‘एव्हरी गुड बॉय डिझर्व फेवर’ : या जगात ‘वेडा’ कोणाला म्हणायचे आणि ‘शहाणा’ कोणाला?
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘एव्हरी गुड बॉय डिझर्व फेवर’ या नाटकातील एक प्रसंग
  • Fri , 02 December 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक एव्हरी गुड बॉय डिझर्व फेवर Every Good Boy Deserves Favour टॉम स्टोपार्ड Tom Stoppard

विसावे शतक हे ‘राजकीय तत्त्वज्ञानाच्या लढायांचे शतक’ म्हणून ओळखले जाते. याची सुरुवात कार्ल मार्क्सच्या १८४८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ या पुस्तिकेने झाली. नंतर मार्क्सचा तीन खंडातला ‘भांडवल’ हा ग्रंथराज प्रकाशित झाला. तेव्हापासून जगभर ‘आहे रे’ विरुद्ध ‘नाही रे’ असा संघर्ष सुरू झाला. त्याला १९१७ सालापासून धार चढली. कारण या वर्षी लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियात ‘कामगार क्रांती’ झाली. नंतर दुसरे महायुद्ध झाले. ते संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांत शीतयुद्ध सुरू झाले. ते १९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर संपले.

ही सर्व पार्श्वभूमी डोळ्यांसमोर ठेवत सर टॉम स्टोपार्ड (जन्म : १९३७) या झेक‐इंग्रज नाटककाराच्या ‘एव्हरी गुड बॉय डिझर्व फेवर’ या नाटकाला सामोरे जावे लागते. स्टोपार्ड शालेय शिक्षणाच्या निमित्ताने १९४३-४६ दरम्यान दार्जिलिंगला होते. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण इंग्लंडला पूर्ण केले आणि आपल्या कारकिर्दीची सुरुवात आधी पत्रकार, नंतर नाट्यसमीक्षक म्हणून केली. ते १९६० सालापासून पूर्ण वेळ लेखन करत आहेत. त्यांनी नाटकांबरोबरच काही चित्रपटांच्या पटकथासुद्धा लिहिल्या आहेत. ‘Rosencrantz and Guildenstern are dead’, ‘Night and Day’, ‘The Real Thing’, ‘The Invention of Love’ वगैरे. ‘विसाव्या शतकातील महत्त्वाचा ब्रिटिश नाटककार’ असा त्यांचा सार्थ गौरव करण्यात येतो.

‘एव्हरीबडी गुड बॉय डिझर्व ए फेव्हर’ हे नाटक १९७७ सालचे. ते रंगमंचावर सादर झाले, तेव्हा त्याचे जोरदार स्वागत झाले होते. अलीकडे पाश्चात्य जगतात त्याचे पुन्हा प्रयोग झाले होते. भारतात त्याचे नुकतेच प्रयोग झाले. या नाटकासाठी पाश्चात्य संगीतकार आंद्रे पेवीन यांनी काम केले. याचा अर्थ, या नाटकात ‘संगीत’ हा घटक फार महत्त्वाचा आहे... महाराष्ट्रातल्या संगीत नाटकांसारखा.

स्टोपार्ड यांची बहुतांश नाटकं राजकीय नाटक आहेत. ‘एव्हरीबडी गुड बॉय डिझर्व ए फेव्हर’ हेही त्याला अपवाद नाही. याचा काळ आहे १९७७ हे वर्ष आणि स्थळ आहे सोव्हिएत युनियन. तेव्हा सोव्हिएत युनियन ‘वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी करणारा देश’ म्हणून कुप्रसिद्ध होता. नामवंत रशियन लेखक बोरीस पास्तरनाक आणि अणुशास्त्रज्ञ साखाराव यांचा झालेला छळ चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर हे नाटक आले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हे नाटक मानसिक रुग्णांसाठी असलेल्या तुरुंगात घडते. यातील दोन पात्रं फार महत्त्वाची आहेत. पहिले, अलेक्झांडर राजकीय कैदी आहे, तर दुसरे, अलेक्झांडर इव्हानोव्ह खरोखरच वेडा आहे. दोघांना एकाच तुरुंगात ठेवलेले असते. कम्युनिस्ट शासनाच्या विरोधात वैचारिक बंड केल्याबद्दल अलेक्झांडरला तुरुंगवासाची शिक्षा झालेली असते. इव्हानोव्हला सतत भास होत असतात की, तो ऑर्केस्ट्रामध्ये ‘ट्रँगल’ हे तसे कमी कौशल्याची गरज असलेले वाद्य वाजवत आहे. हा ऑर्केस्ट्रा इव्हानोव्हच्या मनात चाललेला तरी त्याचे रंगमंचावर प्रत्यक्ष दर्शन होते. त्याद्वारे इव्हानोव्हच्या मनातले खेळ प्रेक्षकांसमोर आणले जातात. अलेक्झांडर आणि इव्हानोव्ह यांच्यातल्या गप्पांतून आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात ‘वेडा’ कोणाला म्हणायचे आणि ‘शहाणा’ कोणाला?

यात शासनव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची ठरते. कम्युनिस्ट शासन ठरवते की, कोण शहाणा आहे आणि कोण मूर्ख. म्हणूनच तर अलेक्झांडरसारख्या वेड्या नसलेल्या माणसाला इव्हानोव्हसारख्या वेड्याबरोबर तुरुंगातील एका खोलीत ठेवले जाते. मात्र सरकार अलेक्झांडरला नेहमी सांगत असते की, जर त्याने त्याच्या चुका कबूल केल्या, तर त्याची लगेच सुटका करण्यात येईल. त्याला अलेक्झांडर नकार देतो. येथे नाटककार स्टोपार्ड महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात - स्वातंत्र्यासाठी सत्याचा बळी द्यावा का? अशा प्रकारे माफी मागून‚ लाचार होऊन जर स्वातंत्र्य मिळत असेल, तर ते घ्यावे का?

या दोन महत्त्वाच्या पात्रांबरोबरच अलेक्झांडरचा शाळेत जाणारा मुलगा साचा‚ मनोरुग्णांचे डॉक्टर हे छोट्याशा भूमिकेत आहेत. साचा शाळेत ‘बंडखोर मुलगा’ म्हणून ओळखला जातो. (शिक्षक त्याला नेहमी म्हणतात की, बंडखोरी तुमच्या रक्तातच आहे.) एका प्रसंगी साचा तुरुंगात असलेल्या वडिलांना सुचवतो की, त्यांनी सरकारला कबुलीजबाब लिहून द्यावा की, ‘माझं चुकलं’. पण त्याचे तत्त्वनिष्ठ वडील ठाम नकार देतात. सरकार आणि अलेक्झांडर दोघंही आपापल्या भूमिकांवर ठाम राहतात. नंतर मात्र या दोन्ही कैद्यांची सुटका होते.

याचा अर्थ शासनव्यवस्थेत बदल होतो का? तर थोडासुद्धा बदल झालेला दिसून येत नाही. दिसतं असं की, लवकरच तुरुंगात नवा अलेक्झांडर‚ नवा इव्हानोव्ह येतील आणि व्यवस्था आधी होती तशीच पुढे सुरू राहील…

शीतयुद्धाच्या काळातले हे नाटक आता, २०२२ साली बघताना काहीसे कालबाह्य वाटते. १९९१ साली सोव्हिएत युनियन कोसळले, त्याला आता ३० वर्षं होऊन गेलीत. आजच्या पिढीला सोव्हिएत युनियन म्हणजे काय, ती कशा प्रकारची शासनव्यवस्था होती‚ तिथं राजकीय बंडखोरांना कसं वागवलं जाई, याबद्दल फारशी माहिती नाही. अर्थात आज अनेक देशांत तेव्हाच्या सोव्हिएत युनियनपेक्षाही जास्त गंभीर स्थिती आहे‚ हा भाग वेगळा.

या नाटकाच्या पाश्चात्य जगतात झालेल्या प्रयोगांदरम्यान रंगमंचावर ऑर्केस्ट्रा असायचा. मुंबईत झालेल्या प्रयोगात ‘सिम्फनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’चे सुमारे तीन डझन कलाकार रंगमंचावर होते. खूप वर्षांपूर्वी मी याच एनसीपीएमध्ये १९३०-४०च्या दशकात बनलेले ‘द गेम ऑफ डाईस’ वगैरे कृष्णधवल सिनेमे बघितले होते. पडद्यावर सिनेमा सुरू असायचा, तर पडद्याच्या बरोबर खाली वाद्यवृंद बसलेला असायचा, जो प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत द्यायचा. हा प्रकार और होता. आता तो अनुभव स्टोपार्डच्या नाटकामुळे अनुभवायला मिळाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या नाटकाचे दिग्दर्शन ब्रुस गुथरिये यांनी केले आहे. यात नील भूपलम‚ डेंझील स्मिथ‚ सोहराब अर्देशिर‚ दीपिका देशपांडे यांच्या भूमिका आहेत. डेंझील स्मिथ आणि नील भूपलम यांच्यातील जुगलबंदी लक्ष्यवेधी ठरते. ऑर्केस्ट्रा मिकेल टॉम्स सांभाळतात. प्रकाशयोजना (रिक फिशर)‚ रंगभूषा (पल्लवी पटेल) यांचे योगदानही दखल घेण्याजोगे आहे.

हे नाटक बघताना मला १९७०च्या दशकातला ‘वन फ्लू ओव्हर द कुकुज नेस्ट’ हा हॉलिवुडचा सिनेमा आठवत होता. विसाव्या शतकात ‘राजकीय तत्त्वज्ञान’ हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. परिणामी आधुनिक समाज जीवनात ‘राजकीय समर्थक’ आणि ‘राजकीय विरोधक’ यांच्यात सतत वादविवाद‚ प्रसंगी हाणामाऱ्या होत असतात. आजच्या भारतात तर असे प्रसंग जवळपास रोजच घडत आहेत. कधी नथुराम गोडसेवर आलेल्या नव्या नाटकाचा विषय असतो, तर कधी वीर सावरकरांचा ‘माफीनामा’.

‘एव्हरी गुड बॉय डिझर्व फेवर’सारख्या नाटकाचे महत्त्व हे आहे की, ते या मागे असलेल्या राजकीय शक्ती‚ त्यांचे यशापयश वगैरेंवर प्रकाश टाकते. या नाटकाच्या माध्यमातून स्टोपार्डने यांनी जॉर्ज ऑर्वेल पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि ‘मानवी स्वातंत्र’‚ ‘सर्वंकष सत्ता’ वगैरेंची सैद्धान्तिक चर्चा केली आहे.

मराठीत ‘राजकीय नाटक’ हा प्रकार गो. पु. देशपांडे यांचा अपवाद वगळता फारसा पाहायला मिळत नाही. थोडक्यात, हे नाटक पाहताना खरंखुरं राजकीय नाटक कसं असतं‚ याचा अंदाज येतो.

.................................................................................................................................................................

लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख