अजूनकाही
नुकताच प्रदर्शित झालेला ‘झुंड’ हा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सिनेमा खूप चर्चेत राहिला. त्याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ आणि ‘द काश्मीर फाईल’ या सिनेमांबद्दल समाजमाध्यमांमध्ये ‘हा सिनेमा पहा’, ‘तो पाहू नका’, असा कुप्रघात जाणीवपूर्वक पसरवण्यात आला. त्यावर नागराजने प्रतिक्रिया देऊन सगळे सिनेमे सगळ्यांनी पाहण्याचा सल्ल्ला देऊन, हा वाद आपल्यापरीनं संपवण्याचा प्रयत्न केला. देशाबद्दल प्रेम असेल तर हे सिनेमे पाहिलेच पाहिजेत. कारण ते ऐतिहासिक घटनांवर आधारित आहेत.
मात्र ‘झुंड’ शहरी झोपडपट्ट्यांतील मागासलेपण, गुन्हेगारी, निमूट वाया जाणारी नवीन पिढी, या जळजळीत वास्तवासोबतच त्यांना नवीन आशेचा किरण दाखवणारी आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणू पाहणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे यात एक भीमजयंतीचे गीत आहे. त्यात नागराज यांनी महानायक आणि महामानव एकाच फ्रेममध्ये आणले. त्याचे अनेक अभिनेते आणि प्रेक्षकांनीही समाजमाध्यमावर कैतुक केले. या एका फ्रेमवर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, त्याच कौतुक केलं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
हे असं का झालं? तर त्यांचं कारणही तसंच आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात सरकारी कार्यालयांत आणि न्यायालयांत महात्मा गांधींच्या छायाचित्रासोबत बाबासाहेबांचं छायाचित्र क्वचितच चार-दोन सेकंदासाठी येत असे. त्याचा उद्देश बाबासाहेब दाखवणे असा मुळीच नसायचा, तर सरकारी कार्यालयांचं वातावरण निर्माण करणं असाच असायचा.
भारतीय सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातही बाबासाहेब दुर्लक्षिले गेले आणि स्वातंत्र्यानंतरही. अशा वेळी नागराज मंजुळे थेट महानायक अमिताभ बच्चन यांना भीमजयंतीत आणून बाबासाहेबांना अभिवादन करायला लावलं! हे काम आजवर मुख्य प्रवाहातील सिनेमानं कधी केलं नव्हतं. त्यामुळे ‘झुंड’ला आंबेडकरी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.
हॉलिवुड दिग्दर्शक रिचर्ड अटेनबरो यांनी १९८२ साली ‘गांधी’ हा सिनेमा निर्माण केला. तो जगभर प्रदर्शित झाला. आंतरराष्ट्रीय सिनेनिर्मिती संस्था इंडो-ब्रिटिश फिल्म आणि नॅशनल फिल्म डेव्हलोपमेंट कार्पोरेशन, इंडिया यांनी सिनेमाची निर्मिती केली होती. मात्र १९९० सालापर्यंत बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ हा नागरी सन्मान मिळेपर्यंत त्यांच्यावर एकही सिनेमा अथवा लघुपट निर्माण झाला नव्हता. जब्बार पटेल यांनी १९९१ साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या नावानं भारत सरकारच्या साहाय्यानं एक लघुपट बनवला आणि प्रदर्शित केला. त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली. लंडन-अमेरिकेसह बाबासाहेब जिथं जिथं राहिले, तिथं तिथं जाऊन त्यांनी चित्रण केलं. तेव्हाच त्यांच्या मनात बाबासाहेबांवर सिनेमा बनवला पाहिजे, हे बीज रुजलं. मात्र त्याला अंकुर फुटायला २००० साल उजाडावं लागलं. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इंडिया यांच्या आर्थिक मदतीनं २००२ साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द अनटोल्ड ट्रुथ’ हा सिनेमा हिंदी-इंग्लिशसहित भारतातील प्रमुख नऊ भाषांत प्रदर्शित झाला. यात बाबासाहेबांची भूमिका दक्षिणात्य अभिनेता मामुटी यांनी निभावली आहे. त्यांना त्यासाठी उत्तम अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
पडद्यावर मामुटीत बाबासाहेब पाहून मी अनेकांना रडताना पाहिलं आहे, इतके हुबेहूब बाबासाहेब त्यांनी साकारले आहेत. या सिनेमाचं प्रदर्शन आजही शहरांत, गावागावात आयोजित केलं जातं. या सिनेमात सोनाली कुलकर्णी यांनी रमाईची भूमिका केली आहे. त्यांना आजही ‘रमाई’ असा लोक आवाज देतात, असं त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. या सिनेमावर आंबेडकरी समाजानं खूप प्रेम केलं. अगदी अचूक आणि वास्तववादी बाबासाहेब जब्बार पटेलांनी चित्रित केले आहेत.
या सिनेमानंतर मुख्य प्रवाहामध्ये बाबासाहेबांवर सिनेमा निर्माण झाला नाही. मात्र २०१४ साली श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘संविधान : द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ ही टीव्हीमालिका हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत राज्यसभा टीव्हीवर प्रदर्शित झाली. या मालिकेचे १० भाग असून प्रत्येक भाग ३० मिनिटांचा आहे. भारतीय संविधाननिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया या मालिकेमधून सांगितली आहे. यात बाबासाहबांची भूमिका सचिन खेडेकर यांनी उत्तमरित्या केली आहे. ही मालिका प्रत्येक भारतीयांनी एकदा तरी जरूर पाहावी अशी आहे. बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करने या मालिकेचे सूत्रसंचालन केले आहे. राज्यसभा टीव्हीच्या ऑफिशियल यू-ट्यूब चॅनेलवर ही मालिका पाहता येते.
दशमी क्रिएशननिर्मित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा’ ही मराठी मालिका स्टार प्रवाहावर २०१९मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्रदर्शित झाली. तिचं दिग्दर्शन गणेश रसाने यांनी केलं; तर कथा-पटकथा अपर्णा पाडगांवकर आणि शिल्पा कांबळे यांची आहे. ही मालिका मराठीच्या इतिहासात एकमेव होती, मात्र हा एक अयशस्वी प्रयोग म्हणावा लागेल. कारण निर्मात्यांचा हेतू चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेलं बाबासाहेबांचं १२ खंडी संपूर्ण चरित्र पडद्यावर उतरवण्याचा होता. मात्र टीआरपीच्या व्यावहारिक गणितामुळे ही मालिका ३४३ भागानंतर बंद करावी लागली. सुरुवातीला प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला, मात्र वेळेच्या बदलामुळे प्रेक्षक कमी झाला आणि पुन्हा पूर्ववत झाला नाही, असं स्टार प्रवाहचं म्हणणं आहे. या मालिकेत सागर देशमुख यांनी बाबासाहेबांची भूमिका चपखलपणे साकारली आहे. शिवानी रंगोले यांनी रमाई, तर मिलिंद अधिकारी यांनी रामजी सकपाळ उत्तम प्रकारे उभे केले आहेत. या मालिकेची लोकप्रिय झालेली जिंगल उत्कर्ष शिंदे यांनी लिहिली, तर आदर्श शिंदे यांनी गायली आहे. आपण ही मालिका हॉटस्टार आणि झी फाईव्हवर पाहू शकता.
दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी यांची ‘एक महानायक : बी. आर. आंबेडकर’ ही हिंदी मालिका डिसेंबर २०१९मध्ये प्रदर्शित झाली असून यशस्वीरीत्या या मालिकेने दोन सिझन झाले आहेत. आणि तिने तिसऱ्या सिझनमध्ये यशस्वीरीत्या पदार्पण केले आहे. हिंदी भाषिक दर्शकांचा उत्तम प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. हाही एक यशस्वी प्रयोग होताना दिसत आहे. यात बाबासाहेबांची भूमिका प्रकाश जावडे यांनी केली आहे, मात्र मराठी प्रेक्षकांना ही हिंदी मालिका तितकीशी आवडलेली दिसत नाही. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवांची गौरवगाथा’ या मराठी मालिकेवरून प्रेरित होऊन निर्मात्यांनी ही हिंदी निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबासाहेब मागच्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर येत आहेत, ही नक्कीच महत्त्वाची बाब आहे. दाक्षिणात्य सिनेदिग्दर्शक वंचितांची संस्कृती, दलित नायक आणि त्यांच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा सिनेमाध्यमाद्वारे प्रगल्भपणे दाखवत आहेत. शोषित-वंचितांच्या भावना, अन्याय-अत्याचार आणि त्यांच्या आशा-अपेक्षा, स्वाभिमान, मानसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी ते करत असलेले बंड, आता सिनेमांतून ठळकपणे येत आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पा. रंजितच्या ‘कबाली’ या सिनेमाचा निर्वासित लोकांचा नायक रजनीकांत म्हणतो, ‘आंबेडकरांसारखं आम्ही सुटाबुटात राहू’. रंजितचा दुसरा सिनेमा ‘काला’ अनेक प्रतीके-प्रतिमांतून बरंच काही सांगणारा सिनेमा आहे. दक्षिणात्य सिनेमा हा पर्यायी सिनेमा निर्माण करत आहे. तो जनसामान्यांचे रोजच्या जगण्यातले प्रश्न, जातीयता-लैंगिकता यांच्या आधारावर होणारे शोषण मुख्य प्रभावात बेधडक दाखवत आहे. आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
थोडक्यात, ‘कर्णन’, ‘सरपट्टा परंबराई’, ‘जय भीम’, ‘झुंड’ यांसारखे सिनेमे थेट आंबेडकरवादी सांस्कृतिक राजकारण करताना दिसत आहेत.
.................................................................................................................................................................
लेखक चंद्रकांत कांबळे सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे येथे वरिष्ठ संशोधक आहेत.
chandrakant.kamble@simc.edu
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment