अजूनकाही
‘नकुशी’ असलेल्या स्त्री-भ्रूण हत्या करण्यासाठी गर्भलिंग चाचणी निदानाचे तंत्रज्ञान वापरणाऱ्या डॉक्टरांची साखळी उजेडात आणणाऱ्या ‘स्त्री’ची कथा ‘वाय’ हा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे आणि अनोख्या पद्धतीने मांडतो. कथा महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा ती ज्या पद्धतीने सादर केली आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. आजही महाराष्ट्रात आणि राजस्थान-गुजरात-बिहार-उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांत गर्भलिंग निदान करण्यासाठी पालक (?)बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करतात. गर्भलिंग चाचणी करणे बेकायदेशीर असले तरी अनेक गैरमार्ग अवलंबले जातात आणि मुलीच्या गर्भाची जन्माआधी हत्या केली जाते. पुरुषांमध्ये असलेल्या ‘Y’ गुणसूत्रावर गर्भलिंग ठरत असले, तरीही त्यासाठी स्त्रीला जबाबदार धरले जाते आणि त्यामध्ये भरडलीही जाते.
अजूनही महाराष्ट्रात जन्मानंतर मुलीचे नाव ‘नकुशी’ ठेवल्यास पुढच्या वेळेस ‘वंशाचा दिवा’ जन्माला येतो, अशी अंधश्रद्धा आहे. अशा समाजाला हातभार लावणाऱ्या डॉक्टरांची पोलखोल अनेक ठिकाणी झाली आहे, होत आहे. त्यापैकीच एक प्रयत्न म्हणजे हा सिनेमा.
चित्रपट हे कथा सांगण्याचे प्रभावी दृश्य माध्यम आहे. त्यामुळे एखादी कथा सांगण्याऐवजी दाखवली जाते, तेव्हा दृश्य माध्यमाचा वापर कसा करायचा, हे पटकथाकार आणि दिग्दर्शकावर अवलंबून असते. कथेची पटकथा करताना एकामागोमाग एक प्रसंग लिहिले जातात आणि त्यामध्ये संवाद टाकले जातात. गोष्ट सांगताना कोणते पात्र केव्हा प्रेक्षकांसमोर आणायचे, त्याचे कोणते कृत्य केव्हा दाखवायचे, त्या पात्राचा चित्रपटातील इतर पात्रांशी संबंध कसा आणि केव्हा दाखवायचा, हे पटकथाकाराचे कसब असते. प्रसंगांची मालिका रचताना प्रेक्षकांना या क्षणी काय सांगायचे नाही, हे पटकथा लेखकाला माहीत असणे महत्त्वाचे ठरते. ‘वाय’ची पटकथा लिहिताना स्वप्नील सोज्वळ, डॉ.अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या तंत्राचा पूर्वार्धामध्ये विशेष प्रभावीपणे वापर केला आहे. मराठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट का बघावा, याचे प्रमुख कारण हेच आहे.
डॉक्टरपेशासंबंधी चित्रपट करताना त्यातील बारकावे, त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक असते. एक पटकथाकार वाडीकर स्वत:च डॉक्टर असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय भाषेचा मोजकाच, परंतु योग्य वापर केला आहे. त्यासाठी त्यांनी पटकथा लिहिण्याचे तंत्र शिकून घेतलेच, शिवाय त्याचा चतुराईने वापर केल्याचे जाणवते.
‘तलवार’, ‘ल्युडो’सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तेच प्रसंग आपल्याला दिसतात, परंतु हे तंत्र वापरण्याचा त्यांचा उद्देश वेगळा होता. ‘वाय’ बघताना मात्र प्रसंगांची गुंफण करताना वेगळे तंत्र अनोख्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे हा चित्रपट परिणामकारक झाला आहे.
दिग्दर्शक वाडीकर यांनी ‘Show, Don’t tell’ हे दृश्य माध्यमाचे तंत्र विचारपूर्वक वापरले आहे. त्यामुळे काय घडते आहे, याची पूर्वकल्पना असूनही हा चित्रपट उत्कंठावर्धक झाला आहे. मराठी प्रेक्षकांना हे समजेल का, असा विचार न करता त्यांना विचार करायला लावणारे तंत्र प्रभावीपणे वापरले, याबद्दल दिग्दर्शक वाडीकर यांचे विशेष कौतुक करायला हवे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
मुक्ता बर्वे यांनी साकारलेली सरकारी वैद्यकीय ऑफिसर ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू. मुक्ताने ज्या पद्धतीने खंबीर अधिकारी, कुत्र्यांना विलक्षण घाबरणारी, मुलीच्या बाबतीत हळवी डॉ. आरती उभी केली आहे, ते दाद देण्यासारखे आहे. तिच्या अभिनयकौशल्याचा अनुभव ‘एक डाव धोबीपछाड’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘जोगवा’, ‘कबड्डी-कबड्डी’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘कोड मंत्र’, ‘छापा-काटा’ यांसारख्या अनेक नाटक-चित्रपटांमधील वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांनी घेतला आहे. त्याचे प्रतिबिंब इथेही दिसते. नंदू माधव यांनी साकारलेला स्त्री-भ्रूण हत्यारा डॉक्टर ही त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे.
ओंकार गोवर्धन यांनी एका कार्यकर्त्याची तडफड उत्तमरीत्या दाखवली आहे. ‘देऊळ’मधला कवी सुहास शिरसाट इथे अभिनयाचे वेगळे रंग दाखवतो. संदीप पाठक आणि प्राजक्ता माळी यांच्या भूमिका मात्र मध्येच सोडून दिल्यासारख्या वाटतात. हा लेखन-दिग्दर्शनाचा दोष आहे की, संकलनामध्ये त्या भूमिका कापल्या गेल्या, माहीत नाही. काही प्रसंगांचे संकलन अधिक सफाईदार करता आले असते. काही दृश्ये कापली असती तरी चालले असते. उदाहरणार्थ, एखाद्याला उलट्या होत आहेत, हे समोरच्या बाजूने दाखवण्याची गरज नसते. तसेच गर्भपात करताना ऑपरेशन थिएटरमधील दृश्ये वेगळ्या पद्धतीने दाखवून अपेक्षित परिणाम साधता आला असता.
या चित्रपटाचा शेवट बाळबोधपणे केला नाही, त्याबद्दल लेखक-दिग्दर्शकांचे विशेष कौतुक. अनेक मराठी चित्रपट ‘प्रेक्षकांना हे कळणार नाही’ अशा समजुतीमधून लिहिले-चित्रित केले जातात. त्यामुळे एखाद्या इंग्रजी वाक्याचा मराठी अनुवाद तेच पात्र पुन्हा मराठीत करताना दिसते. फोनवर संभाषण झाल्यावरही तोच संवाद समोरच्या व्यक्तीला पुन्हा सांगताना दाखवला जातो. प्रेक्षक हुशार आहेत, असे समजून जे चित्रपट तयार केले जातात, ते उत्कृष्ट असतात. ‘वाय’च्या चित्रपटकर्त्यांनी सत्यघटनेवर आधारित चित्रपट तयार करताना प्रेक्षक विचार करतात, असे गृहीत धरले आहे. त्यामुळे हा चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे.
.................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment