‘गॉडफादर’ला चित्रपट म्हणून मिळालेलं यश, त्यातील नटांचं अभिनय कौशल्य आजही अफलातून वाटतं!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
जयंत राळेरासकर
  • ‘गॉडफादर’ची पन्नाशीनिमित्त तयार करण्यात आलेली पोस्टर्स
  • Thu , 01 September 2022
  • कला-संस्कृती चलत्-चित्र गॉडफादर Godfather मारियो पुझो Mario Puzo मार्लन ब्रान्डो Marlon Brando अल पासिनो अल पसीनो Al pacino फ्रान्सिस फोर्ड कोपोला Francis Ford Coppola

मारियो पुझो (१९२०-१९९९) या लेखकाची ‘गॉडफादर’ ही कादंबरी १९६९ साली प्रकाशित झाली. ‘अतिरंजित’ अशी संभावना झालेली ही कादंबरी जगभरच्या वाचकांनी मात्र डोक्यावर घेतली होती. त्यावरील त्याच नावाचा चित्रपट २४ मार्च १९७२ रोजी प्रदर्शित झाला. या वर्षी या चित्रपटाला पन्नास वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं जगभर त्याच्याविषयी अनेकांनी लिहिलं, त्याच्याविषयीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.

फ्रान्सिस फोर्ड कोपोलाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला. खुद्द लेखक मारियो पुझो हादेखील निर्मिती प्रक्रियेत सहभागी होता. त्याने या चित्रपटाचे संवाद लिहिले होते. विटो कोर्लोन या माफियासम्राटाची आणि टोळीयुद्धाची ही कथा खूप गुंतागुंतीची आहे. पुझोच्या कादंबरीला हा चित्रपट पूर्ण न्याय देतो.

अंमली पदार्थांचा व्यापार आणि त्यातून निर्माण होणारी लालसा, याचं अत्यंत भेदक चित्रण हे ‘गॉडफादर’चं महत्त्वाचं अंग आहेच, पण त्याचबरोबर त्यातून मनुष्य-स्वभावाचे कंगोरेदेखील दिसतात. मात्र ते केवळ गुन्हेगारी विश्वातल्या, हेही तितकंच खरं.

केवळ कायद्याच्या परिघाबाहेर नव्हे, तर स्वत:चे कायदे निर्माण करणारा डॉन- विटो कार्लोन ही एक अफलातून व्यक्ती आहे. केवळ अमली पदार्थांची तस्करी करणारा अशी त्याची प्रतिमा नाहीय, तो एक तल्लख बुद्धीचा, खऱ्या अर्थानं धर्मात्मा… ‘गॉडफादर’ होऊन जातो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘गॉडफादर’मध्ये अमली पदार्थांचा व्यापार, त्यातून निर्माण होणारी टोळीयुद्धं, खून-खराबा वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती, हे सगळं आहेच, पण सगळ्यात प्रभावी आहे तो डॉनचा थंड स्वभाव आणि त्याची मुत्सद्देगिरी. अगदी थंड विचारानं तो सर्व प्रकारच्या शक्यतांचा विचार करतो.

डॉनच्या कन्येचा विवाहाचा प्रसंग असतो (चित्रपटाची सुरुवातच या प्रसंगाने होते) आणि अचानक पोलिसांची एक तुकडी येते. बाहेर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचे क्रमांक ते डायरीत लिहीत असतात. डॉनचा मुलगा ते पाहतो. ही बाब तो त्याला सांगतो, त्या वेळी त्याला कळतं की, ती काळजी त्याने आधीच घेतली आहे. सर्व निमंत्रितांना त्याने स्वत:ची गाडी न आणण्याची सूचना केलेली असते. माफिया टोळीतील त्याच्या सर्व हस्तकांनी ती काळजी घेतलेली असते.

असाच दुसरा एक प्रसंग आहे. डॉनचा मुलगा मायकेल पूर्वी आर्मीत असतो. अर्थातच हा मार्ग डॉनला पसंत नसतो. त्याची सुटका कशी होईल, याची व्यवस्था प्रचंड पैसा ओतून डॉनने आधीच केलेली असते. मायकेलला त्याची कल्पनादेखील नसते. आपल्या तीन मुलांपैकी मायकेलच आपला उत्तराधिकारी असू शकतो, याची खूणगाठ त्याने आधीच बांधलेली असते. डॉनचं व्यक्तिमत्त्व खुलतं, ते अशा प्रसंगांतून. खऱ्या अर्थानं तो ‘गॉडफादर’ होतो.

(मूळ कादंबरी आणि) चित्रपट कुठेही भावनावश होत नाही. मारियो पुझो स्वत: इटालियन विस्थापित होता. स्वत: विटो कार्लोन हे नाव मात्र त्याच्या सिसिलीतल्या गावाचं. बाकी सगळा कथाभाग आणि प्रसंग हे टोकाची ईर्ष्या आणि लालसा दाखवतात.

त्याआधी माफिया-चित्रपट आले होते, मात्र त्यात एकांगी चित्रण होतं आणि कुठलेच दिशादर्शक विचार नव्हते. लाचखोर समाज-जीवन हेच या परिस्थितीला कारण आहे आणि हा गुन्हेगारीचा उद्रेक त्यातून निर्माण झाला आहे, असं मारियो पुझोला वाटत असावं. कोपोलाने त्याला दृश्य स्वरूप दिलं इतकंच. दिग्दर्शक या नात्यानं कोपोलाने मारियो पुझोवर काही लादलेलं दिसत नाही. मात्र कोपोला इतकेच श्रेय डॉन साकार करणाऱ्या मार्लन ब्रान्डोलादेखील द्यायला हवं. त्याच्या चेहऱ्यावरचे दगडी भाव आणि थंड संवाद अतिशय परिणामकारक ठरतात. अल पसिनो या नटानं त्यातील मार्लन ब्रान्डोच्या मुलाची भूमिका केली आहे. डॉनचा परिस्थितीशरण वारस म्हणून तो शोभला आहे.

मात्र गमतीचा भाग असा की, या दोघांनाही त्यांच्या या भूमिकांसाठी ऑस्कर पारितोषिक जाहीर झालं, पण ते या दोघांनीही नाकारलं आणि सोहळ्यावरही बहिष्कार टाकला होता. बड्या कलावंतानं ऑस्कर नाकारण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी ते जॉर्ज स्कॉटने नाकारलं होतं. अमेरिकन इंडियनना दिली जाणारी वागणूक हे कारण मार्लन ब्रान्डोने दिलं होतं. अल पसिनोला मिळालेलं पारितोषिक सहाय्यक अभिनेत्याचं होतं. त्याचं म्हणणं असं होतं की, त्याच्या भूमिकेची लांबी अधिक असताना तो सहाय्यक कसा होईल?

संवाद हे ‘गॉडफादर’चं आणखी एक बलस्थान आहे. साधी साधी वाक्यंदेखील चित्रपटात नाट्यपूर्ण पद्धतीनं येतात. ‘Revenge is the dish best served cold’ असे डॉन कार्लोनचे एक वाक्य चित्रपटात आहे. सतत अशा प्रकारच्या सूडाचा प्रवास हेच त्याचं आयुष्य आहे. आपण कायम अनभिषिक्त सम्राट म्हणूनच राहिलं पाहिजे, ही लालसा (आपण त्याला महत्त्वाकांक्षा नाही म्हणू शकत) आणि त्यासाठी काहीही करावं लागलं, तरी बेहत्तर अशी त्याची धारणा असते. न्यूयॉर्क शहरात आपलं कुणीही काहीही करू शकत नाही, असा त्याचा दरारा असतो. तशी माणसं त्याच्या सभोवती असतात. खून-खराबा, दहशत निर्माण करणं, आपल्याकडे आलेल्या गरजू माणसांची विविध कामं करून देणं आणि आपलं अधिराज्य प्रस्थापित करणं, ही त्याची खासीयत असते. डॉनचा उत्तराधिकारी कोण असावा असा एक धागा कथेत आहे. पिढ्यानपिढ्या हे वैमनस्य आणि टोळीयुद्ध असंच राहणार हाच त्याचा अर्थ.

“I'm gonne make him an offer he can’t refuse” हे असंच आणखी एक वाक्य. नंतरही हे वाक्य अनेक प्रकारे आलेलं आहे. त्यातील दहशत आणि इशारा ही पुझोची निर्मिती. मात्र त्यापूर्वीदेखील याच अर्थाचं वाक्य फ्रेंच लेखक बाल्झाकच्या एका कादंबरीत आलं आहे. हॉलिवुडमध्ये संधी मिळत नाही, म्हणून न्याय मागायला आलेल्या जॉनी फौटेनला डॉन हे वाक्य ऐकवतो. त्यात जॉनीसाठी एक दिलासा आहेच, पण त्याचसोबत एक धमकी आहे, आणि एक बिझिनेससुद्धा आहे. इटालियन मूळ वंशाच्या अनेकांची अमेरिकेतील परवड हादेखील कोपोलाच्या दृष्टीकोनाचा महत्त्वाचा भाग आहेच. अशा प्रकारच्या सेवेला तो ‘समाज-सेवा’ वगैरे म्हणत नाही, तर ‘हा एक व्यवसाय आहे’ असंच नेहमी म्हणतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘गॉडफादर’वर काही आक्षेपही घेतले गेलेत. त्यापैकी एक यातील स्त्री-व्यक्तिरेखा. यातील स्त्री-पात्रं फक्त एक वस्तू म्हणूनच सामोर येतात. डॉनच्या इतक्या मोठ्या कुटुंबात स्त्रीचं दुय्यम स्थान जाणवेल इतकं ‘दुय्यम’ असतं. हा आक्षेप चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना, १४ मार्च २०२२च्या ‘Culture’च्या अंकात निकोलस बार्बर यांनी तो घेतला आहे.  

‘गॉडफादर’ आजही लोकप्रिय आणि चांगला चित्रपट असला तरीही तो ‘क्लासिक’ सदरात मोडत नाही वा गणला जात नाही. मात्र त्याचा प्रभाव नंतरच्या काळात इतर अनेक चित्रपट, नाटकं आणि टीव्हीमालिका यांवर पडलेला दिसतो. मात्र ‘गॉडफादर’ची उंची कुणीही गाठू शकलं नाही. आपल्याकडेसुद्धा त्याचा प्रभाव असलेले चित्रपट निघाले आहेत. ‘धर्मात्मा’, ‘दयावान’ हे हिंदी चित्रपट ‘गॉडफादर’ची अत्यंत ढोबळ अशी नक्कल होते. राम गोपाल वर्माचा ‘सरकार’ राजकीय अधिक होता. मात्र अमिताभ बच्चनच्या भूमिकेतला थंड सम्राट बघायला चांगला वाटला होता.

आणखी एक उल्लेख करायला हवा तो मणीरत्नमच्या ‘नायकन’चा. यात आणि ‘गॉडफादर’मध्ये एक साम्य आहे. नायकन हा वरदराज मुदलीयारच्या आयुष्यावर बेतलेला होता. हा मुंबईत आलेला एक तमिळ विस्थापित. मुंबईतील गुन्हेगारी जगात तो सम्राट होतो. साठच्या दशकात मुंबईवर त्याची दहशत होती. मणीरत्नमने हे जग बघितलं होतं. त्याचे पडसाद ‘नायकन’मध्ये असणं अनिवार्य होतं.

किळस वाटेल असा हिंसाचार हा ट्रेंड चित्रपटांमध्ये हल्ली बराच दिसतो. ‘आतंक ही आतंक’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून ते पाहायला मिळतं. कोपोलाच्या ‘गॉडफादर’मध्ये हे सगळं आहे. मात्र त्यात जे होतं, ते आपल्या हिंदी चित्रपटात दिसलं नाही हे खरं.

मात्र ‘गॉडफादर’कडे पाहताना मनात येतं की, सत्ता आणि संपत्तीचं हे प्रदर्शन काय दाखवू\सांगू करू पाहत आहे? आज गुन्हेगारी जगाची दाहकता जगभर दिसते आहे! ती कसला संदेश देऊ पाहत आहे? ‘गॉडफादर’चे आणखी दोन भागही आले, दुसरा भाग १९७४, तर तिसरा १९९०मध्ये आला. ‘गॉडफादर’ला चित्रपट म्हणून मिळालेलं यश, त्यातील नटांचं अभिनय कौशल्य आजही अफलातून वाटतं. तरुणवयात तो कधीतरी बघितलेला, पण आता ५० वर्षांनंतरही आठवतो. काही चित्रपट कधीच विसरले जात नाहीत. त्यापैकीच हा एक.

..................................................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख