मोहम्मद रफीचे वारसदार अर्थात रफीच्या शैलीत गायचा यत्न करणारे गायक….
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
प्रवीण घोडेस्वार 
  • मोहम्मद रफी आणि रफीचे वारसदार गायक - मोहम्मद अझीज, महेंद्र कपूर, बिपीन सचदेव, देबाशिष दासगुप्ता, सोनू निगम, अन्वर आणि शब्बीरकुमार
  • Mon , 01 August 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा मोहम्मद रफी Mohammed Rafi मोहम्मद अझीज Mohammad Aziz महेंद्र कपूर Mahendra Kapoor बिपीन सचदेव Bipin Sachdev देबाशिष दासगुप्ता Debashish Dasgupta सोनू निगम Sonu Nigam अन्वर Anwar शब्बीरकुमार Shabbir Kumar

३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफीने जगाला अलविदा केलं. काल त्यांची ४२वी पुण्यतिथी होती. रुपेरी पडद्यावर दिलीपकुमार– राज कपूर- देव आनंद या त्रिकुटानं अधिराज्य गाजवलं, तद्वतच पार्श्वगायनाच्या क्षेत्रात रफी- किशोर- मुकेश यांनी श्रोत्यांना अनमोल गाण्यांचा खजिना बहाल केला. रफीच्या आधी कुंदनलाल सैगल, पंकज मलिक, जी. एम दुर्रानी, सी.एच. आत्मा यांनी काही काळ गाजवला होता. सैगल तर पुरुष पार्श्वगायकीचा आद्य पुरुष समजला जातो. रेडिओ सिलोनवर सकाळी साडेसात ते आठ या वेळेत जुन्या चित्रपट गीतांचा कार्यकम प्रसारित होतो. या कार्यक्रमाची सांगता सैगलच्या गाण्यानं होते. हा शिरस्ता आजही कायम आहे.

रफी-मुकेश-किशोर हे तिन्ही गायक सैगलचे भक्त नि चाहते होते. त्यांनी आरंभीची काही गाणी सैगलच्याच शैलीत गायली. पुढे या तिघांनी आपापली स्वतंत्र शैली विकसित करून ओळख प्रस्थापित केली. खरं म्हणजे हे तीन गायक केवळ गायक नव्हते, तर त्यांनी आपलं ‘स्कूल’ निर्माण केलं. हे तिघेही खऱ्या अर्थानं आम जनतेचे गायक बनले. याच गायकांचे समकालीन अजून तीन गायक हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवून होते. तलत मेहमूद- मन्ना डे- हेमंतकुमार. रफी- मुकेश- किशोर जनसामान्यांचे गायक होते, तर तलत- मन्ना- हेमंतदा अभिजन वर्गात जास्त लोकप्रिय होते. रफी- मुकेश- किशोर यांच्या शैलीत गाणारे अनेक गायक हिंदी सिनेदुनियेत आलेत. काही लोकप्रिय झाले, काही विस्मरणात गेले. पण तलत- मन्नादा- हेमंतदा यांच्या आवाजाशी नाते सांगणारे गायक मात्र आले नाहीत.

मूळचा पाकिस्तानचा असलेला अदनान सामी हा गायक हेमंतकुमारच्या आवाजाची आठवण करून देतो. पण ही गोष्ट फार कमी लोकांच्या लक्षात आली आहे. मखमली स्वरांचा तलत केवळ अतुलनीय नि अलौकिक देणगी लाभलेला अभिजात गायक होता. ‘एक तलत, बाकी सब गलत’ असं एकेकाळी त्याच्याविषयी बोललं जायचं. विशेषतः ग़ज़ल गायकीचा तलत अनभिषिक्त सम्राट होता. गुलाम अली, मेहंदी हसन हे दिग्गज ग़ज़ल गायकसुद्धा त्याच्या गायकीनं प्रभावित होऊन त्याला आपला आदर्श समजतात. 

रफी हयात असतानाच त्यांच्या आवाजाला पर्याय म्हणून अनेक गायकांना पुढे (pramote) करण्यात आलं. पण महेंद्र कपूरचा अपवाद वगळता इतरांना जम बसवता आला नाही. महेंद्र कपूर यांनी बॉलिवुडमध्ये बऱ्यापैकी आपलं बस्तान बसवलं. शिवाय त्यांनी स्वत:ला हिंदीपुरतंच मर्यादित न ठेवता मराठीसह इतरही प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली. मराठीत तर ते दादा कोंडके यांचा पडद्यावरचा हुकमी आवाज बनले होते. त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारची गाणी मिळाली. निरनिराळ्या संगीतकारांकडे ते गायले. त्यांनी पडद्यावर विविध अभिनेत्यांना आवाज दिला. एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय आहे.

रफीच्या निधनापूर्वी, १९७३ मध्ये गायक अन्वरला ‘मेरे गरीब नवाज़’ या चित्रपटात गायची संधी मिळाली. यातलं त्याचं ‘कसमे हम अपने जान की...’ हे गाणं ऐकून रफी खूप खुश झाले होते. त्यांनी सांगून टाकलं- अन्वर माझी जागा घेईल! पण दुर्दैवानं हा चित्रपट फ्लॉप झाल्यानं त्याची गाणी लोकांपर्यंत फारशी पोहचली नाहीत. विनोदवीर मेहमूद आणि संगीतकार राजेश रोशन यांनी ‘जनता हवालदार’ या चित्रपटासाठी अन्वरला पाचारण केलं. तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्ना हा या चित्रपटाचा नायक होता. त्याच्यावर चित्रित झालेली ‘तेरी आँखो की चाहत में...’ आणि ‘हमसे का भूल हुई...’ ही त्याची दोन सोलो गाणी खूप गाजली. अन्वरला लता आणि आशासह इतरही अनेक गायिकांसमवेत गाणी गायची संधी मिळाली. शिवाय खय्याम, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, भप्पी लाहिरी, अन्नू मलिकसारख्या आघाडीच्या संगीतकारांची गाणी त्याने गायली आहेत.

त्याची ‘सोहनी मेरी सोहनी’ (सोहनी महिवाल), ‘जिंदगी इम्तिहान लेती हैं’ (नसीब), ‘ये प्यार था या कुछ और था’ (प्रेमरोग), ‘नजर से फुल चुनती हैं नजर’ (आहिस्ता-आहिस्ता), ‘मोहब्बत अब तिजारत बन गई हैं’ (अर्पण), ‘रब ने बनाया मुझे तेरे लिये’ (हीर-रांझा), ‘हाथो कि चंद लकिरो का’ (विधाता), ‘मेरे खयालों के रहगुजर से’ (ये इश्क नही आसान), ‘मौसम-मौसम लव्हली मौसम’ (थोडीसी बेवफाई), ‘एक पल हसना जो चाहा’ (बहार आने तक), ‘कहां जाते हो रुक जाओ’ (दुल्हा बिकता हैं), ‘कोई परदेसी आया परदेस में’ (हम हैं लाजवाब), ‘कुर्बानी कुर्बानी अल्ला को प्यारी हैं’ (कुर्बानी) अशी अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. तसेच २००४मध्ये त्याने स्वत: संगीतबद्ध केलेला नि गायलेला ‘मेरी आशिकी से पहले’ हा अल्बम काढला. यातली गाणी मोहम्मद रफीची आठवण करून देणारी असल्याचं जाणकारांचं मत आहे.

अभिनेता सनी देओलचा पहिला चित्रपट ‘बेताब’ १९८३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे सनी-अमृता सिंग या जोडीने हिंदी सिनेदुनियेत पदार्पण केलं. त्याचबरोबर अजून एका व्यक्तीचा हा पहिला लोकप्रिय  सिनेमा ठरला. गायक शब्बीरकुमार याचा. यातली सर्व गाणी शब्बीरकुमार-लताने गायली होती. ‘जब हम जवा होंगे’, ‘तेरी तस्वीर मिल गई’, ‘बादल यू गरजता हैं’, ‘अपने दिल से बडी दुश्मनी थी’, ‘तुमने दी आवाज’, ही सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली नि शब्बीरकुमार हे नाव घराघरांत पोहचलं. खरं म्हणजे त्याने ‘कुली’ या चित्रपटातील गाणी आधी ध्वनिमुद्रित केली होती, पण अमिताभला चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातामुळे ‘कुली’ उशिरा प्रदर्शित झाला. यातली ‘अ‍ॅक्सिडेंट हो गया’,  ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं’, ‘मुबारक हो तुमको हज का महिना’, ‘जवानी कि रेल कहीं’, ‘हमका इश्क हुआ’, ‘लंबूजी लंबूजी’, ‘मुझे पिने का शौक नहीं’, ही गाणी फार लोकप्रिय झाली होती.

शब्बीरकुमार बडोद्याचा. त्याने ‘मेलडी मेकर्स’ नामक तत्कालीन लोकप्रिय ऑर्केष्ट्रामध्ये गायला सुरुवात केली. नंतर ‘एक शाम रफी के नाम’ या रफीच्या गाण्यांच्या कार्यक्रमात तो गाऊ लागला. संगीतकार उषा खन्ना यांनी १९८१ मधल्या ‘तजुर्बा’ या चित्रपटासाठी त्याला पहिल्यांदा गायची संधी दिली. लतासोबत गायलेल्या ‘शाम ये कुछ  खोई-खोई...’ या ‘प्रेम तपस्या’ चित्रपटातील युगलगीताने शब्बीरकुमारने श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतलं. राजीव कपूरच्या पहिल्या चित्रपटात ‘एक जान हैं हम’मध्ये संगीतकार अन्नू मलिकने त्याच्याकडून चार गाणी गाऊन घेतली. ‘याद तेरी आएगी’, ‘आसमा पे लिख दू नाम तेरा’, ‘दिल दिल हैं कोई’, ‘बोलो बोलो’ ही गाणी श्रोत्यांनी फार उचलून धरली. अन्नू मलिकचा हा पहिला सुपरहिट सिनेमा. पडद्यावर आपले काका शम्मी कपूरची नक्कल करत राजीव कपूरने अभिनय केला, तर रफीच्या शैलीत शब्बीरकुमारने गाणी गाऊन चित्रपट प्रेक्षकांना नि श्रोत्यांना वेगळा आनंद दिला.

शब्बीरकुमारने १९८०च्या दशकांत आघाडीच्या सर्वच संगीतकारांकडे काम केलं. शिवाय सर्वच अभिनेत्यांना आपला आवाज दिला. गायक  मोहम्मद अझीजचं आगमन होईपर्यंत शब्बीरकुमारने भरपूर गाणी गायली. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्याला सर्वाधिक गाणी दिली. त्याची अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. वानगीदाखल ‘प्यार किया नाही जाता’ (वो सात दिन), ‘बोल दो मीठे बोल’ (सोहनी महिवाल), ‘तुमसे मिलकर ना जाने क्यू’ (प्यार झुकता नहीं), ‘झीहाल–ए-मुश्कीन’ (गुलामी), ‘जिंदगी हर कदम एक नई जंग हैं’ (मेरी जंग), ‘हैरान हू मैं आप कि जुल्फो को देखकर’ (जवाब हम देंगे), ‘साजन आ जाओ’ (आग ही आग), ‘सो गया ये जहा’ (बेताब), ‘गोरी हैं कलाईया’ (आज का अर्जुन), ‘सोचना क्या जो भी होगा’ (घायल), ‘मिलके ना होंगे जुदा’ (प्यार झुकता नहीं), ‘मेरे साथी जीवनसाथी’ (बाझी), ‘तू पागल प्रेमी आवारा’ (शोला और शबनम), ‘तुम याद ना आया करो’ (जीने नहीं दुंगा), ‘दिल बेकरार था दिल बेकरार हैं’ (तेरी मेहरबानीया), ‘तुझे कितना प्यार करू’ (कुदरत का कानून) अशी अनेक गाणी सांगता येतील.

शब्बीरकुमारने मराठीतही गाणी गायली आहेत. ‘गाऊ सख्या प्रीत गाणी’, ‘सिनेमावाले’, ‘जाऊ या डबलसीट’, ‘दणादण दे दणादण’, ‘पोलीसवाल्या सायकलवाल्या’, ‘देवी ही पावली वाट मला दावली’, ‘घेऊनी टांगा सर्जा निघाला’ यांसारखी गाणी त्याने म्हटली आहेत. यातल्या काही गाण्यांवर अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने अभिनय केला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मोहम्मद रफीच्या शैलीत गाणारा आणखीन एक लोकप्रिय पार्श्वगायक म्हणजे मोहम्मद उर्फ मुन्ना अझीज. तो कोलकात्याचा. त्याने पहिलं पार्श्वगायन बंगाली चित्रपटासाठी केलं. हिंदीत १९८४मध्ये आलेला ‘अंबर’ हा त्याचा पहिला चित्रपट. मनमोहन देसाई-अमिताभ बच्चन या जोडगोळीच्या ‘मर्द’ या चित्रपटातल्या ‘मर्द टांगेवाला’ या शीर्षकगीतानं तो प्रकाशझोतात आला. कुमार सानूचे आगमन होईपर्यंत अझीज हिंदीतला आघाडीचा पार्श्वगायक होता.

शब्बीरकुमारप्रमाणेच अझीजलाही संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी सर्वांत जास्त संधी दिली. जवळपास २५०पेक्षा जास्त गाणी त्यांनी त्याला दिली. नौशाद-ओ.पी. नय्यर ते नदीम-श्रवण, जतीन-ललित पर्यंत तत्कालीन सर्व संगीतकारांकडे त्याने गाणी गायली. दिलीपकुमार-धर्मेंद्र-अमिताभपासून ते अनिल कपूर-गोविंदा-अजय देवगणपर्यंत सगळ्यांसाठी तो गायला आहे. त्यानेही लता-आशासह अनेक गायिकांसोबत गाणी गायली.

तो सुरुवातीला हॉटेलमध्ये गायचा. १९८४ मध्ये तो कोलकाताहून मुंबईला आला. ‘मर्द’नंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. १९८७मध्ये किशोरकुमारचे निधन झाल्यानंतर मो. अझीज हिंदीतला क्रमांक एकचा पार्श्वगायक बनला. ‘इक लडकी जिसका नाम मोहब्बत’ (आग और शोला), ‘आते-आते तेरी याद आ गई’ (जान कि बाझी), ‘प्यार से भी ज्यादा तुझे प्यार करता हूँ’ (इलाका), ‘आवाज हमारी इसी वादी में’ (शूरवीर), ‘में तेरी मोहब्बत में पागल हो जाऊंगा’ (त्रिदेव), ‘तेरा बिमार मेरा दिल’ (चालबाज), ‘चुपचाप तू क्यू खडी हैं’ (नरसिंहा), ‘इक दुसरे से करते हैं प्यार हम’ (हम), ‘तू मुझे कबूल’ (खुदा गवाह), ‘दुनिया मी कितना गम हैं’ (अमृत), ‘दिल दिया हैं जान भी देंगे ए वतन तेरे लिये’ (कर्मा), ‘माय नेम इज लखन’ (राम लखन), ‘पतझड सावन बसंत बहार’ (सिंदूर), ‘इमली का बुटा’ (सौदागर), ‘अमिरों की शाम गरिबों के नाम’ (नाम), ‘आप के आ जाने से’ (खुदगर्ज), ‘आज कल याद कुछ रहता नहीं’ (नगीना), ‘छोडेंगे ना हम तेरा साथ’ (मरते दम तक), ‘प्यार हमारा अमर रहेगा’ (मुद्दत), ‘हम तुम्हे इतना प्यार करेंगे’ (बीस साल बाद ), ‘मैं माटी का गुड्डा’ (अजूबा), ‘फुल गुलाब का’ (बिवी हो तो ऐसी), ‘सावन का महिना’ (आई मिलन कि रात), ‘तुमसे बना मेरा जीवन सुंदर सपन सलोना’ (खतरों के खिलाडी), ‘उंगली में अंगुठी अंगुठी में नगीना’ (राम अवतार), ‘कहना ना तुम ये किसी से’ (पती पत्नी और तवायफ), ‘जाने दो जाने दो मुझे जाना हैं’ (शहनेशहा), ‘खत लिखना हैं पर सोचती हूँ’ (खेल), ‘एक अंधेरा लाख सितारे’ (आखिर क्यू?) ही त्यांची काही लोकप्रिय गाणी. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मोहम्मद अझीजचं मुंबईत निधन झालं.

पाकिस्तानी गायक अताउल्ला खान याने गायलेली गाणी टी-सीरिज कंपनीने सोनू निगम या तरुण गायकाकडून गाऊन घेतली. ती तुफान लोकप्रिय झाली. विशेषतः जनसामान्यांमध्ये. त्याचप्रमाणे मोहम्मद रफीची गाणी  सोनू निगमच्या आवाजात टी-सीरिजने श्रोत्यांना सादर केली. अत्यंत गोड नि लवचीक आवाजाची देण लाभलेल्या सोनूची ही गाणी लोकांना खूप आवडली. शिवाय आवाजच नव्हे, तर लोक त्याच्या गायकीच्याही प्रेमात पडले. सोनू निगम हा रफीच्या आवाजाचा आधुनिक आविष्कार म्हणून ओळखला जाऊ लागला. जाणकारांच्या मते सोनूचा आवाजात रफी आणि किशोरकुमार दोघांची झलक दिसून येते. त्याने ‘आजा मेरी जान’ या चित्रपटात ‘ओ आसमावाले’ हे गाणं गाऊन पार्श्वगायक म्हणून हिंदी सिनेजगतात पदार्पण केलं. १९९५मध्ये त्याने दूरचित्रवाणीवर ‘सा रे ग म पा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. हा कार्यक्रम त्याने आपल्या बहारदार सूत्रसंचालनानं आणि सादरीकरणाच्या शैलीनं एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला.

त्याने गायलेली ‘अच्छा सिला दिया तुने’ (बेवफा सनम), ‘संदेसे आते हैं’ (बोर्डर), ‘ये दिल दिवाना’ (परदेस), ‘अभी मुझ में कहीं’ (अग्निपथ), ‘हर घडी बदल रही’ (कल हो ना हो), ‘सुरज हुआ मध्यम’ (कभी ख़ुशी कभी गम), ‘तन्हाई’ (दिल चाहता हैं), ‘कम्बख्त इश्क’ (प्यार तुने क्या किया), ‘साथिया-साथिया’ (साथिया), ‘किस हैं ये इंतजार’ (मैं हूँ ना), ‘धीरे जलना’ (पहेली), ‘मैं अगर कहू’ (ओम शांती ओम), ‘इन लम्होंके दामन में’ (जोधा अकबर), ‘आल इज वेल’ (थ्री इडियटस), ‘पीहू बोले’ (परिणीता), ‘बंदे में था दम’ (लगे रहो मुन्नाभाई), ‘तेरा रंग बल्ले बल्ले’ (सोल्जर), ‘मेरे हाथ में तेरा हाथ हैं’ (फना), ‘दो पल’ (वीर जारा), ‘मुझे रात दिन बस मुझे चाहती हो’ (संघर्ष), ‘नगाडा नगाडा’ (जब वी मेट), ‘सतरंगी रे’ (दिल से), ‘मेरी दुनिया हैं’ (वास्तव), ‘खामोशीयाँ गुनगुनाने लगी’ (वन टू का फोर), ‘जाने दिल में’ (मुझ से दोस्ती करोगे), ‘गीत कब सरहदे मानते हैं’ (सरहदे), ‘प्यार से प्यारे तुम हो सनम’ (दिवानगी), ‘कहीं प्यार ना हो जाए’ (बादल), ‘कयामत हो कयामत’ (तेरा जादू चल गया), ‘छोटी छोटी रातें’ (तुम बिन), ‘पंछी नदिया पवन के झोंके’, ‘ऐसा लागता हैं’ (रेफ्युजी), ‘तेनु लेके’ (सलाम-ए-इश्क) अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारासह फिल्मफेअर पुरस्कारही त्याला मिळाला आहे. चित्रपट गाण्यांखेरीज त्याच्या अल्बममधली गाणीदेखील लोकप्रिय झाली आहेत.

टी-सीरिजच्या गुलशन कुमार यांनी अजून एका गायकाकडून रफीची गाणी गाऊन घेतली आहेत. तो म्हणजे बिपीन सचदेव. निर्माता-दिग्दर्शक सावनकुमारच्या ‘सनम बेवफा’मध्ये त्याने गायलेली गाणी बऱ्यापैकी गाजली होती. यातलं ‘बिना ईद के ही चांद का दीदार हो गया’ हे लतासमवेत म्हटलेलं गाणं लक्षणीय आहे.

देबाशिष दासगुप्ता हा टी-सीरिजने शोधलेला अजून एक रफीचा अवतार. ‘जिना तेरी गली मे’ या अल्बम (पुढे याचा नावाचा चित्रपट गुलशनकुमार यांनी काढला) मधलं देबाशिषचं ‘मिलदी नसिबा नाल मोहब्बत’ हे गाणं रफीची आठवण करून देणारं आहे. टी-सीरिजनेच रफीने गायलेल्या मराठी गाण्यांचा अल्बम  देबाशिषच्या आवाजात काढला आहे. १९९०मध्ये ‘बहार आने तक’ या नावाचा एक चित्रपट आला होता. यातलं गायक मंगलसिंग व अनुराधा पौडवालने म्हटलेलं ‘काली तेरी चोटी हैं’ हे पंजाबी ढंगाचं गाणं तेव्हा चांगलं गाजलं होतं. हादेखील रफीच्या शैलीत गाणारा गायक. पण त्याला फारशी गाणी मिळाली नाहीत.

मोहम्मद रफी हा एकमेवाद्वितीय गायक होता. त्याच्या प्रभावाखाली गाणाऱ्या गायकांनी काही काळ त्याचा आभास निर्माण केला, पण शेवटी अभासच. त्याची सर कोणालाही आली  नाही. शब्बीरकुमारला ‘भसाड्या आवाजा’चा, तर मोहम्मद अझीजला ‘बद्धकोष्ठ झालेला गायक’ असं म्हटलं गेलं.

रफीच्या स्मृतिदिनानिमित्त त्याच्या शैलीत गायचा यत्न करणाऱ्या गायकांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप वाचकांना आवडला असेल अशी आशा आहे.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. प्रवीण घोडेस्वार चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.

gpraveen18feb@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......