अजूनकाही
‘बालभारती’ हा मराठी चित्रपट पाहिला. मातृभाषेतून मिळणारं शिक्षण आनंददायी असतं. इंग्रजी माध्यमात शिकण्यामुळे बालमनाला किती यातना होतात, हा याचा मुख्य विषय आहे. चित्रपटाची कथा कोणत्याही अंगाने उत्कंठावर्धक वगैरे नाही. ना त्यात काही थरार, रहस्य किंवा ‘हटके’ वगैरे म्हणावं असं काही नाही. अगदी कुठल्याही सर्वसामान्य मराठी कुटुंबात घडते, अशीच कथा आहे. फक्त त्या कुटुंबातील एका लहान मुलाला, ‘चिन्या’ला कसल्या तरी भन्नाट कल्पना सुचत असतात, ही त्यातली जमेची बाजू.
या चित्रपटाचे संवाद कुठल्याही अर्थानं टाळीबाज, ‘आई-बाबा नि साईबाबा टाईप’ चटपटीत किंवा बाहेर पडल्यावरही लक्षात राहतील, असे नाहीत. भाषा कोल्हापूरची असली तरी मुद्दाम त्याला तांबडा-पांढरा झणझणीत तडका दिलाय असंही नाही. सगळे घरगुतीच संवाद. अपवाद फक्त रॉकी नावाचा माजी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर जे थोडंफार वेगळं ऐकायला मिळतं तेवढंच!
चित्रपटाला संगीत आहे का? तर आहे. गाणी आहेत का? तर हो, गाणीही आहेत. पण चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही ती लक्षात राहतात का? तर तसं नाही. मात्र ‘आम्ही शिकण्यात नंबर वन’ या गाण्यातून चित्रपट पुढे सरकतो, हे नक्की!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
कॅमेऱ्याच्या काही विशेष करामती दिसतात का? विशिष्ट अँगलने कॅमेरा फिरतोय वगैरे असं काही? कॅमेऱ्यातून दिग्दर्शक काही बोलू, सांगू पाहतोय? मला तरी कुठे तसं काही दिसलं नाही.
थोडक्यात, चित्रपट ‘पाहण्यासाठी’ आवश्यक असणाऱ्या गोष्टींची यात काही प्रमाणात वानवा भासत असली, तरी ही कमतरता हीच या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. बाकी कार्य सिद्धीस नेण्यासाठी सिद्धार्थ जाधव - नंदिता पाटकर या जोडप्याची ‘ऐ डिप्लोमा - ऐ एम मराठी’ अशी छान जमून आलेली भट्टी, अभिजीत खांडकेकरची रॉकिंग स्टाईल, उषा नाईक आजीबाईचा विसराळूपणा, रविंद्र मंकणींचा भागवत सरांचा ‘शिस्तीत रहा’ म्हणून दिलेला सल्ला, यांनी आपला ठसा उत्तम उमटवला आहे.
हा चित्रपट बनवण्यामागे लेखक-दिग्दर्शक यांचा काही एक हेतू आहे, हे जाणवत असले तरी त्यांनी त्याचा प्रचारपट केलेला नाही. हा चित्रपट उगीचच तात्त्विक चर्चा करत नाही. हा लघुपट नाही आणि विशेष: म्हणजे रटाळवाणा तर अजिबात नाही, हे त्याचं विशेष! तसा तर प्रत्येक चित्रपट प्रचारपटच असतो, पण आधी तो चित्रपट असावा, ही किमान अपेक्षा असते. आणि हा ती अपेक्षा नक्कीच पूर्ण करतो.
यातली दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे, दिग्दर्शकाला लहान मुलांचं भावविश्व नीटपणे कळलेलं दिसतं. कारण मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांचे प्रसंग अधिक परिणामकारक झाले आहेत. मग ते प्रसंग गंभीर असोत वा मजेशीर! विशेषत: चिन्याचे मित्र जेव्हा जेव्हा पडद्यावर येतात-बोलतात, तेव्हा तेव्हा ‘हास्यजत्रे’तला गौरव बोलतो, तसा चित्रपट ‘फ्रेश’ होतो! शिक्षणाचं माध्यम बदलल्यामुळे लहान मुलाची होणारी घालमेल, त्याचा कोंडमारा, त्याची तगमग किती त्रासदायक असते, ते दाखवण्यात हा चित्रपट संपूर्णपणे यशस्वी झाला आहे, असं निश्चितपणे जाणवतं. याचं श्रेय जेवढं दिग्दर्शकाचं, तेवढंच चिन्याचं पात्र रंगवणाऱ्या आर्यन मेंघजी याचंही!
या चित्रपटाचा आवाका तसा मोठा आहे. त्याला अनेक पदर आहेत. तीन तासांतही ते सगळं मावणं तसं अशक्यच. त्यात हा चित्रपट तर जवळपास दोन तासांतच ‘आटोपला’ आहे. त्यामुळे अनेक गोष्टी यायच्या राहून गेल्या किंवा काही ठिकाणी तपशीलाच्या उणिवाही राहिल्या असल्याचं जाणवतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्यातल्या त्यात मराठी शाळांचा कार्यकर्ता म्हणून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. मराठी शाळांना पायाभूत सुविधा पुरवण्यात, त्यांचा दर्जा सुधारण्यात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग खूप मोठा असतो. अनेक माजी विद्यार्थी संघांनी ते यशस्वीपणे सिद्ध केलेलंही आहे. मात्र माजी विद्यार्थ्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेला दाखवणं, हे थोडसं अतिशयोक्तीपूर्ण किंवा मूळ प्रश्नाचं वरवरचं उत्तर आहे. शिक्षणात रस असणारा माजी विद्यार्थी आपल्या शाळेच्या गुणवत्ता वाढीत निश्चितच मोलाचं योगदान देऊ शकतो. मात्र माजी विद्यार्थ्यांकडून सरसकट तशी अपेक्षा करणं योग्य नाही. त्यापेक्षा शाळेतील शिक्षकांच्या सक्षमीकरणात माजी विद्यार्थी कसे भर घालू शकतात, यावर अधिक जोर द्यायला हवा होता.
मराठी शाळा या विषयावर चित्रपट करायची उत्सुकता, तयारी याआधी अनेकांनी दाखवली. मात्र मराठी शाळांचा विषय दिवसेंदिवस अधिक जटील होत चालला आहे. एकूणच निराशा वाढवणाऱ्या बातम्या रोजच येत असताना तो विषय पडद्यावर आणला, तो लेखक दिग्दर्शक नितीन नदन यांनी! त्यामुळे मराठी समाजाने त्यांचे मन:पूर्वक आभारच मानायला हवेत. किमान मराठी शाळा चालवणारे संस्थाचालक, शिक्षक, पालक यांनी तरी जाहीरपणे कौतुक करायला हवं. कारण ते ज्या समस्येशी रोजच्या रोजच भिडत आहे, त्याचे पडसाद सर्वदूर पोचवण्यात हा चित्रपट मोलाचं काम करतो आहे. मराठी समाजावर एकूणच मूलगामी परिणाम करणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयाला नितीन नंदन यांनी पडद्यावर आणलं आहे.
आनंददायी वातावरणात शिकणारं, खेळणारं, हसरं मूल अचानक भेदरलेलं, तापट, अबोल कसं होतं, हे पहायचं असेल आणि त्यापेक्षाही ते अधिक समजून घ्यायचं असेल, तर ‘बालभारती’ अवश्य पहा!
ता. क. - बहुजन समाजाचं शिक्षणातील वाढतं प्रमाण आणि मराठी शाळांची परवड हा काही निव्वळ योगायोग नाही. शिवाय सरस्वती, गणपती ही विद्येची दैवतं हे मान्य. पण कुणासाठी? ज्यांना विद्याच नाकारली त्यांचा आणि या विद्येच्या दैवतांचा काय संबंध? शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील मराठी शाळा या चित्रपटातही ‘सरस्वती विद्यालय’च दाखवली आहे! ‘सावित्रीबाई शाळा वा विद्यालय’, अशी पाटी पडद्यावर पाहायला कधी मिळेल कुणास ठाऊक!
.................................................................................................................................................................
लेखक आनंद भंडारे ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे कार्यकर्ता असून ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ या केंद्राच्या उपक्रमाचे समन्वयक आहेत.
bhandare.anand2017@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment