‘अप्पू चित्र-त्रयी’ : ही अमूर्त कलाकृती तंत्रज्ञानाच्या चमत्कारानं आज आपल्याला घरबसल्या बघायला मिळते, यासारखं भाग्य ते कोणतं!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सलील जोशी
  • ‘अप्पू चित्र-त्रयी’ची पोस्टर्स
  • Fri , 03 June 2022
  • कला-संस्कृती चलत्-चित्र अप्पू चित्र-त्रयी Apu Trilogy पाथेर पांचाली Pather Panchali अपराजितो Aparajito अपूर संसार The World of Apu

काही कलाकृती कालातीत असतात. कुठल्याही काळात त्या बघितल्या, वाचल्या तरी त्या अप्रासंगिक वाटत नाहीत. गेल्या महिन्यात बऱ्याच वर्षांपासूनचे अपुरे असलेलं काम, सत्यजित रे यांची अप्पू चित्र-त्रयी बघण्याचा योग्य आला. ‘पाथेर पांचाली’ (१९५५), ‘अपराजितो’ (१९५६) व ‘अपूर संसार’ (१९५९) या चित्र-त्रयीचा आनंद घरबसल्या घेणं, ही अपूर्व आनंदाची परमावधी वाटली. ‘पाथेर…’ अगदी लहान असताना दूरदर्शनवर बघितल्याचं आठवत होतं. पण १९ इंची पडद्यावर, पात्रं अंधारलेली, संवाद न कळणारे, तसंच सब-टायटल्स नसल्यानं कुठेतरी न पोचलेला, असा तो सिनेमा म्हणून आठवणीत होता. त्यापुढील दोन सिनेमे बघण्याचा योग मात्र केवळ अनुपलब्धतेपोटी येत नव्हता, याची रुखरुख असायची.

रे यांचे इतर बरेच सिनेमे यथावकाश इतर माध्यमांतून, डीव्हीडीवर का होईना बघता यायला लागले. पण अप्पू-त्रयी मात्र कुठे तरी गहाळ झाल्यासारखी होती. मधून-मधून या तीनही सिनेमांवर स्तुतीसुमनं ऐकायला मिळायची. मार्टिन स्कॉर्सेसीला सत्यजित रे यांच्यामध्ये व विशेषतः या चित्र-त्रयीमध्ये स्वतःच्या सिनेमाआवडीचं वा संवेदनशीलतेचं मूळ दिसतं, यात कुठे तरी आनंद वाटायचा व असूयाही. कारण हे म्हणजे आपल्या घरची गोष्ट परक्याकडून कळण्यासारखं. स्कॉर्सेसीच्या सिनेमाची जातकुळी रे यांच्या सिनेमापेक्षा अतिशय वेगळी असूनही ती त्याला का भावत असावी, याबाबत कमालीचं कुतूहल वाटत असायचं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

१९९३मध्ये म्हणे या तिन्ही सिनेमांच्या रिळा एका अपघातात जळाल्या. बहुतांशी नष्ट झालेल्या या सिनेमांचे अवशेष अकॅडेमी ऑफ फिल्म आर्काइव्ह आणि निर्माते जानस फिल्म्स यांनी २० वर्षं जपून ठेवले. त्यानंतर अकॅडेमी, हार्वर्ड फिल्म आर्काइव्ह, जानस फिल्म्स व ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट यांनी इटलीतील एका फिल्म लॅबमध्ये या अप्पू-त्रयीच्या जीर्णोद्धाराचं काम केलं. त्यासाठी जळालेली प्रत्येक फीत हायड्रेट करून, त्यातील चित्र व संवाद यांचा ताळमेळ जुळवून अत्यंत आधुनिक अशा ४K रेसोलूशनमध्ये पुनःनिर्मित करण्याचं काम केलं. ‘अपूर् संसार’साठी त्यांना डुप्लिकेट निगेटिव्हचा आधार घेऊन - जी कदाचित सामान्य प्रोजेक्टरमध्ये घालून बघता येणार नाही व ज्यात संवाद व फितीचा ताळमेळ बसणं अवघड असेल - संपूर्ण सिनेमा बनवावा लागला.

पण त्याचा परिणाम हा थक्क करणारा झाला आहे. कृष्ण-धवल सिनेमा किती सुंदर दिसू शकतो, याचा उत्तम नमुना म्हणून या पुनःनिर्माणाकडे बघावं लागेल. एक तर रे यांचा कॅमेरा अगदी अंतर्मनाचा ठाव घेणारा. त्यात त्यांची पात्रं अत्यंत बोलक्या डोळ्यांची (त्यात बंगाली डोळे म्हणजे जुलमीपणाची हद्दच असते!). त्यामुळे ही सगळी पात्रं या तांत्रिक चमत्कारानं अक्षरश: जिवंत झालेली दिसतात.

पण हा नुसताच तंत्राज्ञानाचा चमत्कार सशक्त कलाकृतीमुळे उठून दिसला आहे. रे यांच्या सगळ्याच सिनेमातील पात्रं उत्स्फूर्त असतात, विशेषतः त्यांची स्त्री पात्रं अतिशय कणखर असतात. मग ती ‘पाथेर...’, ‘अपूर्...’, ‘महानगर’, ‘तीन कन्या’, ‘चारुलता’, ‘घरे-बाहिरे’ या सगळ्या सिनेमातील स्त्री पात्रं त्या कथेचा कणाच ठरतात. रे यांच्या सिनेमात बंगाल, तसंच पर्यायानं भारतीय संस्कृतीचा, संगीत व सामाजिक परिस्थितीचा अपूर्व मिलाफ दिसून येतो.

बरं, त्यांच्या सिनेमात केवळ परिस्थिती खलनायक ठेवून मनुष्याला सरळ-साधं दाखवण्याकडे भर असतो आणि त्याचमुळे तो सिनेमा अत्यंत मोहक, लोभसवाणा वाटतो. प्रेक्षकांना अप्पूच्या परिचय, काशाच्या फुलांच्या जंगलातून अप्पू व त्याची बहीण दुर्गा प्रथमच रेल्वे बघतात, वाराणसीतील घाटांचं सौंदर्य, गजबजलेलं कलकत्ता, अशी अनेक दृश्यं व कलाकारांचे अप्रतिम क्लोज-अप्स, हे तंत्रज्ञानामुळे अधिकच उठून दिसले आहेत.

अपू-त्रयीला रविशंकर यांचं अतिशय संयंत पद्धतीनं दिलेलं पार्श्वसंगीत बघताना अजून एक साक्षात्कार होतो. अपू आपल्या नव-विवाहित पत्नीला घेऊन शहरात येतो. सकाळी ती चुलीशी काम करत असताना तो तिच्याकडे डोळे भरून बघत असतो. पार्श्वभूमीला सतारीवर धून वाजत असते- ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ची. ‘अपू’ बनलाय १९५४-५९मध्ये. एस. डी. बर्मन भरात असले तरी ‘अभिमान’ झाला नव्हता. बरं, अनेक बंगाली संगीत-दिग्दर्शकांच्या हिंदी गाण्याच्या मूळ चाली, या त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या बंगाली गाण्यावरून बेतलेल्या असतात. पण तशी ही शक्यता इथं नव्हती. रविशंकर बर्मनदांकडून चाल घेणं, हेही अशक्यच वाटत होतं.

शेवटी सगळ्या बंगाली कलेचं मूळ रवींद्र-संगीतात आढळतं याचा शोध लागला. तर याची चाल दस्तुरखुद्द रवींद्रनाथांनीच लावलेली आहे. (मूळ गाणं – ‘जोडी तारे नाई, चिनी जो शेकी’). ही धून रे यांनी केवळ अर्ध्या मिनिटांकरता वापरली, तर बर्मनदांनी एका गाण्याच्या मुखड्याकरता. (गूगलवर शोधताना रविंद्र-संगीतातील चांगली चार-पाच प्रसिद्ध हिंदी सिनेमातील गाणी सापडली. त्यातील सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे ‘छू कर मेरे मन को, किया तुने क्या इशारा’).

याच सिनेमात म्हणे रविशंकरांना अतिव्यस्ततेमुळे एका मुख्य प्रसंगाकरता पार्श्वसंगीत देणं जमलं नाही. रे यांचे कॅमेरामन सुब्रत मित्र हेसुद्धा पट्टीचे सतार वाजवणारे. त्यांनी एक पीस स्वतः वाजवून वेळ निभावून नेली. असं म्हणतात की, तो तुकडा कोणता हे फक्त या तिघांनाच ठाऊक आहे.

‘My Years with Apu’ या पुस्तकात रे यांनी अपू-त्रयीची निर्मिती प्रक्रिया उलगडून सांगितली आहे. त्यांचा शांतिनिकेतनपासून ते सिनेमा तयार करेपर्यंतचा प्रवास वाचताना थक्क व्हायला होतं. साधनांचा इतका अभाव असताना त्यांनी एवढी बहारदार निर्मिती केली, आज ते असते तर त्यांनी काय कमाल केली असती, असं वाटून जातं! आजकाल सिनेमातील कथेला, पात्रांना होणारा राजकीय विरोध हा त्या काळीसुद्धा होताच. ‘पाथेर’ला भारतातील गरिबीचं प्रदर्शन म्हणून सार्वजनिक व सरकारी विरोध सहन करावा लागला. पण खुद्द पं. नेहरूंनी हा सिनेमा बघून त्याच्या सर्व विरोधकांना शांत केलं होतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

पाश्चिमात्य देशांसाठी ‘पाथेर’चा शोध हासुद्धा एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभावा असाच होता. न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टचे डायरेक्टर कलकत्त्यात इतर कामानं येतात काय, त्यांना या सिनेमाच्या रशेस दाखवल्या जातात काय आणि ते रे यांना हा चित्रपट न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित करायची गळ घालतात काय? कदाचित हे रे यांनासुद्धा अपेक्षित नसावं. पण न्यूयॉर्कमधील प्रदर्शनात ‘पाथेर’च्या वाट्याला अमाप कौतुक आलं.

आश्चयाची गोष्ट म्हणजे सिनेमाला सब-टायटल्स नसूनही तेथील प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. कदाचित तोपर्यंत पाश्चात्य जगाला पडद्यावर भारतीय संस्कृती म्हणजे नुसतीच ब्रिटिश सरंजामशाहीच्या दृष्टीकोनातून किंवा गरिबीचं भांडवल करणारी दिसत असावी. ‘पाथेर’च्या रूपानं तेथील रसिकांस अगदी त्यांच्या तोडीची, पण अस्सल भारतीय कलाकृती बघायला मिळाली असावी.

अशी ही अमूर्त कलाकृती, जी कदाचित काळाच्या पडद्याआड गेली असती, ती तंत्रज्ञानाच्या चमत्कारानं आज आपल्याला घरबसल्या बघायला मिळते, यासारखं भाग्य ते कोणतं!

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......