अजूनकाही
२००३ साली अमेरिकेतल्या मॅसेच्युएट्स राज्यातील बोस्टन शहरातल्या ‘द बोस्टन ग्लोब’ या वर्तमानपत्रातील ‘स्पॉटलाईट’ या सदराला पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो जाहीर करताना ‘कॅथलिक चर्चमधील पाद्रींकडून होणाऱ्या लहान मुलांच्या शोषणाच्या संदर्भात एक धाडसी आणि सर्वसमावेशक काम केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे’, अशी टिपणी पुरस्कार निवड समितीने केली होती. ‘स्पॉटलाईट’ हे सदर गुन्ह्यांच्या संदर्भातील (इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिझम) बातमीचा तपास करण्यासंबंधी होतं. विशेष बाब म्हणजे तेव्हाचे या सदराचे संपादक धर्माने यहुदी होते.
२०१५ साली याच सदरावर आधारित ‘स्पॉटलाईट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातून कॅथलिक चर्चचे पाद्री कशा प्रकारे लहान मुलांचं शोषण करतात, हे जगासमोर आणलं गेलं. मॅसेच्युएट्स राज्य आणि बोस्टन शहरातील चर्चमधील गैरप्रकार शोधण्याचं काम या चित्रपटातून करण्यात आलं. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या शेवटी कोणकोणत्या देशांत चर्चच्या पाद्रींवर केसेस सुरू आहेत, याची नोंददेखील दिलेली आहे. भारतातल्या केरळमधल्या एका पाद्रीवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या खटल्याचीही नोंद त्यात दिसते. थोडक्यात, या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात चर्चच्या पाद्रींकडून लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची माहिती आणि गांभीर्य जगासमोर आलं. हे लक्षात घेऊन या चित्रपटाला २०१६मध्ये अकादमी अवॉर्ड (ऑस्कर) जाहीर झालं.
आता, २०२२ साली या चित्रपटाविषयी सांगण्याचे कारण काय, असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. तर त्याचा खुलासा असा की, मुद्दा या चित्रपटाचा नाही, तो आहे ख्रिस्ती बहुसंख्य अमेरिका, ख्रिस्ती निर्माते, ख्रिस्ती कलाकार आणि पुरस्कार देणारेही ख्रिस्ती यांच्या संदर्भातला. ख्रिश्चन धर्मातल्या प्रार्थनास्थळातल्या गैरप्रकारांवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाच्या निर्मात्यापासून कलाकारांपर्यंत आणि पुरस्कार निवड समितीपासून प्रेक्षकांपर्यंत सगळेच ख्रिस्ती असूनही हा सिनेमा वाखाणला गेला. या अशा सहिष्णुतेमुळे आणि सुधारणावादी दृष्टीकोनामुळेच अमेरिका महासत्ता आहे, आणि आपण नाही.
याचा अर्थ अमेरिका अगदी सर्वगुण संपन्न आहे, असं नाही. पण जेव्हा जॉर्ज फ्लॉइडसारख्या प्रकरणात सर्व देश ‘निंदनीय घटना’ म्हणून एकवटतो, तेव्हा तिथं कुणाला ‘देशद्रोही’, ‘खलिस्तानी’, ‘अर्बन नक्सल’ वगैरे ठरवलं जात नाही, एवढं तरी मान्य करायला फारशी अडचण येऊ नये.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आपल्याकडे पुरोगामी व सुधारणावादी लोकांना प्रश्न केला जातो की, तुम्ही जसे हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीतींवर प्रश्न उपस्थित करता, तशी हिंमत इतर धर्माबाबत का दाखवत नाही? अमेरिकेत ‘स्पॉटलाईट’च्या टीमला मात्र हा प्रश्न कुणी विचारला नाही की, तुम्हाला फक्त ख्रिस्ती चर्चच दिसली का? ‘स्पॉटलाईट’चे संपादक यहुदी होते, तरीही ख्रिस्ती बहुसंख्य देशात त्यांच्या ख्रिस्ती कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू ठेवली. हे कशाचं द्योतक आहे? आपल्याकडे कुणी मुस्लीम पत्रकारानं अशी एखादी मोहीम हिंदू गुरूंबद्दल राबवली असती, तर काय झालं असतं? कल्पनाही करतानाही धास्तावून जायला होतं ना!
अलीकडच्या काळात आपल्या देशात हिंदू धर्मावर धर्मावर टीका करणार असाल, तर ‘बॉयकॉट’, ‘ट्रोलिंग’ करण्यात येईल, अशी भावना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून असं वाटतंय की, लवकरच चित्रपट कसा असावा, याचे निकषदेखील ‘बॉयकॉट’धारी, ‘ट्रोलिंग’ गँग काही ठरवायला लागतील.
चित्रपट न पाहताच त्याला बॉयकॉट करणं, ही कुठली मानसिकता आहे? हल्ली चित्रपट आणि धर्म यांना यांचा संबंध जोडणं नित्याचंच झालं आहे. कुठल्या ना कुठल्या चित्रपटातल्या कशा ना कशामुळे कुणाच्या ना कुणाच्या भावना दुखावल्या जाताना दिसतात. त्यातही हिंदू धर्माची चिकित्सा कुणीही करायची नाही, आणि जर केली वा विडंबन, चेष्टा केली, तर असहिष्णू झुंडींच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय.
मध्ययुगात युरोपमध्ये कुणी ‘बायबल’ किंवा चर्चविरुद्ध बोललं की, त्याला मृत्युदंड दिला जाई. अशा या कट्टर चर्च-संस्कृतीनं ग्रासलेली राष्ट्रे आज ‘ब्लास्फेमी लॉ’ बंद करू लागली आहेत. आता इंग्लंड, स्कॉटलंडमध्ये धर्माची चेष्टा, विडंबन किंवा विरोध केला तरी गुन्हा मानला जात नाही. याउलट प्राचीन काळापासून सहिष्णू असलेला आपला देश मात्र ‘ब्लास्फेमी लॉ’कडे प्रवास करू लागला आहे. हा उलटा प्रवास आपल्याला अज्ञानाकडे घेऊन जाणारा आहेच, पण तो खाईच्या गर्तेत लोटणाराही आहे, यात शंका नाही.
केवळ धर्मचिकित्सा करणाऱ्या चित्रपटांना ‘बॉयकॉट’ला सामोरं जावं लागतंय का? तर तसंही नाही. २०१७ साली विजय थालापती या कलाकाराचा ‘मरसल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात एका दृश्यात विजय म्हणतो की, ऑक्सिजन सिलेंडर नसल्यामुळे लहान मुलं सरकारी दवाखान्यात मृत्युमुखी पडतात. या संवादाला संदर्भ होता उत्तर प्रदेशमधील सरकारी दवाखान्यातील सत्यघटनेचा. तसंच या चित्रपटात जीएसटीचादेखील उल्लेख होता. त्यातून कररचनेवरही प्रश्नचिन्ह करण्यात आलं होतं. म्हणून हा चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्यात आला. २०२० साली दीपिका पदुकोण जेएनयूमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाली, त्यामुळे तिचा ‘छपाक’ हा चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्यात आला.
म्हणजेच हे ‘बॉयकॉट’धारी केवळ धर्मचिकित्सा करणाऱ्यांनाच नाही, तर त्यांच्याशी राजकीय असहमती दर्शवणाऱ्यांनादेखील धारेवर धरत आहेत. केवळ काही लोकांना बॉयकॉट करतोय, असं ते भासवत आहेत, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. आपण कुणालाही ‘बॉयकॉट’ करू शकतो, अशी त्यांची धारणा बनत चालली आहे. आणि ती सर्वांत दुर्दैवी बाब आहे. आज एक कारण देऊन एकाला ‘बॉयकॉट’ करताहेत, उद्या दुसरं कारण दुसऱ्याला ‘बॉयकॉट’ करताहेत.
का? तर कला व साहित्य या एकमेव गोष्टी आहेत- ज्या समाजकारण, राजकारण, अर्थकारण यावर प्रकर्षानं भाष्य करतात… आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावर लोकांवर परिणामही करतात. ते यांना रोखायचंय. कला व साहित्य या माध्यमांना संपवल्याशिवाय एकाधिकारशाही चांगल्या प्रकारे रुजू शकत नाही. म्हणून कला, साहित्य ही क्षेत्रं उदध्वस्त करायची असं त्यांचं नियोजन दिसतं. थोडक्यात, त्यांना कुणीही राजकीय व्यवस्थेच्या विरोधात साधा ‘ब्र’देखील उच्चारू शकणार नाही, अशी दहशत निर्माण करायची आहे. यात एकाधिकार-प्रवृत्तीसह इतरही काही घटक आहेत. उदा., केवळ गर्दीच्या आवाजाचा भाग होणारे, प्रवाहाबरोबर वाहणारे…
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आज हिंदी चित्रपटांचा आडोसा घेऊन एकंदर सिनेक्षेत्रावर हल्ला केला जातो आहे. हिंदी चित्रपट वाईट आणि दाक्षिणात्य चित्रपट चांगले, अशी आरोळी देणारे तद्दन भोंदू आहेत. एकवेळ यांना हिंदी सिनेमाने केलेली चिकित्सा झेपेल, पण दाक्षिणात्य चित्रपट झेपणार नाहीत. ‘जय भीम’, ‘जन गण मन’, ‘असुरन’, ‘मरसल’, ‘कर्णन’ इत्यादी दाक्षिणात्य चित्रपट ज्या पद्धतीनं आजच्या व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करतात, ते एकाधिकार-प्रवृत्तीवाल्यांना नक्कीच झेपणारे नाहीत.
सध्या हिंदी सिनेमासृष्टी मोडून काढायचे प्रयत्न चालले आहेत, उद्या हा मोर्चा प्रादेशिक सिनेमासृष्टींकडेही वळू शकतो. त्यामुळे उद्या तमिळनाडूमधील चित्रपट डीएमके पक्षाच्या बाजूनं जास्त बनवले जातात, म्हणून त्यांना ‘बॉयकॉट’ केलं जाऊ शकतं. परवा तेलगू चित्रपट हिंदीला विरोध करतात, म्हणून त्यांना ‘बॉयकॉट’ केलं जाऊ शकतं. तेरवा मल्याळम चित्रपटांत डाव्या पक्षांचा जयजयकार आणि हीरो बीफ खातो म्हणून त्याच्या विरोधात मोहीम उघडली जाऊ शकते. अशा पद्धतीनं देशभरातील सिनेक्षेत्र मोडीत काढायचा कार्यक्रम उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
प्रथम सेन्सॉरशिप, नंतर बॉयकॉट, अशीच व्यवस्था चालू राहिली तर उद्या सिनेक्षेत्राला आपल्या संहिता आधी तथाकथित समाजसुधारकांकडून तपासून घेऊनच कलानिर्मिती करावी लागेल. हे कलेच्या दृष्टीनं घातक आहेच आणि लोकशाहीच्या दृष्टीनंही. आणि आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि वेळीच सजग व्हावं लागेल.
प्रश्न हा आहे की, ते आपण लक्षात घेणार का? आणि सजग होणार का?
..................................................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment