‘भयंकर आनंदाचा दिवस!’ : अध्यात्माच्या पारंपरिक संकल्पनांबाबत प्रश्न विचारणारं ‘मनोहर’ नाटक
कला-संस्कृती - नाटकबिटक
श्रेया पांचाळ
  • ‘भयंकर आनंदाचा दिवस!’च्या प्रयोगाचं एक पोस्टर
  • Mon , 06 June 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक भयंकर आनंदाचा दिवस Bhayankar Aaandacha Divas श्याम मनोहर Shyam Manohar

धर्म, कर्मकांड, अध्यात्म या वरवर हातात हात घालून असलेल्या पारंपरिक संकल्पना. पण नीट बारकाईनं विचार केला, तर या संकल्पना एकमेकांहून किती भिन्न आहेत, हे लक्षात येतं. जो धारण केला जातो तो धर्म, अशी एक धर्माची व्याख्या केली जाते. म्हणजे थोडक्यात जीवन जगताना परस्परांशी नैतिकपणे वागण्याचे नियम म्हणजे धर्म. तर भौतिक जगात एका अलौकिक आणि दिव्य शक्तींचा प्रतीकात्मक असा आधार म्हणजे कर्मकांड. प्रस्थापित धर्म आणि कर्मकांड हे मनाचा आणि बुद्धीचा विकास आभासी स्वरूपात दाखवत असले, तरी बहुतांशी तो बाहेरच्या भौतिक साधनांशी निगडित असतो. मात्र माणसाचं अजून एक मनाचं आणि बुद्धीचं आतंरिक क्षेत्र असतं. अध्यात्माचा संबंध हा माणसाच्या अंतरंगातील या क्षेत्राशी निगडित असतो.

अधि + आत्म = अध्यात्म म्हणजे स्वतःकडे पाहणं. आत्मपरीक्षण करणं. जगताना आपल्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याविषयीचे प्रश्न, उत्सुकता आपल्यात निर्माण होत नाही. याला कारणीभूत असतो आपल्यातला अहंकार, मीपणा. धर्म, कर्मकांड, भौतिक आभासी जग यांनी तो पोसला जातो. त्यामुळे व्यक्तीला गहन प्रश्न पडणं बंद होत जातं. माणसाची नैसर्गिक प्रेरणा जागृत करून जगण्याविषयी, भवतालाविषयी एक दृष्टीकोन प्राप्त करणं म्हणजे आध्यात्मिकता. त्यासाठी आपल्यातला अहंकार समूळ नष्ट होणं अनिवार्य असतं.

प्रसिद्ध नाटककार श्याम मनोहर यांचं ‘भयंकर आनंदाचा दिवस’ हे या संकल्पनेवर आधारलेलं एक नाटक. अहंकार, धर्म, कर्मकांड, भौतिक साधनं आणि अध्यात्म या मुद्द्यांवर परखड भाष्य, त्यांची उलट- सुलट तपासणी या नाटकात आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

माहिती-तंत्रज्ञानाचा विकास एवढा झाला आहे की, संपूर्ण जग आपल्या तळहातावर आलं. एका जागेवर बसून आपण एका क्लिकवर जगाचा प्रवास करू लागलो. याचा परिणाम थेट माणसाच्या वृत्तीवर झाला, शोध घेणं कमी होऊ लागलं. त्यात ‘खाउजा’ (खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण) संकल्पनेमुळे जागतिक संस्कृती आणि जगण्याची रित यांची सरमिसळ झाली. त्यांचं केवळ अंधानुकरण केलं गेलं. धर्म, कर्मकांड, राजकारण, अर्थकारण यांचं स्तोम वाढतं गेलं. प्रत्येक गोष्टीचा उत्सव करण्याची सवय लागली. त्यामुळे आपण विवेक आणि जगण्यातलं समाधान गमावून बसलो. या विश्वाबद्दलचं कुतूहल थांबलं आणि आपण दिशाहीन झालो. या नाटकातली पात्रं याच प्रभावाखाली वावरताना दिसतात.

श्याम मनोहरांचं कथात्म आणि नाट्यात्म साहित्य तथाकथित साहित्य संकल्पनांच्या मांडणीची मोडतोड करतंच, त्याचबरोबर आशय-विषयाच्या बाबतीतही त्यांचं साहित्य वेगळं ठरतं. त्यांच्या सर्वच साहित्याचा आशय-विषय हा पारंपरिक साहित्याच्या आशय-विषयाहून वेगळा असतो. त्यात मानवी नातेसंबंधांतील विसंगती, माणसाच्या जगण्याविषयीचे मूलभूत प्रश्न, पेच, जगण्यातल्या दुर्लक्षित गोष्टी यांची तर्काधिष्ठित मांडणी दिसते.

‘भयंकर आनंदाचा दिवस’ हे नाटक याचाच एक नमुना. कौटुंबिक म्हटल्या जाणाऱ्या नाटकात कथानकाच्या विकासासाठी जी संघर्षमूल्यं उपयोजिली जातात, त्याहून वेगळ्या संघर्षमूल्यांचं उपयोजन श्याम मनोहर या नाटकात करतात. हे संघर्षमूल्य व्यक्ती विरुद्ध नैतिक समज अशा प्रकारचं असतं, असं म्हणता येईल. या नाटकात एका सधन कुटुंबात आध्यात्मिक वातावरण कायम राखण्यासाठी घरात ठेवलेल्या महाराजांना अचानक एके दिवशी आपण आध्यात्मिक नसल्याचा साक्षात्कार होतो, आजवर आपण स्वतःला आध्यात्मिक म्हणवून घेण्यासाठी ज्या बाहेरच्या बेगडी संकल्पनांचा आधार घेतला, त्या वरवरच्या आहेत, आपला अहंकार अजून गेलेला नाही, याची जाणीव होते.

ही बाब जेव्हा ते कुटुंबातील इतर व्यक्तींना सांगतात, तेव्हा पेच निर्माण  होतो आणि तिथून पुढे नाटक अध्यात्माच्या पारंपरिक संकल्पनांबाबत प्रश्न विचारत त्यांची सविस्तर चर्चा घडवून आणतं. या नाटकात पात्रापात्रांमधील आंतरिक विरोध मनोहरांनी घडवले आहेतच. त्याचबरोबर तत्त्वज्ञान, आनंद, राजकारण, धर्म, कर्मकांड आणि माणूस यांच्यातील द्वंद्व यावरही भाष्य केलं आहे.

हे झालं नाटकाच्या संहितेविषयी. परंतु नाटकाचा प्रयोग रंगमंचावर अधिक सकसपणे जिवंत होत प्रेक्षकांपर्यंत पोहचत असतो. रत्नागिरीतील के.झेड क्रिएटिव्ह ही संस्था या नाटकाचे व्यावसायिक प्रयोग करत आहे.

मुळात श्याम मनोहर आणि व्यावसायिक नाटक हे समीकरणच आपल्याला फारसं रुचणारं नाही. तरीसुद्धा असा प्रयत्न यशस्वी करण्याचं धाडस, या नाटकाचे दिग्दर्शक प्रदीप शिवगण यांनी केलंय. त्यांनी दिग्दर्शित केलेला या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर हे नाटक जणू व्यावसायिक रंगभूमीकरताच लिहिलंय असं वाटून जातं. याआधीसुद्धा शिवगण यांनी प्रायोगिक नाटककारांची नाटकं दिग्दर्शित केली आहेत. या नाटकाचं नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा, संगीतसंयोजन हे तंतोतंत व्यावसायिक नाट्यप्रयोगासारखं आहे.

दादासाहेबांचा उच्च मध्यमवर्गीय श्रीमंती दाखवणारा बंगला आणि त्याला दिलेलं महाराजांच्या आश्रमाचं स्वरूप, नेपथ्यकार प्रसाद दादा लोगडे यांनी समर्थपणे उभं केलंय. नेपथ्याची रंगसंगती, मंचावर मांडलेल्या वस्तू यांमधून बंगल्यातला भपकेदारपणा अधोरेखित होतो. बऱ्याचअंशी प्रसंग बंगल्याच्या दिवाणखान्यात घडतात. त्यामुळे काही प्रसंग सोडल्यास बरंचसं नाटक, हे सामान्य प्रकाशात घडतं. नाटकासाठी आवश्यक असणारा प्रकाश नाटकाचे प्रकाशयोजनाकार हृषिकेश लांजेकर आणि स्वानंद शिंदे यांनी अचूक राखला आहे. अक्षय धांगट यांनी नाटकाला साजेसं संगीत दिलं आहे. मात्र शीर्षकगीत अधिक प्रभावी करता आलं असतं. नरेश पांचाळांची रंगभूषा आणि वेशभूषा नाटकातील पात्रांना आणि त्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्यांना सूचित करणारी आहे.

दिग्दर्शकानं नाटकाच्या आशय-विषयाला जराशीही ठेच न पोहोचवता व्यावसायिक आणि प्रायोगिकतेची योग्य रितीनं सांगड घातली आहे. विलक्षण विनोदी असलेलं हे नाटक सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी दिग्दर्शकानं पात्रांना आंगिक हावभाव दिले आहेत. नाटकाचा वेग सांभाळण्यात मात्र दिग्दर्शक आणि कलाकार थोडेसे कमी पडतात. पहिल्या आणि दुसऱ्या अंकातील वेग यांच्यात समतोल साधला न गेल्यानं नाटक थोडं कंटाळवाणं होऊ लागतं.

दिग्दर्शक शिवगण हे स्वतः नाटकातील दादासाहेब हे पात्र करतात. त्यांचा श्रीमंत बेरकीपणा, स्वार्थ, विनोदबुद्धी आणि आपला हेतू साध्य करणारी व सारं काही पैशाशी जोडणारी वृत्ती त्यांनी अचूक दाखवली आहे. संपूर्ण नाटकभर स्वत:ला भूमिकेसोबत जोडून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. संवादांची विनोदी लय, नेमक्या ठिकाणी विराम आणि हालचालींचा योग्य वापर यातून त्यांची भूमिका अधिक ठळक होते.

मानसी पाथरे यांनी रंगवलेली रेवती श्रीमंत घरातली, भौतिक संसाधनांनी परिपूर्ण असूनही असमाधानी, पारंपरिक पद्धतींना शरण गेलेली गृहिणी, तिची धावपळ, असमाधान, आनंदी राहता येत नसल्याचं दु:ख, कुटुंबाच्या सुखासाठीची धडपड योग्य रितीनं साकार करते. परंतु रंगमंचावरच्या घाईनं भूमिकेवरील पकड काही प्रसंगात सुटल्यासारखी वाटते. सरकारी नोकरीमधून निवृत्ती घेतलेली मैत्रीण रेखाची भूमिका करणारी प्रणेत्री पांचाळने दिग्दर्शकाबरहूकूम साकारली आहे. संवादांचे अर्थ पोहोचवण्यात मात्र ती कमी पडते.

दिप्ती वहाळकरने राजकारणी सरला चांगली उभी केली आहे. तरीही तिची राजकारणी वृत्ती, धोरणीपणा, प्रसंगी परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याची ताकद, ठामपणा हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू तिच्या संवादातून, देहबोलीतून म्हणावे तितके ठसत नाहीत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

कौस्तुभचा फिलॉसॉफी की प्रेम यामधला तणाव, वस्तुस्थितीची जाणीव होत असतानासुद्धा त्यावर मात करता न येणं आणि त्यामुळे आलेला ढिसाळपणा, किशोर कनौजियाने देहबोलीतून आणि रंगमंचावरच्या वावरातून शक्य तेवढा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जिथं संवाद नाहीत, तिथं मात्र त्याचा नवखेपणा जाणवतो.

राणीची भूमिका साकारणाऱ्या श्रेया जाधवने तिची चंचलता, हजरजबाबीपणा, ‘चिअर गर्ल’ असणं, व्यावहारिकपणा आणि दादासाहेबांच्या कुटुंबातील घटक नसणं, हे क्रिया-प्रतिक्रियांमधून व्यवस्थित साकारलं आहे. नाटकातली तिची नृत्यंसुद्धा प्रभावी झाली आहेत. आपला अहंकार अजून गेला नाही, याची जाणीव झाल्यानंतर, भगवी वस्त्रं टाकून स्वतःचा शोध घ्यायला निघण्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास सागर कावतकरने चांगला दाखवला आहे. महाराजांची भूमिका अधिक समर्थपणे उभी करण्यास त्याला वाव आहे.

परंतु हे नाटक प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होतं. विशेष म्हणजे रत्नागिरीसारख्या निमशहरी भागात श्याम मनोहरांचं नाटक व्यावसायिक पद्धतीनं उभं राहणं आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर करू पाहणं, तेही आजच्या अस्थिर काळात नक्कीच कौतुकास्पद आहे. यासाठी नाटकाच्या संपूर्ण संचास मनःपूर्वक शुभेच्छा!

.................................................................................................................................................................

लेखिका श्रेया पांचाळ मुंबई विद्यापीठामध्ये एम.ए. (मराठी)च्या विद्यार्थिनी आहेत.

shreya.panchal8298@gmail.com     

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......