अजूनकाही
क्रॅश लँडिंग म्हणजे एखादे विमान काही कारणांमुळे विमानतळावर न उतरवता कुठेतरी दरीखोऱ्यात वा नदीपात्रात वा हायवेवर उतरवावे लागणे. अशा काही घटना आजवर जगभरात अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्यावर अनेक चित्रपटही निघाले आहेत. याच विषयावर अलीकडेच ‘अमेझॉन प्राईम’वर ‘रनवे ३४’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे..
हा चित्रपट रात्री गॉगल लावणाऱ्या कॅप्टन विक्रांतच्या (अजय देवगण) स्टाईलबाज एन्ट्रीने सुरू होतो. त्यानंतर त्याचे कुटुंबाशी संवाद झाल्यानंतर लगेच पार्टीत ऐश करणारा, एकामागोमाग एक सिगारेट ओढणारा म्हणजे सर्व ‘गुण’संपन्न कॅप्टन दिसतो. तो विमानात उड्डाणाची घोषणा करत असताना विनोद करतो, त्याला विमानातले सगळे पॅसेंजर हसून दाद देतात. एका प्रवाशाचे बाळ रडते, त्या वेळी हवाई सुंदरी त्या बाळाला एक खुळखुळा आणून वाजवून दाखवते. असे बरेच काहीबाही हिंदी चित्रपटास अनुसरून पण पटकथा इतरत्र भटकण्यास मदत करणारे घडत राहते. खराब हवामानामुळे विमान कोचीनऐवजी त्रिवेन्द्रमला उतरवण्याचा निर्णय कॅप्टन जाहीर करतो, त्या वेळी प्रवासी आरडा-ओरडा करतात. त्या वेळी कॅप्टन कॉकपिटमधून बाहेर येऊन त्यांना भाषण देतो. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर बराच वेळ वैमानिक डोळे बंद करून लँडिंग करतो.
अजय देवगणसारखे कलाकार चित्रपट निर्माण करतात आणि त्यामध्ये नायकाची भूमिका साकारतात! आपण गृहीत धरतो की, त्याने अभिनयही केला आहे. अजय देवगणचा चेहरा कुठेही हलताना दिसत नाही. हा अभिनयाचा पैलू असू शकतो? भारतभूषणच्या काळात ते चालून गेले, परंतु आता स्पर्धा कोणाशी आहे, हे लक्षात घ्यायला नको. त्यामानाने अमिताभ बच्चन उठावदार वाटतात. पण त्यांनी वेगळे काय केले आहे? क्लिंट इस्टवूडसारखे अभिनेते वय झाल्यानंतर वेगळे काही करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अमिताभ बरीच वर्षे तोच तो अभिनय त्याच पद्धतीने करतात, हे दुर्दैव आहे. त्यांच्याकडे अभिनयाचे १० पत्ते आहेत, हे निर्विवाद. पण तेच ते पैलू आपल्याला वारंवार दिसत राहतात. मारधाड चित्रपट करणाऱ्या क्लिंट इस्टवूडने दिग्दर्शक या नात्याने कसे वैविध्य दाखवले हे अमिताभ यांनी शिकण्यासारखे आहे. त्याच्या संवादफेकी अप्रूप असले तरी आता ते नवीन काय देतात, हा मोठा प्रश्न आहे.
‘रनवे ३४’चे विमान कसे आणि का कोसळते, याची कारणे ‘सली’, ‘फ्लाईट’सारखे इंग्रजी चित्रपट बघताना समजतात.
क्लिंट इस्टवूड दिग्दर्शित ‘सली’ हा चित्रपट २०१६ साली रिलीज झाला. त्यामध्ये एका वैमानिकाला प्रवाशांनी भरलेले विमान १५ जानेवारी २००९ रोजी हडसन नदीच्या पात्रामध्ये उतरवावे लागले. त्याचे चित्रमय स्वरूप दाखवण्यात येते. वैमानिकाला प्रवासी कौतुकाची थाप देत असले, तरी नियमाप्रमाणे वैमानिकाला चौकशीला सामोरे जावे लागते. त्याचे चित्रण या चित्रपटाच्या शेवटच्या भागामध्ये सविस्तर केले आहे.
टॉम हँक्स अभिनित या अप्रतिम चित्रपटामध्ये दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड वैमानिक नायकाच्या क्रॅश लँडिंग कौशल्यातील थरार दाखवण्यापेक्षा त्याच्या चौकशीच्या निमिताने झालेल्या मानसिक द्वंद्वाला अधिक महत्त्व देतात. चित्रपट सुरू होताच आपल्याला वैमानिकाची मानसिक अवस्था दिसते. ‘फ्लाईट नंबर १५४९’मधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे टीव्हीवर दाखवत असले तरी विचारात गढलेला वैमानिक चौकशीला सामोरा जाताना दिसतो. वाचलेले सर्व प्रवासी वैमानिकाचे कौतुक करताना थकत नाहीत, परंतु वैमानिकाची चौकशी सुरू झालेली असते. तो सांगतो की, ते क्रॅश लँडिंग नव्हते, तर परिस्थितीनुसार घेतलेला धोरणात्मक निर्णय होता. चौकशी करणारे म्हणतात की, आम्ही त्या क्षणी वैमानिकाला काय करता आले असते, याचे पर्याय बघू आणि मग निर्णय देऊ.
यावर वैमानिक काय सांगतो, तो चौकशीला कसे तोंड देतो, हे दिग्दर्शकाने दाखवले आहे. थरार काय झाला, हे दाखवतानाच दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड मानवी स्वभावाचे विविध पैलू दाखवण्यावर भर देतो. चित्रपटाचा खरा कप्तान दिग्दर्शक असतो, हे क्लिंट इस्टवूडने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटात जाणवते. उत्तम दिग्दर्शकाच्या हाती उत्तम विषय मिळाल्यावर त्याचे सोने कसे होते, याचे प्रत्यंतर देणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे. शिवाय, ‘Miracle landing on the Hudson’ या ४५ मिनिटाच्या डॉक्युमेंटरीमध्ये ही घटना पुन्हा दृश्य स्वरूपात उभी करण्याचा प्रयत्न केला आहे, जी ‘Disney Hotstar’वर बघता येते.
‘फ्लाईट’ या रॉबर्ट झेमेकीस दिग्दर्शित चित्रपटामध्ये वैमानिक डेंझेल वॉशिंग्टन अशाच प्रकारे फ्लाईटचे क्रॅश लँडिंग चतुराईने जमिनीवर करतो, परंतु त्याचा स्वच्छंदी स्वभाव आणि ड्रग्ज घेणे, त्याला चौकशीमध्ये महागात पडते. फ्लाईट उडवण्यासाठी घरामधून निघण्यापूर्वी तो ड्रग्ज घेतो. फ्लाईट उड्डाण सुरू होण्यापूर्वी तो दारू पितो. तरीही फ्लाईटमध्ये vertical control गेल्यावर तातडीने कार्यवाही करून तो सुरक्षित पद्धतीने विमान मोकळ्या जमिनीवर उतरवतो.
अशा पद्धतीने विमान उतरवताना १०२ प्रवाशांपैकी सहा जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगातून ९६ प्रवाशांना वाचवले, यापेक्षा सहा जणांचा मृत्यू झाला, या कारणास्तव वैमानिकाविरुद्ध गुन्हा नोंदवला जातो. त्या तपासामध्ये वैमानिकाने अल्कोहोल आणि ड्रग्ज घेतल्याचे आढळून येते. उड्डाणासाठी योग्य नसलेले विमान चतुराईने चालवून (वेळ पडल्यावर उलटे करून) प्रसंगावधान राखल्याबद्दल कौतुक होण्याऐवजी चौकशीला सामोरे जाणे आणि उपेक्षा सहन करावी लागणे, त्यासंबंधी कायदेशीर लढाई, बिघडलेली व्यक्तिगत नाती, याबद्दल चित्रपट तयार करताना रॉबर्ट झेमेकीस या दिग्दर्शकाने ७० टक्के भाग वैमानिकाची मनोवस्था, त्याची लढाऊ वृत्ती आणि ड्रग्जबद्दलची अपराधी भावना चित्रित करण्यावर भर दिला आहे.
आपल्या व्यसनीपणा वैमानिकाला कसा छळतो, त्यावर त्याचा वकील त्याला कशी मदत करतो, तरीही तो पुन्हा अल्कोहोलच्या आहारी जातो का, त्या चुकांचे परिमार्जन तो कसे करतो, एकूणच या गंभीर विषयावर त्याची मनोवस्था, त्याचा मानसिक झगडा हे सर्व आपण या चित्रपटात बघतो. परंतु हे सर्व दाखवताना त्याच्या व्यसनाला चित्रपटात कुठेही पाठिंबा दिलेला नाही, त्याचे उदात्तीकरण केलेले नाही.
या दोन्ही चित्रपटांच्या उलट प्रकार ‘रनवे ३४’मध्ये दिसतो. कोणत्याही न्यायालयामध्ये एकमेकाला खोडून काढण्याची मुभा असते, परंतु त्यासाठी जेवढा मुबलक वेळ ‘रनवे ३४’मध्ये दिल आहे, तो प्रत्यक्षात भारतात नसतो. (यासाठी ‘कोर्ट’ हा मराठी चित्रपट बघावा). ‘तारीख पे तारीख’छाप चित्रपटीय प्रतिमेमधून बाहेर पडून खरे न्यायालय कसे असते, याचा अभ्यास करायला हवा. यात न्यायालयीन युक्तिवादांमध्ये अमिताभ बोलतो, त्या वेळी कोणीही चकार शब्द काढत नाही. कारण साक्षात अमिताभ बच्चन! ते ज्या वकिलाची भूमिका वठवतात, तो कोणताही वेगळा साक्षीदार उभा करत नाही. अमिताभ स्वगतासाठी प्रसिद्ध आहेत, म्हणून त्यांना त्यासाठीच वापरणे न्यायालयाच्या नियमाविरुद्ध आहे (भलेही ती चौकशी विमान वाहतूक नियामक मंडळ चालवत असले तरीही).
अमिताभ बच्चन, सलमान खान चित्रपटात आहेत म्हणून त्यांच्यासाठी संवाद लिहिले जातात, भूमिकेची लांबी वाढवली जाते. चित्रपटापेक्षा मोठे होणारे अभिनेते, कथेला आणि एकूणच चित्रपटाच्या परिणामाला मारक ठरतात. याच क्षणी दिग्दर्शकाच्या हातातून चित्रपट निघून जातो. या चित्रपटात कौटुंबिक मालिकांप्रमाणे सगळीकडे लख्ख प्रकाश असतो.
हा चित्रपट बघताना अनेक प्रश्न पडतात. ‘ज्युरी सिस्टीम’ भारतामध्ये आहे? नसेल तर न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या उजव्या बाजूला बसलेले चौघे कोण? अजय देवगण विरुद्ध अमिताभ बच्चन (वकील की चौकशी अधिकारी?) असा सामना कसा होऊ शकतो? पायलट (अजय देवगण)ला कोणी वकील नेमता आला नाही? न्यायाधीशाची भूमिका आहे की नाही? खटल्याचा निकाल अमिताभ बच्चन कसा देऊ शकतात? ते वकील आहेत की न्यायाधीश? तो इतका वेळ स्वगत कसं करू शकतात? विमान चालवताना पायलट सिगारेट ओढू शकतो? वैमानिकाची बायको विमान सुरू असताना त्याचा फोन स्विच ऑफ असल्याची तकार कशी करू शकते? एकूणच अभिनेता अजय देवगणच्या सामर्थ्याविषयी शंका नव्हतीच, हा चित्रपट बघितल्यानंतर ‘दिग्दर्शक’ अजय देवगणबद्दलही ‘भ्रमनिरास’ झाला नाही!
विमान संकटात असताना झोपलेला पायलट आणि ‘सली’मध्ये सर्व निर्णय अचूक घेऊनसुद्धा चौकशी आयोगाला निर्भीडपणे सामोरा जाणारा पायलट, या दोन्हीमध्ये सत्यघटना आणि त्याचे चित्रीकरण यात विपर्यस्त फरक असल्याचे जाणवते. वैमानिकाला विमानतळावरून मार्गदर्शन करणारा हवाई वाहतूक नियंत्रक ‘सली’मध्ये प्रयत्नांची शर्थ करतो, परंतु इथं त्याची तब्येत बिघडलेली असते, त्याचे वाहतूक नियंत्रणावर लक्ष नसते, असा एकूण विरोधाभास आहे.
‘सली’मध्ये विमानाचे क्रॅश लडिंग टाळून हडसन नदीमध्ये विमान उतरवले जाते, त्या वेळी पायलट हवाई सुंदरींना फोन करून सांगतो- ‘Brace for Impact’. त्यानंतर दोन्ही हवाई सुंदरी विमानातील सर्व प्रवाशांना ‘Heads down, stay down, Brace, brace, brace’ असे ओरडून सांगतात. सर्व प्रवासी त्याचे पालन करतात. परंतु ‘रनवे ३४’मध्ये वैमानिक कॉकपिटमधून बाहेर येऊन सर्वांना सूचना देतो, तेव्हा प्रवासी त्याच्याबरोबर वाद घालतात, हे दृश्यच विनोदी आहे. हडसन नदीमध्ये विमान उतरल्यानंतर शेवटचा प्रवासी बाहेर पडेपर्यंत वैमानिक त्याची खात्री करून घेण्यासाठी विमानातच थांबतो. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सगळेच हिरो मानतात, तरी त्याचा अविर्भाव आपण विशेष काही केले असा नसतो.
‘रनवे ३४’मध्ये नायक अजय देवगण स्वतःला स्टाईलिश हिरो समजतो आणि तसेच वागतो. त्याच्या अशा वागण्यामुळे प्रेक्षकांची त्याला सहानुभूती मिळत नाहीच, शिवाय भारतातील पायलट असोसिएशनने असे काही घडले, हे नाकारले आहे. ‘सली’मध्ये शेवटी आपल्याला खरे प्रवासी दिसतात. १५५ प्रवासी जिवंत आहेत हे समजल्यानंतर टोम हँक्सचा चेहरा बघावा, त्याचे बोलके डोळे बघावेत.
‘फ्लाईट’मधल्या वैमानिकाला ‘रनवे ३४’ या चित्रपटाप्रमाणे आपल्या व्यसनी असल्याबद्दल फुकाचा अभिमान वाटत नाही. नायकाच्या ड्रग्ज घेण्याचे कुठेही उदात्तीकरण झालेले नाही. याउलट नायक अजय देवगणला कोणी ‘सिगारेट ओढू नकोस’ असे सांगितले, तर तो उद्धटपणे ‘जलाया तो नहीं ना?” असे विचारतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
हिंदी चित्रपटसृष्टी अजूनही ब्लॅक अँड व्हाईट अशी पात्रं रंगवण्यात आणि नायकाला सर्वगुणसंपन्न दाखवण्यात मश्गुल आहे. ‘सली’मध्ये वैमानिक नायक साधासुधा वैमानिक आहे. त्याचे कोणतेही स्टाईलबाज कृती वा वाक्य नाही. आपल्याविरुद्ध सुरू झालेल्या चौकशीबद्दल त्याला काळजी वाटते (‘रनवे ३४’तील वैमानिकासारखा तो बेफिकीर नाही). टॉम हँक्स इमारतीच्या काचेमधून समोरच्या इमारती बघता बघता त्यामधून येणारे विमान दिसते आणि आपण विमान पाण्यात न उतरवता अशा इमारतीवर विमान आपटले असते तर काय झाले असते, याची त्याला कल्पना येते, त्या विचारामध्ये तो गढून जातो. तो प्रसंग क्लिंट इस्टवूड या दिग्दर्शकाने अतिशय तरलतेने घेतला आहे. चौकशी दरम्यान चौकशी करणारे म्हणतात की, वैमानिकाच्या कौशल्याबद्दल त्यांच्या मनात काही संदेह नाही, तरीही हे सर्व प्रकरण टाळता आले असते किंवा कसे याबद्दल ते चौकशी करत आहेत. यामध्ये कोणीही खलनायक या नात्याने समोर येत नाही. ‘सली’चे ते यश आहे आणि ‘रनवे ३४’ इथेच फसलेला आहे.
चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. उत्तम दिग्दर्शक असेल तर चांगल्या कथेचे कसे सोने होते, हे अनुभवण्यासाठी ‘सली’, ‘फ्लाईट’ हे चित्रपट बघता येतील. त्याच कथेवर दिग्दर्शकाच्या हातातून निसटलेला ‘रनवे ३४’ आता प्राईमवर बघता येईल. ओटीटीमुळे हिंदी चित्रपटांची स्पर्धा फक्त इंग्रजी चित्रपटांशीच नव्हे, तर तमिळ-मल्याळम चित्रपटांशीसुद्धा होते आहे. प्रेक्षकांना एकापेक्षा एक दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता-दिग्दर्शकांनी नवे विषय, नवी गणिते मांडायला हवीत, अन्यथा क्रॅश लँडिंग अटळ आहे.
.................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment