या ‘गोदार्द’ नावाच्या आशयात कायम आधुनिक जगण्याच्या वावटळीत सापडलेल्या समकालीन युरोपियन आयुष्याचा समावेश असायचा...
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सत्यजित राय
  • फ्रेंच दिग्दर्शक जीन-लॉक गोदार्द (जन्म - ३ डिसेंबर १९३०, मृत्यू - १३ सप्टेंबर २०२२)
  • Tue , 13 September 2022
  • कला-संस्कृती चलत्-चित्र जीन-लॉक गोदार्द Jean-Luc Godard सत्यजित राय Satyajit Ray अवर फिल्म्स देअर फिल्मस Our Films Their Films

जगप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक जीन-लॉक गोदार्द (Jean-Luc Godard) यांचं आज वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या सिनेमाचं वेगळेपण सांगणारा हा लेख...

सत्यजित राय यांच्या ‘Our Films Their Films’ या पुस्तकातील ‘An Indian New Wave?’ या लेखातल्या गोदार्दविषयीचा मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे.

मूळ इंग्रजी मजकुराचा मराठी अनुवाद : विकास पालवे 

.................................................................................................................................................................

गोदार्दला असं वाटलं की, सिनेमे स्वस्तात आणि वेगाने बनवले जाऊ शकतात. मग त्याने फार धीटपणे सिनेमा या कलाप्रकाराची मूलभूत पवित्रता नष्ट  न करता खर्चाच्या रूढीबद्ध गोष्टींपासून कशी मुक्तता मिळवता येईल, यावर काम केलं. त्याचा जो काही परिणाम समोर आला, तो सिनेमे बनवण्याच्या मूलभूत गोष्टींत लावलेला ताजा शोध होता, असं आपण म्हणू शकतो. त्यात तोवर ज्ञात असलेल्या सिनेमे बनवण्याच्या प्रकारांबाबत प्रश्न उपस्थित करणं आणि त्यांच्या जागी नवे प्रकार वापरून पाहणंही अंतर्भूत होतं. रूढीमुक्त युगातील रूढीमुक्त लोकांबाबतचे सिनेमे बनवण्यासाठी ज्या तयार आणि कच्च्या पद्धती आहेत, त्या यथायोग्यपणे वापरण्यात गोदार्द समर्थ होता, हे ‘ब्रेथलेस’ आणि त्यापुढील सिनेमांनी सिद्ध केलं.

दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ‘गोदार्द’ नावाचा रूपबंध हा ‘गोदार्द’ नावाच्या आशयातून वाढलेला आहे, आणि या ‘गोदार्द’ नावाच्या आशयात कायम आधुनिक जगण्याच्या वावटळीत सापडलेल्या समकालीन युरोपियन तरुणांच्या - पत्रकार, सैनिक, वेश्या, कामगार स्त्रिया, बुद्धिजीवी - आयुष्याचा समावेश असायचा. मांडणी नवी होती, गती आणि लय नवी होती, कथनाच्या कल्पना नव्या होत्या.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गोदार्द हा सिनेमाच्या इतिहासातील पहिला दिग्दर्शक आहे, ज्याने सर्वसाधारणपणे परिचित असलेल्या कथनाच्या साच्यातून स्वतःला मुक्त केलं. खरं तर असं म्हणणं योग्य ठरेल की, गोदार्दने सिनेमाची एक नवीन शैली विकसित केली. तिची व्याख्या करता येणार नाही, तिचं केवळ वर्णन करता येईल. ही शैली म्हणजे कथा, सिने ट्रॅक्ट्स*, न्यूजरिल्स, रिपोर्ताज, अवतरणं, संदर्भ, व्यावसायिक जाहिराती आणि थेट टीव्हीवरील मुलाखती या सगळ्यांचा कोलाज आहे. उपरोल्लेखित बाबी या नेमकेपणाने समकालीन परिस्थितीतील एखाद्या पात्राशी किंवा पात्रांच्या समूहाशी निगडित असायच्या. हा विचारांशी जोडला गेलेला सिनेमा होता, केवळ भावनिक सिनेमा नव्हता, त्यामुळे तो अल्पसंख्याकांचा सिनेमा होता.    

सिनेमा पाहणारा श्रोतृवर्ग ज्या प्रसंगांद्वारे पुढे काय होणार आहे किंवा कथानकाचा संभाव्य विकास कसा होणार आहे हे ताडू शकतो, अशा ‘आवश्यकच’ असणाऱ्या प्रसंगांना फाटा देऊन गोदार्दला कथानकाचे रूढ साचे बाजूला सारणं शक्य झालं. या गोष्टीने पाहणाऱ्याला तर्क न बांधता केवळ सिनेमा पाहणं आणि आतवर रिचवणं यासाठी प्रवृत्त केलं.  

एक उदाहरण देतो. ‘मस्क्यूलीन-फेमिनीन’ हा सिनेमा सुरू होतो, तेव्हा एका उपाहारगृहात तरुण-तरुणी एकमेकांपासून २० फूट अंतरावर असलेल्या स्वतंत्र टेबलांवर बसले आहेत. त्यांना आपण एकमेकांना ओळखत असल्याचं लक्षात येतं. ते बोलतात, पण कॅमेरा त्यांच्यापासून थोड्या दूरवर असल्यामुळे आणि बाहेर रस्त्यावर खूप ट्रॅफिक असल्यामुळे (काचेच्या दरवाजातून दिसणारी) ते एकमेकांशी काय बोलत आहेत, ते आपल्याला कळत नाही. ट्रॅफिकचा आवाज जाणीवपूर्वक आणि मी असं म्हणेन की, वास्तववादी पद्धतीने त्या दोघांतील संभाषणांच्या आवाजापेक्षा अधिक वरच्या पट्टीत सुरू ठेवून इथे गोदार्द जे काही रूढ संकेत आहेत, त्यांना उलटंपालटं करतो.

हे असं थोडा वेळ सुरू राहतं. अचानक दुसऱ्या एका टेबलावरील माणूस उठतो आणि उपाहारगृहाच्या बाहेर जाऊ लागतो. त्याच्या मागे एक महिला लागलीच बाहेर पडते. ती आपल्या हातातल्या बॅगेतून पिस्तूल काढते आणि थेट त्याच्यावर गोळी झाडते. तो तरुण-तरुणी या घटनेवर काहीतरी प्रतिक्रिया देतात, जी आपल्याला ऐकू येत नाही आणि इथं हा प्रसंग संपतो. एक सांगायचं राहिलं की, ते तरुण-तरुणी हे सिनेमाचे केंद्रबिंदू म्हणून कायम राहतात, पण त्या खुनाबद्दल मात्र सिनेमात पुन्हा काहीच येत नाही.       

वरवर पाहता हा प्रसंग निरर्थक आणि विसंगत आहे, असं म्हणून रद्दबातल करणं सोपं ठरलं असतं. पण पुनर्विचार केल्यानंतर (किंवा पुनः पाहिल्यानंतर) हा प्रसंग या गोष्टीवर प्रकाश टाकतो की, वास्तव ज्या तऱ्हेनं तेव्हाच्या सिनेमांत सादर केलं जायचं, त्यापेक्षा अधिक सच्चेपणाने या प्रसंगात सादर झालेलं आहे. तसेच तो आपलं जगणं आणि काळ यांविषयी काही मूलभूत व योग्य अशी टिप्पणी करतो. सिनेमाचं व्याकरण आपल्याला असं सांगतं की, जे महत्त्वाचं आहे त्यावर भर दिला पाहिजे आणि असं करण्याच्या अनेक दृक-श्राव्य मार्गांची यादी सादर करतं. पण काय महत्त्वाचं आणि काय नाही, याबाबत दिग्दर्शकाचा पूर्णपणे नवा दृष्टीकोन असेल तर काय करायचं?

उपरोक्त वर्णन केलेल्या प्रसंगात ते तरुण-तरुणी एका उपाहारगृहात भेटतात आणि बोलतात, हे दाखवलेलं आहे, याबद्दल काही वाद नाही. ते काय बोलले, हे गोदार्दच्या दृष्टीनं बिनमहत्त्वाचं आहे. हेही दाखवलेलं आहे की, ते जेव्हा बसून बोलत असतात, त्या वेळी त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यातच एक महिला एका पुरुषाचा खून करते (नवरा? प्रेमिक? - बिनमहत्त्वाचं).

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आता, असा प्रसंग घडत असेल तर त्या प्रसंगाची पार्श्वभूमी म्हणून काही गोष्टींची जुळवाजुळव करणं, हे दिग्दर्शकांसाठी आवश्यक असतं. पृष्ठभागावर घडणाऱ्या मुख्य कृतीची जी दिशा आहे, तिला धक्का न लावता सुयोग्य वातावरण निर्माण करणं, हा सामान्यतः एकदम थेट डोळ्यात भरणार नाही, असा पण व्यवसायाचा विशेष भाग होता. पण आपण अशा युगात राहतोय, जिथं आपल्या अवतीभवती सर्वत्र हिंसाचार आहे, असं सुचवण्यासाठी जर एखादा दिग्दर्शक खूप हिंसक असा प्रसंग पृष्ठभागी ठेवत असेल तर काय करायचं?

आणि त्या तरुण जोडप्याचं त्या प्रसंगाशी उघडउघड संबंध नसल्यासारखं वागणं - हा प्रसंग दीर्घ काळ भरपूर हिंसाचाराच्या वातावरणात राहिल्यामुळे निर्माण होणारा हिंसाचाराच्या घटनांकडे पाहण्याचा उदासीन दृष्टीकोन सूचित करत नाही का?       

हे नमूद करणं आवश्यक आहे की, गोदार्दच्या बाबतीत रूढी किंवा प्रस्थापित संकेत यांना उलटंपालटं करणं, हे केवळ चूष किंवा देखावा नाहीय, तर हे सिनेमाच्या व्याकरणाचा सकारात्मक आणि अर्थपूर्ण विस्तार घडवणं आहे.

....................................................

* सिने ट्रॅक्ट्स - फ्रान्समध्ये १९६८ या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उठावाच्या प्रसंगी विविध लोकांनी छोट्या छोट्या फिल्म्स बनवल्या होत्या. त्याला ‘सिने ट्रॅक्ट्स’ असं म्हणतात. गोदार्द आणि अन्य काही दिग्दर्शकांनी या फिल्म्सचा अंतर्भाव आपल्या सिनेमांत केला होता. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal    

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......