिनय
राजाभाऊ परांजपे यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम करत असताना, वेळप्रसंगी एखादा कलाकार जर आलेला नसेल तर दत्ताजींनी चित्रीकरण थांबू न देता त्याची छोटी भूमिका पार पाडून चित्रीकरण पूर्ण करून दिले. दत्ताजींनी ‘जगाच्या पाठीवर’ (१९६०), ‘सुवासिनी’ (१९६१), ‘ते माझे घर’ (१९६३), ‘गुरुकिल्ली’ (१९६६), ‘आधार’ (१९६९) या मराठी चित्रपटांसोबतच ‘क्रांतिवीर’ (१९९४), ‘वजूद’ (१९९८) या हिंदी चित्रपटांमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका पार पाडल्या व दिग्दर्शकाच्या कामाचा खोळंबा होऊ दिला नाही हे विशेष. चित्रपटाचे दिग्दर्शन करणे थांबवल्यावर वयाच्या नव्वदीकडे झुकल्यानंतरसुद्धा दत्ताजींनी तरुण दिग्दर्शक सतीश रणदिवे यांच्या ‘दुसऱ्या जगातील’ (२०११), दिपक कदम यांच्या ‘वाक्या’ (२०१७), रमेश मोरे यांच्या ‘हाक’ (२०१७) या चित्रपटातील दीर्घ भूमिका तितक्याच ताकदीने पार पाडल्या.
लघुपट / माहितीपट
शिवराज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाली, तेव्हा महाराष्ट्र शासनासाठी ‘कथा राजगडाची’ हा लघुपट दत्ताजींनी तयार करून दिला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित ‘सखा माझा ज्ञानेश्वर’, वारली समाजाच्या जीवनावर आधारित ‘काज’ आणि दुर्गाबाई भागवत यांच्या जीवनावर आधारित ‘दुर्गा’ हे माहितीपट त्यांनी दूरदर्शनसाठी तयार करून दिले.
डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘केशव : संघनिर्माता’ (१९८८) या लघुपटाचे दिग्दर्शनसुद्धा दत्ताजींनी केले. अपंग कल्याण संस्था, वानवडी, पुणे ही संस्था दिव्यांग मुलांसाठी गेली अनेक वर्षे काम करते. अशा समाजासाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी त्यांनी ‘एका पाऊलवाटेची सुवर्ण जयंती’ व ‘कथा अरुणोदयाची’ हे दोन माहितीपट केले. विशेष म्हणजे संस्थेतील मुलांनाच घेऊन त्यांनी हे माहितीपट बनवले आहेत.
राजदत्त यांचे दिग्दर्शनाचे काम प्रचंड आहे. त्यांच्याइतकी महाराष्ट्र शासनाची १३ पारितोषिके आजपर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाला मिळालेली नाहीत. तसेच १९८२ ते १९८६ या सलग पाच वर्षांमध्ये दिग्दर्शनाची सात पारितोषिके मिळवण्याचा मोठा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
(‘समग्र दिग्दर्शक राजदत्त’ या परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे यांच्याद्वारे प्रकाशित होणाऱ्या आगामी पुस्तकातून)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment