अमरावतीचे प्रसिद्ध चित्रकार संजय गणोरकर यांनी एकेकाळी ‘सत्यकथा’ मासिकासाठी मुखपृष्ठं व रेखाटने केली. मुंबईत अनेक संधी असूनही ते तीस-पस्तीस वर्षांपूर्वी आपल्या मूळ गावी परतले. तिथं त्यांनी अंध मुलांसाठी काम केलं. नंतर शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी मांडणी शिल्पं तयार केली. त्याची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रदर्शनं झाली. गेल्या वर्षी त्यांना ‘ग्रेस स्मृती पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं घेतलेली त्यांची ही मुलाखत…
..................................................................................................................................................................
सौरभ बागडे : तुमचं बालपण विदर्भातील एका खेड्यात गेलं. त्यानंतर शिक्षणासाठी तुम्ही मुंबईतील जे.जे. आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतलात. तुमच्या शेतकरी, कवी-लेखकांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाविषयी आणि बालपणाविषयी सांगा…
संजय गणोरकर : माझं चवथीपर्यंतचं बालपण शिरसगाव-बंड नावाच्या अमरावतीतील अतिशय छोट्या गावात गेलं. घरची परिस्थिती बेताची. थोडीशी शेती होती. वडील पीठाची गिरण चालवायचे. आई-वडील दोघंही काळाच्या पुढे चालणारे होते. दोघांनाही वाचनाची, संगीताची आवड होती. त्यामुळे सहाजिकच घरी वाचन, संगीताचं वातावरण होतं. त्यांनी आम्हालाच नाही, तर गावातल्या मुलांनाही कायम शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. चौथीनंतर मी अमरावतीला बहिणीकडे- प्रभा गणोरकरकडे राहायला गेलो. तिथल्या मराठी शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. चौथी-पाचवीत असेन, तेव्हा मी एक सूर्याचं चित्र काढलं होतं. ते बहिणीने ‘कला केंद्र विदर्भ साहित्य संघ नागपूर’तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी पाठवलं आणि त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं. सूर्याचं चित्र सगळीच लहान मुलं काढतात, पण बक्षिस मिळण्याचं कारण असं होतं की, सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी सलग पाच मिनिटं पाहून, डोळे बंद केल्यावर आपल्याला ज्या क्रमानं रंग दिसतात, ते मी काढले होते.
मॅट्रिक झाल्यानंतर अमरावतीच्या चित्रकला महाविद्यालयात एक वर्षं फाउंडेशन कोर्स केला. ड्रॉइंग ग्रेड परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळे त्या महाविद्यालयात अॅडमिशन मिळालं. त्या वेळी प्रवेश परीक्षा वगैरे नव्हत्या. नंतर जे.जे.मध्ये शिक्षणासाठी गेलो, तेव्हा संभाजी कदम सर डिन होते.
सौरभ : तुम्ही संभाजी कदमांचे पट्टशिष्य होतात...
संजय : हो. ते आमचे फॅमिली फ्रेंड होते. अॅडमिशनचा प्रश्न आला, तेव्हा मी त्यांच्याच घरी राहिलो, ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत. त्या काळी किंवा आजही असेल, खेड्यातील मुले जे.जे.सारख्या आधुनिक महाविद्यालयातील वातावरणाबाबत अनभिज्ञ असतात, मीसुद्धा होतो. आमची परिस्थिती बेताचीच होती, माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च बहीण (प्रभा) आणि मेव्हणे (वसंत आबाजी डहाके) यांनीच केला. त्या परिस्थितीत मला वाटे की, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आपल्या कामाशी, कलेशी प्रामाणिक राहणं आवश्यक आहे. कदमांसारख्या मोठ्या कलावंताच्या घरी राहायला मिळाल्यामुळे फायदा असा झाला की, त्या त्या क्षेत्रातील मोठे कलावंत जवळून पाहता आले; चर्चा, गप्पा ऐकता आल्या. कदम समीक्षक होते. त्यामुळे त्यांच्यासोबत वेगवेगळ्या आर्ट गॅलरीजमधील प्रदर्शनं पाहता आली. कलाक्षेत्रातील संकल्पना, मूल्य समजावून घेण्यासाठी त्यांच्या सहवासाचा प्रचंड उपयोग झाला.
सौरभ : या पूर्णतः वेगळ्या वातावरणाशी जुळवून घ्यायला कसं जमलं?
संजय : मला प्रत्येक गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. जे.जे.मध्ये तेव्हाही (आणि आताही) श्रीमंत वर्गातील मुलं-मुली होती. त्यांच्या चालीरीती, इंग्रजी भाषेत बोलणं, १९७८-७९ साली मुलामुलींची मैत्री, मोकळेपणा माझ्यासाठी नवीन, चकित करणारा होता. मी कधी आर्ट गॅलरीज, उत्तमोत्तम सिनेमे, संगीताचे लाइव्ह कार्यक्रम, नाटकं पाहिली नव्हती, ती कदमांमुळे पाहायला मिळाली. त्या काळी छबिलदास चळवळ ऐन बहरात होती, ती जवळून पाहता आली. जे.जे.त संगीताचे कार्यक्रम व्हायचे. वर्धापन दिनाला किशोरी अमोणकर, अब्दुल हमीद जाफर खान यांचे कार्यक्रम होत. जे.जे.च्या मागेच झेवियर्स कॉलेज आहे. त्यांचाही पावसाळ्यात मोठा संगीताचा कार्यक्रम व्हायचा. त्यात भीमसेन जोशींसारखे दिग्गज गायचे. आम्ही त्या मैफिलीत पहाटे चार-चार वाजेपर्यंत रंगलेलो असायचो. याचा संगीताचे कान तयार व्हायला खूपच फायदा झाला.
मला आठवतं, दरवर्षी जे.जे.च्या प्रांगणात तीन-चार दिवस जे. कृष्णमूर्तींची व्याख्यानमाला चालत असे. ते पांढरेशुभ्र कपडे घालून, आपल्या धीरगंभीर आवाजात, उच्च दर्जाच्या इंग्रजीत व्याख्यान द्यायचे. त्यातलं मला काहीच कळायचं नाही, पण ऐकायला छान वाटायचं. वयाच्या १९व्या विसाव्या वर्षी जे.कृष्णमूर्तींचा ग्रेटनेस माहीत नव्हता. पण आज या सगळ्याकडे बघताना असं वाटतं की, जे.जे.मुळे हे सगळं अनुभवायला मिळालं… ते माझं भाग्य आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
संभाजी कदम सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक होते. ते जे.जे.त सौंदर्यशास्त्रावरची व्याख्यानं वरच्या वर्गांना देतं. तेव्हा माझे दुसरे तास चालू असल्यामुळे त्या व्याख्यानांना उपस्थित राहू शकत नसे, पण ते सौंदर्यशास्त्राचे ‘व्हिजिटिंग लेक्चरर’ म्हणून आठवड्यातले दोन दिवस ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’मध्ये जायचे, तेव्हा मी त्यांच्यासोबत जाऊन ती व्याख्यानं ऐकायचो. कदमांचं बालपण देवगडमध्ये गेलं. मला आठवतं, आम्ही एकदा कोकण दौरा केला होता. कदमांचे सहकारी- सोलापूरकर, सब्बणवार, प्रभाकर कोलते, मृगांक जोशी कदमांच्या घरी यायचे. मी त्यांच्या चर्चा, गप्पांचा साक्षीदार आहे. या सगळ्यांचं तत्त्व ‘कलेसाठी कला’ हे होतं, म्हणजे कलेचा धंदा करायचा नाही, स्वतःच्या आनंदासाठी, निर्मितीसाठी कला. शंकर पळशीकर कदमांच्या घराखाली राहायचे. त्यांच्यासारख्या थोर माणसासोबत बोलायला, बसायला आणि त्यांच्याकडून काही ऐकायला मिळणं अदभुतच होतं. त्या मानानं माझी समज, कुवत खूपच कमी होती. मला आजही त्यांची संभाषणं आठवतात. त्यांच्या मूल्यांचा माझ्यावर निश्चित परिणाम झाला. मोठ्या माणसांचं मोठेपण अनुभवायला मिळालं. ते अतिशय साधे असत. खरा श्रीमंत माणूस किंवा खरा मोठा माणूस दुसर्याला जाणीव होऊ देत नाही की, मी मोठा आहे. अशा माणसांसोबत राहून कळलं की, आपण कुठेच काही नसतो, तरी फुकाचा मोठेपणा मिरवतो.
तुम्ही एका मोठ्या माणसाच्या संपर्कात आलात की, आपोआप अनेक मोठ्या माणसांच्या संपर्कात येता. आमची बहीण, मेव्हणे आणि कदमांमुळे अनेक थोरा-मोठ्यांचा सहवास लाभत गेला. जे.जे.त आल्यानंतरचं आयुष्य खूप समृद्ध झालं.
कदमांमुळे ‘सत्यकथा’त जाता आलं. आठवड्यातला एकवार ‘सत्यकथा’च्या कचेरीत जायचो आणि राम पटवर्धनांच्या समोरील खुर्चीत बसायचो. तिथं कोणीतरी लेखक-कवी आलेला असायचा. त्याच्यासोबत राम पटवर्धन माझी ओळख करून द्यायचे. त्यांच्या गप्पा चालायच्या. त्या तासन्तास ऐकायचो. पटवर्धन धोपटी आवरून, त्या साहित्यिकासोबत चालत जायचे, तेव्हा मीही त्यांच्यासोबत जायचो आणि ‘अच्छा’ करून परत यायचो. मला ‘सत्यकथा’च्या कचेरीतील प्रसंग आठवतात. एकदा मी गेलो, तेव्हा पटवर्धनांच्या समोर एक बाई बसल्या होत्या. त्यांनी जे काही लिहून आणलं होतं, त्यातील पात्रांविषयी पटवर्धन बोलत होते. त्या बाई निघताना पटवर्धन म्हणाले, ‘‘तुम्ही लिहिलंय ते तसंच छापायला मी तयार आहे, पण तुम्ही पुन्हा एकदा लिहावं, असं मला वाटतं.” मी पटवर्धनांना विचारलं, या कोण होत्या? तर ते म्हणाले, “सानिया”. मी त्यांचा फार पूर्वीपासून फॅन होतो. त्या ‘सानिया’ या टोपण नावानं लिहायच्या. त्यांचं खरं नाव सुनंदा बलरामन होतं, हे नंतर मला कळलं. त्या गौरी देशपांडेंच्या पठडीतल्या! ‘सत्यकथा’त ग्रेस, पानवलकर यायचे. त्या सर्वांसोबतच्या गप्पा मला जश्याच्या तश्या आठवतात. त्या मोठ्या लोकांचा दिलदारपणा की, त्यांनी मला त्यांच्यात बसू दिलं, त्यांच्या गप्पा ऐकू दिल्या. या सगळ्यामुळे माझं विश्व समृद्ध झालं.
आज सांगायला लाज वाटते, पटवर्धनांनी मला ‘यक्षाची देणगी’वर परीक्षण लिहायला सांगितलं होतं. तसंच दीपक घारेंच्या चिं.त्र्यं. खानोलकरांवरच्या पुस्तकावरही परीक्षण लिहिलं होतं. नारळीकर आणि घारे केवढे मोठे आणि आपण विशीत त्यांच्या पुस्तकांवर लिहिलंच कसं, याचं आता मला आश्चर्य वाटतं, पण त्या वेळी मी हा वेडेपणा केला होता. आज मी ते धाडस करणार नाही.
राम पटवर्धनांनी मला खूप प्रोत्साहित केलं. मी ‘सत्यकथे’साठी मुखपृष्ठं केली. पटवर्धन मोठमोठ्या लेखकांची हस्तलिखितं द्यायचे, मग मी त्याविषयी ‘सत्यकथे’साठी रेखाटनं करायचो. तो सगळा भारावलेला काळ होता.
सौरभ : तुम्ही मुंबई सोडून पुन्हा विदर्भात आलात. मध्यंतरी मी तुमची मांडणी शिल्पं बघितली. त्यात तुम्ही शेतकऱ्याचं जगणं, त्याचा हताशपणा, निराशा मांडण्याचा प्रयत्न केला होता. शेतकरी निव्वळ जीवन आणि मरण याच्या धूसर सीमारेषेवरील हतबल जीव झाला आहे, असं तुम्हाला वाटतं?
संजय : मांडणी शिल्पं आणि मुंबई सोडल्याच्या मध्ये खूप मोठा काळ गेला. १९८५मध्ये मी महत्त्वाचा निर्णय घेतला की, मुंबईत रहायचं नाही. खेड्यात जाईन, आई-वडलांसोबत राहीन.
सौरभ : गांधीजींचे संस्कार?
संजय : नाही, तोपर्यंत माझ्यावर गांधीजींचे संस्कार नव्हते.
सौरभ : मुंबईत तुम्हाला चांगल्या संधी होत्या. त्या सोडून पुन्हा खेड्यात जायचा निर्णय का घेतलात?
संजय : तो निर्णय कसा घेतला, हे मलाही माहीत नाही आणि घरच्यांनीही कसा मान्य केला, तेही. ‘टर्निंग पॉइंट’ म्हणता येतील असे तीन प्रसंग घडले. त्या वेळी मी सई परांजपे यांचा ‘स्पर्श’ सिनेमा पाहिला होता. तो पाहून भारावून गेलो. त्यात अंध लोकांचं विश्व, ब्रेलमध्ये पुस्तक नाहीत हे दाखवलं होतं. मग मी ठरवलं अमरावतीत अंध विद्यालय आहे का, ते पहायचं. शोध घेतला तर एक अंध विद्यालय होतं. इतकी वर्षं अमरावतीत राहूनही हे मला माहीत नव्हतं.
मी त्या अंध विद्यालयात गेलो. सिनेमातील प्राचार्यांसारखेच प्राचार्य अंध. मी त्यांना म्हणालो, “मला ब्रेल शिकायची आहे आणि शिकता येईल का?” ते ‘हो’ म्हणाले. मी विचारलं, “किती दिवस लागतील?”. तर ते म्हणाले, “तुम्ही डोळस आहात, आठ दिवसांत शिकाल.” मग मी रोज चार ते पाच त्यांच्याकडे जायला लागलो. मला असं वाटू लागलं होतं की, मराठी साहित्यातील काही साहित्य ब्रेलमध्ये रूपांतर करूया. तेव्हा ब्रेलमध्ये फारसं काही नव्हतं. मी विद्यालयात जाऊ लागलो. परिचय वाढत गेला. एक दिवस प्राचार्य म्हणाले, “अमरावतीतल्या एक डॉक्टर बाई आहेत. त्याही ब्रेल शिकल्यात. आमच्या मुलांसाठी ‘मनाचे श्लोक’ ब्रेलमध्ये करताहेत. त्यांनी डोळस माणसांसाठी ब्रेलचा एक चार्ट केला आहे. त्यामुळे लवकर ब्रेल शिकता येतं.” मग मी त्यांना त्या बाईचा पत्ता विचारला, तिथं मला संजीवनी (पत्नी) भेटली. ब्रेल शिकण्याच्या आणि अंध विद्यालयाच्या निमित्तानं आमच्या दोघांच्या नियमित भेटी होऊ लागल्या.
अमरावतीत अंध विद्यालय आहे, हे गावातील लोकांनाही माहीत नव्हतं, म्हणून आम्ही ठरवलं की, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही अंध विद्यार्थांना घेऊन पु.ल. देशपांडे यांचं नाटक बसवलं. गावात अंबा देवीची यात्रा भरते. तिथं अंध मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचा स्टॉल लावला. त्यामुळे अनेकांना अंध विद्यालयाची माहिती झाली. गावात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लोकांकडून देणग्या गोळा केल्या.
जवळपास वर्षभरानं प्राचार्य मला म्हणाले, “तुमचं गाव जवळ आहे. तुम्ही परत मुंबईला जाणार नाही. तुम्ही मुलांनाही आवडता आणि आम्हालाही डोळस शिक्षकाची गरज आहे, तर तुम्ही आमच्या संस्थेत जॉईन का होत नाही?” मी त्यांना म्हणालो, “नोकरी करण्याची माझी इच्छा नाही आणि माझा सामाजिक संस्थांचा अनुभव विशेष चांगला नाही. तरी तुम्ही म्हणता आहातच, तर एखाद-दोन वर्षं काम जमतेय का ते पाहीन.”
ते म्हणाले, “तुम्हाला आवडत आहे, तोपर्यंत नोकरी करा.”
मग मी इंटरव्ह्यू न देता, पैसे वगैरे काहीच न देता जॉईन झालो. तिथं मी ३३ वर्षं आनंदानं नोकरी केली. या काळात कला, लेखन, मुंबईशी फारसा संपर्क राहिला नाही. क्वचित पुस्तकांसाठी मुखपृष्ठं, लेखन वगैरे केलं असेल.
जसा सई परांजपे यांच्या चित्रपटामुळे माझ्यात मोठा बदल झाला, तसा बदल रिचर्ड अॅटनबरो यांच्या १९८२ साली आलेल्या ‘गांधी’ चित्रपटामुळे घडला. त्यामुळे मी भारावून गेलो. गांधींविषयी उत्सुकता, प्रेम वाटू लागलं. तो सिनेमा मी खूप वेळा पाहिला. मोठ्या सिनेमाचं, व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं की, तुम्ही तो कितीही वेळा पाहिलात, वाचलात तरी दरवेळी त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन सापडतं.
त्याच दरम्यान ‘टाईम’ मॅगझिनने गांधींना ‘मॅन ऑफ मिलेनियम’ ही पदवी देऊन अंक काढला होता. त्यामुळे मला माहीत झालं की, गांधींनी साबरमती आश्रम जरी काढला असला तरी ते तिथं फार काळ राहिले नाहीत, ते सेवाग्राम आश्रमात जास्त काळ राहिले. माझ्या घरापासून सेवाग्राम फक्त ११० किलोमीटर अंतरावर आहे. मग मी सुट्टीत सेवाग्रामला भेट द्यायला गेलो. आश्रम, त्याचा परिसर पाहून थक्क झालो. त्या वेळी मी ठरवलं की, प्रत्येक गांधी जयंती- २ ऑक्टोबर - ला मी इथं येणार. त्याप्रमाणे गेली कित्येक वर्षं मी सेवाग्राममध्ये जातो. आदल्या दिवशी संध्याकाळच्या प्रार्थनेत भाग घेतो, नंतर सकाळच्या प्रार्थनेत भाग घेतो, स्वच्छतेचं काम करतो, वाचन करतो, तो दिवस आनंदात घालवतो.
हा इतका मोठा माणूस आपल्या देशात होऊन गेला, आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, तर मी ठरवलं दरवर्षी २ ऑक्टोबरपासून वर्षभरासाठी स्वतःपुरता एक संकल्प करायचा. स्वतःला झेपतील असे संकल्प ठरवायचे आणि ते पूर्ण करायचे. साहजिकच या वर्षी काय धरणार, काय सोडणार, अशी नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यात चर्चा होऊ लागली. एक दिवस अचानक एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, “अरे, संजय दरवर्षी दोन ऑक्टोबर आला की, मला तुझी आठवण येते. या वर्षी कोणता संकल्प करणार आहेस?” मी त्याला म्हणालो, “अरे, २ ऑक्टोबरला माझी कशाला आठवण काढतोस, त्याऐवजी गांधीजींचं स्मरण कर.” पण मी तेव्हापासून ठरवलं की, आपण कोणता संकल्प करतो, हे कोणालाही सांगायचं नाही. अर्थात थोड्या दिवसांनी तो सगळ्यांना माहीत होतोच.
नंतर माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला, तो सुधीर पटवर्धनांच्या ‘विस्तारणारी क्षितिजे’मुळे. इतकी वर्षं कवाडं बंद होती, ती पुन्हा उघडली. सुधीर आणि शांता पटवर्धनांच्या व्यक्तिमत्त्वानं आणि त्या प्रदर्शनानं मी इतका भारावून गेलो की, पहिलं प्रदर्शन अमरावतीला झालं, दुसरं प्रदर्शन नागपूरला झालं, तेव्हा मी त्यांच्यासोबत नागपूरला गेलो. नंतर नाशिक, औरंगाबाद, पुणे अशी जिथं जिथं प्रदर्शनं झाली, तिथं तिथं गेलो. फक्त कोल्हापूरच्या प्रदर्शनात नव्हतो. या प्रदर्शनांत अतुल दोडियासारखे चित्रकार आले होते. माझा मुलगा शौनक, त्यालाही अनेक ठिकाणी घेऊन गेलो.
माझ्या मांडणी शिल्पांचं प्रदर्शन करण्यामागचं मुख्य श्रेय पटवर्धनांचं आहे. ‘विस्तारणारी क्षितिजे’चं शेवटचं प्रदर्शन होतं, तेव्हा ते पटवर्धन मला म्हणाले, ‘तू या प्रोजेक्टमध्ये आमच्यासोबत होतास. गेली वीस-पंचवीस वर्षं तू या क्षेत्रात काहीच केलं नाहीस. आता तू प्रॉमिस कर की, एका वर्षाच्या आत मला काहीतरी करून दाखवशील. आणि ते बघायला आम्ही दोघंही (सुधीर, शांता) अमरावतीला येऊ’. त्या भारावलेल्या अवस्थेत माझी विचार प्रक्रिया सुरू झाली.
मी गेली अनेक वर्षं आधुनिकीकरणामुळे शेतीत, आजूबाजूला झालेले बदल टिपत होतो. ते बदल आपण मांडावेत असं वाटलं. त्यासाठी माध्यम निवडलं मांडणी शिल्पाचं. हेच माध्यम का निवडलं? मी पेंटिंग, कविता, लेख लिहू शकलो असतो, पण ‘विस्तारणारी क्षितिजे’मध्ये मांडणी शिल्प हे प्रभावी माध्यम वाटलं. त्यात रंग, रेषा आकार आहे, शिल्पाच्या, चित्राच्या क्वॉलिटीज आहेत. तुम्हाला जे म्हणायचं आहे, ते अधिक स्पष्टपणे म्हणता येतं. इतके दिवस माझ्या मनात जे काही साचलं होतं, ते या माध्यमातून व्यक्त केलं. ही मांडणी शिल्पं तयार करताना पटवर्धनांच्या संपर्कात होतो. इतरांची पुस्तकं, सिनेमा, चित्रांवर टीका करतो, त्यामुळे आपण जे काही केलं आहे ते ‘अप टू द मार्क’ आहे की नाही, लोकांसमोर ठेवायच्या लायकीचं आहे की नाही, हे सांगणारी अॅथोरिटी हवी होती. म्हणून काही केलं की, त्यांच्याकडे जायचो, चर्चा करायचो. त्यांनी मला खूप सहकार्य केलं.
प्रदर्शनाचे तिन्ही दिवस सुधीर आणि शांता पटवर्धन होते. ते आमच्या घरी राहिले. निघताना म्हणाले, “हे प्रदर्शन इथं थांबता कामा नये, जहांगीर, पुण्यात, नागपुरात लावलं पाहिजे, हा विषय लोकांपर्यंत गेला पाहिजे.” आणि प्रदर्शन लावण्यासाठी मागे लागले. अमरावतीतही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लोकांना हे माध्यम, विषय भिडला.
‘दुष्टचक्र’ नावाचं मांडणी शिल्प
सौरभ : ‘एक फोलपट’ नावाचं तुमचं एक मांडणी शिल्प आहे. त्यात असं दाखवलंय की, शेतकऱ्यांची अवस्था फोलपटासारखी झाली आहे.
संजय : हो. सुपात धान्य आहे आणि सुपाबाहेर शेतकऱ्यांची प्रेतं पडली आहेत असं ते शिल्प होतं. त्यातून मला दाखवायचं होतं की, लोकांना धान्य हवं आहे, पण शेतकरी मात्र नको आहे. सर्वांत गाजलं ते ‘दुष्टचक्र’ नावाचं शिल्प! एक जातं आहे, त्यात धान्य टाकलं जात आहे आणि पीठाऐवजी कुंकू बाहेर येत आहे, असं ते शिल्प होतं. मूठभर धान्यासाठी बाईला आपलं कुंकू पणाला लावावं लागतं आणि बायका खुंट्याला धरून दुष्टचक्र थांबवत आहेत, या अर्थानं मी ते बनवलं होतं. आमची मैत्रीण सुषमा देशपांडेने त्या शिल्पाचा अर्थ बायकांशी जोडला. ते शिल्प पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली “अरे, यात बाईच्या आयुष्यातील केवढा मोठा त्रास मांडला आहेस तू!” मी म्हणालो, “कसं काय?”. ती म्हणाली, “बाईच्या गर्भात बीज पडतं. दरवेळेस ते फळतं असं नाही. मासिक पाळीच्या रूपात रक्ताद्वारे ते बाहेर पडतं. आणि पंधराव्या वर्षांपासून ते पन्नास वर्षाच्या प्रत्येक बाईला जर तुम्ही विचारलं की, बाई तुला काय पाहिजे, तर ती म्हणेल या दुष्टचक्रातून मला सोडव, मला गर्भ नको, ती गर्भपिशवीही नको.” हे दुष्टचक्र त्या लेकुरवाळ्या बायका थांबण्याचा प्रयत्न करताहेत, असा सुषमानं अर्थ लावला. शिल्पाचं शीर्षक होतं- ‘दुष्टचक्र’, शेतकऱ्याच्या संदर्भात… पण ते बाईच्या संदर्भातही वापरलं तरी चपखल लागू होतं. हे शिल्प बघून ‘आविष्कार’चे काकडे म्हणाले की, यात नाटक आहे. एक-दोन वर्षांनी पुण्याच्या सुनील देवळेकरांचा फोन आला. ते म्हणाले, ‘तुमचं शिल्प घेऊन मी ‘स्त्री, जातं, ओवी आणि कविता’ नावाचा एक कार्यक्रम तयार केला आहे’. देवळेकरांच्या या कार्यक्रमाचे पुष्कळ प्रयोग झाले. आताही २७ जानेवारीला एक प्रयोग झाला. लोकांनी असे वेगवेगळे अर्थ लावले.
‘एक फोलपट’ नावाचं मांडणी शिल्प
सौरभ : अशीच ‘लक्ष्मी’ आणि ‘पुनर्जन्म’ नावाची शिल्पं आहेत…
संजय : लक्ष्मी पेटीत आहे आणि ती पेटी दोरखंडानं बांधली आहे, असं ते शिल्प आहे. त्याचेही दोन अर्थ लावता येतात. एक, ते सरंजामशाहीचं चित्र होतं. म्हणजे लक्ष्मी एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे. दुसरं, स्त्री बंदिस्त आहे आणि ती तो दोरखंड तोडू पाहतेय.
घरचं कोणी गेल्यानंतर एका कोपर्यात दिव्याखाली पीठ पसरलं जातं आणि वर टोपली ठेवली जाते. त्या पिठात उमटणारी किडा, पशू, पक्ष्याची आकृती यावरून गेलेली व्यक्ती त्या रूपात पुर्नजन्म घेते, असं मानलं जातं. आता विज्ञानयुगात ही अंधश्रद्धा आहे, हे आपल्याला माहीत आहे. मी शिल्पात असं दाखवलं होतं की, टोपली खालून गाड्या जात-येत आहेत. आत्महत्या झालेल्या घरी भेट देणाऱ्या कलेक्टर, मंत्र्यांच्या गाड्या आहेत. आणि पीठात उमटणार्या गाड्यांच्या आकृतीच्या रूपात आपल्या बापाला पुर्नजन्म मिळो, असं शेतकऱ्याच्या मुलाला वाटतं, म्हणजे आपल्या बापाला पुन्हा भेटता येईल.
‘लक्ष्मी’ आणि ‘पुनर्जन्म’ नावाची मांडणी शिल्पं
सौरभ : एका शिल्पात रिक्षा दाखवली आहे. त्यात एक प्रेत आहे. त्याचे पाय आणि डोकं बाहेर आलं आहे. ते प्रेत दोन म्हातारे आई-वडील मांडीवर घेऊन बसले आहेत आणि रिक्षाच्या मागे लिहिलेलं आहे- ‘शेती फायद्याची, विक्रमी उत्पन्नाची’.
संजय : हे दृश्य मी स्वतः पाहिलेलं आहे. हिवाळ्याचे दिवस होते, शाळा संपवून संध्याकाळी माझ्या खेड्याकडे मोटारसायकलने निघालो होतो. तेव्हा माझ्यापुढे एक रिक्षा होती. त्यातून पांढर्या कपड्यात बांधलेल्या प्रेताचं डोकं आणि पाय बाहेर आले होते. बराच वेळ त्या रिक्षाच्या मागे होतो. मी खूप अस्वस्थ झालो. एक क्षण असा की, मला असह्य झालं. मग मी ओव्हरटेक केलं, तेव्हा मला रिक्षात तोंडाला काही न बांधलेले दोन म्हातारे आई-वडील मांडीवर प्रेत घेऊन बसले आहेत आणि रिक्षा चालवणाऱ्यानं तोंड झाकलं असल्याचं दिसलं. रिक्षावाल्याला प्रेताचा वास येतो म्हणून त्याने तोंडाला रुमाल बांधला आहे, तोच वास वृद्ध आई-वडलांनाही येत असेल, पण त्यांनी तोंडाला काहीच कसं बांधलं नाही… ते असे संध्याकाळच्या कातरवेळी प्रेत घेऊन चालले आहेत. त्यांच्या घरी कोणीच तरुण नसेल का, घरी त्याची बायको-मुलं असतील, त्यांचं काय होईल… शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही अशी केविलवाणी फरफट का व्हावी, असे अस्वस्थ करणारे प्रश्न पडले. म्हणून मी त्या शिल्पाला नाव दिलं- ‘जर्नी विथ थाव्हजंडस क्वेशन्स’. ते शिल्प पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ‘आजचा सुधारक’चे तत्कालीन संपादक नंदा खरे हे शिल्प पाहून रडले. त्यांनी त्यावर सलग तीन संपादकीये लिहिली.
सौरभ : ‘आजचा सुधारक’सारख्या बुद्धिप्रामाण्यावादी मासिकानं सलग तीन संपादकीये लिहावीत, यातून तुम्ही केलेली प्रभावी मांडणी लक्षात येते.
संजय : हो. नागपूरच्या प्रदर्शनाचे उद्घाटक होते महेश एलकुंचवार. त्यांनी आयोजकांना सांगितलं की, ‘मी फार वेळ थांबणार नाही. पंधरा-वीस मिनिटंच थांबेन’. पण ते पूर्ण दिवस थांबले. शिल्पाविषयी चांगलं बोललं. ही सगळी त्या शिल्पांची ताकद होती.
‘जर्नी विथ थाव्हजंडस क्वेशन्स’ नावाचं मांडणी शिल्प
सौरभ : या तुमच्या प्रदर्शनांच्या निमित्तानं तुमचे जे.जे.तील अनेक मित्र पुन्हा भेटले असतील. त्यांच्याकडे बघून तुम्हाला कधी असं वाटलंय का, की अंधशाळेत नोकरी केली ठीक आहे, पण जर याच क्षेत्रात राहिलो असतो, तर मोठं करिअर करता आलं असतं आणि ते आपण गमावलंय.
संजय : नाही, मला असं कधी वाटलं नाही. मी समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगलो. त्यामुळे आजतागायत पश्चाताप वगैरे कधीच झाला नाही. चित्रं विकून पैसे कमवावे, प्रसिद्धी मिळवावी, अशी महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. स्वतःच्या आनंदासाठी काम करावं, हे त्या वेळच्या लोकांचे संस्कार होते. मला वाटतं, माझ्या लायकीपेक्षा कितीतरी पट जास्तच मला विनासायास मिळालं आहे.
सौरभ : अभिनव काफरे नावाचे तरुण चित्रकार आहेत. मध्यंतरी त्यांनी एक पोस्ट केली होती. तीत ते म्हणाले होते की, “मी शोभा गोखलेंचे चित्र प्रदर्शन गेलो होतो. त्याची फी १५० रुपये होती. ती पाहून मी माघारी वळलो, कारण अशी फी आकारल्यामुळे कला एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित राहते”. समाजात कलासाक्षरता निर्माण झाली पाहिजे, हा मुद्दा नेहमीच चर्चेत दिसतो, तर कलासाक्षरतेसाठी काय केलं पाहिजे?
संजय : मगाशीच आपण पटवर्धनांच्या ‘विस्तारणारी क्षितिजे’विषयी बोललो. पटवर्धनांचा प्रोजेक्ट कलासाक्षरतेसाठीच होता. तू जो प्रश्न विचारला आहेस, तोच प्रश्न मी पटवर्धनांनाही विचारला होता- आधुनिक कविता, कादंबरी लोकांपर्यंत पोहोचली, आधुनिक नाटक, सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला, पण चित्रकला, शिल्पकला सामान्य लोकांपर्यंत का पोहोचली नाही? म्हणजे तुम्ही आज लोकांना विचारलं की, चित्रकला, शिल्पकला क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मोठ्या व्यक्तींची नावं सांगा, तर त्यांना ती माहीत नसतील, किंबहुना त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही माहीत नसतील. सामान्य लोकांना असं वाटतं, हे आपल्यासाठी नाही, ते विशिष्ट वर्गासाठी आहे. त्यांनाच त्यातलं कळतं आणि तेच विकत घेतात. गायतोंडेंचं एक चित्र २५ कोटींना विकलं गेलं, यांसारख्या बातम्यांनी लोकांच्या मनात आणखीच गोंधळ निर्माण होतो, म्हणजे जे चित्र आपल्याला कळत नाही, ते चित्र २५ कोटींना विकलं जातं, याचा अर्थ आपल्यातच काही दोष आहे, असं लोकांना वाटतं. ‘विस्तारणारी क्षितिजे’ खूप छान आहे, हे सगळीकडे झालं पाहिजे, असं अनेक जण म्हणाले, पण प्रत्यक्षात आर्ट गॅलरीज, आर्ट क्युरेटर, लव्हर यापैकी कोणीही प्रयत्न केले नाहीत.
इतर देशांत सामान्य लोक मुझियम्सना भेटी देतात, चित्रं विकत घेतात, पण आपल्याकडे लोक रिप्रिंटसुद्धा विकत घेत नाहीत. तरुण चित्रकारांनी काढलेली चित्रं विकून कॅनव्हॉसचीदेखील किंमत परत मिळत नाही. इतर देशांत जशी कलासाक्षरता झाली, तशी आपल्या देशात झाली नाही. याचं कारण आपण त्यासाठी मुळापासून प्रयत्नच केले नाहीत. कलेकडे बघण्याची दृष्टी विकसित केली नाही.
.................................................................................................................................................................
मुलाखतकार सौरभ बागडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहेत.
bagadesaurabh14@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment