‘कोडा’ : या चित्रपटात दोन भिन्न जग आहेत. एकात एक माणूस दुसऱ्याशी बोलू शकतो, दुसऱ्यात शब्दच नाहीत. दोन्हीत काळजी आहे, धडपड आहे, स्वत:चं अस्तिव टिकवण्यासाठी केलेला आटापिटा आहे, पण…
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
सतीश कुलकर्णी
  • ‘कोडा’ या चित्रपटाचे एक पोस्टर आणि त्यातील मुलगी रुबी
  • Wed , 11 May 2022
  • कला-संस्कृती इंग्रजी सिनेमा कोडा CODA (Child of Deaf Adults

शब्द! इतरांशी संवाद साधण्याचे प्रभावी साधन. पण खरोखरच संवाद साधण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो? हळुवार केलेला स्पर्श किंवा डोळ्यातील अश्रुंचा थेंबसुद्धा मनातील भावना सहज व्यक्त करू शकतो, काळीज हेलावून टाकू शकतो. अनेकदा शब्दांच्या अवडंबरापेक्षा मूक संवाद अधिक बोलका असतो.

सिआन हेडर दिग्दर्शित ‘CODA (Child of Deaf Adults)’ हा २०२१ सालचा चित्रपट. यास सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट सहायक कलाकार अशा तीन ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अमेरिकेल्या एका गावातलं एक चौकोनी कुटुंब. त्यात चारच सदस्य असतात. Frank Rossi (Troy Kotsur), त्याची पत्नी Jackie (Marlee Matlin), मुलगा Leo (Daniel Durant) आणि मुलगी Ruby (Emilia Jones), पण रुबी वगळता सर्व जण मुके आणि बहिरे असतात. उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब मच्छिमारीचा व्यवसाय करत असतं. पण तोसुद्धा त्यांना रुबीशिवाय शक्य नसतं. कारण आई-वडील आणि भाऊ सांकेतिक भाषेत काय बोलतात, हे इतरांना समजावून सांगण्याचं काम रुबीलाच करावं लागतं. थोडक्यात, रुबीच या कुटुंबाची संवादक असते. पण तिला स्वत:ची ओळख निर्माण करायची असते. तिचा आवाज चांगला असतो. तिला संगीताची आवड असते. पण आपल्या आवडीनिवडी जपत असताना तिचा कोंडमारा होत असतो. रुबीची भावनिक घुसमट, तिच्या कुटुंबाचा अडीअडचणींवर मात करत जगण्यासाठी चाललेला संघर्ष म्हणजे हा चित्रपट.  

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहे. महाविद्यालयामध्ये एका सांगीतिक कार्यक्रमासाठी कलाकारांची निवड करण्यासाठी ‘मिस्टर व्ही’- Villalobos (Eugenio Derbez) म्हणून संगीततज्ज्ञ आले आहेत. त्यांचा वाढदिवस नुकताच झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांना ते सांगतात की, त्यांना ‘हॅपी बर्थ डे’ या गाण्याच्या ओळी गाऊन शुभेच्छा द्या. सर्व जण तशा शुभेच्छा देतात. पण रुबीची जेव्हा पाळी येते, तेव्हा ती तिथून पळून जाते.

कॅमेरा दाट झाडीतून एकट्याच जाणाऱ्या रुबीच्या मागे जातो. एका सुंदर तळ्याच्या काठावर रुबी बसते. खिन्न, विचारात हरवलेली. आजूबाजूच्या झाडांचं प्रतिबिंब तळ्याच्या पाण्यात पडलेलं असतं… जणू तिच्या मनातल्या विचारांचंच प्रतिबिंब. रुबीचं एकटेपण आपल्याला जाणवतं… तोच एक हलकंसं गाणं आपल्या कानावर येतं- ‘हॅपी बर्थ डे टू यु’. रुबीला गाणं येत असतं. तिचा आवाजही सुंदर असतो, तरी तिने ते म्हटलं नाही. कारण कौटुंबिक समस्या- आपले आई-वडील, भाऊ याचं मुकेपण. त्यामुळे तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. आपण गाणं म्हटलं आणि बाकीचे मित्र हसले तर? डबडबलेल्या डोळ्यांनी रुबी घरी जाते आणि घरची परिस्थिती बघून अधिक उदास होते.

रुबीची समस्या मिस्टर व्ही ओळखतात आणि तिला सांगतात- ‘जगात असे बरेच लोक आहेत, ज्यांचा आवाज चांगला आहे, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. तुझ्याकडे सांगण्यासारखं आहे. त्यामुळे न्यूनगंड बाळगण्याचं काहीच कारण नाही.’ रुबीचा आत्मविश्वास वाढतो. ते तिला तिच्या संगीताविषयीच्या भावना विचारतात, तेव्हा ती भावना शब्दांत व्यक्त करत नाही, तर मूक भाषेतच व्यक्त करते. जणू ती सांगत असते- समुद्रांच्या लाटेवर तरंगत आहे, इतका आनंद तिला झाला आहे. खरंच भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज असते का?

शब्दाशिवाय संवाद आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना हे जसं या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे, तसंच काही प्रसंग कॅमेराच्या (सिनेमॅटोग्राफी - पावला हुईदोब्रो) साहाय्याने प्रभावीपणे साकार झाले आहेत. रुबीची संगीतातील प्रगती बघून मिस्टर व्ही तिला पुढील शिक्षणासाठी बोस्टनला जाण्याबाबत प्रोत्साहित करतात. रुबी आपला निर्णय घरी सांगायचे ठरवते. रात्रीची वेळ. सर्व जण एकत्र बसलेले असतात. वातावरणात नेहमीची शांतता. पण एव्हाना या शांततेची आपल्याही सवय होते. इतक्यात रुबी येते आणि आपला बोस्टनला जाण्याचा निर्णय सांगते.

आणि मग मघाशी ती शांतता गढुळते, हिंदकळते, उचंबळते. रुबी गेली तर काय? आपण व्यवसाय काय करायचा? अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्याला फक्त हातांच्या, बोटांच्या हालचाली दिसतात. आणि मनात चालू असणारी घुसमट. रुबी तिच्या खोलीत जाते आणि जोरात किंकाळी मारते. पण ती कुणालाच ऐकू जात नाही. ती आर्त किंकाळी जणू विचारते- माझं दु:ख, माझा विचार कधीच कुणाला ऐकूच जाणार नाही का?

आपलं दु:ख दुसऱ्याच्या, निदान आपल्या कुटुंबातील कुणाच्या वाट्याला येऊ नये, ही भावना कुणाच्याही मनात येणं स्वाभाविकच. पण रुबीच्या आईला मात्र रुबी जन्माला आली, तेव्हा मनात येतं- ती मुकी असावी! का? कारण रुबी मुकी नसेल तर ती तिच्याशी भावनिकरित्या जोडू शकणार नाही. रुबीच्या दृष्टीनं तिची आई वेगळी ठरेल आणि मग त्यांच्यात विसंवाद होईल. आईच्या या भावना एका मुक्या व्यक्तीच्या आहेत. आणि फक्त प्रेम या भावनेच्या मागे लपलं आहे. आपल्या मुलीबरोबर भावनिकरित्या कायम राहण्याची तिची मनस्वी इच्छा. दोघी मायलेकी एकमेकांच्या मिठीत जातात आणि स्वत:च्या भावनांना मोकळी वाट करून देतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रुबीच्या वडिलांची भूमिका करणारा अभिनेता ट्रॉय कोत्सूर, आईची भूमिका करणारी मार्लि मॅटलिन आणि भाऊ, लिओची भूमिका करणारा डॅनियल ड्युरंट हे सर्व अभिनेते प्रत्यक्षातसुद्धा मुके आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेत व्यक्त होणं सोपं असेल, पण तिघांचा अभिनय  तितकाच कौतुकास्पद आहे. विशेषत: ट्रोयची सुरुवातीला विनोदी ढंगानं जाणारी भूमिका हळूहळू गंभीर होत जाते, तेव्हा त्याचा अभिनय आपल्याला आवडू लागतो. सहायक अभिनेता म्हणून त्याला ऑस्कर पारितोषिक मिळालंय!

रुबीची भूमिका करणारी एमिला जोन्स अप्रतिम. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि कुटुंबात होत असणारा तिचा कोंडमारा तिने यथार्थपणे साकार केला आहे.

या चित्रपटात दोन भिन्न जग आहेत. एका जगात एक माणूस दुसऱ्याशी बोलू शकतो, दुसऱ्यात शब्दच  नाहीत. दोन्ही जगात काळजी आहे, धडपड आहे, स्वत:चं अस्तिव टिकवण्यासाठी केलेला आटापिटा आहे, पण दोन्ही जगांना सांधणारी भावना मात्र एकच आहे- प्रेमाची. ती आपल्याला उत्तम दिग्दर्शन, अभिनय, पटकथा यांच्या माध्यमातून बघायला मिळते!

.................................................................................................................................................................

सतीश कुलकर्णी

satishkulkarni2807@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख